देव आहे हे पुन्हा एकदा अनुभवलं





 देव आहे हे पुन्हा एकदा अनुभवलं


मागे पाठवलेल्या गौरी महालक्ष्मी च्या लेखाचा हा एक अजून भाग, संदर्भ जरा खासगी आहे पण लिहावं असं कटाक्षाने वाटलं, कृपया याला आत्मस्तुती, किंवा सहचारिणीचे अतीव प्रेम किंवा दिखावा असं न समजता एक अनुभव म्हणून वाचावं ही विनंती.


परवाच ऑफिसचा एक मेगा इव्हेंट करून अख्या पुणे टीम सोबत परतलो कारण 2 दिवसांनी गणपती येणार होते, त्याची तयारी म्हणून आधीच आलो. हा सण दरवर्षी येत असला तरी त्याची तयारी करण्याचा एक विलक्षण आनंद उत्साह दर वर्षी असतोच. त्याच भरात सगळं होत होतं. प्रथे प्रमाणे 2 मूर्तींची स्थापना, त्या नंतर मी आणि अनिता पुण्यातील 5 मानाचे गणपती दर्शन घेऊन आलो, आमच्या कडे गणपतीची तशी उपासना फार किंवा अगदी नाहीच असं म्हणा, फक्त हे दीड दिवस ते आमच्या घरात असतात. त्यामुळे या दिवसात आम्ही जेवढे शक्य तेवढे गणेश दर्शन इत्यादी करतो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी विसर्जन तत्पूर्वी वळीव लाडु, मोदक आणि इतर पक्वान्ने यांचा नैवेद्य करून मी पूजा आटोपून सकाळीच ऑफिसला गेलो. मूर्तींचे विसर्जन मुलांनीच केले, कामा मुळे मला ते शक्य नव्हते. लगेच गौरी चे आगमन होणार होते, ऋषी पंचमी चा कडक उपवास करून आई आणि अनिता दिवसभर काही शिल्लक राहिलेले फराळाचे पदार्थ बनवून, पून्हा संध्याकाळी सोसायटीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांत गेलो तिथे संपूर्ण नियोजन या वर्षी हर्षल आणि निशांत आणि मित्र असे होते आणि प्रथे प्रमाणे आईचा कार्यक्रम पण होतात. अशा प्रकारे दिवस संपला. रात्री अचानक जाग आली तेंव्हा अनिता तापाने फणफणली होती इतकी की काहीच सुचत नव्हते. त्यात ही ती मलाच धीर देत होती. सकाळी मी पुन्हा ऑफिसला जाण्यासाठी उठलो तेंव्हा ती उठून कामाला लागली होती कारण गौरी आगमन होते. कामाच्या भरात मी दिवसभर तिची साधी चौकशी ही करु शकलो नाही, आणि पूजे साठी लवकर जावं म्हणून घरी आलो तर अनिता पुर्ण पणे तापात होती आणि अक्षरशः झोपून होती, हात लावुन पहिलं तर चटका लागला आणि तिच्या तब्येती सोबतच आता या सोहळ्याचे काय होणार या काळजीत मी होती, मातोश्री पण या वेळी खूप थकलेल्या वय वर्ष 80, हात आणि पाय दोनीही तिला सतावत होते आणि ती स्वतः त्या दुखण्या ला सोबत घेऊन बीड पुणे असा प्रवास करून आली हेच दिव्य होतं. बोलता बोलता गौरी आगमनाची वेळ झाली, आणि जणू काहीच झालेच नाही या गतीने अनिता पून्हा कामाला लागली, माझे तिला समजावण्याचे अनेक प्रयत्न फोल ठरले, आणि तासाभरात तिने गौरी उभ्या केल्या एकटीने, कारण आपल्याला ते जमत नाही या सबबीवर मी आणि मुले फक्त प्रेक्षक होतो. सोबत पहिल्या दिवसाचा फ़ोटो जोडणार आहेच. 

