पु ल यांचं 101 वा जन्म समरण दिन.
आज आदरणीय भाई,
पु ल यांचं 101 वा जन्म समरण दिन...ते आज असते तर 101 वर्षांचे असते, पण त्यांनी दिलेलं साहित्य, दिलेला आनंद पिढ्या न पिढ्या पुरून उरेल. जो वर चंद्र, सूर्य, तारे आहेत तो वर त्यांचं हे साहित्य तसंच तळपत, उजळत, चमकत राहणार. आज काही तरी लिहून त्यांना हे शब्द तर्पण द्यावे, म्हणून लिहायला घेतलं.
सध्या मी हैदराबाद ला आहे, त्या मुळे खाण्यासाठी दर दर भटकणे आले (पैसे देऊन). रोज कंपनीत व्यवस्था असते पण आज सुटी. तरी ही नाष्टा आणि रात्रीचे जेवण याची भ्रांत असतेच. म्हणून चालत दर कोस, दर मजल करत फिरत होतो. ,कुठं जावं काय खावं हे नेहेमीच छळणारे प्रश्न. त्यात वाहन ही नाही, मग जवळपास जे असेल ते...पोचलो इथल्या Chutneys या खास दाक्षिणात्य खाऊगिरी अड्ड्यावर. इथे सर्व पदार्थ छान केळीच्या पानावर अन असली चवीचे मिळतात. समोर तापमान तपासणीच्या बंदुकीने रोखले...नंतर एखा भव्य यंत्रांतून तिर्थ घेऊन त्याने हात घासून घेतले अन एकदाचं "अपवित्र पवित्रो वा" करून, मुखवटा काढून कॅमेऱ्याला मु दिखाई केली. हल्ली हे तर new normal आहे. सर्वच ठिकाणी आहेत.
आत पोचलो तर एकदम दवाखान्यात किंवा शस्त्रक्रिया गृहात आलो की काय असा भास झाला. सर्व कर्मचारी शिरस्त्राण, मुखवटे, हात मोजे अन एकाच गणवेशात होती. सामाजिक अंतरीकरण करून एक जण एका कोपऱ्यात तर एक दुसऱ्या कोपऱ्यात असं विलगिकरण. मेनू कार्ड ची जागा एका छापील कागदाने घेतली अन अनेक पदार्थ गायब होते. मला एक गोष्ट कायम आवडत नाही ती म्हणजे बस स्टँड वर जाऊन विमानाची चौकशी, किंवा वैशाली ला जाऊन मिसळ खायची, इराणी हॉटेल मध्ये इडली किंवा कांदाभजी, कोल्हापुरी हॉटेल ला जाऊन वडापाव, पिझ्झा किंवा डोसा खायचा. पण हल्ली विचित्र संयोजन असतात सर्व ठिकाणी.

आसनस्थ होऊन ऑर्डर दिली एकदाची, फावल्या वेळात काय करायचं ? बरं सतत मोबाइल मध्ये डोकावून उगाच आपण टाटा, बिर्ला (,यांचं नाव अजून येतंच), अंबानी वगैरे आहेत असं भासवण्याची मला कधीच गरज वाटली नाही. किंवा उगाच गंभीर चेहेऱ्याने त्यात गुंतून करोडचे व्यवहार करतोय असं दाखवता येत नाही. बरं तिथल्या वेटरला हे कळत असतं :) . आजूबाजूला काही लोक इथेही नूडल्स आणि काही बाही खाण्यात व्यस्त आहेत. जिथे खमंग लज्जतदार इडली, डोसा, सांबर, वडा, पेसरट्टू असे। विविध चवदार पदार्थ असताना लोक हे का खात असतील ?? काही जण त्यांच्या मेकअप मध्ये इतके गुंतलेले आहेत की एका हातात चमचा, एक हात अधून मधून केसांवरून, एक हात मोबाईल अगदी श्वासासारखा सांभाळून ...अन या दरम्यान होणारी तारांबळ लपवून खाण्याचा केविलवाणा प्रयत्न. बरं हे इतके तयार होऊन येतात की यांच्या कडे कोण कोण पाहतय ते पाहण्यासाठी यांच्या सोबतचे लोकं व्यस्त. एवढं सौन्दर्य (?) सोबत असताना काही जण इतरत्र त्यांचे कॅमेरे फिरवत राहतात. काही जण आपली डिश सोडून पूर्ण लक्ष इतर टेबलावर. इतकं की तो चमचा तोंडा ऐवजी दुसरीकडे जातो... तरी हे तसेच. सोबत ची तरूण मंडळी उगाच अगदी उगाच मोबाईल मध्ये गुंग "बहुतेक हरवलेला संवाद शोधत असावेत" भोळा विचार माझा. ते इतके तुटक राहतात की सोबतचे यांच्या ओळखीचे नाहीत असे वाटते. Excuse me, bowl please, finger bowl please असे अगदी काही डझनभर इंग्रजी शब्द फेकून मारले तेवढाच काय तो संवाद ...बाकी पदार्थ कमी अन भांडे जास्त अन त्यांचा आवाज हे संगीत असतं. काहींचा मेकअप एवढा की आता यांचं एक तर शूटिंग आहे, किंवा बोहल्यावर चढणार, किंवा आंतरराष्ट्रीय सौन्दर्य (??) स्पर्धेत सहभागी होणार की काय असा प्रश्न पडतो. समस्त भगिनींची माफी मागून ..हे फक्त संदर्भ म्हणुन.

दरम्यान काही झुंडी येत असतात, येतानाचा तो अविर्भाव म्हणजे आता काही क्षणात ते हे हॉटेल खरेदी करणार किंवा कोणीतरी सेलिब्रिटी आहेत की काय असा. पण तोंड उघडताच त्यांची हुशारी कळते, खुर्च्यांची चेंगराचेंगरी करून एकदाचे स्थिरावतात. त्यातच एक हुशार मेनू चं revision , अभ्यास करून काही तरी ऑर्डर देतो, हे देताना कधीही एकमत नसतं. वर सांगितल्या प्रमाणे सर्व घटनाक्रम होऊन बिल येतं अन मग चेहऱ्याचे हावभाव बदलतात, त्यात बिल देणाऱ्यांची बायको आणि ह्याची झालेली नजरानजर...ज्या तावातावाने येतात ती गती मंदावते, जड आणि संथ हात खिशात जातात.
तो वर माझा दोसा आलाच, त्या वर यथेच्च ताव मारून मी पुनःश्च एकदा तिर्थ हातावर घेऊन हॉटेल कडे निघालो नवीन अनुभव टिपण्यासाठी.
शरद पुराणिक
081120
Comments