माझा अध्यात्मिक, धार्मिक प्रवास ...अल्प ...विस्कळीत... अर्धवट ...मज्जा अन मस्ती

 माझा अध्यात्मिक, धार्मिक प्रवास ...अल्प ...विस्कळीत... अर्धवट ...मज्जा अन मस्ती


आज पुजा करताना आचमन झाले, केशव, नारायण, माधव असे 24 नाव झाले. 


प्राणायामे विनियोग: असं म्हणून मी भूत काळात गेलो, ते अश्यासाठी की आपण हे कुठून आणि कसं शिकलो. अन त्या सर्व गुरू जणांच्या आशीर्वादाची श्रेय नामावली अशी एखाद्या अध्यायासारखी दृष्टीस पडली. 


ते म्हणतात ना पिकतं तिथं विकत नाही, तत्सम आम्ही ही पुराणिक हा नाममात्र वारसा. तशी आमची संस्काराची पाटी बरीच कोरी.  पूर्वीच्या अनेक लेखांतून घरांतील सर्व धार्मिक संस्कारा विषयी लिहिलं आहेच. त्या मुळे ऐकून ऐकून बरीच स्तोत्रे, अष्टक असं येत होतं. पण सर्वार्थाने ते यथासांग शिकणं गरजेचं होतं.  वडील सरकारी अधिकारी असल्याने त्यांच आणि आमचं वेळापत्रक कधी जमलं नाही. 


सुरुवात झाली ती रामरक्षा, मारुती स्तोत्र अशी सुरुवात कै भगवानराव मुळे ज्यांचं दैवतच प्रभु श्रीराम होते, त्यांनी शिकवलं, ऐकून थोडं थोडं येत होतंच. ही पहिली पायरी. पण बालवयात याचं गांभीर्य फार नसल्याने ते तिथेच थांबले. 


पुन्हा आम्ही श्री धुंडिराज शास्त्री पाटांगणकर यांच्याकडे जाऊ लागलो जिथे अनेक इतर स्तोत्रे शिकलो. अतिशय कडक शिस्त पण मला त्यांच्या आवाजात आणि चालीत ले "माधुराष्ट्क" अधुरम माधुरम ..फार भावायचे अन फ़क्त ते ऐकण्याच्या ओढ्याने मी तिथे रमलो, ते तसे आमच्या वडिलांचे मित्र असल्याने दुहेरी दबाव होताच.  ही पाटांगण वास्तु एक फार पवित्र आणि प्रसन्न आहे. त्याची ती विशिष्ट ठेवण आणि संपूर्ण लाकडांच्या स्तंभात तो सभामंडप, समोर जनी जनार्दन भगवान, देवघर आणि अव्याहत होत असलेला मंत्रोच्चार, या मुळे विशिष्ट अशा लहरी तिथे कायम एका लयीत वावरत असतात. 


इथे ही दोन पाटांगण आहेत धाकले आणि थोरले असे दोन संस्थान ...एकीकडे अखंड श्रीमद् भागवत वाचन परंपरा, जिथे आमचा ही काही सहभाग पूर्वी होता. याचा उल्लेख पुर्वी आलेलाच आहे. 


दोनीही ठिकाणी चातुर्मास उत्सव असतो अन जेंव्हा याची समाप्ती होते ती एक वेगळी परंपरा आहे. समाप्ती ला "माधुकरी" मागून अन्न संकलन करून तेच अन्न प्रसादरूपी मिळायचे ...काय तो परमानंद...साधारणपणे 10 ते 15 लोक शुचिर्भूत होऊन सोवळ्यात सर्व आसपासच्या घरोघरी जाऊन माधुकरी मागायची. ज्या घरातील ते अन्न असे तेथील सोवाष्ण स्त्रिया सोवळ्यात स्वयंपाक करून, अक्षरशः देवाची वाट पाहावी अशी वाट पाहून कधी एकदा ती अर्पण करू असं व्हायचं. कुठे पोळ्या, कुठे भात, भाज्या, कोशिंबिरी,  चटण्या, गोड पदार्थ, असे विविध प्रकार, ते ही सर्व अर्थातच कांदा, लसूण विरहित. अति सात्विक अन्न. अन ते जेवण घेण्यासाठी आम्ही अक्षरशः उतावीळ व्हायचो. जेवणं ही धोतर, शुभ्र पंचा, आपण आपलं पाण्याचं भांड घेऊन जायचं. अन जमेल ती सेवा ही करायची. दोनीही संस्थानात हे पुढे मागे व्हायचे, म्हणजे दोन प्रासादिक मेजवान्या. मला आज ही ते सर्व डोळ्यासमोर  लक्ख दिसतंय. जेवताना श्लोक म्हणण्यासाठी लागलेली स्पर्धा ...म्हणून मग अनेक श्लोक इथे शिकलो. आपण श्लोक सुरू केला की पांगतीत बसलेली इतर सर्व जण ही सूर देत अन मग तो असा काही भिनायचा की विचारू नका. 


