गड्या आपला "लॉकडाऊन" बरा .... अजून जखमा ओल्याच आहेत
गड्या आपला "लॉकडाऊन" बरा ....
अजून जखमा ओल्याच आहेत
अन आसवं ही आटली नाहीत
अनेक संसार उसवलेलेच आहेत
त्यांना अजून पुरती तुरपाई नाही
सरकारच डोकं ठिकाणावर आहे का?
हे सांगायचा अधिकार आम्हाला नाही
तुम्हीच केलीत आंदोलनं, मोर्चे
वेठीस ही धरलत त्यांना सतत
मोकळ्या श्वासासाठी सुसाट निघालात
धाब्यावर बसवत सर्वच नियम
इस्पितळे पुन्हा झालीत मंडई सारखीच
मोकळ्या श्वासानी घात केलाय
श्वास पुन्हा रोखलेत, खोकणे, गुदमरने
बेड नाही, बेड नाही हा सूर ऐकू येतोय
तीव्रता कमी असेल म्हणुन पोचले नाहीत
पण पुन्हा त्याच अवस्थे कडे जातंय सारं
कर्कश्श किंकाळ्या आता नकोत पुन्हा
असह्य वेदनानाही आत जागा नाहीये
व्याकूळ करणारे रुग्णवाहिकेचे भोंगे नको
माणसाचं मानसातून विलगिकरण नको
सतत भीतीच्या गर्द छायेत जगणं नको
औषधांचा काळा बाजार नको
स्वकष्टाने भरलेल्या बँका रिकाम्या नको
कर्जाचे असह्य डोंगर, दऱ्या नको
थोडासा आराम घेउन यमदूतांची टोळी
अंधुक शी दिसत आहे मार्गस्थ होताना
त्यांना तेथेच रोका सीमेवर ...
गड्या आपला लॉकडाऊन बरा ...
लस घ्या, नियम पाळा, मास्क लावा, हात धुवा, अंतर राखा, गर्दी टाळा
शरद पुराणिक
23082021
तळटीप : गेल्या आठवड्यात दोन चार इस्पितळात जाण्याचा प्रसंग आला आणि हे कटाक्षाने जाणवलं म्हणुन लिहिलंय
Comments