माझ्या गावी बीड ला चुलत भावाच्या लग्नासाठी

 1 डिसेंबर ला





माझ्या गावी बीड ला चुलत भावाच्या लग्नासाठी गेलो होतो. तसं आमच्या भावंडांच्या रांगेतील हे तसं शेवटून दुसरं कार्य, अजून एक बाकी आहे. 


वयाच्या पन्नाशीत असं कार्य पाहायला आणि अनुभवायला आम्ही अत्यंत उत्सुक होतोच. मुलांच्या परीक्षा असल्याने आम्ही उभयतांनी जाण्याचे योजिले.  दोघंच होतो त्या मुळे बस ने प्रवास करून पहाटे पोचलो.  त्याच दिवशी देव ब्राम्हण असल्याने पहाटेच लगीन घाई सुरू झाली होती. 


माणसाची नाळ आपल्या मातीचे गुण आणि वाण सोडत नाही. खरं तर हल्ली शहरात राहून बडे जावं आणि चोख व्यवस्था, प्रचंड खर्च, दिखावा असं एक साधारणपणे चित्र असतं कुठल्याही कार्यात, पण ते सारं क्षणिक, दांभिक आणि काही तासांपर्यंत टिकणार असतं. तो झगमगाट मला कधीही आपलंसं करून गेला नाही, ना त्या अति उच्चभ्रू वातावरणात मी कधी रमलोच नाही. 


इथे उतरताच एक कार्य संचार भिनतो शरीरात, तहान भूक विसरायला होते, इथे असते ती आपलेपणाची, भेटी गाठींची भूक. अगदी तसंच काही झालं. थोडावेळ पडू म्हणून विचार करत असतांनाच डोळा लागला आणि काही वेळाने काकीने आवाज दिला चला रे चहाला, हे सकाळी 6 वाजता. थोडं दुर्लक्ष करे पर्यंत अजून दुसरं आमंत्रण. एकदाचा चहा झाला, साधारण 8 वाजेपर्यंत 3 वेळा झाला. नाहीतर इकडे शहरात मंगल कार्यालयांत घंटीच्या तालावर सर्व, वेळेत पोचलात तर ठीक नाही तर स्वखर्चाने , एखाद्या कारागृहात आल्या सारखे नियम. कार्याचा तो मनमुराद आनंद खरा इकडेच.


पूर्वी पेक्षा खूप बदल झालेंयेत नक्की पण माणुसकी, आपुलकी आणि मायेचा ओलावा तो इकडेच. 4 पदार्थ कमी पण जे आहे ते अगदी निखळ स्वच्छ यथेच्च. खऱ्या अर्थाने परिपूर्ण. 


ज्या काकांच्या मुलाचं हे लग्न होतं त्यांना 2 मुलं, काकांना कुठलीही नोकरी नाही, धार्मिक व्यवसायातून सुरुवात करुन त्यांनी त्यांचा जीवनप्रवास सुरू केला. काका अन काकू तसे फार शिकलेले नाहीत, तेंव्हा त्यांच्या मुलांचं काय होइल याची एक विनाकारण शंका इतर नातेवाइकांना होती. पण प्राप्त परिस्थितीत बीड सारख्या गावात दोनही मुलं आज स्व कर्तृत्वावर खंबीरपणे उभे आहेत, आणि स्वप्नवत वाटावं असं जीवन ते आज जगतायेत. कुठल्याही मार्गदर्शन किंवा पाठिंब्याशिवाय त्यांच हे यश खरंच वाखाणण्या सारखे आहे.


त्यातच त्यांची माणसं जोडण्याची कला ही त्यांच्या यशाचं गमक आहे.  स्थानिक पातळीवर त्यांनी गोळा केलेला तो नात्यांचा स्नेहाचा संबंधांचा गलबला लग्नात पाहिला अन मी अवाक झालो. प्रत्येक पातळीवर त्यांचं लहान असून ही झाकळणार मोठे पण दिसून आलं.


त्यांच्या याच प्रेमाला साक्ष ठेवून झाडून पुसून सर्व नातेवाईक आले, नात्यांचा तो कुंभमेळा फुलवून गेला तिथला आसमंत, धरती, हवा आणि वातावरण. एक तर या काळात एवढी मंडळी एकत्र येणे याला फक्त नशीब, सुस्वभाव आणि संस्कार असावे लागतात सोबतच ते सर्व सहन करून त्यातून आनंद शोधण्याची वृत्ती लागते.  आम्हा पुराणिकांना ही पूर्वजांची पुण्याई म्हणून देणगी रूपात प्राप्त आहे.  तिचं संवर्धन ही आमच्या पिढीची आणि पुढल्या पिढीची जबाबदारी आहे. म्हणुन माझं सर्वांना सांगणं आहे, उतणार नाही मातणार नाही, घेतला वसा सोडणार नाही, हे आपण कायम लक्षात ठेवू.


आमचे सर्व काका, काकू, चुलत भाऊ बहिणी वहिनी भाऊजी, आत्ये भाऊ बहिणी वहिनी भाऊजी, सोयरे , आणि इतर आप्तेष्ट त्यांना सर्वाना याच श्रेय देतो, लोग आते गये और कारवा बनता गया.  


तसं आमचं घर म्हणजे आत्यंतिक धार्मिक, अग्निहोत्र आणि पुराणिक अशी दुहेरी प्रतिमा आणि इतिहास. त्या मुळे अथ ते इति पर्यंत सर्व धार्मिक पद्धतीने होतं, त्याला कुठलाही, कधीही अपवाद नसतो. या वातावरणात ही आमच्या सर्वांच्या आई, काकु,  त्या नंतर आलेल्या आमच्या सर्वांच्या सौभाग्यवती, सुना आणि सर्व यांनीही याचा आनंदाने स्वीकार केला. हे करतानाही त्या प्रचंड धमाल, मस्ती, दंगा करतात. एकमेकांना चिडवणे, मज्जा घेणे, आणि कपाळावर एक पुसटशी सुद्धा रेघ न येता अति उत्साहाने  कष्ट, अपार मेहेनत घेऊन त्या आनंदाला चार चांद लावतात.  या लग्नात ही त्यांनी हे करून दाखवलं. सोबत सारी चित्रं जोडणार आहेच.


सोशल मीडिया ला कोणी कितीही वाईट म्हटले तरी कुटुंब आणि माणसं नक्कीच जवळ आलीत. पण आधीच सांगितल्या प्रमाणे आमचे genes त्याच धाटणी चे असल्याने आम्ही तसेच आहोत, राहणार आहोत घट्ट, एकत्र कायम. पुढच्या पिढीला ते कितपत शक्य होईल माहीत नाही, पण आशा आहे कारण याच संस्कारात ते ही फुलत आहेत.


अशी ही दिव्य मेजवानी 2 दिवस घेऊन, त्या आठवणी चे गाठोडे उराशी घट्ट ठेवून उशाशी, मी माझ्या परतीच्या प्रवासाला निघालो, त्यात थोडीशी जागा ठेवून, पुढच्या वळणावर काही मिळाल तर ते वेचून पून्हा ठेवण्यासाठी.


शरद पुराणिक

हैदराबाद, 5 डिसेंबर 2019

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती