वेडात मराठे वीर दौडले सात
वेडात मराठे वीर दौडले सात
मी या पूर्वी लिहिलेल्या लेखात याचा संदर्भ दिला होता. या महामारी मुळे जे लोकडाऊन आपणा सर्वांना अनुभवायला मिळाले ते अनेक अर्थाने शाप आणि वरदान अशा दोनीही बाजूने होते. प्रचंड आर्थिक नुकसान, वित्त हानी, व्यापाराची कंबर मोडली, कामगार अक्षरशः हतबल झाले. हे सर्व होत असताना तुमच्या माझ्या सारखे वेग वेगळ्या भूमिकेतून या काळात वावरत होतो आहेत. ज्याला जसं शक्य होईल तशी किंबहूना आपल्या परिघाबाहेर जाऊन ही अनेकांनी आर्थिक आणि इतर मदत केलीच. कित्येक लोक ज्यांना स्वतः ला खरच मदती ची अपेक्षा असतांना देखील अनेक वेगवेगळ्या मदत प्रक्रियेचा भाग म्हणून राबले, आज ही राबत आहेत. एरवी टवाळ, आवारा किंवा वाह्यात असं वाटणाऱ्या वस्त्यातील अनेक मुलांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून या मदत कार्यात सहभाग नोंदवला. मोठ्या उद्योजक किंवा सिनेमा क्षेत्रातील लोकांचं योगदान होतं आणि त्याची चर्चा ही होते. पण हे अदृश्य नायक कायम या चर्चे पासून दूर असतात, कसली ही प्रसिद्धी नाही पण प्रत्यक्ष मदत करण्यात सर्वस्व मानणारे हे लोक कायम उपेक्षित असतात कौतुकापासून. औषध, भाजीपाला, अन्नधान्य वाटप, रुग्णांना मदत अगदी उचलून नेऊन ते अंत्यसंस्कार इथपर्यंत मदत ते ही निस्वार्थ.
तुम्ही आम्ही जेंव्हा घरात बसून हे सर्व माध्यमातून पाहत ऐकत होतो तेंव्हा हेच आपलं ते बसणं सुखकर होण्यासाठी लढत होते. दंगल, पूर, भूकंप की आणखी काही हा वर्ग कायम तत्पर असतो. अगदी चौकाचौकात होणाऱ्या ट्रॅफिक जॅम ला पण हेच पूर्वपदावर आणतात.
या काळात टिव्ही वर स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका रोज दाखवली गेली, पहिले काही दिवस ती 4 तास होती, नंतर 2 तास झाली. मी आवर्जून ही मालिका पाहिली, पाहत आहे.
या मालिकेत हो असे अनेक शूर वीर दाखवले ज्यांची इतिहासात तशी फारशी दखल घेतलेली नाही.
रायप्पा, जोत्याजी, लाडी असे शंभुराजेंच्या श्वासा सोबत जगणारे मावळे. इकडे हंबीरमामा, बहिर्जी काका, हिरोजी, आणि त्यांच्या दिमतीत असंख्य मावळे. फक्त आणि फक्त छत्रपती आणि राज्याची सेवा यासाठी सबंध आयुष्य पणाला लावलेली मंडळी.
बहिर्जी नि तर फक्त आणि फक्त संकट झेलायची आणि ती सावरून ते सुख पुन्हा राजाच्या पायी ठेवायचं. ऊन, वारा, पाऊस, भूक, तहान हे सर्व विसरून, जीवाची पर्वा न करता झोकून घ्यायचा स्वतःला संकटात - का तर लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे. महाराजांच्या गनिमी काव्याचे ते कायम मुख्य सूत्रधार होते. मालिकेतल्या प्रत्येक प्रसंगात त्यांची अन महाराजांची जी संभाषण आहेत ती पुन्हा पुन्हा आवर्जून पहावीत अशीच आहेत, अगदी क्षणिक संवाद पण त्यात सर्व काही सामावलेले असायचे.
तसेच हंबीरमामा, खरे तर राजाचे मेहुणे, पण स्वतः ला कायम स्वराज्या चा सेवक मानून, पडेल ती जबाबदारी चोख बजावली. सरनोबत असूनही पदाचा माज कधीच दाखवला नाही आणि शंभूराजे विषयीची आत्मीयता आणि प्रेम त्यांच्या लकाकत्या डोळ्यात सतत चमकत राहिले. अनेक गहिवरून टाकणारे प्रसंग या दरम्यान आहेत.
इकडे रायप्पा, लाडी आणि जोत्याजी, काय ते स्वराज्य प्रेम. क्षणा क्षणाला जीव धोक्यात घालायचा. सततची घौडदौड , ऐनवेळी बदलणारे नियोजन, त्यालाही तितक्याच तीव्रतेने ते आमलात आणायचे. कायम शत्रूच्या गोटात जायचं, पाहताना ही अंगावर काटा येतो. हे आणि असे अनेक unsung heroes या इतिहासात दडलेले आहेत.
काही व्यक्ती ( विशेष करून अनाजी दत्तो) विषयी जरा वाद असले तरीही महाराजांचे अष्टप्रधान मंडळ ही त्याच ताकतीने पण वैचारिक पातळीवर , उत्तम नियोजनासाठी आणि प्रशासकीय व्यवस्थे साठी होती. त्यांच योगदान ही अति मौल्यवान होतेच. पेशवे, चिटणीस, न्यायाधीश, कारभारी ही आणि अशी अनेक मंडळी होती ज्यांनी स्वराज्यासाठी आपलं जीवन वाहून घेतलं. एक दोन जणांनी गैरव्यवहार केलें असं मालिकेत दाखवले आहे आणि त्यावर बऱ्याच उलट सुलट चर्चा, प्रतिक्रिया, विचार आहेत - आपण चांगलं ते घ्यायचं वाद सोडुन.
बाजी प्रभू, तानाजी मालुसरे हे ही होतेच पण इतिहासात त्याची दखल घेतलेली आहे.
आजचा हा लिखाण प्रपंच म्हणजे संपूर्ण आयुष्य पणाला लावून , संघर्ष करून ज्यांनी स्वराज्य उभं केलं पण त्यांचा विशेष उल्लेख फारसा सापडत नाही त्या समस्त उत्तुंग व्यक्तीमत्वांना मानाचा मुजरा.
आज छत्रपती शिवाजी राजेंचा राज्याभिषेक दिन, त्या निमित्त आज हे सर्व प्रकर्षाने लिहावे वाटलं - छत्रपती शिवाजी महाराज की जय ।। जय भवानी जय शिवाजी ।। हर हर महादेव
शरद पुराणिक
पुणे
6 जुन 2020
Comments