चिवचिवाट ओसरला ...पाखरे उडू लागली





 चिवचिवाट ओसरला ...पाखरे उडू लागली 


आज हा आत्यंतिक भावनिक विषय हाताळताना मन अक्षरशः गहिवरले आहे....तसं एक गाणं सुचलं लगेच.. अगदीच संदर्भ नसला तरी मन त्याच गाण्याकडे भरकटत होतं


"मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते,

नात्यांच्या बंधात धुंद मोहरते 

मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते" 


अशीच अवस्था आहे.... आमच्यातली एक चिमुरडी "राशी" काहीच दिवसात उच्च शिक्षणासाठी परदेश गमन करत आहे.  खरं तर खूप आनंदाची गोष्ट आहे पण मन हेलकावे खात राहतं अन आनंद ही गहिवरून टाकतो. कारण या आनंदाला एक तात्पुरती विभक्ती ची झालर असते ती खिन्न करते.  काल परवाच तिचा व्हिसा आला. एकटी कोलकाता, दिल्ली असा प्रवास करून सोबत व्हिसा घेउन परतली.


मी थोडा मागे गेलो ...आमचा अंबाजोगाई हुन पुणे येथे पोटापाण्यासाठी आलेला एक समूह आहे. साधारण मध्यम वर्गीय या प्रकारात मोडणारं आमचं सामाजिक जगणं.  कर्म धर्म संयोगाने सर्वच जण राहायला आसपास. काही थोडे दूर पण मनाने तितकेच जवळ.  अमोल, पिटु, शशांक मिलींद, नरेंद्र, चारू, लालु, धंनजय,  असे सर्व जण कुटुंब कबिल्यासाहित भेटत होतोच.  सर्वांची लेकरं अगदीच पहिली, दुसरी, बालवाडी असे. शशांक फ़क्त कराड आणि नगर इथे होता, पुढे तो ही इथेच स्थिरावला.  व्यवस्थापण, अनुशासन, शिस्त याचा एकमेव पुरस्कर्ता मिलिंद ने आणि सोबत त्याच्या मैत्रिणी म्हणजे आमच्या बायका असं सार्वमत घेउन "भिशी" ची संकल्पना जाहीर झाली, आमलात ही आली. अन मग दोन महिन्याला एकदा सर्वजण एकत्र येऊन तो कुंभमेळा भरत असे. प्रत्येकांनी आपल्या घरांतून एकेक पदार्थ घेऊन ती अंगत पंगत सजायची. हास्याचे डोंगर, टोमणे आणि मराठवाडी "नाजूक" (?) आवाज अशी ती आवाजी मैफल अशी काही फुलायची की विचारू नका.  अनंत गमतीदार कीस्यांचा अक्षरशः किस पडायचा. खुमासदार भोजन, पदार्थांची रेलचेल त्यात अजून भर टाकायची. अन पुणेरी त्या सोसायटीच्या आवारात आम्ही "मराठवाडी" शिक्का अजून गडद करून जायचो.  


आधी बाळ गोपाळ काला (लहान मुलांचे जेवण) व्हायचा, प्रचंड गोंगाट, गलबलाट यात  कोणी तरी एक दोघी ती पंगत उरकून मग आमची पंगत व्हायची. सासू-सून, नणंद-भावजय असे अनेक खुमासदार टोमणे एकमेकांना देणे, पदार्थ कसे झाले मग कोणी बायकोला मदत केली अशा विविध वळणावरून ती आगगाडी फिरायची. उशिरा येणाऱ्याची खैर नाही. कधी मध्यरात्र व्हायची कळायचं नाही. पण मग चिमुरडी अंगाई घेण्याच्या बेतात असताना या मैफिलींची भैरवी सुरू ..गरमागरम कॉफी चा आस्वाद घेउन, पुढचा अड्डा निश्चित करून रामराम व्हायचा.


दोन चार वर्षे हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवल्या गेला, पुढे पोरांच्या शाळा, कॉलेज या मुळे भेटी थोड्या कमी झाल्या. पण कार्यक्रम, काही नैमित्तिक भेटी होत होत्या. त्यात गेली दीड दोन वर्षे या कोरोना ने एकत्र भेटी अजुनच कमी झाल्या.  यात अनेकजण याच्या विळख्यात होती, मग एकमेकांना मदत , फोन, विचारपूस असं सुरू झालं अन पुन्हा मिलिंद ने एका ऑनलाइन भेटीचा योग घडवुन आणला...पन तीच गंमत पुन्हा अनुभवली..


