पायलट-ड्रायव्हर अन होस्टेस-क्लीनर जोडगोळ्या
सात ते आठ महिन्यानंतर प्रवासाचा योग आला अन तो ही हवाई प्रवास. आता कोविड च्या दुष्टचक्रात प्रवासाचे ही नियम बदलले. विमानतळावर पोचलो अन नियमांची ती लांबलचक यादी पुन्हा एकदा वाचली. प्रत्येक जण एक दुसऱ्या कडे शंकेने पहात रांगेत लागलो. रांगेतच दोनीही बॅगा sanitizer मध्ये यथेच्च न्हाऊन निघाल्या. इथे ही बंदुक होतीच. तो आकडा कळेपर्यंत उगाच धस्स होतं. तिकीट, ओळखपत्र याची काचेच्या आतून चाचपनी झाली. पुन्हा मु दिखाई झाली, मास्क काढुन लावला. एरवी अदबीने केल्या जाणाऱ्या सर्व सेवा आता स्वयं करायच्या...बॅग स्वतः उचलून, टॅग लावून तपासून घेऊन, पुन्हा पट्ट्यावर सोडली. "मी ठणठणीत आहे असं एक पत्र स्वतः च्या सहीच दिलं". प्रस्थानाला अजून 45 मिनिटं होती, कारण ते आधीची एक ट्रिप करून एक जथ्था सोडून पुन्हा इथे आलं. हे म्हणजे आपल्या कडे खासगी गाड्या जश्या ट्रीप मारतं अगदी तसंच, फरक एवढा की हे रस्त्यावर (खड्यातून असंच लिहायचं होतं खरं तर), अन हे हवेत ( तो रस्ता त्या पायलट ला कसा कळतो हा एक प्रश्न मला सतत पडतो).
सर्व खुर्च्या व्यस्त होत्या, म्हणजे बस स्थानकावर असते तशी गर्दी. काही लोक तर अगदी चंद्रावर निघालेत असेच वाटले, पांढरे निळे फुल गाऊन, कपडे, त्या आत मास्क, त्या वर पुन्हा ग्लास शिल्ड. सोबत "शराबी" मध्ये बच्चन जशी भारी चपटी दर वेळेला खिशातून काढतो त्याच अविर्भावात बहुरंगी, विविध आकाराच्या सॅनिटायझर च्या बाटल्या काढुन तंबाखु मळावी तसे हात मळत होते. काही त्या गर्दीतही वेगळेपण जपण्याचा प्रयत्न, कारण अंतर ठेवणं गरजेचं आहेच. सर्वांच्या हातात हे खूळ (mobile) होतंच. तिथेच एका ट्रे मध्ये disposable apron होते अन ग्लास शिल्ड. ते घेऊन लोक आहे तिथे उलट सुलट न पाहता तिथेच ते घालून उभे, त्या सोबत एक नाडी दिली पण अनेकांचं लक्ष गेलंच नाही, अन ती तशीच अस्ताव्यस्त पडली. काही जण स्वतः ची शिल्ड असताना ही ती दिलेली घेऊन ठेवण्यासाठी धडपडत होते. आता हळूहळू अंतर कमी होत होतं. सुरुवातीचे काही सीट नंबर आत जाण्यासाठी उच्चारले अन हे शिकलेले सर्व जण आपला सीट नंबर न पाहता रांगेत. तरी ती इंग्रजाळलेली भारतीय बाई सतत सूचना करत होती, पण yeh mera India लोक सतत विचारत होते. अगदी धक्काबुक्की करून social distancing ला उधळून अक्षरशः धडपडत होती. विमान आतून sanitize होत आहे असं ते बाहेर सांगत होते. एकदाचं गेलो आत. हे म्हणजे मुक्कामाची एकच गाडी त्यात कोंबून जावं तत्सम भाव, अन दारात त्या होस्टेस होत्या अगदी तश्याच जसे "आपल्या गावच्या गाडीवर" ते बारके, भाऊ, पिंट्या, बाळ्या असतात. ते ओरडून कदाचित शिवी घालून तुम्हाला सूचना करतात. पण इथे शिस्तबद्ध इंग्रजी अन ते ही न कळणाऱ्या उच्चारात त्या सांगत असतात. सूचना नेहेमीच्याच, पेटी बांधा, दरवाजा इकडे, oxygen mask, इत्यादी. हे जेंव्हा घडतं तेंव्हा मला बस मध्ये पेन, डायरी, पुस्तक असं काही तरी विकतात ते लोक डोळ्यासमोर येतात.
