पवित्र श्रावण महिन्याचा शेवट,
काही काही शुभ दिवस एवढ्या गोष्टी सोबत घेऊन येतात की मनाच्या अंतरंगात विविध छटा आकार घेत हर्षोल्हासाचे इंद्रधनू रेखाटतात. या प्रत्येक छटा आणि तिचा रंग हे त्यांचे वैविध्य आणि महती सोबत घेऊन येतात.
आज नेमकं हेच झालंय,
पवित्र श्रावण महिन्याचा शेवट, अमावस्या, बैल पोळा. आता खरं तर या आधीही अनेकदा मी लिहिलेच आहे की काही विशिष्ट दिवस हे फ़क्त त्या दिवशी साजरे न होता, ते रोजनीशीत, दैनंदिनीत नेहेमी होतच असतात... आजच्या दिवशी हिंदु संस्कृती प्रमाणे मातृदिन साजरा होतो. लहानपणी पासून आम्ही हा साजरा करतो तो एका वेगळ्या पद्धतीने. आई त्यादिवशी विशेष अशा सांजाच्या पुऱ्या, त्यासोबत तूप साखरेचे दिवे, त्यावर तुपाची वात आणि एका वाटीत खिर असं एक औक्षण ताट करून देवासमोर बसते. आपण तिच्या मागे उभे राहायचे. ती विचारते "अतीत कोण"? आपण सांगायचे "मीच" असं तीन वेळा करून, ती या आशीर्वाद रुपी अक्षता समोरच्या बाजूने आपल्यावर वाहते. तो तूप साखरेचा दिवा नंतर आपण सेवन करायचा असतो. या नंतर असं ही पोळ्यासाठी म्हणुन मिष्टान्न भोजन असतेच त्याचा आस्वाद घ्यायचा. मी ज्या ज्या वर्षी घरी नव्हतो, किंवा सुटी नसेल तर आईने मागच्या काही वर्षांत हा आशीर्वाद फोन वर दिलाय. सध्या सर्वच घरी असल्याने आज पुन्हा तो योग आलाच. सोबत फोटो जोडत आहे. माझ्या आईप्रमाणे सौ. अनिता ही दर वर्षी आवर्जून निशांत आणि हर्षल ला हे वाण देतेच. ज्येष्ठ बंधु बाळासाहेब औरंगाबादला असतात, त्याला ही फोन वर आज वाण दिले.
वर सांगितल्या प्रमाणे पोळा हा सण ही आज असतो. खरं तर आम्ही नोकरदार घर असल्यामुळे शेती, बैल, गाय तत्सम गोष्टी नाहीतच. पण मला कळण्या पूर्वी पासून मातीचे बैल आणून त्यांची विधिवत पुजा करण्याची प्रथा आमच्या कडे आहे. त्याच सोबत कागदावर पोळा चे चित्र काढून ही पुजा असते. विशेष म्हणजे या बैलांना शिंगात घालण्यासाठी तळलेले वळीव लाडू करतात, कार्पाश वस्त्र, फुल अशी पूजा होऊन मिष्टान्न नैवेद्य दाखवला जातो (शक्यतो पुरण पोळी, पण श्रावणात इतर अनेक दिवशी पुरण हे होतंच असते म्हणून काही तरी वेगळे पदार्थ ही करतात. सोबत या वर्षीच्या पुजेचा फोटो जोडला आहेच. खरं तर पुण्यात आमच्या मराठवाड्यासारखे मातीचे बैल मिळत नाहीत ही खंत कायम आहे. तिकडे अगदी खिलारी बैलांची जोडी सोबत छोटी दोन बैल आणि गाय असे पाच एकत्र मिळायचे. इथे साच्यात तयार केलेले बैल मिळतात. इतरत्र कुठे मिळत असतील तर माहीत नाही पण मी चिंचवड इथे 1 वर्ष आणि गेली 16 वर्ष कोथरूड ईथे आसपास मिळत नाहीत.
वरती उल्लेख केलेल्या प्रमाणे आम्हाला शेती वगैरे नसल्याने त्या बळीराजाची आणि वर्ष भर त्यांच्यासाठी राबणाऱ्या बैलांना अशी कृतज्ञता दर्शवून हा सण साजरा होतो. ज्यांच्या कडे शेती, बैल, गाई असतात त्यांच्यासाठी हा खूप मोठा सण आहे आणि महिना भर आधी त्याची तयारी होते. बैलांसाठी झुल, शिंग रंगवायची, त्यांना जरा भादरून आणायचे, दिवसभर उपवास ठेऊन, बैलांना पुरणपोळी खाऊ घालून मग सर्व जेवणार आणि त्या नंतर गावात त्यांची मिरवणूक.
आजची अमावस्या ही दर्श पिठोरी अमावस्या आहे. 64 योगिनी याचे दैवत असून त्याची ही पूजा होते.
अशा विविध छटांचा हा दिवस छान जात आहे ...भरपूर हादडल्या नंतर झोपण्याऐवजी हे लिहून काढले ...
तस आपण रोजच बळीराजा, त्याची बैल आणि इतर व्यवस्था ज्या मुळे आपण रोज चविष्ट भोजन घेतो त्यांचे आभार मानले पाहिजेत ...रोज शक्य नसेल तर निदान या निमित्ताने तरी ....
शरद पुराणिक
180820 पोळा
Comments