इकडे गल्लीत ही मैदान विठोबा मंदीरात सप्ताह असायचा, अन आमच्यासाठी ही सतत टाळ वाजवण्याची बारी, मग या दरम्यान अनेक भजन शिकलो. असा नियम होता की सात दिवस अखंड टाळ  वाजवायचा. सर्व जण दिवसातला एक एक तास वाटून घ्यायचे. ती सेवा ही आठवली अन समोर "सावळे सुंदर" रूप विठू रखमाई चे. एक दिवस काला, अन तो काला खाण्यासाठी ती धडपड. घासभर तो काला, पण ते खाण्यासाठी काय जीवाचा आटापिटा. पण एक सांगतो ती काल्याची चव आज ही जिभेवर तरंगत आहे. काहीही म्हणा तो काला अजून ही खावा वाटतोय. 


नंतर कै रेणुकादास शास्त्री राक्षसभुवणकर यांच्या कडे रुद्र शिकायला गेलो. माझे मित्र प्रवीण, प्रशांत राजापूरकर, गणेश महाजन असे आम्ही जायचो.  भांडारगल्लीत एक प्राचीन महादेव मंदीर, पायऱ्या उतरून आत प्रवेश करून आत बसायला कट्टा होता. गुरुजींचा खडा आवाज, ती संथा घेऊन आम्ही आवाज टिपेला नेऊन आम्ही ते मंत्र एकसुरात म्हणायचो. आह ही तो आवाज घुमतोय कानात 


ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः।

स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः।

स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः।

स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॥


अशी रुद्राष्टध्यायी शिकलो.  


त्या पूर्वी ज्येष्ठ भगिनी लग्न करून गेल्या. तिथे आम्ही सुट्टी मध्ये जायचो. तिचे सासरे कै. भानुदास राव जोशी यांनी मला भगवद्गीता, रामरक्षा (पुनरावृत्ती), मारुती स्तोत्र  असं सर्व शिकवले. आज ही त्यांनी शिकवलेला "ऊर्ध्व मूल मध:शाख" हा पंधरावा अध्याय मुखोद्गत आहे. हे आमचे सुटीतले खेळ होते. 


मधे एक काळ असा आला जिथे आमची रावानगी वेद शाळेत होणार होती, पण मातोश्री यांचा थोडा विरोध अन पदवी पूर्वच नोकरी मिळवून आम्ही कॉर्पोरेट जगतात शिरलो. दरम्यान बरेच वर्ष या सर्वांपासून दूर होतो.  


ज्येष्ठ बंधूंच्या विवाहानंतर मी सर्व कुटुंब घेऊन औरंगाबाद ला आलो आणि या काळात वडिलांनी मला "रात्रीसुक्त" शिकवलं जे आज ही अगदी जसेच्या तसे अगदी शुद्ध उच्चारण सहित मुखोद्गत आहेच. पुन्हा या दुनियदारीत रमलो अन या सर्वापासून दूर गेलो. 


दरम्यान पुण्याला आलो आणि माझे मित्र जो आज आपल्यात नाही त्या कै. राजू वाईकर जोशींनी मला सप्तशती पूर्ण शिकवली. 2014 च्या पितृ पक्षात अगदी 15 दिवसांत त्यानें संथा दिली. त्याला गुरुदक्षिणा विचारली तर म्हणाला 100 पाठ करून एक शतचंडी कर, आणि वरील सर्व  गुरू,  गुरुकृपाशीर्वाद (आदरणीय श्री  बहू सोमयाजी यज्ञेश्वर सेलूकर महाराज) पूर्वजांची पुण्याई या मुळे 2015 साली "शतचंडी"  संपन्न झाली ही. राजू म्हणजे माझा गुरुबंधू, बालपणी सोबत खेळलो आणि त्यानेच मला हे खूप मोठ विद्यादान दिले. फार स्पष्ट आणि अचुक उच्चारण आणि त्याचे महत्व त्याने सांगितले. पुढची एक शतचंडी मागच्या अधिकमास वेळी ठरली पण मग यात काम्य कर्म चालत नाही म्हणून राहिली. या कोरोना काळात पुन्हा तेवढीच सेवा घडली. आता बघू कधी संकल्प पूर्तीचा योग येईल !! त्या क्षणाची वाट पाहतोय. 


असे हे ज्ञानार्जन आज ही सुरूच आहे. कोणाचा उल्लेख राहून गेला असेल त्यांचा आदरयुक्त उल्लेख करतो आणि या प्रवासातील सर्व प्रभृतींना साष्टांग दंडवत घालून थांबतो.


तुम्ही म्हणाल पूजा करताना प्राणायाम करून लक्ष देवा कडे होतं की नाही, पण या निमित्ताने त्या सर्व गुरुजनांचे आशीर्वाद अन संस्कार आज पुजेत आले...त्यामुळे प्रत्यक्षात आज पूजा सर्वार्थाने संपन्न झाली. 


ॐ द्यौ: शान्तिरन्तरिक्षँ शान्ति:,

पृथ्वी शान्तिराप: शान्तिरोषधय: शान्ति:।

वनस्पतय: शान्तिर्विश्वे देवा: शान्तिर्ब्रह्म शान्ति:,

सर्वँ शान्ति:, शान्तिरेव शान्ति:, सा मा शान्तिरेधि॥

ॐ शान्ति: शान्ति: शान्ति:॥


अशी आमच्या बीड ची ख्याति..काही लोक आमच्या बीडला विनाकारण नाव ठेऊन उपहासात्मक बोलतात, पण असे सर्व काही फक्त आणि फक्त या नगरीने आम्हाला दिले अन त्याचा आम्हाला अभिमान आहे. 


शरद पुराणिक

200920

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती