आट पाट नगराची माझी कहाणी
आट पाट नगराची माझी कहाणी
जो जो वाचेल तो तो आपली आपली कहाणी आठवून गत काळात नक्की रममाण होईल, हेची माझें सांगणे, उतणार नाही मातणार नाही आणि कधीही या गोष्टी विसरणार नाही.
बडेगाव अर्थात बरदापुर नामक एका छोट्या नागरातली ही कहाणी. तुम्ही म्हणाल अरे ते तर खेडं गाव, पण आम्ही ऐकलेल्या कहाण्यात जशा विविध नगरी असायच्या, म्हणजे मिथुला नगरी, अमुक नगरी तमुक नगरी तशीच ही ही. आमचा जन्म तसा शहरी भागातला, अग्निहोत्र, पुराणिक असा धार्मिक आध्यात्मिक वारसा असलेल्या कुटुंबात झाला, अनेक दिव्य घटना जरी शिदोरीत होत्या, तरी त्या नगरी सारखी हिरवी गर्द चादर काही आमच्या कडे नव्हती. म्हणूनच त्या नगरी विषयी एक विशिष्ट आकर्षण होतं, आहे आणि राहील ही.
भव्य दिव्य नसला तरी मायेच्या आणि प्रेमाच्या तटभिंती आत, स्नेहाणं आणि आपुलकीने लख्ख असा तो मावशीचा वाडा. बाजूला अजून एक वाडा, समोर गोमाता आणि सर्ज्या राज्या दिमाखात नांदायचे तो गायवाड़ा. तिथल्या गादीवर बाप्पा म्हणजे मावशीचे सासरे यांचं साम्राज्य. हल्ली शेणाचा नुसता वास आला तरी तोंड न नाक मुरडतात. मला मात्र तिथे पाऊल ठेवताच तो सुगंध आकर्षित करायचा. बाप्पा त्यांच्या सिंहासनावर ताज्या हिरव्यागार पळसाच्या पत्रावळी आणि द्रोण तयार करत बसायचे. ते सारखं पाहत रहावं वाटायचं. भुकेची वेळ होताच एका खड्या आवाजात ते आरोळी ठोकायचे, अन अगदी त्या पावली ते चालत मुख्य महालात यायचे. म्हणजे ओसरीवर. स्वतः एका पाटावर अन ताट ही पाटावर असा तो भोजनाचा थाट.
ओसरीवर अर्धी भिंत, त्या पलीकडे भटारखाना अर्थातच स्वयंपाकघर, भिंतीआड राणी साहेब चुलीच्या धुरात गरम गरम जेवण तयार करण्यात व्यग्र. मोठ्या राणी साहेब अर्थात मावशीच्या सासू देखभालीसाठी तिथेच हजर असायच्या. सोबत राजे म्हणजेच अण्णा असायचे. ती पंगत होईस्तोवर एकदम कलम 144.
माझ्या सोबत इतर नातवंड ही या नगरीत दर उन्हाळी सुट्टीत यायची, शरद, नरेंद्र, प्रशांत, हे मावशीचे भाचे , पुतणे, भाच्या इ. पण माहेर अन सासर चे भाचे असा फरक त्या राज्यात कधीच नव्हता. सर्व एकत्र नांदायचे. त्या मूळ घरचे ही 3 राजकुमार अन 5 राजकन्या असा मोठा परिवार. इतर मावशीचे पण मुलं असायची. असं तो कुंभमेळा निदान 1 ते 2 महिने चालायचा.
