अश्रूंची अखंड मालिका भाग 2 ....पण अभिमान न गर्वाने छाती ही फुलते
अश्रूंची अखंड मालिका भाग 2 ....पण अभिमान न गर्वाने छाती ही फुलते
एकीकडे कोरोना ने किती नुकसान झाले, कोणाला काय दिले, कोणाला काय नाही दिले. या तणावपूर्ण आणि जबरदस्तीच्या सुट्टीत वेळ कसा सत्कारणी लावावा हे प्रश्न सतत भेडसावत आहेतच. अशातच दूरदर्शन वर दाखवत असलेल्या मालिका हा प्रश्न असा सहज सोडवतात आणि बराच वेळ जातो.
झी मराठी वर 4 ते 6 "संभाजी" राजे वर चित्रित झालेली मालिका सुरू आहे. मी मागेच नमूद केल्या प्रमाणे मागचे काही वर्षे हैदराबाद ला असल्याने मी ही मालिका प्रथमच पाहतोय, इतिहास माहीत असला तरी प्रत्यक्ष ते प्रसंग पाहण्याची मेजवानी काही औरच.
काल च्या 2 तासात आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज स्वतः ची सुटका आग्र्याहून करताना चे प्रसंग. भावविवश, प्रेम, माया, मोह, स्वराज्याच स्वप्नं, शत्रूंचा जीवघेणा पहारा अन अक्षरशः जीव मुठीत घेऊन रयतेचा राजा स्वराज्यासाठी प्राणांची बाजी लावतो.
औरंगजेबा ला धूळ चारून महाराज त्या अवघड मार्गाने कसे बाहेर पडणार हे मोठे प्रश्न भेडसावत असतांनाच, महाराजांचा दुसरा धाडसी निर्णय. शंभूराजे ना मागेच मथुरेत ठेवायचा निर्णय. हा निर्णय घेताना अस्वस्थ झालेले महाराज, आई विना ते 10 वर्ष वयाचं पोर असं दुसऱ्या राज्यात ते ही शत्रू राज्यात एका जुजबी ओळखीवर कुठे तरी राहणार. त्यातच, मुळात शूर पराक्रमी असे संभाजीराजे ही हट्टाला पेटतात, महाराजांना एक घट्ट मिठी मारून सोडून न जाण्यासाठी केलेली ती गयावया. तद्नंतर एकांतवासात स्वतः ला सावरणारे महाराज, अस्वस्थ, विमनस्क गोंधळलेल्या अवस्थेत असलेले महाराज. त्या क्षणी एक अदृश्य शक्ती "सईबाई" ज्या तो प्रसंग अजून भावनिक करतात. दिलेल्या वचनांची याद महाराजाना देताना चे हृदय पिळवटून टाकणारे ते प्रसंग. आपल्याला कायम एक वीर योद्धा, शूर, पराक्रमी महाराज दिसतात, त्यांना किती खडतर प्रसंगातून मार्गक्रमण करावे लागते, दिव्य दिव्य अग्निदिव्य. तुमच्या आमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी, संकटा पेक्षा ही आपण विचार सुद्धा करू शकत नाही असे ते प्रसंग. कुठे पाण्याची, खाण्याची व्यवस्था नाही. दरी खोऱ्या, जंगलं, ऊन, वारा, पाऊस कशा कशाची तमा न बाळगता सतत स्वराज्याचं स्वप्नं जगायचं, नुसतं जगायचं नाही तर ते प्रत्यक्ष कृतीत उतरवून साकार करणारे ते महान योद्धे.
स्वतः ची त्या भावनिक तणावातून मुक्तता करत असतानाच, शंभूराजे येऊन त्यांचं मनोधैर्य वाढवतात, "आबासाहेब तुम्ही निघा, आम्ही थांबतो" काय ते धैर्य, तो बाणा. शंभूराजे ना तिथे सोडायचं म्हणजे स्वतः च त्यांना शत्रूच्या भडकत्या अग्नीत त्यांची आहुती देण्यासाठी ठेवण्या सारखं होतं. पण दस्तुरखुद्द महाराजाना धीरोदात्त पणे त्यांच्या निर्णयाला साथ देतात.
अख्ख बालपण राजघराण्यातील एक राजपुत्र बंदिवासात एका ब्राम्हण भिक्षुकाच्या घरात आश्रयाला राहतो. वेगळे संस्कार, मर्यादा त्या चौकटीच्या आत संभाजीराजे नावाचं वादळ स्वतः ला शमवून काळ ढकलत होते. त्या ही परिस्थितीत त्यांनी दाखवलेले बुद्धी चातुर्य, शौर्य आणि क्लृप्त्या - मुजरा राजे 🙏🏻.
दिवेश मेदगे या बाल कलाकारानी साकारलेले शंभूराजे म्हणजे अफलातून. प्रत्येक प्रसंगातून त्याने साकारलेला अभिनय म्हणजे दिव्य अनुभव... मंदीर चोरीत केलेला न्याय, स्वतः च्या विवाह समारंभात हरकून न जाता एक शोधक नजर, अचूक हेरणारी, शहाजीराजे च्या निधनानंतर आऊसाहेबांची काळजी घेणारे शंभूराजे, विविध खेळात प्रावीण्य, त्याच अविर्भावात इतर धार्मिक, नैतिक शिक्षण पूर्ण. येसूबाई सोबत आणि जन्मदात्री नसताना इतर सर्व मातांशी सोबतच दुधाई सोबत ही त्याच आदराने वागणारे शंभू राजे. या सर्व भूमिकांत त्याने फारच अप्रतिम अभिनय केलाय.
महाराज, आऊसाहेब, पुतळा आई, येसू बाई या भूमिकाही खूप भावतायेत.
उत्कृष्ट संवाद लेखन हे ही या मालिकेचे यश उंचावते.
जय भवानी, जय शिवाजी, जय संभाजी
हर हर महादेव
शरद पुराणिक
11 एप्रिल 20
Lockdown 1st extension day
Comments