या वेळी मला अगदी पहिलंच सीट मिळालं आणि अनेक गोष्टी जवळुन पाहिल्या. एवढया मोठया त्या विमानात या लोकांना बसायला छोट्या पट्ट्या अन त्यालाच पट्टा बांधुन ते बसतात. अगदी आपला बारक्या स्टीअरिंग च्या बाजूच्या त्या छोट्याशा जागेत बसतो. तो नेमका रस्त्यात असतो अन दर वेळी त्याला उठावं लागतं. यांचं ही तसंच आहे, सूचना झाल्या की प्रत्येक प्रवाशांना पाहायचं, बेल्ट लावला का, खिडकीच तावदान उघड आहे का? सीट सरळ आहे का. बर इन मिन 30 ते 50 मिनिटे हा प्रवास त्यात ही लोक घोडे विकून झोपतात, कोणी आरामखुर्चीत आहे असा आभास करतात, तर काही चुळबूळ करत राहतात. त्या वेळात ही toilet चा आवर्जुन उपभोग घेतात. आता असते एखाद्याला सवय, काय करणार ? सर्व जण स्थिरावतात इतक्यात ते पायलट साहेब एका विशिष्ट हेलात स्वतः ची ओळख, दुसऱ्या पायलट ची ओळख करून देतात. तो काय बोलतो हे सर्व भाषेत ऐकल्यावर पूर्ण कळतं. कारण कुत्र विमानाच्या मागे उभे असते की काय इतक्या घाईत तो सांगतो. हो इथेही दोन जण असतात जसे लांब पल्ल्याच्या गाडीला दोन ड्रायव्हर असतात, त्यातला एक जण बिनधास्त झोपतो, इथे याला झोपणं सोडा, आरामशीर बसण्याची जागा नसते. अन हे झोपले तर झालंच की.
पोटात गोळा ठेऊन विमान झेप घेतं, पायलट पुन्हा काहीतरी सांगतो. पण आमचं लक्ष समोर येणाऱ्या नाश्त्या कडे असतं. आता त्याचे विविध प्रकार असतात. कोणाच्या तिकिटात असतात, काही कंपन्या देतात तर काही ना नसतं. इन मिन 2 ते 3 प्रकार पण लोक अगदी हॉटेल मध्ये वेटर ला मेनू विचारावा असं विचारतात, पण मग मिळेल ते घेतात. आता या होस्टेस ते सर्व्ह करताना मला त्या बारक्याची आठवण झाली, त्याला असलं काही करावं लागत नाही, उलट ज्या धाब्यावर गाडी थांबवतो तिथे रुबाबात ताव मारतो. ते कुठे अन कसं ते मात्र दिसत नाही, ती त्यांची secret जागा असते. खाणं झालं की त्या बिचाऱ्या होस्टेस एक मोठी पिशवी घेऊन ते सर्व एकत्र करतात. अप पुन्हा त्या छोट्या जागेवर बसतात. त्या काय गप्पा मारत असतील हे कुतूहल होतंच, सहज म्हणून ऐकलं तर अगदी आपली गल्लीतली हिंदी अन घरचे गाऱ्हाणे करत होत्या. एअर होस्टेस च्या आधुनिक आणि इंग्रजी वेशात त्या महिला आता मात्र मला वेगळ्याच भासल्या. मग बारक्या आठवला तो आपल्या शेजारी स्वस्तात बसवलेल्या प्रवासी लोकांना किस्से ऐकवतो.
इतक्यात दोन चार पिल्ले ही होते प्रवासात ते धुमाकुळ घालत होते, अन त्यांचा बाप बेल्ट काढून त्यांना सांभाळण्यासाठी उठ बैस करत होता, लगेच या होस्टेस sir please take your seat, use the belt .. Don't move" असं काही तरी सांगत होत्या. मला वाटलं आपण बस किंवा आपे गाडीत तर नाही ना.
आता विमानाची उतरण्याची तयारी, पायलट पुन्हा काही तरी सांगतो, मला एकदा तो accent शिकायचा आहेच राव. मला लगेच आपल्या ड्रायव्हर ची आठवण झाली, तो ओरडतो खराडी, येरवडा. मग बारक्या ही सीट वर जाऊन अक्षरशः कानात ओरडतो पण जे सांगायचं ते स्पष्ट सांगत नाही. मग त्याचे अन ड्रायव्हर चे ते संवाद फार खास " अरे उणे पाशाभाई क्या भगारे, मै पिछे से बोलरा तो सूनरेच नई, उत्तेमे गाडी का पाटा आवाज कर्रा, आगे से वो बमबई की 4758 आरेली दिखी, माई बोला आबा दोनो गाड्या गले मील रे ..लफडा कररे" ,..असे अनेक किस्से ..इतते सिटा कायकू भररे सेठ लोग....
थांबलं विमान अन खाली उतरून पुन्हा तीर्थ, शुचिर्भूत अगदी बॅगेसहित ...पोचलो कोरोना नंतरच्या एका नव्या विश्वात जगण्यासाठी ...
आग्गे हौर मिलेंगे रे भाई ...कैसा जमता क्या है की..तब तक सिटा हौर पॅसेंजर पकड के रखो...
शरद पुराणिक
101120
Comments