चैत्र कृष्ण अष्टमी अन दिवटी बुदली
चैत्र कृष्ण अष्टमी अन दिवटी बुदली
आपल्या धर्मा मध्ये प्रत्येक घराण्याचे आपले असे ठराविक कुलधर्म, कुलाचार असतात. देश आणि राज्याच्या भौगोलिक आकार मानानुसार ते विविधतेने नटलेले असतात. अगदी तसंच जसा आपला देश विविध छटांनी रंगलेला आहे.
कोणी म्हणेल या सर्व अंधश्रद्धा आहेत, असं काही नसत, आणि माणसानं हे आपल्या सोयीनुसार ठरवलेले आहेत. ज्याचा त्याचा, श्रद्धेचा आणि अभ्यासाचा हा विषय आहे.
आज मी जो विषय घेतला आहे तो अश्याच एका विशेष कुलाचारा संबंधी आहे. साधारण पणे, काही पौर्णिमा, नवरात्र, असे ठराविक दिवस असतात. नंतर आपल्या देवेतेच्या विशेष पुजा जसे की सत्य नारायण, सत्य विनायक, सत्य दत्त आणि सत्त्यांबा. आमचे कुलदैवत श्री रेणुकामाता आहे आणि आम्ही सत्यांबा करतो.
या व्यतिरिक्त या चैत्र महिन्यात दोन कुलाचार असतात. चैत्र पौर्णिमा आणि चैत्र कृष्ण अष्टमी. यात अष्टमी चा कुलाचार जो आहे तो वेगळा आहे. या दिवशी गृहदेवतांची यथासांग पूजा करून "दिवटी बुदली" ची विशेष पुजा असते. लेखा सोबत चित्र जोडले आहे ते अवश्य पाहावे. ही धातू पासून बनवलेली असते. दिवटीच्या वरील भागात एक पात्र असते. त्यात काकडा लावून त्यावर बुदलीने तेल टाकून प्रज्वलित केले जाते. थोडक्यात मशालीचे एक रूप. याचा उपयोग देवाला ओवळण्यासाठी करतात. खंडोबाच्या कुलाचारात याला मोठं महत्त्व आहे. कुलदेवता खंडोबा असलेल्या बहूतेक घरात या दिवटी बुदली पाहायला मिळतात.
या दिवशी देवाला विशेष नैवेद्य असतो, तो म्हणजे ठोंबरा आणि ढोकळे. सोबत परवाच घरी देवासाठी केलेल्या नैवेद्याचे फोटो टाकत आहे. ठोंबरा म्हणजे थोडक्यात ज्वारीचा भात (कण्या) ज्यात दही घातलेले असते, आणि भरड डाळींचे ढोकळे जे पाण्यावर वाफवून करतात. या सोबत तेल मोहरी घेऊन त्याचा एकत्र मलिदा करून ते खाता येतं.
परवाच खाल्ला असल्याने ती चव जिभेवर अजून रेंगाळते आहेच.
सध्या हा कुलाचार होत नाही, कारण या दिवशी एक अप्रिय घटना घडलेली आहे, पण नंतर सवडीने दिवस बघून तो करावा असे शास्त्र सांगते.
पुजा अर्चना हा तर एक भाग आहेच, पण या वेगळ्या चवीचे जेवण मिळते म्हणुन माझ्या आवर्जून माझ्या लक्षात आहे, आणि राहील.
या व्यतिरिक्त इतर अनेक असे विविध प्रकार आहेत, जे सवडीने काही संदर्भाने लिहिले जातील.
हा माझा लेख त्या देवाला, ठोंबऱ्या ला, ढोकळे आणि फोडणीच्या तेल मोहरीला सोबत मशाली सारखी दिवटी बुदली ठेऊन.
जय जगदंब 🙏🏻🌹🙏🏻
शरद पुराणिक
Comments