माझी लुटुपुटूची नाटय चळवळ - भाग 3

 माझी लुटुपुटूची नाटय चळवळ - भाग 3

 

या लेख मालिकेचं जरा रात्रीस खेळ सारखं चालू आहे. जो भाग आधी यायला हवा होता तो सर्वात शेवटी येतोय. 


झालं असं ज्येष्ठ बंधु B.Sc.Dairy Science  ला अंबाजोगाई ला प्रवेशित झाले. माझी बीड येथे 11 वी चालू होते. भविष्याचा विचार करून आम्ही सर्व अंबाजोगाई ला घर करणार होतो कारण वडिलांची बदली पण होणारच होती. म्हणून 12 वी ला अंबाजोगाई लाच प्रवेश घेतला. तात्पुरती एक खोली घेऊन त्या खोलीत बंधु आणि मी असे राहिलो. किराणा आणणे, दळून आणने, भाजी बाजार करून स्वतः स्वयंपाक आणि नंतर भांडी घासणे. स्वयंपाक, तो ही स्टोव्ह वर म्हणजे भांडी पार काळी कुट्ट असायची. असं ते ब्रम्हचर्य जीवन जगत होतो. तिकडे बाळासाहेबांचे मित्र भगतसिंग हे ही गावावरून अंबाजोगाई ला त्याच शिक्षणासाठी आले होते. ते एका गावचे देशमुख तर दुसऱ्या गावचे ठाकूर असल्याने त्यांचा थाट वेगळा होता. 1987 साली त्यांच्या सेवेसाठी पूर्णवेळ cook होता. या सर्व तामझामामुळे बंधु अनेकदा तिकडेच रमायचे. भगतसिंग पूर्वी पुण्यात शिकले होते त्यामुळे राहणी उच्च दर्जाची, branded कपडे आणि जगण्याची एक विशिष्ट पद्धत. आम्ही म्हणजे त्या काळी 12 वी ला ही 2 आल्टर केलेल्या पॅन्ट, आणि बहिणीने शिवण कला वर्गात शिकवलेला एक झब्बा असं राहायचो. असो. दरम्यान वर्ष भरात घर ही शिफ्ट झाले आणि आम्ही मोटेगावकर यांच्या वाड्यात (आता तो फार मोठा बंगला आहे). तिथल्या ही खूप आठवणी आहेत, नाना, माई, बंडू सर ज्यांनी मला शपु हे नाव दिले - इतर संदर्भ आणि घटना नंतर तपशीलवार देइल.


अंबाजोगाई ही मराठवाड्याची सांस्कृतीक राजधानी असल्याने माझी तिथल्या सर्व कलाकार मंडळी आणि ते घडवून आणण्यासाठी इतर मंडळी यांची माझी ओळख झाली. योगेश्वरी महाविद्यालय ची एक team फार छान काम करत होती. त्यात संजय सुगावकर हे नाव प्रामुख्याने घेतो कारण त्याला ही "खाज" जास्त होती. हा शब्द उपरोधिक नाही तर ती वस्तुस्थिती होति आणि म्हणूनच की काय कुठलीही विशेष तयारी न करता हा एक अत्यंत प्रयोगशील, सच्चा नाट्यवेडा समूह याच "खाज" मुळे उभारला. एवढंच नाही तर अनेक युवक महोत्सव, राष्ट्रीय पातळीवर, राज्य पातळीवर अनेक स्पर्धा मधून विविध पारितोषिके मिळवली. तो या क्षेत्रातच रमणार, स्थिरावणार हे तेंव्हाच लक्षात आलं होतं. आज त्याची पावती मिळालीच आहे. संजू ही कपड्याबाबत तसा निवडक आणि चांगले, चालत्या फॅशनचे कपडे वापरायचा. त्याचा एक sky blue शर्ट जो एका विशिष्ट design pattern नि मग्गीरवार टेलर ने शिवला होता. 1987 - 88 साली ही stylish जीन्स वगैरे वापरायचा.


दुसरं नाव दासू वैद्य - तो आता सर्वाना माहीत आहेच त्यासाठी त्याविषयी तपशीलवार न लिहिता पुढे सरकतो.  दासू चा तो साहित्यिक उगम बहरला आणि फुलला तो ही या रम्य आंबनगरीतच. आम्ही त्याचे साक्षी आहोत हे हो अभिमानास्पद आहेच.


प्रशांत कुलकर्णी, उस्मानाबाद वरून येऊन आपल्या नाना पाटेकर style ने सर्वांच्या फार जवळचा होता. सडपातळ शरीर यष्टी, खादीचा शर्ट, नाना सारखी दाढी आणि तशीच hair style आणि तसंच बोलणं, मोजकेच, धीर गंभीर.  दिग्दर्शन, लेखन, नेपथ्य या विषयी आस्था, वेगळे विचार आणि चर्चे पेक्षा ते कृतीत आणणे याला महत्व देणारा.  पाहताना उगाच रागीट वाटणारा, नाना सारखा पण आत तसाच मऊ आणि प्रेमळ. या व्यतिरिक्त आम्ही नंतर औरंगाबाद मध्ये ही अनेक वर्षे आणि guest appearance मध्ये भगतसिंग असं ही जगलो आहोत.


भगतसिंग - छान आवाज,  नाटकासाठी लागणारा योग्य आवाज, full of expressions आणि smart body language. 


संजय म्हणजे अभिनयाचा एक झरा, द्याल  ती भूमिका तो वाजवून दाखवायचा म्हणजे दाखवायचा. दासू ने लिहिलेल्या भूमिका फक्त त्याच्यासाठीच लिहिल्यात की काय असे वाटायचे.  अनेक पात्र त्यानं लीलया जगवली आणि मनमुराद मनोरंजन ही केलं 


नितीन म्हणजे एक तांत्रिक मेंदू होता, तांत्रिक भाग तो उत्तम हाताळायचा. मितभाषी म्हणजे हसण्यात ही एक विशिष्ट शिस्त पाळणारा हा.  सुयोग्य नियोजन आणि ते ही फारसा गाजावाजा न करता. नितीन चे बाबा ही उपप्राचार्य म्हणून निवृत्त झाले.


ही आणि इतर अनेक मंडळींची माझी दरम्यान ओळख झाली.


हौसिंग सोसायटीत जिथे आम्ही राहायचो त्याच्या मागेच teachers कॉलनी मध्ये नितीन जोशी, समोर च वैद्य सरांच्या घरात प्रशांत  कुलकर्णी आणि भगतसिंग हे दोघे राहत होते. 


त्याच रस्त्यावरून जाताना वैजयंती नदी अलीकडे दासू, जरा पुढे जाऊन गावातील भागात संजू (भालचंद्र वकील चा वाडा). आता सर्वांचे आपले असे मोठे दुमजली घर आहेत. 


या सर्वांच्या आणि गावाचा मध्यवर्ती भाग म्हणजे जीथे राम काका, मुकादम गुरुजी आणि मॅडम, इतर अनेक दिगग्ज तसेच राजकीय प्रस्थ राहायचे ज्यांनी त्यांच्या काळात रंगभूमी गाजवली, वाजवली. त्यांच्या दुसऱ्या पिढीतील बाळू मुकादम आणि त्यांचे भाचे आणि आमचे मित्र मीट्टू शेठ रहात होते.  बाळू म्हणजे बहुरंगी वारसा असलेला दरिया दिल माणूस, वडिलांचा साहित्यिक वारसा, नाट्य वारसा आणि सामाजिक बांधिलकी यात तावून सुलाखून निघालेला बाळू म्हणजे ऊर्जा स्रोत आहे. बाळूचे अनंत किस्से आहेत. तसेच श्री मीट्टू शेठ यांचे ही किस्से आहेतच.


गाव तसं आकाराने फार मोठं नाही. संध्याकाळी हॉटेल रीगल समोर सार्वजनिक वाचनालय आणि त्या बाजुला सांस्कृतिक club होता, त्याच्या मागे एक आमचा असा कट्टा होता, जिथे ही पावलं संध्याकाळ झाली की आपोआप येऊन स्थिरायची. तास न तास या कट्ट्यावर सर्व नियोजन व्हायची, थोडी छेडछाड व्हायची. याच कट्ट्यावर स्क्रिप्ट वर चर्चा, पात्र, आणि स्पर्धा असो वा स्थानिक महोत्सव असो इथेच होणार. इतर उल्लेख टाळतो.  बाजूच्या सांस्कृतिक मंडळात आर्थिक नियोजन (पत्ते), समोर रिगल च्या कट्ट्यावर राजकीय, सांस्कृतिक नियोजन व्हायचे - पण ते जरा उशीरा मध्यरात्री सुरू होणार आणि पहाटे संपणार असायचं. तिथले प्रस्थापित वेगळे होते.  आमच्यातील काही जण परत फिरून त्या मैफिली ही सजवत होते. 


