आणि कोरोना नं दार ठोठावल..काळीज चरचरल...
आणि कोरोना नं दार ठोठावल..काळीज चरचरल...
झालं की हो वर्ष हे अदृश्य भूत, पिशाच्च अन महामारी आमच्या मानगुटीवर, श्वासा श्वासात घर करून बसलीय. जरा कुठं दिलासा मिळाला होता अन आम्ही सुखावलो होतो. अर्थव्यवस्थेचा सत्यनाश सुरळीत होऊ पाहत होता. दुरावलेल्या माणसांना एकत्र येऊ देत होता, घरात राहून राहून रापलेले देह जराशी मोकळी हवा अन श्वास घेऊ पाहत होते. पण म्हणतात ना 'अति तिथे माती' अगदी तेच झालं.
जेल मधून कैद्यांना मोकळीक द्यावी, किंवा डाँबुन ठेवलेले प्राणी सैरावैरा बेभान सुटावेत तसेच माणसांचे जथ्थे पुन्हा आकार घेऊ लागले. संपत्तीचा माज आणि अघोरी प्रदर्शन करण्यासाठी सोहळे होऊ लागले. अन बुद्धिवादी जीव अगदी बेभान सुटले. साखरपुडा, हळद, लग्न , डोहाळे जेवण, बारसे अन वाढ दिवस पुन्हा हैदोस घालत आले. मोडलेल्या अर्थव्यवस्थेचा कणा जरी बळकट होत होता पण निष्काळजी देह हे पार विसरून गेले की तो विषाणू अजून कार्यरत आहे. पण मदमस्त राजकारणी अन बेधुंद जनता त्याला हिणवत रंग उधळू लागली.
पूर्वी लोकडोउन मुळे स्मशान झालेले रस्ते, त्यात झाडांची पानझड अजून भर घालून भयावह वाटणारे ते दिवस आम्ही इतके लवकर विसरलो ...बंद हॉटेली बाहेर पुन्हा रांगा लागू लागल्या. मंदिरातील देव ही मोकळा श्वास घेत होते पण इथेही आम्ही त्यांचा तो श्वास पुन्हा हिरावला. या धावपळीत आम्ही पार विसरून गेलो कोरोना आणि नेमका याचाच फायदा त्याने घेतला अन तो असा भेसूर राक्षस होऊन पुन्हा घिरट्या घालत घालत आता तर अक्षरशः थैमान घातले आहे.
परिचयातील अनेक परिवार सर्वच्या सर्व positive आहेत. काही उपचारार्थ दवाखान्यात आहेत तर काही घरीच उपचार घेत आहेत. पुणे औरंगाबाद बीड संबंध महाराष्ट्रात, बाहेर अनेक लोक संसर्गित आहेत. तसाच आमचा मित्र प्रशांत कुलकर्णी आणि त्याचं कुटुंब सर्व जण बाधित निघाले. आई, वडील सुरुवातीला दवाखान्यात होते, नंतर वडिलांची सुटी झाली, पण आईची तब्येत फार बरी नव्हती. नंतर तो स्वतः ही दवाखान्यात admit झाला आईला सोबत अन थोडा फार इलाज असं दोनीही. अगदी काल परवा त्याने त्याच्या आईचा अन त्याचा live video पाठवला. एक दोन दिवसात सुटी होणार होती. इंजेक्शन चा कोर्स पूर्ण झाला.
काल रात्री व्हाट्सअप्प वर प्रशांत ने लिहिलं आमच्या मातोश्रीना आज 8.15 वा देवाज्ञा झाली. मी सुरुवातीला वाचलं सुटी झाली असेल असं, पण देवाज्ञा ..अन काळीज चरचरल...खरं तर ते दोघेही कोरोनामुक्त झाले होते, पण कोरोना मुळे त्याच्या आईचे फुफ्फुस बाधित झाले आणि काल दुपारी अचानक त्यांची तब्येत खालावली अन संध्याकाळी उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली.
