बंगाली पिंपळ्याचे केशव मामा - त्यांची भव्य गढी

 बंगाली पिंपळ्याचे केशव मामा - त्यांची भव्य गढी


खरं तर किती किती लिहीत आहे मी तरी माझं बालपण काही संपत नाही. त्यातलं जगणं डोळ्या समोर सतत घिरट्या घालत असतं अधून मधुन. आजच्या विषयातील एक प्रमुख व्यक्ती आहेत ते म्हणजे आदरणीय कै केशवराव नारायणबुवा काळे, मु पो बंगाली पिंपळा. ता. गेवराई जिल्हा बीड.  लोक स्वतः च्या मामा विषयी, मामाच्या गावा विषयी लिहितात, पण मी आज वडिलांच्या मामा विषयी लिहिणार आहे आणि याची मला फार वेगळी गंमत वाटत आहे. त्यांच्या विषयी मी का आणि काय लिहावं ? अहो हे व्यक्तिमत्त्व एवढं उत्तुंग होतं की विचारू नका. सहा फूट उंच, धिप्पाड शरीर यष्टी, आवाजात जरब. म्हणजे दिसताक्षणी जागेवर तुम्हाला त त प व्हावं असलं भारदस्त व्यक्तीमत्व.  मी त्यांना शेवटचं पाहिलं ते मी आठवी नववी वर्गात असेल किंवा त्या ही आधी. त्यांची मुलगी म्हणजे माझी आत्या आमच्याच वाड्यात राहायची आणि अनेक कार्य प्रसंगी ते पिंपळ्याला जायचे, दोन तीन वेळेला मी ही त्यांच्या सोबत गेलो.


बंगाली पिंपळ्याला जाण्यासाठी एकच मुक्कामी बस ती ही अधूनमधून बंद असायची.  मग अचानक जायचं झालं तर मादळमोही, कोळगाव पर्यंत गाडी असायची. कोळगाव ते पिंपळा 3 ते 4 किलोमीटर पायी प्रवास तो ही अवघड, आडवळणाचा खाली वर, डोंगर असा रस्ता.  अनेक लोक येत जात असत म्हणुन पायवाट होती पण फक्त दिवसा तो प्रवास शक्य होता, त्यातही लुटमार, अडवणे, दगड मारने असे अनेक प्रकार असायचे. नवीन कोणी दिसला तर खैर नाही, पण केशव मामाच नाव सांगितलं तर तेच लोक आणून ही सोडत होते असा त्यांचा दरारा होता. एकट्याने प्रवास अशक्य होता. 


दरकोस दरमजल हा प्रवास करुन आलं की गावची वेस, त्या नंतर उंच ओट्यावर हनुमान मंदिर त्याला पाहताक्षणी वेगळीच ऊर्जा निर्माण व्हायची. ते ग्रामदैवत म्हणा हवं तर, अजूनही एक दोन मंदिरं होती. थोडं पुढं आलं की लोहाराच्या भट्ट्या, उजव्या बाजुला समोर ग्राम पंचायत कार्यालय.  अन मग सुरू व्हायच्या गल्ल्या तशी पहिली गल्ली पार केली की समोर एक भव्य गढी, वीस तीस पायऱ्या, त्या उंच उंच भिंतीवर अलगद टेकलेल्या आतल्या पिंपळाच्या फांद्या, उजव्या बाजूला एक भव्य ओटा, त्यातच एक आड, विहीर.  अक्षरशः गढी, ती अशी रुबाबात उभी, त्या पायऱ्या सर करत आत गेलो की एक छज्जा, त्या वर बस्तान ठेवायचं, पिंपळाच्या झाडाखाली रांजनाच्या पाण्यानी पाय धुऊन पटकन चुलीवरच्या चहाची चव चाखायची. बाजुला एका खोलीत धान्य साठा, समोर पटांगण अन दोन तीन खोल्या, त्यात वसलेले मामांच साम्राज्य.


वाड्याच्या बाजूला गावातील 2 ते 4 दुकानं, टेलर, वाणी इत्यादी. आसपास ही काही प्रतिष्ठित वास्तव्यास होतेच. मामांचा मुलगा तुकाराम आणि मी बरोबरचे म्हणुन त्याच्यासोबत गावात, शेतात फिरलो. शेत ही असं तळ्याच्या बाजूला त्या मुळे तिथं जायची एक वेगळी गंम्मत होती.मी दोन चार वेळा गेल्यानं सर्वांची चांगली ओळख होती आणि सर्व गाव ओळखत होता. अगदी एखाद्या कथेत, चित्रपटात असावं असं हे गाव. मुक्कामाची बस म्हणजे पर्वणी, चालक वाहक ग्राम पंचायत कार्यालयात मुक्कामाला, कोणी जेवण, कोणी चहा असा त्यांचा थाट. त्या काळी एक मुस्लिम विवाह सोहळा मी प्रत्यक्ष अनुभवला होता आम्ही खास निमंत्रित होतो, अन हे जणु घरचेच कार्य आहे. कुबुल कुबुल कुबुल हे अगदी प्रथमच पहायला खुप गंमत आली.  तुकारामाच्या मुंजीत ही मी गेलो होतो आणि तयारीला ही होतो, त्या मुळे गावाची समस्त बलुतेदारी मला ओळखत होती.  कुंटल भर गव्हाची लापशी मी तयार होताना पाहिली आणि खाल्ली ही. 


केशवमामा मूळ तसे आर्वी या गावचे. ते लहानपणी घरासमोर खेळत होते, इतक्यात एक विद्वान ब्राम्हण भिक्षा मागायला आले, त्यांची आई भिक्षेसाठी काही तरी घेऊन येण्यासाठी उठली तर ते म्हणाले माई मला आज भिक्षेत हा तुझा मुलगा दे, आणि कुठलाही विचार न करता माऊली तयार झाली आणि तिने त्याला अर्पण केलं. कुठलं ही दत्तक विधान नाही, काही नाही. केशव मामांच्या घरीही अग्निहोत्र होतें अशी माहिती आहे. काही संदर्भ इतके जूने आहेत की फार  जास्त लिहिता येत नाही. केशव मामाच 1984 साली देवा घरी गेले आणि तेंव्हा त्यांचं वय 97 ते 98 होतं - म्हणजे पहा कुठला तो काळ.  मी त्यांना पाहिलं ते 1979 ते 1984 या काळात म्हणजे अगदी त्यांचा उत्तरार्ध.  केशव मामाचे दोन विवाह झाले - पहिल्या मामीपासून मुल बाळ नाही म्हणुन त्यांच्याच बहिणीसोबत त्यांनी विवाह केला.  नंतर त्यांना एक मुलगी आणि मुलगा  झाले. 


तर हे केशव मामा संसारात फार रमले नाहीत, स्वातंत्र्याच्या चळवळीत ते सक्रिय होते आणि अनेकदा घरातील कोणालाही काहीही न सांगता ते जायचे आणि मोहीम फत्ते करून आले की नंतर कधी तरी परत यायचे. मूळ व्यवसाय भिक्षुकी आणि शेती. पण यांनी जास्त काळ स्वातंत्र्य चळवळीत घातला.  एकदा ते जवळपास महिनाभर परतलेच नाहीत, सर्वजण परेशान. फोन बिन सोडा, येण्याजाण्याची सोय नव्हती.  अचानक त्यांचे मेहुणे म्हणजे धोंडराईचे कांनपाठक भेटायला आले आणि त्यांना कळलं, मग ते ही यांना शोधायला गेले तर  इंग्रजांनी यांना ही अटक केली, दोघेही स्थानबद्ध.यथावकाश त्यांची सुटका झाली. तसं केशव मामाशी या सर्व घटनांवर  फार चर्चा करण्याचा योग आला नाही, तेवढी अक्कल ही नव्हती. मी अगदीच चड्डीत होतो. पण हे काही तरी जोरदार आहे एवढं कळायचं.  त्यांच्या या अशा सामाजिक, राष्ट्रीय प्रेम आणि बांधिलकी या मुळे घराकडे लक्ष जास्त नसे. मग शेतीचा बोजा मामींवर असे, तुकाराम लहान, मग त्याच सर्व शेत व्यवसाय सांभाळायच्या. खडा आवाज, कडक भाषा आणि भले भले त्यांना ही घाबरत. त्या मुळे शेतीची कामे बिनबोभाट व्हायची. अगदी पुरुषांच्या अविर्भावात त्यांनी ती शेती केली.


बरं एवढी देश सेवा करून यांच्या कडे कुठलेही पुरावे नाहीत. जेंव्हा सरकारने स्वातंत्र्य सैनिकांसाठी योजना आरंभील्या, हे त्या पासुन वंचित होते. मग आमच्या वडिलांनी अनेक खटाटोप करून त्यांना ती कागदपत्रे मिळवून दिली. वसंतदादा पाटील यांच्या सहीचं एक प्रमानपत्र त्या गढीत मोठया मानाने नंतर तिथं सजले.  त्या काळी अशा असंख्य लोकांना केवळ कागदपत्रे नसल्याने (म्हणजे अटकेच्या नोंदी इत्यादी) सरकारी योजनापासून दूर राहावे लागले. वडिलांचं कौतुक म्हणुन नाही पण नातेवाईक आप्त इष्ट अशा असंख्य लोकांची शासकीय, घरगुती, कौटुंबिक तरतूद केली - एक वेळ त्यांनी आमच्यासाठी काही केलं नाही (या विषयी अजिबातच तक्रार नाही) पण इतरांसाठी खूप केलंय - या मुळेच त्यांचा शेवटच्या क्षणापर्यंत आणि आज ही सर्वच जण अतिशय आदराने उल्लेख करतात. 


मामांची बहीण म्हणजे माझी आज्जी कै द्वारकाबाई देविदास पुराणिक यांना त्यांच्या वाट्याच्या जमिनी ही मिळाल्या होत्या, ती अनेक दिवस केशवमामा सांभाळत होते. पण नंतर आमची आज्जी म्हणाली केशवा ही जमीन मला काही सांभाळणे व्हायची नाही, ती विकुन टाक. मामांनी ती मग बाजूच्याच तांड्यावर राहणाऱ्या एका लमानी कुटुंबास ती विकली.  ती विकून तिचे पैसे आणून दिले, त्यात आमच्या आज्जीने चार ही मुलांना सोन्याच्या अंगठ्या केल्या, अन उरलेल्या पैशात घरावर माळवद करुन घेतलं.  हो तेच माळवद जिथे आज आमचा वाडा ऐटीत उभा आहे.  या माळवदाची (लाकडी छत) गोष्ट म्हणजे, बहिणीच्या घरावर छत टाकायचं म्हणून केशव मामांनी स्वतः शेतातली चांगल्या प्रकारची झाडं तोडून, ती लाकडं बैलगाडीत टाकुन स्वतः ती बीडला पोचवले. वा रे वा भावा बहिणीचं प्रेम. 


या आणि अशा असंख्य आठवणी ची ती गढी माझ्या डोळ्यासमोर तशीच ठेऊन थांबतो. अशी मानसे पुन्हा होणे नाही. 


शरद पुराणिक

231021

Comments

Popular posts from this blog

बायकोची जीवश्च कंठश्च मैत्रीण मानसी चा जन्मदिन....