आम्ही दुनियेचे राजे
आम्ही दुनियेचे राजे
काल हा अविस्मरणीय, अलौकिक, वेगळ्या धाटणीची एक सांगितीका musical treat ऐकण्याचा आणि पाहण्याचा योग आला.
पुणे तिथे काय उणे या उक्तीला पुनःश्च सिध्दता प्राप्त झाली. पुणेकरांच्या रासीकते विषयावर वेगळं लिहायला किंवा बोलायला नकोच. साहित्य, संगीत आणि कलेचं उगमस्थान, माहेरघर आणि बरंच काही असलेल्या या पुण्य नगरीत या कार्यक्रमाने अजून एक मानाचा तुरा या शहराच्या शीरपेचात खोवला. हे मी आशा साठी म्हणतोय की या संगीतिकेची संकल्पनाच एवढी भन्नाट आहे आणि कार्यक्रम त्या हुन ही भन्नाट आहे.
अगदी वेगळ्या पद्धतीने निवेदन करून अभिजित खांडकेकर आणि गौतमी देशपांडे यांनी या मेहफिलीची सुरुवात केली. सहज गप्पा रंगवून त्याच्या संदर्भाने गीत लगेच सादर होई. सुरुवातीला आशुतोष मुंगळे याने पु लं चा एक नाट्य प्रवेश सादर केला. इतक्या सहज, सूर तालात आणि साक्षात पु ल च सादर करतायेत की काय असं वाटलं. खडा आवाज, लकब अन तसाच अभिनय - हा या संगीतिकेचा USP असावा.
पुन्हा गप्पा जुन्या सांगीतिक आठवणी, किस्से आणि बरंच काही अभिजित आणि गौतमी सांगत होतें. त्या सर्व आठवणीवर सत्य प्रसंगांची अन घटनांना सजवून देवेंद्र भोमे शिक्का मोर्तब करत होता. खुप अभ्यास केलाय या मंडळींनी याचा सतत प्रत्यय येत होता. संपूर्ण मेहफिलीत गायिलेल्या गाण्याचा उगम ते सादरीकरण असा प्रवास डोळ्यासमोर उभा करण्याची एक प्रचंड ताकत दिसली.
चर्चे दरम्यान मास्टर कृष्णराव, बाबूजी, खळे काका, जगदीश जी खेबुडकर, वसंत पवार, वसंत प्रभू, शांताराम बापू, राम कदम आणि इतर दिगग्ज मंडळी आणि त्यांच्या सांगीतिक प्रवासाचा एक तरल भाव पट पाहण्याचा एक दुर्मिळ योग आला. त्यात कृष्णराव यांच्या मुंबई ते पेशावर या प्रत्येक मेहफिली, त्याचे किस्से, बाबूजींचा लकडीपुलावर थांबलेला टांगा, तिथे सुचलेल्या ओळी, मुखडा. प्रभात मध्ये ऑफिस बॉय ते एक प्रतिभावंत संगीतकार राम कदम, त्यांच्या मिरजेच्या आठवणी अन लोकसहभागातून त्यांना पुण्याला पाठवल्याचे किस्से. शांताराम बापू ची अजून एक अजून एक अशी सांगीतिक भुक आणि त्याला तितक्याच सहनशीलतेने प्रतिसाद देणारे खेबुडकर आणि त्यातून निर्माण होणारे गीत, संगीत.
हे सर्व घडत असतांना मी ही लकडीपुलावरचा बापुजींचा टांगा, रात्र रात्र लिहिल्या जाणाऱ्या मुखड्या समोर अन सचेतन गंधर्व मास्टर कृष्णराव यांना भेटलो. इथून पुढे जेंव्हा जेंव्हा मी या रास्तावरून जाईन तेंव्हा या दिग्गजांची आठवण होणार. मी पुण्यात राहतो आणि मला त्याचा इतका अभिमान का आहे हे काल पून्हा कळलं, पटलं.
देवेंद्र भोमे आणि केतन पवार ने दिलेली सुमधूर संगीताची मेजवानी, छोट्या छोट्या हुरळून टाकण्याऱ्या आल्हाददायक जागा, दोघेच पण अक्खा बँड आहे की काय ही भावना होते ऐकताना.
आशुतोष मुंगळे, जयदीप वैद्य, श्रुती आठवले आणि मुक्ता जोशी यांचे ताकदीचे गायन ।। वाह क्या बात है उस्ताद ।। अतिउत्तम प्रकाशयोजना हा अजून जमेचा भाग.
हा संगीताचा खजिना अजरामर आहेच पण तो पुन्हा पुन्हा रसिकांसमोर मांडून त्याचा एक हृदयस्पर्शी प्रत्यय देणाऱ्या या समूहाचे अभिनंदन करावे तितके कमीच.
एकदा, अनेकदा, पुन्हा पुन्हा पहा ही विनंती
काही आठवणी कार्यक्रमानंतर खाली जोडल्या आहेत.
शरद पुराणिक
पुणे
Comments