दिल औरंगाबाद... औरंगाबाद हो गया ....




 दिल औरंगाबाद... औरंगाबाद हो गया ....


या महिन्यात एका औरंगाबाद प्रेमी मित्राने "आठवणीतले औरंगाबाद" हा एक फेसबुक समूह निर्मित केला अन त्या दिवसापासून या ऐतिहासिक शहरातील अगदी गल्ली न गल्ली, चौक चौभारे, सर्व फिरुन झाले. अन आमचा या शहरातल्या आठवणींचा वारू अशी काही चौफेर घौडदौड करतोय की विचारूच नका.  आठवणी, त्यांच्या सोबत त्या वास्तु, वस्तु, वास्तव्य, अपव्यव, खाद्य भ्रमंती, अगदी चणे फुटाणे ते भोज ची थाळी, गायत्री , भल्ला चाट, पंजाबी स्वाद ते अन्नाची इडली, मैदू वडा अन बाजूला मोठ्या भांड्यात उकळणारे सांबर....वसंतभूवन चे भजे, मेवाडच्या अनेक डिश ते 4 खाऊन 1चच बिल देत बंद पाडलेल गोपाळ टी पॉईंट ...इथेच थांबतो कारण ही यादी संपणार नाही. कारण आजची माझी आठवण वेगळ्या धाटणीची आहे...उगाच जिभेच्या चोचल्यात तिला अडकवून ठेवणे योग्य नाही.


साहित्य, सांस्कृतिक, संगीत क्षेत्रात ही या शहराचे योगदान आहेच. त्यातीलच एक मोठा सोहळा म्हणजे "एल्लोरा फेस्टिवल".  संगीत, नाटक, सिनेमा क्षेत्रातील सर्व दिगग्ज मंडळींनी या उत्सवास आवर्जून हजेरी लावली. असा सर्व श्रोत्यांचे कान तृप्त करणारा हा  सोहळा. डोळ्यांचे पारणे फेडणारी ती व्यवस्था, भव्य रंगमंच, मागे कैलाश लेणी आणि भव्य दिव्यांची रोषणाई त्या  आधीच निसर्गाने सुंदर सजवलेला सभोवताल इतका आकर्षक असायचा की विचारूच नका.  अगदी कार्यक्रम संपला तरीही तिथून पाय निघायचे नाहीत. निसर्गाच्या कुशीत आणि लेण्यांची ती नगरी... आपण जणु एका वेगळ्या विश्वात आहोत याची अनुभूती देणारा.  जणु धरतीवर स्वर्ग अवतारावा ...अन त्या लेण्यांमध्ये जिवंत पणा यावा ...अशाच काही माझ्या भावना आहेत.


एक वर्ष वेरूळ ला हा कार्यक्रम घेता आला नाही तर तो या शहराच्या दुसऱ्या एका तितक्याच भव्य आणि तत्सम ऐतिहासिक वारसा, संदर्भ असलेल्या "सोनेरी महल" इथे आयोजित करण्यात आला. सोबत तिथला फोटो जोडत आहे.  मी वर व्यक्त केलेल्या सर्व अनुभुती इथेही होत्याच. एक विशेष म्हणजे बाजूला ग्रामीण जीवन पद्धती दाखवत एक आगळा वेगळा मेळा, त्याच ठेवणीतली खाऊगिरी असं साकारलं होतं. अगदी ऐतिहासिक काळात घेऊन जाणारी ती व्यवस्था.  


आम्ही गेलो त्या दिवशी प्रख्यात गझल गायक तलत अझीझ यांचं गझल गायन होतं. मुळातच गझल हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय... अर्थात सर्वच गज़ल आणि त्यांचे अर्थ पूर्णतः कळतात असे अजिबात नाही..पण तरीही मला गझल कायम जवळची वाटते... ऐकायला फारच आल्हाददायक आणि थेट आत काळजाला भिडते... उंची शब्द, त्यांचे चपखल अर्थ आणि शेरो शायरींनी केलेला तिचा शृंगार. अगदी कमी संगीत पण ते इतकं जवळीक निर्माण करतं की एक एक बिट अशी झंकारून जाते.  एकटेपणाची उत्तम सहचारिणी असते गझल, काळाच्या आड गेलेल्या अनेक आठवणी आणि दुःख असं तिच्या कवेत घेऊन गझल तुम्हाला गुंतवून ठेवते.. म्हणुन ती खूप जवळची वाटते. जगजीतसिंग हे या क्षेत्रातील आमचं कुलदैवत.  


असो तलत अझीझ व्यासपीठावर अवतरले अन मेहफिल सजली... अस्खलित हिंदी, उर्दू शब्दांची पेरणी त्याच धाटणीचे संचालन अन मागे सोनेरी मेहेल ...उत्कृष्ठ प्रकाशयोजना आणि त्यात अक्षरशः न्हाउन निघणारा तो मेहेल ...त्या सोबत गझल चे आर्त सूर अन संगीत ..या क्षणीही मी ती अनुभूती घेतोय असा भास होतोय. हा कार्यक्रम कधी संपूच नये ही आतल्या आत होणारी भावना...शब्दात न सांगता येणारी अवस्था. सोबत फोटो अगदी गुगल वर शोधून जोडत आहे...कारण हा अनुभव मोबाईल नव्हते त्या काळातला आहे ...अगदी मला वर्ष ही आठवत नाही.


या सम असंख्य साहित्यिक, सांस्कृतिक, खाऊगिरी अन इतर बऱ्याच आठवणी आहेत... आठवतील तशा अवतरतील...


फिर छिडी रात बात फुलो की ...

अब क्या गझल सुनाऊ तुझे देखणे के बाद..

आइना मुझसे मेरी पेहली सी सुरत मांगे..

झिंदगी जब भी ....


अब मुझे यही रूकना चाहीये ....

सभी औरंगाबादीयो को समर्पित...


शरद पुराणिक

290521

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती