शरीरशुद्धी ...
शरीरशुद्धी ...
ॐ अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपिवा ।।
यः स्मरेत्पुण्डरीकाक्षं स बाह्यभ्यन्तरः शुचिः ॥
माझ्या मागील अश्रूंची मालिका याचा हा तिसरा भाग. खरं तर मी याला अश्रूंची मालिका भाग 3 असं म्हणू शकलो असतो. पण मी जे लिहितो आहे आणि जे अनुभवलं आहे, हे त्याही पलीकडे एका वेगळ्या वळणावर नेऊन ठेवलेल्या गोष्टी, संदर्भ आणि अनुभवा विषयी आहे. याला एक हलका संदर्भ, माझ्या अग्निहोत्र या लेखाचा पण आहेच.
मी वरती जो मंत्र लिहून या लेखाची सुरुवात केली तो कुठल्याही पूजेला बसण्यापूर्वी उच्चारला जातो. पूजे ला बसणारे यजमान यांच्या सर्व शुद्धी साठी तो आहे, ज्या सोबत काही क्रिया पण आहेत, पण त्याचा इथे फारसा संबंध नसल्याने विस्ताराने लिहिणार नाही. त्याचा थोडक्यात अर्थ असा आहे की मी या पूजेला बसताना माझ्या शरीरातील, सभोवतालच्या वातावरणातील, आणि इतर सर्व अपवित्र गोष्टींना पवित्र करून, शरीर शुद्धी करून बसत आहे. देवाचं नामस्मरण करून मी ती शुद्धी प्राप्त करत आहे.
या मंत्राचा संदर्भ एवढ्यासाठी की सध्या "विनाशकारी" कोरोनाच्या विळख्यात जे जीवन आपण जगत आहोत त्या साठी. शासन यंत्रणा, डॉक्टर, कलाकार, शासकीय अधिकारी सर्व जण वारंवार सांगत आहेत, वेळोवेळी हात धुवून घ्या, बाहेर जाऊ नका, कोणाच्याही संपर्कात येऊ नका, अंतर पाळा इत्यादी. हे आपण करत नव्हतो असं नाही पण ज्या गतीने आपण धावत होतो तिथे हे जरा मागे पडत गेलं, आज आम्ही ते पुन्हा स्वीकारले, अंगीकारले.
आमचं बाहेर जाणं येणं, वाहनं, सर्व स्तब्ध झालं अन हे विश्व आधी मंदावले, स्थिरावले अन आता पूर्णतः (काही अत्यावश्यक सेवा वगळता) थांबले. स्वच्छ, मोकळी हवा, अगदी छोटे छोटे नाद आम्ही ऐकू शकतोय, स्वच्छ निरभ्र आकाश, मोकळा श्वास असं सर्व आंतर्बाह्य शुद्ध झालंय, होतय.
यातच अजून एक दिव्य गोष्ट म्हणजे दूरदर्शनवर दाखवल्या जाणाऱ्या रामायण, महाभारत अशा मालिकांमधून जे संस्कारांच शुद्धीकरण होतय ते सर्वार्थाने न भूतो न भविष्यती आहे.
नाहीतर सकाळी ऑफिसला निघाल्यापासून ते झोपेपर्यंत चे 20 मार्च आधीचे दिवस आठवा , तो कर्कश्य वाहनांचा आवाज, विनाकारण स्पर्धेत चालणारी माणसे न त्यांची वाहन, सकाळी सकाळी जिथे मंत्र म्हणायचे तिथे तोंडात शिवी आल्याशिवाय राहायची नाही. ऑफिसचे ते नाटकी चेहेरे अन तिथेही पुन्हा ती जीवघेणी स्पर्धा, राजकारण, दबाव इत्यादी.
पहिला आठवडा जड गेला कारण बदल असा सहज होत नाही, पण विविध संस्कारातून अंतर्बाह्य होणारी शुद्धी हे एक अनमोल वरदान या काळानं दिलें, याचे आभार मानायचे की अजून काय कळत नाहीये. नुकसान आहेच, अतोनात आहे, पण या परिस्थितीत आपण जे शिकत आहोत ते त्याही पेक्षा खूप मौल्यवान आहे, भविष्याची एक पुंजी म्हणा हवं तर.
जिथे एकमेकांना दिसणं दुरापास्त होतं, तिथे सर्व जण चहा, नाष्टा, जेवण आणि घरकाम असं सर्व एकत्र अनुभवतो आहोत. संपलेला संवाद पुनुरुज्जीत झाला. PubG मध्ये व्यस्त असणारा पोरगा धनुष्यबाण, भाले, हे खेळ खेळतोय. मुलांचे कलागुण आईबाप याची देही याची डोळा अनुभवत आहेत.
धुळ खात पडलेल्या अनेक आठवणी घराच्या अनेक कोपऱ्यातून अश्या मोती रुपी बाहेर पडत आहेत. सतत फोन कडे पहात शून्य मिनिटात देव पूजा आटोपणारा निवांत देवाशी हितगुज करत पूजा करतोय. हॉटेल, टपऱ्या, ठेले बंद असल्याने घरचे जेवण, ते ही गरम गरम. ज्या छोट्या छोट्या सुखासाठी वेळी बॉस शी भांडणे करणारे आपण आज त्या सुखात अक्षरशः लोळत आहोत.
रामायण या मालिकेतील संस्काराची शिदोरी तर एवढी मिळालीय की मन, शरीर, हृदय पूर्ण पणे धुवून काढलंय, अगदी एक जुनाट तांब्याचं भांडं पितांबरीने घासून चमकत तसं.
अनेक भावनिक प्रसंगातून खळ खळ वाहणारे डोळे ही तसेच स्वच्छ, शुद्ध. आम्ही एवढं असं एकत्र अनुभवलच नाही मागच्या काळात, कोरोना शाप की उशाप माहीत नाही.
डोळ्यांची घळ घळ, टप टप, तोंडाला कोरड, शब्द न फुटणे, आणि बरंच काही. अनुभवलं रामायण मालिका पाहताना. अजून ही मी त्याच मातीवर आहे जीथे श्रीरामचंद्र वनवासातून परतले आणि अयोध्येत नतमस्तक झाले.
एक एक पात्र, एक एक घटना, एक एक प्रसंग असा काही बिंबवला आहे आत खोलवर, त्या रामानंद सागर यांचे आणि समस्त समूहाचे ऋणी आहोत, अगदी तूर्त थांबवलेल्या गृह कर्जा पेक्षा ही मोठं ऋण, ज्याची परतफेड नाही. पण त्याचं जतन करून ते तसेच जपून ठेवायचे अगदी तसेच जशी जुन्या काळात कस्तुरी एका छोट्या डबीत घरात सर्वात सुरक्षित जागेत ठेवायची. ती डबी नुसती उघडली तरी तो कस्तुरी सुगंध अख्ख्या घरात दरवळायचा, अगदी तसेच.
काय, किती अन कसं लिहू याच संभ्रमात थांबतो.
शरद पुराणिक
31 वा lockdown दिवस
24 एप्रिल 2020 - हा दिवस ही अशाच या आजच्या युगातील मर्यादा पुरुषोत्तम सचीन तेंडुलकर याचा जन्मदिवस
Comments