Lockdown - फोना फोनी
Lockdown - फोना फोनी
या लेखातील सर्व पात्रं ही काल्पनिक असून, कुठलंही साधर्म्य वाटलं तर तो निव्वळ योगायोग समजावा.... 😃😃कुठल्याही प्रकारे वयक्तिक नाही
तर विषय असा आहे मागील 4 महिन्याच्या या lockdown आणी unlock मध्ये अनेक अद्भुत घटना घडल्या, अशक्य ते शक्य झालं. रोज विविध पदार्थ करून खाल्ले, अनेक नवनवीन शोध लागले, नवीन खेळ आले. मुळात सर्वाना अंतर्मुख करून जगण्याची एक नवीन दिशा दिली या कोरोना ने.
सर्व जण बंद दरवाजाच्या आत आपल्या छोट्या जगात रममाण झाले आहेत. पण आपसात करून करून कीती सा तो संवाद साधणार. म्हणून फोना फोनी हा ही या प्रक्रियेचा एक विशेष भाग झाला. याच फोना फोनीचे हे विविध पैलू.
घरातील थकलेली आई दिवस भर सुना नातवंडांचे कौतुक करून, मुलीशी थोडं निवांत बोलु म्हणून तिला मिस् कॉल करते. इकडे लेक ही त्याची वाट पाहत असतेच. चर्चा सुरू होते अन मग काही प्रश्न कानी पडतात, का? कसं? कुठे? तिकडून उत्तर येते नंतर सांगते. म्हणजे समजावं तिकडची सून बाजूलाच आहे. तिकडची सून म्हणजे network ला आलेला अडथळा असतो, range कमी होते, ऐकायला येत नाही, तर काही वाक्य तोंडातच विरतात. पुन्हा इकडचे तिकडचे विषय घ्यायचे. आवाज स्पष्ट येऊ लागला की हे समजावं. आवाज ऐकू येत नसेल तर मग काही तरी खास, खरपूस, खिमासदार विषय आहे. खरं तसे काही विषय नसतातच मुळी पण स्वभाव आणि परंपरा (ही अनेक ठिकाणी वेगवेगळी असते). तिकडची सून झोपल्यावर चाचपणी घेऊन पुन्हा फोन येतो पण विषय काही संपत नाहीत. ते चांदोबा च्या कथेतल्या सारखे क्रमशः सुरूच राहतात.
आता याच प्रकाराची दुसरी बाजू.
एक सून दिवसभराची घरकाम आटोपून संध्याकाळी उशिरा आपल्या घरच्या लोकांना फोन करत आहे. फोन चं duration जास्त असेल तर नक्की समजावं या फोन वर आई, बहीण किंवा मैत्रीण असावी. ती आपली बिचारी जरा निवांत फोन वर चर्चा करते आहे. घरातला हंगामी नोकर दिवसभर राब राबून ...work from home फोनमध्ये अक्षरशः हरवलेल्या अवस्थेत, कानात बोळे घालुन आजूबाजूच्या वातावरणा पासून पूर्णतः अनभिज्ञ. घरातली वैतागलेली चिल्लर गॅंग आहेत त्या परिस्थितीस असेल तिथे मानेचे विविध काटकोन, त्रिकोण करत TV पाहत आहेत. त्या घरची सासू कान वाकवुन सुनेच बोलणं ऐकत आहे. म्हणजे चेहेरा TV कडे आणि कान सुनेच्या फोन कडे. हे भीतीपोटी की न्यूनगंड माहीत नाही, पण काही करून ते ऐकायचं हा एकच ध्यास. तो फोन जर माहेरचा असो, इकडच्या नातेवाईकांचा असो किंवा मित्रांचा असो. जरा म्हणून सवलत नाही. वैतागून ती फोन ठेवून देते. सासू ने सर्व ऐकलं असतंच, पण मग भांडे घासताना, स्वयंपाक करताना पुन्हा एकदा उजळणी करुन घेते. म्हणजे आपलं काही तिकडे कळलं नाही, अरे पण असं guilty वाटण्यासारखं वागूच नका.
