गौरी गणपती
गौरी गणपती
सण म्हटलं की धावपळ, उत्साहाला उधाण, माणुसकीचा ओलावा, गर्दी, पैशांची उधळण, खायची चंगळ अन कौटुंबिक कुंभमेळा.
तसे वर्षभरात अनेक सण येतात. प्रत्येक सण काही तरी वेगळी आठवण साठवून जातो खोलवर मनात... आणि जुन्या आठवणींना उजाळा देतात. मन भूतकाळात तरंगायला लागतं.. अन एक एक प्रसंग डोळयांसमोर उभे राहतात.
महालक्ष्मी चा सण आता काही आठ्वड्यावर आहे, श्रावण आला की तो सणांची एक मोठी मालिका सोबत घेऊन येतो, म्हणून आज ही आठवण झाली. मराठवाड्यात या सणाला महालक्ष्मी, लक्ष्मया, गौरी अशी अनेक विविध प्रांतनुरुप नावं आहेत. हा सण म्हणजे खूप धावपळ विशेषतः स्त्री वर्गाची, पुरुषांसाठी सामानाची ने आन, घर आवरणे, इत्यादी. पण षोडशोपचार पूजा त्या सोबत षोडश पक्वान्न आणि त्या साठीची तयारी या साठी स्त्री वर्गाची पार तारांबळ उडते एवढी तयारी. आमच्या लहानपणी सगळी काका मंडळी दूर दूर गावावरून गावी यायची, आजही अनेक ठिकाणी ते आहेच पण अनेक ठिकाणी ते काळाच्या आड गेलंय. असो, सर्व अगदी सह कुटूंब सह परिवार यायचे. पाहुण्यांशिवाय हा सण तो कसला? सगळ्या जावा जावा, सुना, नातसुना, इत्यादी एकत्र यायच्या अन कामाची चढा ओढ, गप्पांची संमेलन, हसणं बागडणं, सर्व कडू गोड आठवणीना उजाळा, कोणी सोनं घेतलं, कोणी कपडे घेतली, कोणी जागा घेतली, कोणाची लग्न ठरली इ. इ. या घाई गर्दीत कामं आटोपतात.. सण ऐन उंबरठ्यावर येऊन पोचलेला, सगळीच धांदल.. गौरी आवाहन पूजा समीप येते, कोणी साड्या बदलतंय, कोणी रांगोळ्या काढन्यात गर्क, कोणी फुलांचे हार ओवतय, इतक्यात आजोबांचा वाढलेला आवाज...मुहूर्त टळत चाललाय... मुखवटे घेऊन या आता, बस झाला नट्टा पट्टा.
घरातल्या सुना तयार होऊन देवासमोर पाटावर तांदूळ ठेवून त्यावर मुखवटे ठेवलेले असतात अगोदर, त्यांना हळदी कुंकू वाहून त्यांना मखरात आणून ठेवतात. ही मखर लावण्याची प्रक्रिया आधीच 2 ते 3 दिवस चालायची. एक ज्येष्ठा आणि एक कनिष्ठा आशा दोघींना सजवायचे, ते मुखवटे सजवलेल्या कोथळ्यांवर (aluminium stands) ठेवायचे. इथेही घराघरांत वेगळ्या प्रथा आहेत. कुठे सुगड्या वर म्हणजे मातीच मडकं, ते एकावर एक ठेवून, त्यावर एक छोटा कुंभक ठेऊन त्याला साडी नेसवायची अन त्यावर हे मुखवटे ठेवायचे. आरास करण्याची पध्दत विविध आहे, ते जरा हौशी प्रकारात मोडणार आहे, सजावट करणे हा तसा धार्मिक भाग नसला तरीही आकर्षण म्हणून करतातच. एकदा हे मुखवटे ठेवले की पदर नीट नेटके करून अलंकारीत करून पहिल्या दिवशी संध्याकाळी जी पूजा होते ती आवाहन पूजा.
या सणाचा मुख्य दिवस म्हणजे गौरी पूजन दिवस दुसरा. या दिवशी गौरींची यथासांग पार्थिव पूजा करून त्या मूर्ती मध्ये जीव टाकणे, अगदी प्रत्येक अवयवाचे आवाहन आणि पूजा होते. आधीच उल्लेख झालेला त्या प्रमाणे सोळा भाज्या, चटण्या, पंच पक्वान्ने, फुलोरा, त्या सोबत चकली, विविध प्रकारचे लाडु, अनारसे, गोड पुरी, साधी पुरी, करंजी, साटोरी हे सगळं करताना घरच्या गृहिणींचे ते कष्ट आणि जिवेभावें केलेले ते सर्व पदार्थ, त्या केलेल्या गोष्टी नैवेद्य म्हणून ताटात अगदी सामावत नाही, नैवेद्य वाढणे ही जबाबदारी शक्यतो पुरुषांकडे असायची आहे. ते यथासांग भरगच्च भोजन म्हणजे तृप्तीची अनुभूती ,,आह,, आह. सोबत मागचा तो फोटो जोडत आहे.
त्या संध्याकाळ पासून पुन्हा आप्तेष्ट यांची वर्दळ , या काकांकडे, आत्याकडे, ते आपल्या कडे, कोणाची जेवणं किती ला झाली , कोणाची आरती आधी आटोपली, सगळा हिशेब एका गंमती च्या माध्यमातून होणार. मला आजही ते सर्व प्रसंग जशे च्या तसे डोळ्यासमोर दिसतात आणि कानात घुमत राहतात. कोणाची झालेली फजिती, सोवाष्ण वेळेवर न येणे, ऐन वेळी काही तरी अडचण, इत्यादी किस्से अगदी प्रामाणिक पणे चर्चिले जायचे अन गंमत यायची. यात कुठेही स्पर्धा मत्सर द्वेष नव्हता. ते सर्व फार प्रांजळपणे होत होतं.
तिसरा दिवस म्हणजे गौरी विसर्जन पूजा. दिवस भर गृहिणींचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालतो, या दिवशी पुरण, भजी, दही भात, चटणी भाजी असा मोजक्या पदार्थांचा नैवेद्य होतो. एक मंगलमय दिवस त्याच्या उत्तरार्धात जातो अन मन हेलकावे घेत, भावनिक होतें, गौरीच्या मुखवट्या कडे पाहून डोळे भरून येतात, आज तिला निरोप द्यायचा , जणु एक माहेर वाशीन सासरी निघते, 3 दिवसात इतकी आपली होते, की तिचं जाणं नकोसं होत. अक्षता टाकून बोळवायच गौरींना, सगळी आवरा आवर करत मध्य रात्र होते. एवढं मात्र खरं या धावपळीच्या युगात दुरावलेल्या नात्यांना एकत्र आणण्याचं मोठ्ठ काम असे सण करतात अन नात्यांची घट्ट आवळण होते.
शरद पुराणिक
सण आटोपुन नोकरीच्या ठिकाणी जाताना पूर्वी हाताने कागदावर लिहिलेला लेख, आज पुन्हा दिसला
Comments