जरा उशिरच झालाय हे लिहायला ...
जरा उशिरच झालाय हे लिहायला ...
गेले काही महिने अनेक कार्यक्रम, सोहळे, भेटी गाठी न सुट्टी असं व्यस्त व्यस्त जगत होतो, पण या व्यस्ततेत एक आल्हाद, सुखद, आंनद लहरी असा अनेक प्रकारच्या तरंग आणि लाटांतून काळ घालवला. काही दुःखद घटना ही घडल्या अन तद्नंतर आज अचानक आठवलं.
या सर्व उशिराला एक व्यक्ती जबाबदार आहेत, एरवी प्रचंड गतिमान जगणारे आमचे मित्र, अशा गोष्टींमध्ये थोडे आळशी झाले, कार्यक्रमाचे त्यांनी अति उत्साहात काढलेले फोटो अनेकवेळा आठवण देऊन ही पाठवले नाहीत, हे मुख्य कारण उशिरा लिहिण्यासाठी.
आमचे जीवश्च मित्र संजय पिंपळकर यांच्या लग्नाचा 25 वा वाढदिवस औरंगाबाद येथे साजरा झाला.
आजकाल आपण मोबाईल ला खूप खूप नावं ठेवतो , अनेक जण बोटं मोडून न कपाळी आठ्या आणून का होऊना वापरतात. पण त्याने माणसं जवळ आली आहेत, कुठल्याही माध्यमात का होईना, संवाद होतोय, सतत होतोय हे खरंय. त्या मुळेच असे सोहळे पटापट आयोजित होत आहेत.
सायली, संजूची मुलगी हिनं हा सोहळा एकहाती आखला, नियोजीला अन अत्यंत दिमाखदार पार ही पाडला. C. A. च्या अभ्यासाच्या व्यग्र वेळापत्रकातून तिने हे केलं ही अजुन महत्वाची गोष्ट. नाही तर हल्ली ज्येष्ठ लोक विनाकारण तरुण पिढीवर ताशेरे ओढून ते किती निष्क्रिय आहेत , इत्यादी इत्यादी उपमा देऊन खरे गुण आणि त्यांची प्रशंसा करत नाहीत.
माझा संजूचा मैत्री प्रवास अंबाजोगाई ला १९८६ पासून सुरू झाला. रविवार पेठेतला हा केवला खवचाड बाबरूचा (याचा अर्थ मला माहित नाही, ही एक सांकेतिक संज्ञा आहे आमच्या महाविद्यालयात वापरली जायची). तसा स्पष्ट वक्ता, जन्मतः आणि आजही steel body अशी शरीर यष्टी, अत्यंत मार्मिकपणे टोले देणारा. 2 ते 3 वर्ष एकत्र शिकून आम्ही नोकरीसाठी औरंगाबाद गाठले. घरच्यांचा याला विरोध होता, पण आम्ही बाहेर पडलो. अर्थात हातात नोकऱ्या होत्या.
राहायच्या खोल्या वेगवेगळ्या होत्या, पण सुटीच्या दिवशी आम्ही एकत्र असायचो. हळू हळु औरंगाबाद येथे ही आमचे अनेक मित्र झाले, परत तेच लोग आते गये और कारवां बनता गया. या सर्वां मध्ये मी न संजू आंब्याचे बाकी सुहास जोशी, सुनील देशपांडे, विश्वास जोशी, मदन देशमुख, वेगवेगळ्या ठिकानाहून होते. म्हणतात ना मैत्री ला काहीच बंधनं अन मर्यादा नसतात , ऋणानुबंध ते होतात आपोआप. प्रशांत कुलकर्णी हा एक दुवा या ही समूहात होताच. प्रशांत न मी तसे अनेक धाग्यानि एकाच दोरीत विणलेले आहोत.
