मंत्र जागर आणि घंटा नाद

 आमच्या घरचे नवरात्र


आताच नवरात्र उत्सव संपन्न झाला. या वर्षी या उत्सवा अगोदरच आमचे काका हे जग सोडून गेले त्या मुळे आम्ही हा उत्सव साजरा करु शकलो नाही.  पहिल्या दिवशी मी जेंव्हा ऑफिस मधून घरी येत होतो तेंव्हा आसपासच्या घरातुन दरवळणारा गुगळ सुगंध, घंटानाद, मंत्र जागर आणि घंटा नाद ऐकताना मी पार आमच्या मूळ गावी बीड ला गेलो आणि त्या काळच्या नवरात्रीची ती धुम एका चित्रफिती प्रमाणे नजरे समोर फिरु लागली. 


आम्ही ज्या वाड्यात राहतो तो वाडा म्हणजे 26 खण माळवद (लाकडी स्लॅब म्हणा). ज्यात साधारण 10 ते 12 खण आमची ओसरी होती, त्यातच एका कोपऱ्यात आमचे देवघर होते. भिंतीतच काढलेले ते देवघर होते ज्याला एक कमान, आत 4 ते 5 पायऱ्या आणि त्यावर क्रमाने राहणारे आमचे देव. देवीचा एक मोठा तांदळा म्हणजे आमची प्रमुख देवता. त्या सोबत वेगवेगळ्या आकाराचे रंगनाथ, शाळीग्राम, गरुड, दीप लक्ष्मी, श्रीयंत्र, अन्नपूर्णा, विष्णूपद, कुबेरयंत्र, गुरू च्या गुरुमंत्र घेतलेल्या डब्या. देव घरा बाहेर उजव्या हाताला एक मारुती मुंजा, शेंदूर लावून लावून फक्त एक चौकोनी आकार दिसतो आता. सोवळ्या साठी एक सीमारेषा म्हणून 2 फुटाचा एक कठडा. समोर बसून पूजा करण्या इतपत जागा. पूजेला बसण्यासाठी व्याघ्रासन, वरती खुंटीला एका विशिष्ट पद्धतीत वेटोळी करून ठेवलेले सोवळे. पूजेसाठी एक भलेमोठे ताम्हण, गंध उगाळण्यासाठी एक सहान आणि चंदनाचे खोड. इतर साहित्य.


नवरात्रीच्या आधी एक दिवस ते सर्व देव आणि उपकरणी घासणे हा एक मोठा कार्यक्रम असे. ते असे चमकावून ठेवायचे. घटस्थापना होणार त्या दिवशी शाळेला सुटी असो व नसो, घरी थांबणे क्रमप्राप्त होते. वडिलांची पूजा व्हायची, यथासांग पूजा घरचे घरी व्हायची. त्या नंतर वडील स्वतः सप्तशतीचा पाठ वाचायचे, तो वर आईचा सोवळ्यात ला स्वयंपाक उरकत यायचा. माझ्या 12 वी पर्यंत आई रोज सोवळ्यात स्वयंपाक करत होती हे आवर्जुन सांगावे वाटते. याचं कारण म्हणजे आम्ही खरंतर अग्निहोत्री होतो, घरात रोज पंचकुंडी अग्नीहोत्र होते. अग्नीमंथन करुन नंतर विधिवत अग्निपूजन करून त्याच अग्निवर अन्न शिजलं जायचं. पण आजोबानंतर हा वारसा पुढे टिकला नाही, आणि आम्ही पुराणिक झालो. वडिलांचे काका हे पारंगत भागवतकार होते आणि आजही काही विशिष्ट ठिकाणी जिथे भागवत वाचले जाते तिथे एक आसन आमच्या घराण्याच्या नावाने बाजूला मांडलेले आहे, असे आम्ही अग्निहोत्री ते पुराणिक झालो. असो.


आईचा स्वयंपाक घरातुन आवाज यायचा जा रे सोवाष्ण , ब्राम्हण आणि कुमारिकेला बोलावून आणा. अगदी अलीकडे परवा पर्यंत आमच्याकडे नवरात्रात 9 दिवस रोज सवाष्ण आणि कुमारिका जेवायला होत्या. अलीकडच्या काळात वेळ, उपलब्धी आणि इतर गोष्टींमुळे ते पहिल्या आणि शेवटच्या दिवशी असं किंवा ज्याच्या त्याच्या सोयीप्रमाणे झाले आहे.