या अशा प्रसंगी प्रशांत हे सर्व कसं करणार, घरी वयस्कर वडील नुकतेच आजारपणातून बाहेर पडलेले बायको, मुलगी अन मुलगा हे त्यांच्या सोबत. डॉक्टरांनी non covid body म्हणुन त्याला सुपूर्द केली. Ambulance घेउन तो घरी गेला ...अगदी 10 ते 15 मिनिटे ..कोणी आलं नाही घरच्यांनी दुरूनच दर्शन घेऊन तो तसाच स्मशानभूमीत निघाला.. इथे मदतीला ना कोणी मित्र, ना शेजारी ना आप्तेष्ट. या आजाराचे भूत असं आहे की आशा वेळेला अगदी प्राथमिक मदत ही मिळत नाही. एरवी सर्व नियम धाब्यावर बसवून सर्व गोष्टी करणारे लोक या वेळी सर्व नियम पाळतात अन माणुसकीचा हा वेगळा रंग समोर येतो. पण आजाराची भीती म्हणा की काही, लोक येत नाहीत. मी पुण्यात होतो, 3 ते 4 वेळा फोन करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. तो एकटाच आईला घेउन निघाला तिच्या शेवटच्या यात्रेच्या सोपस्कारासाठी. अगदी एकटाच. तिथे स्मशानात गेल्यावर अगदी ज्यांची काही ओळख नाही, अगदी रस्त्यालगतचे रात्री उशिरा फिरणारे मुलं त्यांच्या मदतीने इतर क्रिया केल्या. अगदी मडक्यात पाणी भरून प्रदक्षिणा मारायला ही तोच, अन त्या मडक्याला खोच पाडण्यासाठी ही एका अशाच अनोळखी मुलाची मदत, जातीचे ना पातीचे...पण माणुसकीच्या रक्ताचे ते हात. तीन प्रदक्षिणा करून, बोंब मारून तो तसाच विमनस्क अवस्थेत काही मिनिटं स्थिरावला.
तिकडे समोर एक covid body चा ही अंत्यसंस्कार सुरू होता ज्या साठी 60 ते 70 लोक होते अन काही तर एकमेकांच्या गळ्यात पडून रडत होते.
खरं तर होळी आज आहे, पण आईच्या शरीराची ती झालेली होळी आणि त्याच अग्नीच्या ज्वाला आणि त्याच्या त्या चटक्यासाहित, ती धग जशी कमी कमी होत गेली तसे याचे पाय तिथुन निघत होते ..एव्हाना मध्य रात्र झाली होती. वाहन नाही, रिक्षा नाही कोणी मित्र, मित्राची गाडी अगदी काही काही नाही. रस्त्यावर फक्त कुत्रे आणि डोक्यात गेलेला काळ अशा गोंधळलेल्या अवस्थेत तो एकटाच चालत निघाला...कुठुन तरी एक खान साहेब Hero Puch या मोपेड वर आली , ते थांबले अन त्यांनी त्याला घरापर्यंत सोडला ....अशी ही दिव्य अंत्ययात्रा आटोपून प्रशांत घरी पोचला. पुण्याई, मित्र संचय (यात मी ही आलोच), सगे सोयरे अन आप्तेष्ट यांची ती झुंड आज प्रशांतला एकाकी पाडून कुठे गेली याचा काही शोध लागला नाही.. अन मग मला ती कव्वाली आठवली ..
चढता सूरज धिरे धिरे ढलता है ढल जायेगा ...
खाली हाथ आया था खाली हाथ जायेगा
मित्र हो तुमच्या व्यावसायिक फायद्यासाठी, स्वार्थासाठी कोरोनाचा विरोध करू नका, तो आहे आणि अशा विचित्र परिस्थितीत तुम्हाला घेऊन जातो ते कल्पनेपलिकडले आहे ..,तेंव्हा सांभाळून ...ज्याचं जळतं त्याला कळतं ...
ओम शांती ओम शांती ओम शांती
काकु तुमची कायम आठवण येत राहील ...अन दादांची अजिबात काळजी करू नका. प्रशांत आहे खंबीर ...आयुष्याच्या प्रवासात असे अनेक खडतर मार्ग तो फार सामर्थ्याने , धीराने अन आत्मविश्वासाने चालत यशस्वी झालाय ...तेंव्हा काळजी नसावी.
शरद पुराणिक
280321
Comments