आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अर्थ बदलणारी कोजागिरी

 गेल्या वर्षीची आठवण आज पुनः प्रक्षेपित ...भावना त्याच आहेत 



आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अर्थ बदलणारी कोजागिरी


आजच्या उत्सवात, विशेष दिवसात माझंच नाव असल्याने या विषयी काही तरी लिहु असं प्रकर्षाने वाटलं.  आणि कोजागिरी ला शरद पौर्णिमा असं नाव आहे हे माहीत नव्हते असं नाही पण आज त्याचा साक्षात्कार झाला. मग व्यक्त तर व्हायलाच हवं (आता पुण्यात असल्याने शब्दांची ही सर मिसळ थोडी सांभाळून घ्या). मूळ मराठवाडा, ते ही अगदी core भाग म्हणजे बीड जिल्हा. त्या नंतर 15 वर्ष औरंगाबाद आणि 15 वर्ष पुणे. त्या मुळे आमटीला वरण म्हणायची आणि गोड वरणाला साधं वरण...असा आणि इतर अनेक भेसळयुक्त शब्द संभार आपण समजुन घ्याल.. बरं या 5 ते 7 इंच फोन वर लिहिताना होणाऱ्या र्हस्व दीर्घ चुका हे ही तसंच, कधी घाईत, कधी कंटाळवाणे आहे म्हणुन, तर वेळे अभावी इतस्ततः उलट पालट होतं, त्या सर्व अक्षम्य चुका पदरात घ्या. 


कोजागिरी ही अशी मध्यात येते, नुकतीच धार्मीक सण सोहळ्यांची एक मालिका संपुन, एक निखळ आनंद देणाऱ्या सणाची चाहूल घेऊन येते. जिथे फक्त आनंद लुटायला वाटायला आणि उधळायला मज्जा येते. फार धार्मिक बंधन नाहीत, खाओ पीओ ऐश करो..असं काही तरी.  प्रत्येक व्यक्तीला या विषयीच्या आठवणी, संदर्भ, आणि अर्थ वेगवेगळ्या अनुभूती वयाच्या प्रत्येक टप्प्यावर देऊन जाते. 


लहानपणी फक्त मध्यरात्री उठून ग्लासभर मसाला दूध पिणे एवढाच काय तो उमगलेला अर्थ.  हळूहळू आपण मोठे होत जातो मग गल्लीत पैसे (वर्गणी) गोळा करून (आमच्या कडे याला पट्टी गोळा करणे म्हणतात) ही साजरी होते.  मग चिल्लर, ठोक असे ते पैसे ढगळ्या चड्डीच्या खिशात आवाज करत दूध आणायचे, थोडी साखर, चारोळी, विलायची असे पुडे हातात घेऊन, चड्डी सावरत पळत गल्ली गाठायची. एरवी लवकर होणारी संध्याकाळ आज लवकर का होत नाही. नंतर कोणाची तरी गच्ची किंवा अंगण गाठायच, ज्यांच्याकडे आहे ते  आई बाप किती ही आदळआपट करोत पण पुर्णतः दुर्लक्ष करून तामझाम सुरू. हळूहळू सवंगडी यायचे, येताना मोठ्या डोळ्यांनी आणि दात जिभेखाली ठेऊन स्वागत व्हायचं प्रत्येकाचं. त्या घरातले काका आज एकदम खुन्नस द्यायचे, पण आपण त्या गावचे नाहीच असं समजुन राहायचं बिनधास्त.  या वासरात एक लंगडी गाय शहाणी असायची मग ते मोठ्या हाताने दूध आटवणे आणि प्रक्रिया सुरू असायची. दूध आटवत डोळे आकाशात फिरवत 12 वाजण्याची वाट पाहत बसायचे...,एकदाचे बारा वाजले की ते दूध ढोसायचं  अन घरी पळायचं... घरी ही त्याच नजरेने स्वागत.


दिवस कॉलेजचे, आता पौर्णिमेच्या चंद्राचा प्राथमिक अर्थ कळत असतो, कुठल्या तरी चेहेऱ्यात तो दिसतो.  मग आपण जशी पौर्णिमेच्या चंद्राची वाट पाहतो, तसंच इथंही हा चंद्र कधी पाहतो हा उतावळेपणा असायचा. खऱ्या चंद्राला खूप अंतर असतं तर इथे खूप बंधनं आणि मर्यादा असतात. जसं आपण चंद्राला इतक्या उंचावरुन आपल्या दुधात पाहतो, तसंच मिळेल त्या कोपऱ्यातून, खिडकीतुन आणि येता जाता हा चंद्र टिपायला मन उतावीळ.  


त्यांची कोजागिरी त्यांच्या गच्चीवर , यांची इकडच्या गच्चीवर.  आता गच्चीवर छोटे लाईट वगैरे आले होते. छोट्या टेपरेकॉर्डर वर गाणे वाजत होते. तिकडच्या उकळत्या दुधातील निघणार्या वाफातून अधून मधुन डोळ्यांची दुर्बीण करून तो चंद्र पाहायचा. तीच धडपड त्या गच्चीवरून ही.  मग ज्या कोपऱ्यातून तो दुर्बिणीचा दृष्टिक्षेप योग्य असतो तो कोपरा व्यस्त होतो.  त्या चंद्र दर्शनाची ही कोजागिरी या टप्प्यावर वेगळ्या अर्थांची असते.  नजरानजर झाली तसे गाने बदलते. ती रात्र संपूच नये असे भाव अन मग पहाटे पर्यंत त्याच लयीत संथ संथ अन मंद होणारी कोजागिरी. 