जेवणं झाली की वेद लागायचे संध्याकाळ च्या आरती चे. हा आमचा सर्वात मोठा आणि आवडता असा कार्यक्रम होता. गल्लीत काकांची आणि इतर नातेवाईकांची घरं होती आणि सर्वांकडे हे सर्व असायचं. आमची एकत्र कुटूंब होती, त्यामुळे आरतीला क्रमाने वेळ मिळायचा. जो आरती करणार आहे त्याने अंघोळ करून सोवळ्यात होणे, तो पर्यंत आमची ओसरी हळु हळू माणसांनी फुलून जायची. गल्लीतील आणि बाहेरून येणारे आप्तेष्ट पांढऱ्या शुभ्र धोतरावर हातात घंटा घेऊन एक एक करून यायचे. इकडे काही जण समोर अग्निकुंडात शुभा टाकून गुगळं आणि त्याच सोबत, आरतीला लागणारे साहित्य याची जमवाजमव करायचे. ओसरी अशी फुलून जायची. आरती करणारा शूचिर्भूत होऊन येताच, "स्वस्ति न इंद्रो वृध्द श्र्व: ' या मंत्राने तो आसमंत भारावून जायचा. षोडशोपचार पूजा म्हणजे, देवी आणि घटाला हळद, कुंकू, फूल, अक्षता आणि नैवेद्य दाखवुन आरतीची सुरुवात व्हायची. मी आता लिहिताना ही शहारतोय एवढं दैवी स्फुरण यायचं त्या नऊ दिवसात. एका मोठ्या ताम्हणात निरांजन घेऊन उभे राहिल की स्वत्व विसरायला व्हायचं. " अग्निदेवता, ....सुर्योदेवता...वरूनदेवता" हा मंत्र होऊन देवावर अक्षता टाकून आरतीला सुरुवात.  खड्या आवाजात साधारण 25 ते 30 लोक एका सुरात आरती म्हणायचे आणि शरीर आत्मा पूर्णत्वे जगदंबे चरणी तल्लीन व्हायचे. कुटुंबात अनेक व्यक्तींना संचार व्हायचे आणि त्यांची सेवा करण्याचं भाग्य आम्हा तरुण मुलांकडे यायचे. अंधश्रद्धा नव्हे तर ते वातावरण एवढं भक्तिमय होतं की स्वतः ला विसरून जायचे ते ज्येष्ट लोक. अर्थात त्या मध्ये कुठलाही ढोंगी दांभिक पणा, अतितायी पणा  नव्हता, एक निस्सिम श्रद्धा व्यक्त होत होती एवढंच. 


कापूर आरती नंतर मंत्र पुष्पांजली होऊन सर्व जण खाली बसायचे. आरतीचा हा पूर्ण सोहळा उभं राहून असायचा. न्यासकरून रोज देवीची एक स्तुती प्रार्थना रूपात म्हणली जायची, कधी कवच, अर्गला, किलक, रात्रीसुक्त, शक्रा दय, अकरावा अध्याय, लक्षकोटी चंडकीरण.अस रोज एक म्हणून सर्वांनी आणलेला प्रसाद एकत्र करून तो पुर्ण वाटायचा. हे सर्व इथेच न थांबता, लगेच आमच्या काकांच्या आरतीला सर्व जण तसेच जायचे, तिथेही तोच क्रम, नंतर आमचे इतर नातेवाईक यांच्या कडे ही जायचे. असा हा साधारण 7 वाजता सुरू होवून रात्री 10 पर्यंत चालणारा सोहळा आता शॉर्ट कट झाला, कुटुंब विभागली, स्थलांतरित झाली उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने, शहरामध्ये अंतर ही जास्त आहेत. पण हो आजही आमच्या प्रत्येक घरात हे असंच चालू आहे फक्त सर्व एकत्र नाहीत एवढंच. या लेखाच्या निमित्ताने मी आज पून्हा तो काळ जगलो. अनेक गोष्टींचा उल्लेख राहिला पण ते पुढील भागात.


जय जगदंब

शरद पुराणिक

अश्विनी पौर्णिमा 13 ऑक्टोबर 2019, हैदराबाद

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती