अक्षर वेड्यांची सुलेखन सफर
अक्षर वेड्यांची सुलेखन सफर
दोन आठवड्यापुर्वी आमचे कलाकार मित्र गुणवंत सराफ सतत एका कार्यक्रमाची माहिती चेहेरे पुस्तिकेवर (fb) पाठवत होते. अक्षरयात्रा असं नाव असलेल्या या गोष्टीचे मनात एक कुतुहल होते. रोज नवनवीन संकल्पना आणि त्यातूनच साकार होणारी ती आकर्षक माहिती - मी जाहिरात हा शब्द मुद्दाम वापरत नाही - रोज पाहुन उगाच मनात विचार यायचे की आपण जावे का ? बरं हा माणसाचा स्वभाव असावा बहुधा, की जी गोष्ट आपण कधीही केली नाही, करणार ही नाही पण समोर दुसरा कोण करत असेल तर त्या चेहेऱ्यात स्वत:ला शोधत त्या भूमिकेत पोचतो आपण, मग ते कुठलेही क्षेत्र असो, कला, साहित्य, राजकारण, ........सर्व काही. म्हणजे झाकीर हुसैंन जी जर टी व्ही मध्ये तबला वाजत असतील तर आपसूकच आपण आपली मान असल्या नसल्या केसांसाहित उडवतो अन मनात ठेका धरतो.
तर हा कार्यक्रम म्हणजे श्री अनिल गोवळकर यांची "अक्षरयात्रा", जी ते दरवर्षी स्वतःच्या खर्चाने आणि आवडीने भरवतात. या मध्ये सर्व हौशी सुलेखनकार, चित्रकार मंडळी एकत्र येऊन एक छोटंसं संमेलन भरवतात. पण इतर संमेलन आणि यात फार फरक आहे. ईथे फ़क्त कलेची भक्ती केली जाते, त्या भक्तीतून आलेले चित्रकार भक्त प्रसादरूपी अनेक छोट्या मोठ्या गोष्टी मिळवतात, जेणे करून त्यांचा हा कलासागर लाटांनी उसळत एकमेकांना त्यात सामावून घेतात. सागराचा संदर्भ या साठी की या वर्षी म्हणजे रविवारी 21 फेब्रुवारी ला ही यात्रा गणपतीपुळे येथील समुद्रकिनारी झाली. कलेचा अधिपती श्री गणेश याच्या कृपाप्रसादाने ओतप्रेत भरलेला तो समुद्र किनारा, त्याच किनाऱ्यावरील वाळूवर श्री अनिल सरांनी त्यांच्या जादुई हातांनी साक्षात श्री गणेश साकारले अन कार्यक्रमाचा श्री गणेशा झाला. आता मी लिहीत असतांना ही अक्षरशः त्या ठिकाणी आहे असाच भास होतोय. अशा या आगळ्या वेगळ्या संमेलनाची ही सुरुवात. आता तुम्हाला वाटेल हा तर गेला नाही ..पण गुणवंत ने जे सांगितले त्यावरुन मी हे अनुभव कथन लिहितोय.
राज्याच्या अनेक भागातून हे 'अक्षरात अडकले कलाकार अनेक" त्या सात वीरांसारखेच. वय वर्ष 8 ते 55 असे सर्व अक्षरवेडे त्यांच्या कलेचा भंडारा गणरायाच्या साक्षीने उधळत होते. मंडप नाही, खुर्ची नाही अन उनाड त्या किनाऱ्यावर एकरूप होऊन सोहळा साजरा होत होता. कसलीही नोंदणी रक्कम नाही, अगदी मोफत असा हा कार्यक्रम श्री गोवळकर सरांनी त्यांच्याच सासुरवाडीत आयोजिला. नाष्टा, जेवण, चहापाणी आणि अक्षरांना वेचण्यासाठीचे साहित्य (कागद , रंग, पेन, कुंचले) अशी चोख व्यवस्था. उद्देश काय तर अक्षर, त्याचे विविध आकार, त्यातून साकार होणारे भाव, चित्र आणि तुम्ही आम्ही जे जे काही अक्षरांतून पाहू शकतो त्या ही पलीकडचे अर्थ उमगण्यासाठी हा खटाटोप. मोफत मार्गदर्शन. मी आधीच सांगितल्याप्रमाणे मला जायचे होते पण हैदराबाद पुणे गणपतीपुळे आणि हैदराबाद असा प्रवास ते ही दोन दिवसात शक्य नव्हता.... पण आज पश्चात्ताप होतोय :( :(
सोबत काही चित्र ही जोडतोय ...श्री गोवळकर सरांच्या अक्षर प्रेमा विषयी थोडासा खुलासा करून थांबतो ..कोणीतरी त्यांना घरातून निघताना हातावर साखर दिली, त्या इवल्याश्या साखरेचं ही त्यांनी नखाच्या साह्याने तळहातावर "श्री" काढला... जेवण्याच्या ताटात ही ते असे विविध आकार काढतात ...खरं तर आपल्याकडे असं केलं तर रागावतात ..पण कलाकार माणूस तो ...या पेक्षाही त्यांनी त्यांच्या सुलेखन कलेतून साकारलेली हजारो अक्षररूपी चित्र याची देही याची डोळा कधी पाहायला मिळतील असं झालंय ...अशी अनेक स्वप्न सोबत घेऊन मी जगतोय जसं की एकदा माधुरी दिक्षित ला ही भेटायचं आहे...आणि तिला पदर खोवून पोळ्या लाटताना पहायचं आहे...हे मात्र सहज गंमत म्हणुन बरं का ...,बाकी श्री अनिल सर आणि या सफरीत जमलेल्या असंख्य अक्षरप्रेमी मित्रांना आणि त्यांच्या कलेला सलाम ......माझा मित्र गुणवंत जो स्वतःला या क्षेत्रात नवखा समजतो त्याचीच चित्र मी इह वेळ पाहत राहतो तर सरांची कलाकूसर काय ताकदीची असेल याच विचारात थांबतो ...
एक वेडा कशाचाही, केंव्हाही
शरद पुराणिक
हैदराबाद 240221
Comments