दिव्य संस्कारांची "परिपूर्ती"
दिव्य संस्कारांची "परिपूर्ती"
परवाच आमचा दादा, स्नेही, मित्र, सखा, मार्गदर्शक आणि अजून बरंच काही असलेल्या प्रा डॉ संतोष कुलकर्णी यांची गझल मंथन या युट्यूब वाहिनीवर झालेली मुलाखत पहिली, ऐकली, अनुभवली आणि साक्षात गझल प्रवास किंवा गझल प्रांतातील चार धाम यात्रा घडली असं म्हणू.
मी माझ्या या पूर्वीच्या माझ्या लुटुपुटूच्या नाट्यचळवळ या लेखांच्या मालिकेत एक संदर्भ दिला होता, तो असा की एकाच घरातील चार व्यक्तिमत्व आपले मित्र आहेत - असा हा एक दुर्मिळ भाग्ययोग आमच्या नशिबी आला. ते म्हणजे संतोष, सदानंद, सुरेंद्र आणि संपदा सुधाकरराव कुलकर्णी. या चार ही भावंडांचा माझा वेगळया वेगळ्या माध्यमातून संपर्क आला. दादा म्हणजे संतोष याचा छात्रभारती आणि अंबाजोगाई असा दुवा. सदानंद हा पण छात्रभारती, कट्टा (Garage) गॅंग अन अनेक सह मित्र असा दुवा. सुरेंद्र आधी फक्त त्याच्या सुंदर हस्ताक्षर रुपी समोर आला, तसा प्रत्यक्ष भेटीचा योग कमी पण मागील काही दिवसात लिखाणाच्या माध्यमातून एकमेकांच्या इतके जवळ गेलो आहोत की अक्षरशः रोज गळा भेट घडते इतके समविचारी (दुःखी असं लिहायचं नाही, कारण ते आमच्यासाठी सुखाचं लेणं आहे). संपदा ही नाटक, नाट्यशास्त्र या माध्यमातून जोडली गेली अन आमचे सर्वांचे मैत्री मनोमिलन झाले. शीर्षकात नमूद केलेली "परिपूर्ती" ही त्यांची वास्तु जिथे ही चार व्यक्तिमत्व घडली, आणि आज प्रत्येकाचं आपलं वेगळं अस्तित्व आहे, ओळख आहे. स्वतःच स्वतः ची ओळख निर्माण करून त्याला मूर्त रूप देऊन ती जगणं तसं सर्वांनाच जमतं असं नाही. पण अंबाजोगाईत राहून ही एक वेगळी चौकट होती 'परिपूर्ती'ची. जी अनेकांना परिचयाची आहेच.
प्रा.डॉ.संतोष उदगीरला प्राचार्य म्हणून नोकरी करत होताच, पुढे त्याने स्वेच्छा निवृत्ती घेतली. डॉ. सदानंद स्वतः आणि बायको दोघेही MBBS आणि MD, सुरेंद्र स्वनिर्मित उद्योजक तर संपदा ही दासोपंत यांच्या साहित्यावर Ph.D करून नाट्यशास्त्र विभागप्रमुख.
खूप परिचय झाला, मुख्य विषय आहे तो दादाची झालेली मुलाखत. सोबत लिंक जोडत आहे ती वेळ मिळेल तशी अवश्य पहावी. मी ही ती नंतरच पाहिली अन अचंबित झालो. 1980 पासूनचा त्याचा तो गझल चा प्रवास ऐकून थक्क झालो. त्याचं सविस्तर विश्लेषण त्या मुलाखतीत आहेच. पण ज्या लयीत, संथ प्रवाहात आणि अति परिपक्व पद्धतीने त्याने ती दिली. काय तो संयम, भाषेवरचे प्रभुत्व आणि एखादा संकल्प घेतला की तो पूर्णत्वास नेण्यासाठीची प्रामाणिकता, ध्यास,अभ्यास आणि खोली. तुम्ही आम्ही गझल ऐकताना फक्त 'वाहवाss' म्हणून पुढे सरकतो. पण ती प्रत्यक्षात कागदावर आणि आतून उतरवताना जी साधना, कष्ट आणि मेहनत आहे ती दिसत नाही. एका प्रश्नाला तो उत्तरला, 'चांगली गझल जन्मण्यासाठी तुम्ही एक चांगले व्यक्ती असावं, चांगले कवी असावं आणि तरच चांगली गझल जन्म घेते'.