कुठून आली असेल ती शक्ती या विचारातच मी ही शुचिर्भूत होऊन आवाहन पूजा चालू केली आणि समोर असलेल्या ज्येष्ठा कनिष्ठा देवींशी आंतरिक संवाद मंत्रांच्या माध्यमातून होत होता. पुजा आणि जेवण आटोपून आता मी उद्याच्या विचारात होतो. हा प्रतिवार्षिक एक मोठा सण आणि त्यात कुठलीही कसर नको. आमची दोन्ही मुलं ही तयार झाली म्हणाली आई तू फ़क्त मार्गदर्शन कर बसून, बाकी आम्ही सर्व करतो, हे चर्चिले जात असताना मला आठवलं त्या 5 ते ते 6 चटण्या, 5 कोशिंबिरी, यथाशक्ती भाज्या म्हणजे कमीत कमी 7 ते 10 किंवा जास्त, तसा 16 चा मान आहे. त्या सोबत पुरण पोळी, साखरभात, खीर, साधा भात, आमटी, वरण. बाकी फराळाचे सर्व पदार्थ  करंजी, चकली, अनारसे, बेसन लाडु, रवा मैदा लाडु, पुऱ्या, आधीच तयार होते, त्याची चिंता नव्हती.  खरं तर पुर्वी एका मोठया सणाला निशांत ने अशी मदत केली होती, पण ही तयारी जरा जास्तच होती.  अनिता ची तब्येत अजुन बिघडत चालली होती, रात्री पुन्हा ताप,  गोळया घेऊन जेम तेम 4 तास झोपून सकाळी ती 5 ला माझ्याही अगोदर उठून जशी मशीन चालु करावी अश्या वेगात कामाला लागली, घराची झाडाझुड चहा पाणी आणि पूजेची तयारी करून सोवळ्यात स्वैपाक करण्यासाठी सज्ज झाली. मला खरं लक्ष्मी दर्शन तर त्या दिवशी सकाळी झालं जेंव्हा मी अनिताला पाहिलं, तो आजार, वेदना पार मावळून एक तेजपुंज प्रसन्न मूर्ती दिसावी अशी ती दिसत होती. मी सतत विचार कारत होतो कुठे गेलं असेल ते दुखणे, त्या वेदना ज्या मी काही तासापूर्वी पाहिल्या अनुभवल्या होत्या, अन पुन्हा एकदा देव आहे या गोष्टीची पक्की खात्री झाली. ज्या वेगाने आणि आनंदाने तो काम करत होती त्यात 10 वाजता संपुर्ण स्वयंपाक आटोपत आला होता, त्या दरम्यान तीला अनेकदा थोडा वेळ बैस, चहा दूध काही तरी घे असं विनवणी वजा सांगुन ही ती मात्र काही झालंच नाही अश्या अविर्भावात होती. माझी ही पूजा आटोपत होती, तो वर निशांत सोवळ्यात झाला. कारण तिने केलेला स्वयंपाक 5 नैवेद्याच्य ताटात वाढण्यासाठी त्यालाही अर्धा तास लागला. सोबत नैवेद्याचे ही फोटो जोडणार आहे.  आरती, सोवाष्ण (3) ब्राम्हण(2) आणि आम्ही घरची मंडळी यथेच्च जेवलो. तिला फार जेवण गेलं नाही. संध्याकाळी पुन्हा हळद कुंकवाची गडबड ती ही तितक्याच तयारीने तिने निभावले. रात्र होता होता ती पुन्हा तापेने त्रस्त झाली. तिसरा दिवस विसर्जनाच्या तयारीचा आणि आजही अनेक मंडळी भोजनासाठी होती इथपासून ते संध्याकाळी गौरीं ना निरोप देऊन, सगळं जागच्या जागी ठेऊन पुनःश्च 8 ते 10 लोकांच्या जेवणाची तयारी तिने केली.  मला परत परत तेच प्रश्न सतावत होते आणि मी तीला विचारावं अस म्हणताना तिचं दुपारचं वाक्य आठवलं, तिने म्हणजे गौरींनी करुन घेतले. आता मात्र मला पुन्हा एकदा प्रत्यय आला देव आहेत, असतो, तो आपल्याला पाहता आणि अनुभवता आला पाहिजे. 


पुन्हा सांगतो हा लेख एक अनुभव म्हणून वाचावा, कुठल्याही प्रकारे बायकोचा डिंगा मिरवण्यासाठी नाही, फ़क्त हे तीच्या तर्फे घडले आणि मी ते अनुभवले हा योग आहे.


शरद पुराणिक

कोणार्क एक्सप्रेस

8 सप्टेंबर 19

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती