काम धंदा - पोट पाणी - बरंच काही (भाग 5) पुणे / हैदराबाद
काम धंदा - पोट पाणी - बरंच काही (भाग 5) पुणे / हैदराबाद
या फांदीवरून त्या फांदीवर
या जंगलातुन त्या जंगलात
नदी, किनारे, तळे, समुद्र
असं चौफेर उडतच राहिलो
ही एक फांदी जिथे जास्तच विसावलो, चूक की बरोबर माहीत नाही पण रमलो राव !! ☺️😊 ;(
मागच्या लेखात कष्ट, काम या विषयी लिहिलं होतंच, तेंव्हा ते जरासं बाजूला सारून गमती जमती, विविध अनुभव या विषयी. 2011 ला रुजू झालो अन कामात गुंतत गेलो पण त्याचं चीज झालं. 8 वर्षात दोन प्रमोशन आणि त्या नंतर थेट कॉर्पोरेट ऑफिसला माझी विभागप्रमुख म्हणुन निवड झाली तिथेही 3 वर्षापेक्षा जास्त काळ राहीलो. अनंत दिव्य जबाबदाऱ्या, आवाहने स्वीकारून स्वतः ची निवड सार्थ ठरवली. असो खूप झाल्या टीमक्या वाजवणं !! उगीच आपलं बेडकासारखं पाण्यात टर टर :) !!
वार्षिक सहली हा एक कार्यक्रम इथेही होताच ...पुन्हा सारंग भिडे (Sarang Global Tours) हे सर्वेसर्वा ..हे ही औरंगाबाद सोडून पुण्यात स्थिरावले ..त्याच्या सोबत मग पाहणी, पडताळणी, चर्चा, नियोजन आणि प्रत्यक्षात आयोजन असं सालंकृत कार्य इह वेळा पार पाडले. इथे सोबत आमचे मनुष्यबळ विकास विभाग आणि इतर विभागाचे सहकारी असायचेच ..उल्लेख आवश्यक आहे नाही तर म्हणणार काय राव सर सगळं क्रेडिट हे एकटेच घेतात ..तेंव्हा हे सर्व यश हे समूहाचे असं मी मानतो.
लोणावळा, खोपोली, भोर, अशी असंख्य ठिकाणे आम्ही फिरून जिथे सर्व मेळ बसेल अशा ठिकाणी पक्के करून त्या अतिशय यशस्वीपणे आयोजित केल्या. एकूण संख्याबळा पेक्षा कमी लोक यात सहभागी असायचे ...असतात काही काही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालणारे ..पण हाजीर तो वजीर या धर्तीवर या सहली आम्ही छान जगलो. पण आम्ही HR Admin आणि Support म्हणजे मुलीकडचे अन बाकी सर्व लोक मुलाकडचे असं समीकरण. लग्न कार्यात होतात तसे अनेक मानापमान नाट्य इथे ही व्हायचे ...पण तीच तर खरी गंमत आहे. पण आमचा समूह एकदम तरबेज होता अन अगदी चोख व्यवस्था ठेऊन (जसे कार्य निर्विघ्नपणे सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेतच त्या उक्ती प्रमाणे) आम्ही ते पार पाडायचो. म्हणजे अगदी वरात, अन वऱ्हाडी मंडळी घरातुन निघून पुन्हा घरी पोचवण्यापर्यंत सर्व बंदोबस्त. 5 ते 7 बस, त्यांचं मार्गक्रमण, प्रवासांतर्गत सर्व व्यवस्था अगदी पाणी, प्रथमोपचार, नाचण्यासाठी ठेकेदार गाणी, अल्पोपहार, भोजन (दोन्ही अंगी)..संध्याकाळी पुन्हा हादडणे इत्यादी. इथे दुहेरी भूमिका एक पोलीस सारखी अन दुसरी वधू पक्ष ..कोण कुठे कसा काय, संरक्षण ते अगदी संगीताच्या पहिल्या ठेक्यावर आपण थिरकल की मग लोक येत राहतात ...अशी ही बहुरंगी भूमिका. पण कुठलाही ताण न घेता हसत खेळत चालू द्यायचं.
आता या झाल्या कार्यालयीन सरकारी (ऑफिसच्या) खर्चाणे होणाऱ्या ...पन जसं मी आधीच नमूद केलं की आमची टीम खूप भारी होती आणि सर्व एकमेकांना असे घट्ट धरून चालणारे होतो ..दर शुक्रवारी सकाळचा नाश्ता कोणा एकाकडे तो ही घरून घेउन यायचा आणि सर्व मिळून एकत्र खायचा ...दर शुक्रवारी एकाचा नंबर ..हा कार्यक्रम अनेकांच्या डोळ्यात भरला होता कोणाला हेवा वाटत होता तर काही जण ...(असो).. पण आम्ही तो अव्याहत पणे सुरू ठेवला....पुढे काही विघ्नसंतोषी लोकांमुळे तो बंद झाला. एकत्र वाढदिवस, भेळ पार्ट्या, कधी बाहेर जेवायला जाणे, निरोप समारंभ, असे एक ना अनेक छोटेखानी पण माणुसकी, प्रेम आणि मायेच्या ओलाव्याने भरभरून सोहळे पार पाडले. तुझं माझं नाही, एकमेकांना दूषण देणे नाही, हे माझं काम नाही या गोष्टींना अजिबात वाव नव्हता. सर्व चांगल्या, वाइट, अवघड परिस्थितीत एकदिलाने कार्यरत असायची. या व्यतिरिक्त दर पावसाळ्यात एक weekend ट्रीप - ,येवा कोकण आपलोच असा ... गोव्यान ही गेलो ..इथे मात्र व्यवस्था सर्व जण मिळून करायचे आणि जबाबदाऱ्या वाटुन घेतलेल्या होत्या त्यामुळे आम्ही जरा आराम करायचो. मोजता येणार नाहीत इतक्या त्या सहली, त्याच्या गमती, किस्से, या सहलीत सर्व साग्र संगीत असल्याने घटनाही तशाच ....मांसाहारी लोकांना विशेष आ आनंद ..सकाळी तिथल्या स्थानिक मच्छि बाजारात जाणे विविध प्रकारचे मासे ..ते होताना घडणारे किस्से ...आमच्या सारख्याना आपलं पोटभर सोलकढी किंवा उकडीचे मोदक मिळाले तर परमोच्च आनंद. मग ते विवीधरूप दर्शन - अजुनच मज्जा यायची. समुद्रात जाणे, पाण्यात धमाल मस्ती तर इतकी केलीये की विचारू नका. त्या वाळूत क्रिकेट खेळण्याचे खूप रेकॉर्ड आहेत ...तर त्यावर आपली नांवे गिरवत त्याभोवती फोटो ही काढलेत.
काही सहली सहकाऱ्यांच्या शेतात , गावी ही झाल्यात अन ते ग्रामीण जीवन, त्यातील अडचणी, गमती ..म्हणजे अद्भुत, अवर्णनीय. शेव भाजी, आमरस, भरली वांगी, कोथिंबीर वडी, चुलीवरचा चहा, नारळाच्या मसाल्यातल्या भाज्या..तर कुठे गरमागरम पोहे त्या वर भुरभुरलेले खोबरं ..आणि साहेबी थाट....विचारूच नका. प्रवासात थांबलो की तिथे होणारे नाष्टे, जेवण ..किती सांगू अन किती नाही ...हा खजिना इतका आहे की लिहिता लिहिता जागा पुरणार नाही. अगदी पोल्ट्री फार्म मध्ये झोपणे ते गावातल्या सार्वजनिक हातपंपावर आंघोळी... शेतात फेरफटका.
या सोबत नवीन रुजू होणारा, कोणाचे लग्न झाले, कोणाला मूल झाले, घर झालं, बढती झाली की दोन चार जण एकत्र मिळून पुन्हा सहभोजन ... बहुतेक सर्व नामाँकित हॉटेल्स या निमित्ताने फिरून झालीत.
दरवर्षी होणारे विविध सोहळे, दसरा, दिवाळी, सुरक्षा सप्ताह, रक्त दान या सर्व कार्यालयीन कार्यक्रमात ही तितकेच हिरीरीने भाग घेणारा अगदी दृष्ट लागावा असा समूह... पारंपारिक पोशाख, रांगोळी, ऑफिस डेकोरेशन, प्रश्न मंजुषा असो किंवा सुरक्षा सप्ताहात होणाऱ्या विविध प्रात्यक्षिक स्पर्धा ...चौफेर सहभाग, आयोजन ते समाप्ती.
यात एक खूपच मोठा सोहळा असतो तो म्हणजे वार्षिक अंतर ऑफिस होणारे खेळ ...या विषयी एक वेगळा लेख होऊ शकतो ..जो मी या पुर्वी लिहिला होता पण संदर्भ वेगळा होता ...स्थानिक पातळीवर खेळ, त्यातील विजेते हैदराबाद ला जाऊन इतर ऑफीस सोबत खेळणं आणि अभिमानाने आणि गर्वाने सांगतो ..सर्वात जास्त वयक्तिक, आणि सांघिक पातळीवर पारितोषिक पटकावत पुणे संघ कायम अग्रस्थानी आहे, होता. दरवर्षी वेगळ्या प्रकारचे टीशर्ट, ट्रॅक पॅन्ट design करून सतत आपली विशेष ओळख निर्माण केली, पुणे म्हणजे शिस्त, सांघीकबळ आणि प्रावीण्य हा ठसा ही उमटवला ....
असं सर्व अलबेल असतांना एक दिवस मी मुंबईत ,कामानिमित्त होतो, तिथेच फोन आला आणि मला हैदराबाद ला येण्यासाठी सांगितले.. तसाच मुंबई वरून विमानानं हैदराबाद गाठलं ....अन माझी बदली झाली !!
मनी ना ध्यानी अचानक हे घडलं ......
पुढचं लिहू की नाही या विचारात थांबतो 😊☺️
शरद पुराणिक
130721
तळटीप - खूप फोटो आहेत ..मित्रांनो तुम्हीही FB वर वाचलं की तुमचे फोटो टाका.
Comments