Fathers Day
मागच्या वर्षीची आठवण ...
Father's Day ...
आज संध्याकाळी स्वर्गातून आधी संदेश आला
नंतर व्हिडिओ कॉल आला आणि ऐकावं ते नवलच
आज ते म्हणाले अनेक वृद्ध पुरुष आणि काही तरुण मध्यम वयाचे इथून गायब आहेत. काही काल रात्रीच गेले तर काही सकाळी, दुपारी तर काही संध्याकाळी आत्ता गेले.
अनेक इथंच थांबलेत, काही सपत्नीक आहेत तर काही एकटे तर काही निराधार.
रात्र होत आलीय म्हणुन काळजीने फोन केला हो
एक तर ती महामारी आधीच व्यापलीय, एवढी की इथे आम्हाला जागाच नाहीय इतकी आवक आहे, पण आज अचानक गर्दी कमी दिसली अन चौकशी केली.
मी त्यांना विचारले कुठल्या प्रदेशाचे लोक आहेत, ते म्हणाले तसे सर्वच देशाचे आहेत. पण साधारण पाश्चिमात्य लोक दरवर्षी असे जातात, पण गेल्या काही वर्षात तुमचे ही लोक असे जातायत , नेमकं काय म्हणून आपलं फोन केला.
मी त्यांना बोललो, अहो आज इकडे Fathers Day असल्याने बरेच बाप त्यांच्या मुलाच्या फोन मध्ये status म्हणून आले आहेत आणि 24 तास ते राहतील, जसे जसे ते तास भरतील, ते हळु हळु येतीलच, काळजी नसावी.
पण काही लोक वैतागून परत आले, मी त्यांना बोललो आहो जिथे 2 ते 4 मुलं, मुली असतील तिथं जरा धांदल झाली असेल की नेमकं कोणाच्या यंत्रात राहू, जो आवडीचा की जो नावडीचा, पण बाप तसा फरक करत नाही , पण आता आलोच आहोत तर कुठे तरी राहू अन निघू. एरवी कोण आमची आठवण काढतील, कधी बाजूला बस म्हणून विनवण्या न केलेलं पोर ही आज शोधत होतं मिठी मारतानाचे फोटो, पण दिलीच नाही कधी तर फोटो कुठला हो. काही जण तर त्यांच्या फोटो सहित अन संदुकीसाहित फेकले गेले बाहेर. तर काही वृद्धाश्रमात डोळ्यात तेल घालुन वाट पहात तिकडूनच इकडे आले, शेवटची भेट नाही, संस्कार नाही. अशा ही काही जणांना आज उंची मोबाईल मध्ये crop करून, artistic पद्धतीने फोटोत गुंडाळुन ठेवलं आहे - 24 तास तर ते सोंग असतं, बाकी आहेच आपलं आहे तस, होतं तसच.
आमचा फोन सुरूच होता, इतक्यात काही मंडळी परतत होती, असं तिकडचा व्यक्ती सांगत होता. त्यातले काही खुष, काही पाणावलेल्या डोळ्यांनी, तर काही खट्टू झाले होते. काहींना त्यांच्या मागे राहिलेल्या अर्धांगिनींचे दर्शन झाले, काहींना गोड नातवंड पाहता आली, एरवी खस धस करणारी सून ही जरा बरी वाटली. पण काही फार व्याकुळ होते, त्यांच्या पश्चात अनेक जणांचे वाईट हाल आहेत, ते कळकळीने सांगत होते आम्हाला घेऊन चला पण यांचा नाईलाज होता.
तिकडचा माणूस जरा जास्तच चौकस होता, तो म्हणाला पुर्वी पितृ पक्षात ही मंडळी फार खुष असायची कारण आदराने आमंत्रण येणार, हे यथेच्च जेवणार आणि सर्वाना दर्शन देऊन तृप्त होऊन परतायचे. पण म्हणाला हल्ली ते प्रमाण जरा कमी झाले आहे. मी सांगितलं, हल्ली यांच्या नावाने कुठे तरी दान धर्म होतो, कोणी दूध केळी देतो तर कोणी या गोष्टीवर आपला विश्वास नाही या मार्गावर तटस्थ असतात, म्हणून असेल कदाचित.
पण मी त्याला सांगितले, अहो या so called डे मुळे एक दोन संधी जास्त मिळाल्यात, हे ही नसे थोडके, आहे त्यात आनंद मानावा असं त्यांना कळवा. पण त्याच्या चौकश्या काही संपत नव्हत्या, तो विचारू लागला अहो ते आजकाल आमच्या या लोकांचे तुम्ही फोटो पण ठेवत नाही, ज्यांनी लावले त्यांनीही नदीत फेकले, कुठे तरी अडगळीत ठेवले, असं का हो? मी म्हणालो तुमच्या विश्वकर्माला विचारा, त्याच्या काही अनुयायांनी हा विचार इकडे पेरला की मृत व्यक्तींचे फोटो घरात लावू नये.
हे आमचे संभाषण सुरुच राहिले तो वर अजून मंडळी परतत होती.
पण इथे जी खाली आहेत त्या मंडळींची ही अवस्था थोडी फार अशीच होती.
निदान फोन च्या status मध्ये जागा देऊन सर्व बापाना आज जवळ केलंत , यातच ते खुष आहेत. जे चांगले वागतात त्यांनी तसेच वागावे आणि इतरांनी त्यांचा आदर्श घ्यावा.
या सर्व गोष्टीत एक न उलगडलेले कोडं, बापाच्या मुली काल रडून रडून लाल होत्या, तर बापांची काही मुलं माञ आसवं लपवत होती, तर काही कोरडे शब्द status ला ठेऊन वावरत होती.
Happy Father's Day.
शरद पुराणिक
21062020
पुनः प्रसारण
Comments