लोका सांगे ब्रम्हज्ञान !!!
लोका सांगे ब्रम्हज्ञान !!!
तशा यास अनेक उक्ती आहेत ज्याचे वरील उक्तीस साधर्म्य आहे.
गेले काही दिवस काही ना काही भावनिक विषयावर लिखाण होत आहे. सण वार, त्याचे विविध धार्मिक आणि उत्सव पैलू. अनुभव आणि त्यातून अनेक बोधपर लिखाण.
मी या पूर्वी ही हे सांगितले आहे, मी स्वत:ला लेखक किंवा फार ग्रेट असं अजिबात समजत नाही. सहज सुचतं, तर काही विषय डोक्यात घर करून असतात, काही घटना दिसताक्षणी भूत काळात घेऊन जातात आणि त्याचे संदर्भ जुळतात. तुमच्या सारखे अनेक लोक ते आवर्जून वाचतात आणि मी प्रेरित होतो.
आजचा विषय आणि आशय अश्याच विचारांच्या आणि अनुभवांच्या देवाणघेवाण यातून समोर आला, अनेकांनी आग्रह केला या वर तुम्ही लिहाच. त्या मुळे अनेक संदर्भ हे निव्वळ काल्पनिक असून कोणाच्याही बाबतीत ते वयक्तिक असे नाहीत. तसं असेल तर केवळ योगायोग समजावा, हेतू पुरस्सर ते कोणासाठी ही खास लिहिलेले नाही.
असो, या कोरोनाच्या काळात माणसं अचानक दुरावली. हे अशा अर्थाने प्रत्येक जण आपल्या आहे त्या कर्म, जन्म भूमीत तिथेच स्थिरावला. कोणी विद्यार्थी, कोणी पालक, कोणी ज्येष्ठ नागरिक. प्रत्येकाच्या कर्म धर्म संयोगाने सर्व जण आहेत तिथे सुखी आणि आनंदी होतेच. पण अशा या कठीण प्रसंगी सर्व जण एकत्र असणे ही काळाची गरज होती. त्याने धीर वाढतो. काही ठिकाणी अगदीच नाईलाज असल्यामुळे हालचाल शक्य नव्हती. मग अशा वेळी काही मंडळी विनाकारण फोन करून दोनीही बाजूला अस्वस्थ करण्याचं काम अव्याहत करत होते. सत्य परिस्थिती ची कुठलीही जाणीव नसताना, केवळ "उखळ्या, पाखळ्या" या सदरा खाली गाव भर फोन करून कोरोना पेक्षा ही भयंकर असा आजार पसरवत होते. यात काही प्रामाणिक होतेच जे सच्च्या प्रेमाने आणि आपुलकीने विचारत होते. पण मग काही उगाच "माझा जिल्हा, तुमचा जिल्हा" अस वार्तांकन करण्यात व्यस्त होते. म्हणजे अगदी तसंच जसं आजकाल टिव्ही वर अतिरंजित करून बातम्या देऊन माणसा माणसामध्ये फूट पाडण्याचा आटोकाट प्रयत्न करतात.
हे सर्व करताना काही जण आपल्याच घरात जीवंत माणसांना पुतळे समजून त्यांचं जणू अस्तित्व नाहीच अशी वागणूक देतात, सतत तसंच वागतात, अगदी एक ग्लास पाण्यालाही ते पुतळे अक्षरशः तडफडत असतात. पण हे "साळसूद" लोक तुम्हाला असं भासवणार की जणू यांच्या सारखे "पुंडलिक" किंवा "श्रावणबाळ" तेच. वस्तुस्थिती मात्र "कंस" असते जिथे आपल्या हव्यासापोटी वडिलांनाच तुरुंगात डाबून ठेवलंय.
ही अशी मंडळी जेंव्हा या खोटया मुखवट्या आत आपल्याशी संवाद साधतात, तेंव्हा अक्षरशः तळपायाची आग मस्तकात जाते.
काही ठिकाणी परिस्थिती वेगळी पण असते, "पुंडलिक", अन "श्रावण बाळ" चांगले असतात तर तिथले ज्येष्ठ अडमुठ असतात. नेमकी उलटी असते ही बाजू. या ही तडतडत्या काढाईची फोडणी त्यांचे सखे, स्नेही अजुन अजून मोहरी, जिरे टाकून मंद आचेवर सुरू ठेवतात.