त्याचा हा उत्साह पाहून आई म्हणाली, 'तू थेट सुरेश भट यांच्याशी संपर्क कर. म्हणजे मराठी गझलेच्या विद्यापीठात तू जा, त्या साठी लागणारा खर्च मी देते, ही त्याला मिळालेली ती पहिली शिष्यवृत्ती' असं तो म्हणतो. त्या नंतर सुरेश जी भट यांच्या सोबत फोन वर ते ही STD बूथ वरून अडीच तास संभाषण आणि बाहेर खोळंबलेली जनता. तर परभणीला घरमालकाच्या घरी रात्री 12.30 ला भटांनी केलेला फोन ते त्याच्या एकंदर 35 ते 40 बैठका, त्या ही दस्तुरखुद्द सुरेश भट यांच्या सोबत. तुम्ही आम्ही नुसतं त्यांचं गाणं लागलें तर गाडी थांबते, हातातला घास हातात राहतो अन गुंग होतो. इथे हा आमचा दादा प्रत्यक्ष त्यांच्या सहवासात इतके दिवस राहिला. अजून काय हवं. मला हे ऐकल्याक्षणी असं वाटलं जावं लातूरला आणि त्याला घट्ट मिठी मारावी, म्हणजे आपली भटांची भेट झाल्यासारखे वाटेल! या पूर्ण प्रवासात त्याने केलेलं अगाध वाचन, अनुभव कथन हे ही फार प्रभावी आहे. माझं आणि त्याचं एका गोष्टीवर एकमत आहे, ते म्हणजे नामोल्लेख - ही एक धोकादायक प्रक्रिया आहे, चुकून एखादं ही नाव राहिले तर, अनर्थ होतो, तेव्हा 'जेवढे आठवले ते व इतर सर्व' असा उल्लेख अवश्य करावा.
इकडे डॉ. सदानंदचं एक गुपित सांगून टाकतो. तुम्ही आम्ही कवी ग्रेस यांच्या कविता ऐकतो. इथे हे पुन्हा कवितांचं विद्यापीठ, तर अश्या या दिगग्ज व्यक्ती समवेत सदानंदने अनेक रात्री अन् अनेक दिवस एकत्र काढलेत. एवढंच नाही, तर ग्रेस स्वतः त्याच्या घरी मुक्कामाला अनेक वेळेस राहिलेत. म्हणजे ज्या गोष्टीची तुम्ही फक्त कल्पना किंवा स्वप्न पाहू शकता,असा योगायोग सदा जगला. मी तर जेव्हा पासून ऐकले तेंव्हापासून सदाची एक वेगळी मूर्ती पाहू लागलो.
तसाच सुरेंद्र ही अगदी पहिली ते दहावी सर्व गद्य पद्य मुखोद् गत, प्रत्येक धडा शिकवताना गुरुजींनी केलेले हावभाव असे काही शब्दांत गुंफतो की विचारूच नका. कागदावर मोती बरसावेत असं सुंदर अक्षर, तितकेच प्रांजळ भाव लिखाणात आणि सतत सत्य जगणं ही सचोटी. वय वर्ष 4 ते 5 पासून आज पर्यंत घडलेला प्रत्येक प्रसंग शब्दांत गुंफून जगलेले दिवस अजून उजवतो अगदी देवाची उपकरणी पितांबरी किंवा लिंबू लावून चमकावीत. तितकाच हळवा, मृदु आणि हास्य अन् आनंदाचं भांडं कायम उतू घालणारा एक सच्चा दोस्त.
अशी ही दिव्य रत्ने "परिपूर्ती" या वास्तू ने तथास्तु म्हणुन तुमच्या आमच्यात पेरलीत. त्यांची ही संस्कार शिदोरी फार आकर्षित करते. म्हणून मी ती अशी उकलून, उचकून टाकतो.
थांबतो.
शरद पुराणिक
221020
https://m.facebook.com/story.php?story_fbid=3379713825397094&id=100000755284241
Comments