इथून काही कहाण्या रूप घेतात, काही बेरंग होतात, काही अर्धवट राहतात तर काही त्याच वाफेच्या धुरात विरळून जातात. 


याच दरम्यान दोस्ती यारी जीवलग अशा मैत्रीच्या इमारतींची पायाभरणी होतें, अन त्या कालानुरूप आकार घेऊ लागतात. त्या काळातली कोजागिरी आज ही घडते ज्यांना ज्यांना शक्य होते, म्हणूनच त्या इमारती आज दिमाखात उभ्या आहेत ..रंग फिके झाले तरी भिंती अभेद्य आहेत. 


पुढे नोकरी, व्यवसाय असे स्थिरावतात सर्व जण मग बोहला खुणावतो. या दरम्यान ची येणारी कोजागिरी म्हणजे "दिल तो पागल है" सारखे मेरे लिये कोई ना कोई कही ना कही बना है ...अशा विचारात जाते. प्रत्येक पौर्णिमेच्या त्या उजेडात तो अंधुक चेहरा खुणावतो ...स्पष्ट दिसत नाही आणि मग ती आकृती मनातील आकाराची भासते. लग्न ठरते अन...या दरम्यान येणारी कोजागिरी फार सुखद वाटते. अगदी कॉलेजच्या त्या धूसर आकृतीबंध ते मूर्तिमंत चेहऱ्याचा चंद्र, ज्याला त्याला आपला आपला चंद्र भेटतो. हळूच चिमटा काढुन बघतो आपण, की हा चंद्र इथे साक्षात उगवलाय. असंख्य स्वप्नांच्या ओंजळी त्या आकर्षक चंद्रावर अर्घ्य म्हनून सोडायच्या. त्या रित्या ओंजळीत तो चेहेरा, त्याचं प्रेम, अन स्वप्नांचा सुगंध असं मिश्रण घेत जगायचं. 


विवाह, पहिली कोजागिरी, नंतर मुलं बाळं अन कालचक्र पुन्हा त्या टप्प्यावर येऊन थांबते, जिथे सुरू झालं.  काळ बदलला, मुलांची ती घुसमट आता नाही, त्यांनी ठरवलं तर ते हवी तशी कोजागिरी साजरी करू शकतात. पण काळानुसार उत्सवाचे स्वरूप बदलले, कोजागिरीच्या दिवशी दूधच का प्यायचे, अन मग ज्याचे त्याचे दूध वेगळे... छोटा टेपरेकॉर्डर आता कर्कश dj झाला ,  दुधाच्या वाफे ऐवजी बिड्या काड्यांचे धुरवडे येऊ लागले. एकाच गच्चीत दोनीही म्हणजे चंद्र अन त्याची वाट पाहणारे एकत्र. अंतर कमी झालं पण भाव, प्रतीक्षा, ओढ दुरावली.  पण काही ठिकाणी निखळ, शाश्वत मैत्रीच्या गप्पांचे फड ही रंगू लागले. त्यातून काही घट्ट नाती झाली, पण काही ठिकाणी दर पौर्णिमेला वेगळा चंद्र असं वाटणारे ही आले. अन मग तिचं ते रूप वेगळं.  


हल्ली social media ने हिचं विविधरंगी रुप मांडून तिचं ते बहुरंगी रूप झोतात आणलं. कुठे आलिशान बंगल्यावर तर उच्चभ्रु वसाहतीत जोरदार सोहळे, karaoke, बुफे, नाच...अंताक्षरी ..पण अंताक्षरी च्या गाण्यात आपल्या अंतरंगातील चंद्र दिसत नाही. 


मोठी झालेली मुलं आता रात्र बेरात्र बाहेर राहतात त्यांच्या येण्याची वाट पाहत साजरी होते आई बापांची कोजागिरी, घरातच गॅस वर आटवलेले दुध म्हातारे दोघेच पीत, काचेच्या ग्लासातून अनुभवतात गेलेल्या सर्व पौर्णिमा. 


कुणाचे चंद्र, तिथेच वरती चंद्राच्या बाजूला आसपास अन हे इथून हाताची झापड करून त्याला पाहण्यासाठी सुरकतलेल्या डोळ्याची दुर्बीण करतात. काही वृद्धाश्रमात सामूहिक कोजागिरी सोहळे होतात.  सभोवताली काही ही असो पण प्रत्येकाचा चंद्र हा त्याच्या हृदयाच्या कप्प्यात सुरक्षित असतो अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. 


!! सर्वांना कोजागिरीच्या शुभेच्छा !!🌕🌔🌙🌖🌕


शरद पुराणिक

शरद पूर्णिमा

301020 - 191021

Comments

Popular posts from this blog

बायकोची जीवश्च कंठश्च मैत्रीण मानसी चा जन्मदिन....