काही ठिकाणी आपसातील समन्वय योग्य नसल्याने, किंवा तो अजून जास्तीचा न ताणता, नात्यांच्या अबाधिततेसाठी एक खंबीर भूमिका घेऊन सहमताने वेगळ्या चुली मांडतात. आता हा निर्णय त्या कुटुंबाचा स्वेच्छेने घेतलेला असतो, तर काही ठिकाणी तो लादल्या जातो. याचं त्या लोकांना काही ही शल्य नसतं. पण मग येता जाता त्या चुलीत सहज मिरच्या टाकून ठसका उडवणारे आहेतच.
आता दुसरी बाजू म्हणजे लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली तिथे त्यांच्या घरच्यांशी कसं वागतात ? हे ही लपून राहत नाही, पण मग त्या जेंव्हा त्यांच्याच माहेरी चांगुलपणाचे उपदेश देतात, ती परिस्थिती ही तितकीच क्लेशदायक असते.
यात ही वेगवेगळे पैलू आहेत, काही जण सर्वार्थाने चांगले वागतात, काही जण केवळ समोर दिसणाऱ्या संपत्तीच्या प्रकाशात (घर दार, शेती, नोकरी, पेन्शन, दाग दागिने) चांगले वागतात, तर काही हे सर्व असून ही फार विचित्र वागतात. याची उदाहरणे न दिलेली बरी. ती वागणूक शब्दांत लिहिताना ही शब्द बोथट होतात, तेंव्हास ते टाळतोय. बरं जी संपत्ती ज्याचा आपण हव्यास करतो, ती त्या घराने अतिशय सचोटीने, कष्टाने आणि घाम गाळून मिळवलेली असते, त्या वर हक्क सांगणं या साठी ती नैतिकता हवीच की. तसं कोणी काहीही म्हणा Give n Take याच तत्वावर हे जग चालत आहे. प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि संपत्ती या तशा आपसात विभागल्या जातात. इथे कर्तव्यदक्षतेचि ही एक लकीर असते. पण अनेकांना ती न दिसता, किंवा दिसून ही त्याकडे दुर्लक्ष करून फक्त स्थावर संपत्तीची चमकती रेघ दिसते. हे कालचक्र आहे आणि प्रत्येक ठिकाणी देवाणघेवाण ही आहेच, अगदी बालपण ते वृद्धाश्रम सर्व स्थिती मध्ये, पण तुम्ही फ़क्त घेतंच राहिलात तर यात तफावत ही होणारच.
मुख्य विषय असा आहे की वरील सर्व बाबीत जी लोक त्यांच्या परीने व्यवस्थित चालत असतात, त्या दोरीवर तोल सांभाळून मार्गक्रमण करतात, त्या दोरीचे दोन टोक कायम अस्थिर करण्यासाठी अनेक जण प्रयत्नशील असतात. काहींचा तोल जातो, काही सांभाळून घेतात, काही अर्ध्यावर येऊन थांबतात तर काही चालुच शकत नाहीत.
आशा या स्वतःच ठेवावं झाकून
अन दुसऱ्याचं पाहावं वाकून
प्रभृतींना आपण दुर्लक्ष करण्याची गरज आहे. हे लोक स्वतःच अपयश तुमच्यात शोधत असतात. अगदी ज्येष्ठांच्या अखेरच्या श्वासात ही आपला स्वार्थ शोधणारी, किंवा मृतदेहाला अग्नी देण्याआधीच, किंवा दुसऱ्याच क्षणाला त्यांच्या आयुष्याच्या पुंजीचा हिशोब मांडतात, त्यांना तुमच्या वाऱ्यालाही उभे करू नका. यांची मदत कितीही मोठं संकट आलं तरीही घेऊ नका कारण हे त्याचं पण भांडवल करतात.
आता अनेकजण म्हणतील ही काय राव, फारच विचार करता तुम्ही, पण या ज्वाला अनेक मन आणि घर उध्वस्त करत राहतात, तेंव्हा तो अग्निक्षोभ आणि तांडव आवरता आवरत नाही म्हणून हा लेखन प्रपंच.
पण मग या संसारात अनेक निःस्वार्थ मंडळी ही आहेत जे वेळोवेळी आपल्याला योग्य मार्गदर्शन, मदत (नैतिक आधार, आणि आर्थिक) करत असतात, त्यांना खूप जपा...जगण्याच्या सौन्दर्यात भर घालणारी सुवासिक फुलं आणि कल्पवृक्ष आहेत ज्यांच्या सावलीत सुखावतो आपण.
आपण कोरडे पाषाण
शरद पुराणिक
030920
Comments