प्रत्येक जण साधारण कुटुंबातील होतो, आणि स्वबळावर नोकऱ्या मिळवून आयुष्यात स्थिरावत होतो. तेंव्हा च आमची मैत्री घट्ट घट्ट होउन आकार घेत होती. सर्व भावी नवरदेव सोबत फिरत होतो अन हळू हकु लग्नाच्या बेड्या जवळ करत होतो. आधी सुनील, नंतर संजू चे लग्न झाले. सुनील च्या तर मुलगी पाहणे, बैठक, साखरपुडा, लग्न अश्या सर्व कार्यक्रमात मी होतोच. तसंच संजूच्या ही लग्न आणि चर्चा यात होतो. त्या काळी ही नोंदणी विवाह केला या बहाद्दर मित्राने. आता आम्ही इतर अविवाहित होतो. या दोन वाहिन्यांना या दिरांचा आधार कमी अन त्रास जास्त होता. जेवणे खाणे, पार्ट्या, क्रिकेट च्या मॅच पहाणे, असे सर्व कार्यक्रम यांच्याच घरी व्हायचे. आपल्या घरुन असेल नसेल ते घेऊन रोज अंगतपंगत, कधीही आम्हाला कंटाळा आला नाही ना या अर्चना पिंपळकर वहिनी ना संगीता देशपांडे वहिनी यांनी कंटाळा केला. आम्ही निशाचर रात्री बेरात्री वेळ होईल तेंव्हा यांच्या घरात दत्त म्हणून हजर. मध्यरात्री कुकर च्या शिट्या त्या कॉलनीत घुमायच्या. त्या नंतर चहाचे आधण, अन साधारण पहाटे 2 ते 3 वाजता या मैफिली संपायच्या. एक ना अनेक किस्से आहेत. त्यात या वहिनी जेंव्हा माहेरी जायच्या तेंव्हा त्या घराचा फुल चार्ज आम्हा मित्रांकडे. जी वहिनी गावाला तो आमचा मुक्काम. रात्र रात्र पत्ते खेळायचे, भूक लागली की डब्बे उघडायचे , कधी पोहे, चिवडा मिळेल ते हानायच. चहा, कॉफी तयार करायची. त्या येण्या आगोदर घर पुन्हा साफ सुफ करुन ठेवायचं. आता विश्वास च ही लग्न झालं होतं. स्मिता विश्वास, हे सर्व आवरून रात्री साधारण 11 वाजता चक्कर टाकायचे, अन गप्पांचा फड पुन्हा रंगायचा.
अशा गमती जमती अनेक आहेत. क्रिकेट वर्ल्ड कप मॅच एकाच ठिकाणी सर्वानी बघायची. इथे ही अनेक नियम होते, देशपांड्यांनी उशी दुमडून एकदा शरीराचा अमिबा केला की विकेट जायची, तिकडे विकेट गेली की विश्वास बाहेर जायचा, म्हणजे बॅट्समन धुंवाधार फलंदाजी करायचे, असे एक ना अनेक समज गैरसमज होते. चहा पाणी, फरसाण असं मधे मधे किती वेळा व्हायचं त्याची गिणती नाही, त्या माऊलीच जाणे.
आता मुलं ही होत होती, वहिन्या बाळंतपण साठी जात होत्या, आम्हाला मोठ्या सुट्ट्या मिळत होत्या अन आम्ही ही हळू हळु बोहल्यावर जाण्यासाठी तयार होत होतो.
संजूचा कार्यक्रम सुरू झाला अन सायली ने सूचना केली की शपू काका बोलतील, क्षणभर गोंधळलो, खूप खुप बोलायचं होतं, अनंत विषय होते, काय बोलू न काय नाही असं झालं , वेळ नव्हता तेंव्हा उरकलं अन आज लिहावं म्हणून लिहिलं.
प्रशांत ने ही सुंदर प्रतिक्रिया व्यक्त केल्या, त्याच्या बोलण्यात एक परिपक्वता होती, जी त्याने आयुष्याच्या अनेक चढ उतारात स्वानुभवाने मिळवली आहे.
मधल्या काळात अनेक स्थित्यंतरे झाली, सर्वांचे विवाह झाले, मुलं झाली, विषेश म्हणजे सर्वांची मुलं एकाच हॉस्पिटलमध्ये जन्मले. स्मिता विश्वास तिथेच बाजूला असल्याने प्रत्येक बाळंतिणीला तिचा वरण भात, उकळलेले पाणी मिळाले. सर्वांचा डॉक्टर ही एकच, डॉ बन्सल. दीपा मदन ही तिथेच excise quarters मध्ये होते. सुहास, संजू न सुनील तर एकाच कॉलनीत. हाकेच्या अंतरावर घरं होती. मी ही तिथेच समोर होतो. असं हे आमच वसुदेव कुटुंबकम. आठवणीचा एक प्रचंड खजिना आहे पण तो सगळा इथे ओतायला खूप जागा लागेल, अन वेळ ही लागेल. एकमेकांना लग्न कार्यात मदत, बहिणींच्या लग्नात, घरेलू अनेक विषयांमध्ये सक्रिय भाग अगदी बहिणींच्या सासरी सुद्धा.
सायलीच्या नियोजनात कुठलीही कसर नव्हती, आदरातिथ्य, चविष्ट भोजन, विशेष म्हणजे संजूच संपूर्ण कुटुंब, 5 भाउ, वहिनी, आई वडील अन पुढची पिढी अगदी सुना जावई यांनी पुढाकार घेवुन हा कार्यक्रम केला. संजूच्या भाउ आणि वाहिणींनाही आम्ही बॅचलर जीवनात त्रास दिला, अन त्यांनीही तो दीर समजुन आनंदानं आणि खुशीत घेतला.
त्या निमित्ताने सर्व मित्र, पुढची पिढी असे एकत्र जमलो अन ती पूर्ण सीडी रिवाईंड झाली.
शरद पुराणिक
24 जानेवारी 2020
Comments