एक ढगाळलेली संध्याकाळ
एक ढगाळलेली संध्याकाळ
उजेडातही अंधारल्यासारखं वाटावं, पलीकडे भिंती कोसळतायेत, घर कोसळतायेत अशा स्वरूपाच्या मेघ गर्जना अधून मधून, प्रत्येक जन घर जवळ करतोय, क्षणात सुरू होणारा पाऊस भिजवत राहतो सृष्टीला.
तापलेली मनं शांत होतात पावसाच्या भिजण्याने, सर्द होतात. सृष्टी ही सर्द झालेली, मातीनं ही भरवून घेतलं स्वतः ला पावसाच्या पाण्यात, झाडं न्हाऊन निघाली अन आता हुडहुडी भरली झाडांना, तसं पुन्हा त्यांच्यातलं पाणी झटकुन देतात आपण ओले केस झटकतो तसेच, एक छोटा पाऊस.
घराघरातले स्टोव्ह न गॅस पेटलेले, प्रत्येकावर चहाचे आधण ठेवलेले सुंठ टाकून, बाहेर तो बरसतोच आहे, आत चहा उकळत आहे, पवसासोबत येणाऱ्या गारव्याच्या त्या लहरींच्या सोबत चहा प्यायचा तो परमानंद, आह हा.
तिकडे चहाच्या टपऱ्यांवर, हॉटेल मध्ये लोकांची गर्दी, भिजत जायचं थोडंसं अन गरम कडक चहा प्यायचा, ज्यांचे गॅस, स्टोव्ह चालत नाहीत किंबहुना नाहीतच असा वर्ग.
उन्हाळ्यात बिअर पिऊन आंबलेली जीभ आता व्हिस्की चा धसका घेते, तसं बिअर बार वर गर्दी होते, खप वाढतो, आता आशा या मैफिलीत सिगारेट असणं वावगं नाही , ती हवीच असते ज्याला हवी त्याला.
दोन रजया अंगावर घेऊन हुडहुडत झोपायचं.
जमीनदार वापसा होण्याची वाट पाहत, आनंद घेत असतात पावसाचा. पिकांचा अंदाज बांधतात. शहरातली त्यांची पोरं त्या काळात परातलेली गावाकडं, एक महत्वाचा काळ, होणाऱ्या पिकावर वर्ष भराची फीस, रूम चा किराया, मेस ची बिलं द्यायची असतात. ती सारी फेड जिथुन होते त्याच्याशी जरा जवळीक. शेत मजुरांच्या खोलवर गेलेल्या खळग्या पाउस प्रवृत्त करतो नव्या जोमाने मेहनत करण्यासाठी या हंगामात.
रजई घेऊन झोपलेला सकाळी उठतो तेंव्हा त्याच्या ही मनात तिकडं जाण्याचा विचार, बाहेर पावसाची रिमझिम चालूच, विचारात अजून भर घालणारा तो पाऊस, सुट्टी मिळणार नाही हे माहीत असताना उगाच रेंगाळत रहायचं त्या विचारात, इतक्यात पाणी तापलंय अंघोळ करून घ्या घड्याळाचे 9 केंव्हाच वाजलेत असा आवाज, मनात येतं खर तर त्या पावसात भिजत च का करू नये अंघोळ, पण पून्हा आजारी रजा टाकण्या पेक्षा, बाथरूम मध्ये गरम पाण्याने अंघोळ करून पावसाला खिजवायचं.
ऑफिसभर फक्त पावसाची चर्चा, कोन किती भिजले, आमच्या भागात जास्तच झाला, या वर्षी बरा दिसतोय इत्यादी इत्यादी. नाजुक रोझी सर्दी झाल्याची सगळी नाटकं करते, नेहेमीप्रमाणे, बॉस तिला चिडवणार, आज रोझी ला काम नाही, फक्त लाड अन तशा तिच्या टवाल्या सुरू. एव्हाना पाऊस थांबलेला, काही वेळाने ऑफिस सुटण्याची वेळ अन पाऊस सुरू होतो. भिजत घरी जायचं, ओली स्वप्नं, आठवणी अन गावाकडे जाण्याची आंतरिक ओढ दाबुन ठेऊन. घरी गेल्या बरोबर एक कडक च्यायकी प्याली हो अशा अविर्भावात चहा मारायचा, उद्याच्या आशेवर.
एक जुनी आठवण न साठवण
शरद पुराणिक
हैदराबाद
Comments