वर उल्लेखलेल्या प्रमाणे हिरवी चादर म्हणजे शेती, त्यात ही विशेष करुन आमराई. अंतर ही अगदी चालत जायचं इतकंच. ते मुख्य आकर्षण, पाडाचा आंबा पाडून खाणे, आंबा उतरवणे, तो बैलगाडीत टाकणे, घरी आल्यावर तो सगळा आंबा अढीला टाकायचा, कालचा आंबा वर ठेऊन आजचा आंबा त्या खाली ठेवायचा. तयार आंबे एका डालित ठेऊन ते घरी घेवून यायचे. परमोच्च आनंद, म्हणजे राजवाड्यात झोळीभर सोन्याच्या मोहरा मिळाव्यात अगदी त्या ही पेक्षा जास्त हर्षोल्हास. इकडे कुंभमेळ्यातील सर्व जण आधाशासरखी त्याची वाट पहायचे, अगदी माझ्यासकट. न्याहारीला आंबे, दुपारच्या जेवणाला आमरस, रात्री ताज्या कैर्यांची चटणी लोणचं अन सोबत ते सुग्रास भोजन. आह आह. अतिशयोक्ती नाही पण मी अन इह वेळेस स्टीलचे पिंप ते ही मोठे भरून रस याच हातांनी अनेकदा केलाय. लिहिता लिहिता आत्ता ही मी अनाहूतपणे हातांचा वास घेतला अन तो आमरस सुगंध जाणवला. इतर भावंडं ही या प्रक्रियेचा भाग होतीच. जमेची बाजु म्हणजे आंब्याच्या खोलीची चावी ही कायम माझ्या कडे असायची. एक गड आपल्या नावे आहे अश्याच काही भावना. सुट्या सरत आला की मन जड व्हायचं, परतीची वेळ पण इथेही एक राज परंपरा पार करण्याची जबाबदारी माझ्यावर होती, ती म्हणजे खाराचे आंबे सर्व नातेवाईकांकडे पोचवायचे. थोडा लसूण, कांदा अन बरच काही एका पिशवीत भरुन मी मार्गस्थ व्हायचो, पुढच्या सुटीची वाट पाहत.
सोबत त्या काळचे खेळ, लपंडाव, गाण्याच्या भेंड्या, आणि एकमेकांची टर उडवणे असे विविध खेळ.
काळाच्या ओघात मोठ्या राजकुमारांचे विवाह झाले अन त्या राणीसाहेब ही अगदी तश्याच रुळल्या, जणू त्यांचा जन्मच इथे झालाय इतकं एकरुप झाल्या. मला आजही तो भाकरीचा डोंगर तसाच्या तसा दिसतोय, ज्या चुलीच्या धुरात राणीसाहेब होत्या त्याच चुलीवर धाकल्या अन त्याहून धाकल्या राणीसाहेब म्हणजे आमच्या वहिनी उषा वहिनी, विद्या वहिनी अन स्वाती (जी उशिरा सामील झाली) होत्या, आहेत. साधारण 60 ते 70 भाकरी, भाजी ती ही तरतरीत मसालेदार, रोज ताजी चटणी, ताक दही असा तो शाही भटारखाना आणि त्याचा साज. अगदी अलिकडच्या काळात गॅस आला तरीही शेजारी जरा दूर चूल आहेच. अनेक वेळा गड्यांचे जेवण पण घरूनच अन कुत्र्यांच्या भाकरी वेगळ्या, म्हणजे भाकरीची शतकी पार व्हायची / पोळी पन असायची अर्थात.
मी इह वेळा त्या भाकरी त्यात ठासून भरलेला मिरचीचा ठेचा अशी शिदोरी घेऊन शेतात गेलोय. मला पोहता येत नाही म्हणून विहिरीवरचा पंप चालू करून त्या पडण्याऱ्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेत होतो.
इथल्या लग्नकार्यात घागरींनी पाणी भरणे, पंगती वाढणे हे एक विलक्षण कार्य असायचे, सर्व जण मिळून अशी अनेक कार्य या नगरीत पार पडलीयेत. नारायण काका वांजरखेडकर हे आवर्जून प्रत्येकाच्या तोंडात आग्रहाने लाडु कोंबायचे ते आणि कित्येक अविस्मरणीय क्षण, आज ही चित्रपट सदृश फिरत राहतात डोळ्यासमोर.
आमचे राजे त्या राज्याचे आणि लगतच्या नगरीचे गिरधावर होते, शेती हे मुख्य साधन अन त्यात या एवढ्या साम्राज्याचा ते सांभाळ ते ही अगदी थाटात करत होते. राणी साहेब फ़क्त मम म्हणून त्यांच्या साऱ्या संकल्पाना हात लावून साथ देत होत्या. कधी कुठला हट्ट नाही, राग नाही, लोभ नाही. अगदी नातवंड होई पर्यंत कष्ट आणि कष्ट करून राज्याच्या कारभाराला सतत आधार देणारी ती माउली परवा काळा आड गेली, अन माझी कहाणी तिथेच थांबली. राजे आधीच सोडून गेले होते. पण त्यांच्या मागे आमचे बंधू शाम दादा, नंदू भाऊ अन अरुण तात्या , भगिनी उजुताई, सुलभाताई, रंजु, अंजु, मंजू यांनी ती गाठ तशीच घट्ट ठेवली आहे, कुठेही सुटणार नाही इतकी. त्यांच्या या सुंदर नात्याला एक काजळा चा ठिपका.
शरद पुराणिक
हैदराबाद
जानेवारी 23, 2020 12:27 am
Comments