दरम्यान अनेक स्थित्यंतरे झाली ...गोंगाट, गलबलाट, चिवचिवाट करणारी ती पाखरे, स्वतः च्या पंखांवर गगनभ्रमन करू लागली... लालूचा पोरगा कौस्तुभ आधीच जर्मनी ला गेलेला होता, चारुची मुलगी  दिशा अँम्सटरडॅम साठी रवाना होतेय , अमोल ची राशी अमेरिकेत निघालिय, शशांक ची चिन्मयी भोपाळ,  आमचा निशांत पुण्यातच पण नोकरीला लागला तरी ही तो याच दिशेने उडण्याच्या प्रयासात आहे,  मिलिंद चा उत्कर्ष उच्च प्रतीचे अभियांत्रिकी शिकतोय अगदी BITS, IIT सर्वच ठिकानी निवडला गेलाय, तर धनंजय चा ऋत्विक आणि नरेंद्र चा अथर्व त्याच प्रवाहात गतीने मार्गक्रमण करत आहेत.  पिटुची श्रावणी जी अभ्यासात अतिशय हुशार  आहे आणि ती ही या वर्षी 12 वीला आहे .. हे सर्व त्यांनी स्वतः च्या हिमतीवर, कोणाच्याही मार्गदर्शन शिवाय कमावले ही मोठी गोष्ट. दुसरे चिरंजीव , कन्या हे ही आपले मार्ग निश्चित करत आहेतच. ही गॅंग जरा वेगळी आहे. यात हर्षल, रती, काव्या आणि राधा आहेत.


काल परवा पर्यंत आईच्या पदराआड असणारी, अन प्रत्येक वर्ग , शिकवणी आईसोबत जाणारी ही पाखरं आता उडू लागली आहेत... तो चिवचिवाट ओसरत आहे. त्यांच्या यशाचं कौतुक आहेच पण "मन गहिवरते" , त्यांच्यात आलेली परिपक्वता, मोठे पण, वेळी आपल्यालाही समजून सांगणारे शहाणपण असं अचानक समोर उभं असतं.   किती वेडे असतो आपण, जेंव्हा ही मुलं छोटी असतात तेंव्हा वाटतं कधी एकदाची मोठी होतील ...आता झालीयेत तर आपण त्यांचा अल्लडपणा शोधतोय. एक आवर्जुन सांगतो या मुलांनी कधीच हट्ट केला नाही, जिद्द नाही, तक्रार तर नाहीच अन असल्या नसल्या सर्वच गोष्टीत, परिस्थितीत आनंद घेत ही "भरारी" घेतलीये त्या सर्वांना गालावर एक "काळा ठिपका"   

आल्याची, गेल्याची

शेजारच्याची, बाहेरच्या लोकांची

काळ्या कुत्र्याची

कोणा कोणाची न लागो नजर "

थु, थु, थु (मीठ मोहरी ओवाळून टाकली)


या सर्वांसाठी आणि माझ्या सर्व मित्रांच्या मुलांसाठी ज्यांनी हे क्षण त्यांच्या आईवडिलांना दिले त्यांच्यासाठी हे समर्पक गीत ...यातील प्रत्येक ओळ फार अर्थपूर्ण आहे म्हणून ते तसंच कॉपी करत आहे (गूगल प्रसन्न)


‌आकाशी झेप घे रे पाखरा ,सोडी सोन्याचा पिंजरा

तुजभवती वैभव, माया  , फळ रसाळ मिळते खाया

सुखलोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा

घर कसले ही तर कारा, विषसमान मोती चारा

‌मोहाचे बंधन द्वारा, तुज आडवितो हा कैसा, उंबरा

तुज पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने

दरि-डोंगर, हिरवी राने,जा ओलांडुनी या सरिता-सागरा

          कष्टाविण फळ ना मिळते, तुज कळते परि ना वळते

हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई बावरा

घामातुन मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले

घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा


अल्लडपणा, तारुण्य या तुन या अवस्थेत पालक म्हणून कधी आम्ही कधी पोचलो कळलेच नाही ...जवळून आरशात पाहील्यावर थोडंस टक्कल, मधुनच चमकणारे चंदेरी केस ...आयुष्याचा हा प्रवास फारच वेगाने झाला ...


कोकरांना शुभाशीर्वाद देऊन 

धरलेलं बोट सोडतो 

अन त्याच शक्तीने 

सहचारिणी चे बोट पकडून पुढील प्रवास ...कारण छोटी गॅंग त्यांची बोटं घट्ट पकडू देत नाहीत ..उलट तेच आपल्याला सावरतात अनेकदा


शरद पुराणिक

260721

Comments

Popular posts from this blog

बायकोची जीवश्च कंठश्च मैत्रीण मानसी चा जन्मदिन....