काही घरात तरुण किंवा मोठी मुले असतात. दिवसभर हादडून, खेळून, काम करून जरा जास्त दमतात. फार जास्त नाही पण फक्त 10 ते 12 तास मोबाईल खेळत, घरातल्या कामात जमेल तशी मदत ?? करून, काम एकाचे चार वाढवनार. FB किंवा status साठी kitchen मधले selfie, पदार्थ करतानाचे फोटो एकदा टाकले की तो राडा आहे तसा टाकून, कानात बोळे घालून गायब. घरातल्या माणसांना कधी विचारपूस ही न करणारे हे लोक त्यांच्या त्या bobby, bunnu, भावड्या शी तास न तास गहन चर्चा. बरं ग्रुप वेगवेगळे, एक शाळेचा, कॉलेजचा, क्लास चा, गल्लीतल्या अश्या सर्व चर्चासत्रात विचारमाला गुंफून ज्ञानार्जन करण्यात व्यस्त. सध्या एक खूप गहन, कठीण आणि गंभीर विषय म्हणजे आज तुमच्याकडे किती सापडले, कुठं lock मारले, कुठे पोलिसांनी चोपले, काहींची तर या विषयावर triple Ph.D. केलीये. एक दुसरी पिलावळ तिकडे राजकीय टिप्पा टिप्पणी, हा त्याना, ते ह्यांना बाण, घड्याळ, हात असं फार झाडून पुसून घेण्यात व्यस्त. याची तर आता किळस येते एवढं अजीर्ण आणतात हे लोक.
ज्येष्ठ मंडळी आपलं रामरक्षा, महा मृत्युंजय जप करत अन असतील नसतील ते सर्व काढे पिऊन रोज वजाबाकी ची गणितं व्हाट्सअप्प वर, तर कधी फोनवरून सोडवण्यात व्यस्त.
WFH वाल्यांच्या कॉल विषयी तर न बोललेच बरं, आमच्या लहानपणी बागुलबुवा, भोकाडी, पोत्यात शिरून भीती दाखवायची असे काही प्रकार होते. पण हल्ली माझा कॉल चालुय म्हणलं की छोटे न मोठे सर्वच घाबरतात. तिकडे तो ऑनलाइन गेम, जुनी क्रिकेट मॅच, जुना सिनेमा किंवा अजून काही कऱत असेल तर काय कळतं.
आता ज्यांना माहेरी ही कोणी विचारत नाही आणि सासरी हे कोणाला विचारत नाहीत त्यांच काय? हे उगाच ह्याला फोन कर, त्याला फोन कर, इकडची बातमी तिकडे, तिकडची बातमी इकडे करून असुरी आनंद मिळवतात. अशा लोकांचा फोन दिसला तरी संकट वाटतं, की आज हे काय विचारणार अन काय सांगणार. ज्या गोष्टीचा आपला सुतराम संबंध नसतो तिथे उगाच डोकं घालून स्वतः चे आणि समोरच्या चं ही डोकं विस्कटणार. गैरसमजाचे ढग साठवून नाती काळवंडणारी ही मंडळी. यांच्या पासून सावध.
पण काही call खूप अनुभूती, प्रेम, जिव्हाळा अन भावनेचा वर्षाव करून चिंब करतात. सोशल मीडिया मुळे फक्त smart फोन च्या keyboard अन gallery मधले कानात गुज गुज करू लागले, ते अति आल्हाददायक आहे. शब्दांची ती सर ओलं करते, सर एका संथ लईतून, हळूहळू अतिवृष्टीत रूपांतरित होते. बेंबीच्या देठापासून आलेले ते गगनभेदी हास्याचे फवारे. घरातून एक मूक इशारा घड्याळ आणि आवाज यांची सांगड घातलेला. अनेकदा ताट वाढलेलं तसंच, इतरांची जेवणं होऊन भांडी ही झाली तरी याने आपोषण ही घातलं नसतं. कडकडीत भूक पळते दूर दूर अन मित्राच्या ताटात अन वाड्यात डोकावून येते, एवढे ते जीवंत संभाषण. हा विषय इथे थांबला नाही तर लेख नाराज होइल. असो.
तर काही खऱ्या अर्थाने रिकामटेकडे पण आपण फोन केला की प्रचंड व्यस्त आहेत असं दाखवणारे. खरं तर पुर्णतः निष्क्रिय अशी ही लोकं विनाकारण खुप अनावश्यक ज्ञानार्जन करतात, असे अनेक अनुभव येतात. पून्हा हीच मंडळी तुमचं status 4 ते 5 वेळा झूम करून तुमची सर्व बित्तंमबातमी ठेवणार. यांच्या डोक्यात बरोबरी, ईर्षा आणि दुष्ट भाव ठासून भरलेला. जरा म्हणून कुठे आनंद असेल तर तिथे विर्झन घालून ती चव चाखणारे ही फोन असतात. या कठीण काळात ही तुझं माझं, आमचं अन तुमचं करणाऱ्या या लोकांना सलाम करून ही फोना फोनी थांबवतो.
शरद पुराणिक
150720
Comments