तालमीच्या आशा विशिष्ट जागा नव्हत्या, जिथे कुठे उपलब्ध होईल तो जागा, पण मुख्यत्वे करून ती college वर सभागृहात असायची पण ती अगदी शेवटी, शेवटी.  


हे सर्व करत असताना कधी बाहेर जेवायला जायचे plan ठरायचे. मग प्रत्येक जण आपल्या घरी वेगवेगळ्या कहाण्या सांगून निघायचे. आपल्या नावाचा स्वयंपाक उरनार असेल तर त्या पोळ्या, भाकरी कागदात बांधून जेवायला बाहेर पडायचे. यात पशा आणि भग्या एकटे राहायचे, त्यांना अनेकदा "मेहुन" म्हणून जेवायला आमंत्रण असायची आळी पाळीने सर्वांच्या घरी.  अंबाजोगाई सारख्या ठिकाणी ते दोघे असे एकटे रहायचे ते कोणाच्याच आईला, वहिनीला फार वाईट वाटायचं, मग सणवार,  कधी अगदी सहज म्हणून पण हे चालू असायचं. 

त्या दोघांचे नाव, मग त्यांच्या सोबत आमचे ही नंबर लागायचे. असा तो एक कौटुंबिक जिव्हाळा असलेला समूह. आज ही या नात्यांची वीण घट्ट आहे, अधून मधून ते धागे आम्ही अवळतोच अजून घट्ट होण्यासाठी.

जेवणं झालं की college वर जाऊन मग नाटकाची तयारी. 


या सर्वात दोन मुख्य नावं राहिली ती म्हणजे सुधीर वैद्य सर आणि प्रकाश प्रयाग सर. महाविद्यालयात प्राचार्य आणि उपप्राचार्य असलेले हे महागुरु या समूहाची Friend, philosopher, guide आणि खंदा आधार होते - यांतच सर्व आलं.  विवेक गंगणे आता राडीकर, आनंद कऱ्हाडे, यंक्रस आणि इतर अनंत नामोल्लेख आहेत - कृपया उल्लेख नाही म्हणून रागावू नका.  पिटु शेठ, सचिन belurgikar लालू शेठ  parag shah ही कदाचित एक कादंबरी होईल या ताकदीची व्यक्तिमत्त्व. 


दरम्यान आम्ही औरंगाबाद ला शिफ्ट झालो अन मग मंगेश चे garage हे पंजिकृत कार्यालय झालं जिथे अनेक प्रभृती अवतरल्या गोंदू गोविंद मोटेगावकर आणि इतर अनेक - पुढे तपशीलवार उल्लेख येईलच.


हे सर्व सोपस्कार चालू असताना इकडे माझं वेगळं असं अस्तित्व होतंच, कारण मी commerce चा होतो आणि हे सर्व science चे होते. 


मी छात्रभारती च ही काम करायचो तिथे संपदा कुलकर्णी जी आता नाट्यशास्त्र विभाग प्रमुख आहे, सदानंद, पापा आणि सुऱ्या अशी एकाच घरातली चार भावंडं माझे मित्र होते.  संपीच लग्न झालं ते संदीप गिरगावकर ही मित्रच आणि या प्रक्रियेचा भाग होतेच. 


मी आणि सदानंद तर अंबाजोगाई हुन पुण्याला साने गुरुजी स्मारक येथे पथनाट्य प्रशिक्षण शिबिरात आलो होतो, तिथे धनंजय आमोणकर त्याची बहीण यांच्याशी गट्टी झाली त्या 2 दिवसाच्या शिबिरात त्याच्या घरी जाऊन एक गाण्याची मैफल पण केली. 


अंबाजोगाईत ही एक नाट्यशिबिर मी आणि मिट्टया म्हणजे श्रीपाद कुलकर्णी ने केलं. नागझरी च्या खळाळत्या पाण्याच्या सहवासातली ती आठवण आज ही ताजी आहे. 


या आणि अशा अनंत आठवणी आहेत उराशी...


पाखाडुबरी, पाखरखत, पाक पुई 


शरद पुराणिक

12062020

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती