ते मंतरलेले दिवस
ते मंतरलेले दिवस
मी आता लिहीत असलेली परिस्थिती तंतोतंत सत्य, वास्तविक असून मी ती जगलो आहे, हा उल्लेख अशासाठी की हे काल्पनीक वाटू शकतं, किंबहुना सध्या सुरू असलेल्या जातीय तेढ, वगैरे वाटू नये या साठी. कुठलीही जात, धर्म श्रेष्ठ किंवा नीच दाखवण्याचा हा आजीबात हेतू नाही.
माझा जन्म बीड येथे झाला. पूर्वाश्रमीच्या अग्निहोत्र असलेल्या घराण्यातले आम्ही, नंतर पुराणिक झालो. तस या दोनीही आडनावांना संदर्भ आणि इतिहास आहे. माझे आजोबा हे स्वतः अग्निहोत्री होते. पंचकुंडी अग्निहोत्र (5 कुंड, संदर्भासाठी चित्र जोडण्याचा प्रयत्न आहे, शोधावे लागतील.
प्रातःकाळी शुचिर्भूत होऊन, अग्निमंथन होऊन, नित्य ब्रम्ह कर्म सुरू व्हायचे. अग्निमंथन म्हणजे लाकडांच्या घर्षणातून, मंत्रघोषात अग्नी निर्माण करून त्या अग्नी ने कुंड प्रज्वलित करून अग्निहोत्र सुरू करायचे. तोच अग्नी घेऊन चूल पेटवायची आणि त्याच अग्नीवर शिजलेले अन्न ग्रहण करायचे. हे व्रत करणारी व्यक्ती त्या काळी social distancing पाळायचे. एका चौकोनात ते वास्तव्यास असायचे. जेणे करून ते इतर कोणाच्याही संपर्कात येणात नाहीत. त्याच सोबत यज्ञशाळेत इतर सदस्य जे अग्नी प्रज्वलन, स्वाहाकार आणि इतर मदतीसाठी असायचे, ते लोक ही distancing पाळायचे. इतर नियम असे, प्रत्येक वेळी यज्ञ शाळेच्या बाहेर आला की परत जाण्यासाठी पुन्हा स्वच्छ, हात पाय आणि गुळणा करून प्रवेश. शक्यतो तसं हवन , स्वाहाकार करताना बाहेर जाणं निषिद्ध होतं. पण पर्याय म्हणून ही तरतूद होती. अगदी लघुशंका किंवा नैसर्गिक विधी साठी जावे लागले तरीही पुन्हा स्वच्छ स्नान करूनच पुन्हा प्रवेश शक्य होता. सतत अग्नी च्या संपर्कात असल्याने शक्यतो शुभ्र धोतर, सोवळे ते ही cotton चे जेणे करून सतत होणारी उठबैस सुखकर व्हावी असा उद्देश होता. या सर्व विधीत वापरले जाणारे साहीत्य (समिधा, शुद्ध तूप इत्यादी) हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून निवडलेले होते जेणेकरून यातून निर्माण होणाऱ्या लहरी निसर्गाला मदत करणारे होते, आहेत. असो, जास्त धार्मिक बाबींकडे न जाता आपला जो विषय आहे तिकडे वळू.
वरील सर्व नियम हे घरातील स्त्रियांसाठी पण होती ज्या ते रुचकर भोजन त्या पवित्र अग्नीवर तयार करून शेकडो उदर भरण करत होत्या. अन्नदान हा या व्रताचा एक अजून महत्वाचा भाग आहे, ज्या शिवाय त्याचे पूर्ण श्रेय किंवा फलश्रुती, वृतस्थ व्यक्तीला मिळत नाही. दररोज शेणाने सारवलेल्या त्या चुली, आणि ते स्वयंपाक घर रोज चौफेर स्वच्छ व्हायचे. वाळलेल्या त्या चुली समोर सुंदर रांगोळी काढून नंतर स्वयंपाक. आजही प्रत्येक सण, वार, कुलधर्म, कुलाचार असेल तर माझी बायको गॅस वर रांगोळी काढते. ही स्तुती नसून एक संदर्भ आहे.
अगदीच पंच पक्वान्न नाही पण जे शक्य असेल ते, आणि येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पोटभर जेवण मिळणार हे नक्की. त्यात ही पौर्णिमेला आणि अमावास्येला होणाऱ्या इष्टी ला जास्त लोक असायचे. अग्निहोत्री मनुष्याने हा यज्ञ यावज्जीव करावयाचा असतो. नित्यकर्मात या यज्ञाची गणना आहे. सोम व पशू यांव्यतिरिक्त हविर्द्रव्य असलेल्या यागास इष्टी म्हणतात. ही इष्टी सर्व इष्टींची प्रकृती आहे. दर्शेष्टी किंवा पूर्णमासेष्टी दोन दिवस मिळून करावयाची असते. पौर्णिमा किंवा अमावस्येला संकल्प व अन्वाधान करून प्रतिपदेला इष्टी करतात. अग्निहोत्र घेतल्यावर या इष्टींचा प्रारंभ पौर्णिमेपासून करतात. ब्रह्मा, होता, अध्वर्यू आणि अग्नीध्र हे चार ऋत्विज असतात. पुरोडाश (अग्निकुंडावर चांगल्या तुपात शिजलेला भात )हे हविर्द्रव्य आहे. पौर्णिमासेष्टीत अग्नी व अग्निषोम आणि दर्शेष्टीत अग्नी व इंद्राग्नी या देवतांना हविर्भाग देतात. हा सर्व विधी अत्यंत लोभणीय, श्रवणीय असतो. व्रतस्थ व्यक्ती त्याच्या पत्नीसह या यागामध्ये सहभागी असते.
साधारण 2 तास चाललेला हा विधी वातावरण शुद्धी करतो.
आजोबा नंतर पुढच्या पिढीत सर्व सरकारी नोकरी आणि त्या नंतर ची पिढी ही खासगो क्षेत्रात असल्याने हे व्रत कोणी पुढे चालवू शकलो नाही. आणि त्या नंतर अग्निहोत्र हे आडनाव आम्हाला सोडून गेलं.
वडिलांचे एक काका नंतर धर्म ग्रंथ वाचन करत ज्यात मुख्यत्वे करून श्रीमदभागवत, देवी भागवत, हरी विजय आणि इतर शेकडो धर्म ग्रंथ होते. आजही काही ठिकाणी एक आसन आमच्या घराण्याचे म्हणून ठेवून ग्रंथ वाचन होते. आशा प्रकारे पुढे आम्ही पुराणिक झालो. या पूर्वी ही हे संदर्भ मी दिलेले आहेत. त्या आजोबांच्या स्वर्ग गमना पश्चात ते आणि इतर शेकडो ग्रंथ ज्यात चारी वेद हे देखिल होते, ते सर्व आम्ही आदरणीय सद्गुरू गवामयन सोमयाजी दीक्षित रंगनाथ कृष्ण सेलूकर महाराज यांना दिले. गच्चीवर जाणाऱ्या पायऱ्याखालील एका मोठया अलमारी वजा कोनाड्यात निरनिराळ्या रंगात बांधलेले ते ग्रंथ आज ही मला लक्ख आठवतात आणि खुणावतात.
विषयांतर होतंय, क्षमस्व. या नंतर आम्ही एक साधारण जीवन जगत होतो त्याची दिनचर्या अशी.
सकाळी स्नान केल्याशिवाय, स्वयंपाक घरात प्रवेश नाही, चहा पण नाही. रोज धाबळ नेसून पूजा, बसायला व्याघ्रासन.
बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक बादली आणि तांब्या हात पाय धुण्यासाठी अंगणात कायम ठेवलेली असायची. नोकरी आणि बाहेर काम करून येणारी मंडळी पुनःश्च एकदा स्नान करायचे आणि नंतर इतर ठिकाणी वावरायचे. तसेच कुठलाही प्राणी संपर्कात आला तर पुन्हा आंघोळ असा नित्य क्रम होता.
माझ्या 10 वी पर्यंत केश कर्तन हे घरीच होत (सखाराम नामक एक व्यक्ती ज्याच्या मांडीत डोकं खुपसून कटिंग केली आहे) , त्या साठी एक पोत असायचं ते नंतर विसर्जित करायचो. जेणेकरून आत्ता सलून मध्ये होणारे आजार होण्याचा प्रश्न नव्हता, केस कापलेल्या व्यक्ती ला स्नानशिवाय मुख्य घरात प्रवेश निषिद्ध होता. त्याने अंगणातच थांबायचे आणि स्नान करून आत प्रवेश करायचा. वैज्ञानिक दृष्टीकोणातून रचलेले अनेक नियम होते ज्याला नंतर अंधश्रद्धा असे नाव दिले. वाढत्या शहरीकरण प्रक्रियेत आणि छोट्या जागेत हे सर्व काळाआड गेलंय. मी स्पृश्य, अस्पृश्य या वादात न जाता स्वच्छता आणि नोरोगी जगण्यासाठी काय आवश्यक आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. मौन वृत्त, कमी बोलणे, अंतर ठेवून बोलणे यात ही आपण संसर्ग रोखू शकतो. फक्त शारिरीक नाही तर मानसिक आरोग्य सुद्धा खूप शुद्ध होतं. कांदा लसूण किंवा तत्सम तामसी आहार वर्ज्य होता, ज्या मुळे पचनेंद्रिये ही उत्कृष्ट होती, मौखिक आरोग्य उत्तम, पोटाचे विकार शून्य. श्रावणी ला जेंव्हा जानवे बदलायचे असते त्या दिवशी पंच कव्य सेवन असायचे ज्यात गोमूत्र, शेण, दूध, दही, तूप अशा गोष्टींची मिसळ असायची. या आणि इतर अनेक प्रथा होत्या जेणे करून स्वच्छता, आरोग्य आणि शरीर शुद्धी असे अनेक फायदे व्हायचे. अगदी एक गोष्ट आत्ता आठवली ती म्हणजे सोवाष्ण, ब्राम्हण, मुंजा म्हणून जेवायला जाताना सोबत आपलं पाणी पिण्यासाठी भांडं घेऊन जाण्याची प्रथा होती, किती मोठा विचार या रुढी मागे होता. तसेच जन्म आणि मृत्यू नंतर पाळले जाणारे शौच, अशौच याला ही वैज्ञानिक आधार होतें. आज विज्ञान इतके पुढे जाऊन ही अनेक लोकांनी कोरोनाबधित मृतदेह ताब्यात न घेता परस्पर अंत्यविधी करण्यास सांगितले. कारण ही तसेच आहे अर्थात - एक संदर्भ म्हणून मी हे लिहितो आहे, सध्याची परिस्थिती तशीच आहे.
या सर्व लेखातून एवढेच सांगायचे आहे ते म्हणजे आज भले भले विद्वान, राष्ट्रपती, पंतप्रधान, धर्मगुरू जे काही सांगत आहेत तेच आम्ही जगलोय अगदी परवा पर्यंत, मग ते आचरणात आणण्यासाठी आम्हाला त्रास होण्याचं कारण काय?
शरद पुराणिक
Lockdown डे 8 एप्रिल 20
हनुमान जयंती
Comments