हम यंहाके बादशाह ...मीच इथला राजा, राणी ...तुम्ही गुलाम...उग बसा शांत


 हम यंहाके बादशाह ...मीच इथला राजा, राणी ...तुम्ही गुलाम...उग बसा शांत


हा विषय कोणावर ही वयक्तिक टीका, कोणाला उद्देशुन ही नाही... काही संदर्भ मिळतेजुळते असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. आणि केवळ गंमत या सदराखाली लिहीत आहे अजिबात वयक्तिक घेऊ नये.


तुम्ही कुठल्याही खाजगी दवाखान्यात जात असालच ..खरं तर कोणालाच तशी वेळ येऊ नये, पण हल्लीच्या जीवनात अनेकदा जावे लागतेच. मी आत्तापर्यंत जिथे जिथे गेलो आहे तिथे हे सतत अनुभवाला आलेच आहे.  साधारण सर्वच कार्यालये, छोटी मोठी इस्पितळ, इथे एक सर्वे सर्वा राज्य करणारे एक बादशाह, राजा किंवा राणी असतात. आणि त्यांच्या बरहुकुम इथली सर्व कार्यप्रणाली चालत असते.  तुम्ही पोचल्या पोचल्या ते तुमच्याकडे असा काही कटाक्ष टाकतात की आपण बस पकडण्यासाठी विमानतळावर पोचलो की काय अशी शंका येउन जाते. मग आपण काही विचारण्याच्या आतच ते अगदी रागात दोन चार प्रश्न आणि सूचना देऊन तुमची मानसिक स्थिती अजून बिकट करतात.  समोर रिकाम्या काही खुर्च्या असतात त्यात तुम्ही बसणार एवढ्यात तो किंवा ती खेकसाळतात आणि दुसरीकडे बसण्याचा इशारा करतात. इतक्यात त्यांचा फोन वाजतो आणि त्या फोनवर ते व्यस्त होऊन जातात. आत डॉक्टर रुग्णांना तपासण्यात जेवढे व्यस्त नसतात त्या पेक्षाही जास्त ही मंडळीं त्यांची खाजगी चर्चा आणि बरंच काही या वर बाहेर व्यस्त असतात.  बरं काही लोक आगाउची नोंदणी, नंबर लाऊन असतात, काही आपल्यासारखे चालून आलेले तर काही अगदीच घरी बहुधा करमत नाही म्हणून, किंवा दोन चार तास वेळ कसा जाईल या नियोजनाने आलेली असतात.  इथल्या नियमांच्या ठिकठिकाणी तशा सूचना लावलेल्या असतात, काही ठिकाणी त्या नसतात. काही ठिकाणी हा सर्व कारभार पूर्णतः यांच्या स्वाधीन म्हणण्यापेक्षा यांच्या मर्जीनुसार चालतो.


तुम्ही काही शंका किंवा प्रश्न विचारायला गेलात तर यांचा अविर्भाव एवढा की अगदी MBBS, MD, FRCS आणि अनेक वर्षे परदेशात  डॉक्टरकी करून आलेल्या अविर्भावात ते उत्तर देतात.  टाक टाक चपला बुटांचा आवाज, एकदम कडक style ने तो वावर असं वाटतं की बहुतेक ते डॉक्टर यांच्या कडे कामाला आहेत.    कित्येकदा असंही होतं डॉक्टर अगोदर येऊन काम सुरुवात करतात अन त्या नंतर हे बादशाह येतात.  आल्या आल्या त्यांचा तो थाट पहावा, क्षणभर तुम्हाला वाटेल हेच खरे डॉक्टर. त्यात हल्ली कोविड चे अनेक नियम आहेत, तीर्थ प्रसाद, sanitizer अभिषेक अगदी टेबल, खुर्ची चपला मुबलक प्रमाणात फवारून (सासू च्या जीवावर सून उदार).  मग केश संभार ठीक करत फोन वर सुरू. नुकतेच घरून आलेले तरी ही घरी फोन अन विस्तृत चर्चा, त्यात हे जर अविवाहित, तरुण असतील तर विचारूच नका.  एक दोन कॉल मध्ये सर्व बॅटरी उतरुन जाईल एवढे लांब पल्ल्याचे कॉल. 


इतक्यात कोणी तरी पेशंट अशा अविर्भावात येतात की डॉक्टर फ़क्त त्यांनाच तपासणार आहेत, आणि इतर लोक सहज गंमत म्हणून आलेले असतात. सर्व नंबरवारी असून ही यांना घुसण्यात काय मज्जा असते कळत नाही. त्यांना या बादशहा आणि राण्यांची  ही साथ असते... मग यांच्या लाख करोड व्यवहाराच्या गप्पा, इतक्या गहन चर्चा आणि मधेच तुम्ही किती तुच्छ आहात असा कटाक्ष टाकणार. हे क्षणिक नाते फ़क्त नंबर लवकर लागावा एवढ्यासाठी. बाकी बाहेर हे एकमेकाला ओळखतील असे नाही. काही ठिकाणी औषध देण्या घेण्याची कामे ही यांच्याकडे,  इथे तर विचारूच नका तो तोरा. फ़क्त यांनाच धन्वंतरी ने खास आशीर्वाद देऊन सर्व वैद्यकीय ज्ञान  दिलं.


पैसे देताना ही तसेच अगदी जन्मोजन्मी आपण यांच्या कडुन कर्ज घेतलंय अन ते असं हप्त्यात आपण परत करतोय. त्यात हल्ली डिजिटल जमाना, अनंत अडचणी आणि समस्या. ज्येष्ठ पिढीस या वर पुर्ण विश्वास नाही आणि मग अनेक गमतीजमती होतात. खरं तर यात अनेक लोक असे असतात की आयुष्य भर बँकेत लाखो करोडो हाताळलेले, पण इथे या बादशहा, राणी ला वाटतं हे अगदीच निरक्षर आहेत. ते त्यांच्या अतिमहत्त्वाच्या फोन मधे बोलत असतानाच मधेच इशारा करतात. खरं तर हे यांचं आद्य कर्तव्य आहे ...पण हे यांच्या फोन मध्येच. तुम्ही अँपॉइंटमेंट घेण्यासाठी किती ही फोन करा तो लागत नाही, किंवा व्यस्त असतो त्याची ही कारणं.


आपलं प्राथमिक कर्तव्य सोडून इतर सर्व गोष्टी करण्यात आमच्या लोकांना प्रचंड आनंद आणि समाधान मिळते.. ते सर्वच ठिकाणी आहे ..आणि हा "अविर्भाव" सर्वच प्रकारच्या लोकांत आहे अगदी घरी कामाला येणारे, गाडी धुणारे, सलून, इस्त्रीवाला,  वाचमन, पार्किंग मधील कर्मचारी,  सर्व वकील, CA यांचे कर्मचारी. आपण आपल्या दात्यापेक्षा कसे श्रेष्ठ आणि विद्वान आहोत हे दाखवण्यात संपूर्ण शक्ती पणाला लावतात.  ज्या कामासाठी पगार घेतात, ते सोडुन इतर सर्व कामात हे तरबेज असतात. ही जी काही कला आहे त्याचा मला खुप खूप "हेवा" ?? वाटतो.


तुम्ही कधी कॅब ने प्रवास केला असेल तर आठवा, मी गेली अनेक वर्ष कॅब ने फिरतोय, एकदा तुम्हि OTP दिला की हे कानात बोळे घालून UNESCO च्या परीषदेत बोलायला सुरुवात करतात ते अगदी तुमचं डेस्टिनेशन येईपर्यंत यांचा हा कॉल सुरुच असतो.  बरं विषय घरगूती वाद, हेवेदावे, भांडण, तर काही ठिकाणी लैला मजनू संवाद अगदी हिर रांझा ची कहाणी ही फिकी पडेल इतकं गहिरे प्रेम. हा अगदी चंद्रावर रथ चालवणाऱ्या पार्थसारथी तर ती जणू इंद्रलोकीची अप्सरा.. तर कधी स्थानिक राजकारण ते मोदी अशा अत्यंत गहन विषयावर चर्चा...... अरे हो हो धडकशील तर तीन तेरा होतिल ...का रे समजत नाही.


या सर्व बादशहा, बेगम राजा राणीला मुजरा !! 

आपलं नेमुन दिलेले काम चोख करारे !! 


शरद पुराणिक

100821

Comments

Popular posts from this blog

बायकोची जीवश्च कंठश्च मैत्रीण मानसी चा जन्मदिन....