इटूकली ..पिटुकली ..भातुकली
इटूकली ..पिटुकली ..भातुकली
सध्याच्या या युगात जुन्या आठवणी गोंजारत त्यावर भावनिक लिखाण, अनुभव कथन सतत होत असतं. आठवणीत रमण्याचा मनुष्यस्वभाव आहेच. मी स्वतः च एवढा त्या वलयात रमतो की विचारू नका. हल्ली चेहेरे पुस्तिकेवर आठवणींच्या समूहाची अक्षरशः एवढी गर्दी आहे की त्यात आपण हरवून जातो. त्यात माझं शिक्षण, नोकरी निमित्ताने चार पाच शहरात वास्तव्य झाले आणि तिथल्या विविध समूहाचा मी सदस्य ही आहे. असंख्य सहप्रवासी यात सोबत आहेत आणि अगदी बालपण ते आजपर्यंत च्या सर्व घटना, प्रसंग, सोहळे रोज त्या आठवणरुपी आरतीच्या ताम्हणातून ओवाळले जातात, आपण ही त्यावर दोन्ही हातांचे तळवे झाकुन ती आरतीची ऊब अनुभवायची आणि तो मंगलमय सुगंध तसाच साठवुन ठेवायचा.
पण होतंय असं की काही गोष्टी आज ही तशाच टिकून आहेत, किंबहुना त्यांचं पुनुरुत्थाण होऊन त्या भव्यदिव्य स्वरूपात आज वावरत असतात. मधल्या काळात माणूस खूप जास्तच पुढारला इतका की ऑफिसला जाताना रस्त्यात मंदिर लागलें तरी मुद्दाम दुसरीकडे पाहणारी एक पिढी मी पाहिलीये ...किंवा मंदिरात, प्रार्थना गृहात इतरत्र कुठेही जाणं कमीपणाचे वाटू लागले. विज्ञान आणि अध्यात्माच्या वादात जाणे हा अजिबात हेतु नाही, हे फ़क्त संदर्भ म्हणून इथे आलंय. पण काळाचा महिमा म्हणतात ना तोच :) :) ओस पडलेली मंदिरं गर्दीने व्यापली, आणि जनु फॅशन शो आहे की काय अशी शंका यावी अशा अवतारात मंदिरात वर्दळ दिसू लागली. पुढचं जास्त विस्तारात न घेता माझा जो मुख्य विषय आहे तिकडे वळतो.
खरं तर एक पुरुष म्हणुन मी भातुकलीच्या खेळाविषयी का लिहितोय असंही काही जणांना वाटेल ..पण आधी अनेकदा सांगितल्या प्रमाणे आमचं बालपण फारच साध्या वतावरणात गेलं ..त्याची खंत अजिबात नाहीये..पण खेळ, खेळभांडी या सुविधांचा अभाव होता..सर्व काही प्रतिकात्मक (म्हणजे लिंगोरचा चा चेंडु म्हणजे कापडं गोल गुंडाळलेला एक ओबडधोबड गोलाकार गोळा...आणि हल्ली काही उंची दिवाणखान्यात एकावर एक रचलेले दगड असतात तशाच चिपरंगी एकावर एक ठेवून त्या या चेंडूने पाडायच्या, दरवाजाच्या निघालेल्या फळीचा चौकोणी तुकडा वर थोडा निमुळता असेल तर ती बॅट..कुठल्याही झाडाची Y आकार वाटावी अशी फांदी म्हणजे गुलेर...अन मग भातुकली च्या भांड्यांच काय असेल ..ते लिहीत नाही कारण त्याचे एवढे प्रकार अन पद्धती की यादी संपणार नाही).
परवा आमचे मित्र अमोल यांच्याकडे गेलो आणि त्याची बायको तृप्ती हिने घरात एक कोपरा फ़क्त भातुकली ने भरून टाकलाय. लक्ख पितळी भांड्यांचा तो संसार व्वा फ़ारच अप्रतिम आहे. जणु तिचं बालपणच तिथे ठेवलंय. सोबत फोटो जोडत आहेच तो आवर्जून पाहावा. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी तृप्ती आणि अमोल ने संग्रही ठेवल्या आहेत. असा हा भातुकली चा संच तूमच्यापैकी अनेकांना माहीत असेल, कोणाच्या घरातही असेल .विविध रूपांत असेल..आणि तो असावा या मताचा मी आहे. दुःख हे की आमच्याकडे दोनीही कारटे असल्याने कधी बाहुली, teddy, भातुकली आमचा उंबरठ्यावर आल्याच नाहीत. सौ. अनिताला या गोष्टी दिसताच डोळ्यात एक वेगळीच चमक येऊन जाते अन तिचं अनुभवलेल न अनुभवलेलं बालपण ती बहुधा यात शोधते. एक हलकं गोंडस हसू दिसत राहतं. अनेकदा सिग्नल वर प्लास्टिकचे ते खेळभांडी विकणाऱ्या त्याच वयाच्या मुलांना थांबवून तिने ते भांडे पाहिले आहेत. मी ही तितकाच तल्लीन होऊन या अशा गोष्टी पहात असतो. तर अशी ही भातुकली एका वेगळ्या स्वरूपात समोर आली आणि आठवणींचा कोपरा स्वच्छ धुऊन पुसुन लक्ख करुन गेली.
विषय इथेच संपला नाहीये ...परवा रक्षाबंधन ला माझी भाची पल्लवी घरी आली, सोबत तिची मुलगी (अनुश्री राहुल गोरे) होती ..तिला जरा बोर होत होतं म्हणुन मुद्दाम तिच्याशी गप्पा मारत होती ..हल्ली फोन हे सर्वच छोट्या मुलांचं करमणुकीचे साधन आहे .असो मग बोलता बोलता तिच्या मैत्रिणीचा विषय निघाला जी साधारण 7 ते 8 वर्षांची असेल ...तीच्या कडेही हा पितळी भातुकली चा खेळ आहे आणि अहो आश्चर्यम ...ती मुलगी या ईटूकल्या पिटुकल्या भांड्यांवर रोज नवनवीन पदार्थ बनवते आणि तिचा स्वतःचा असा युट्युब चॅनेल आहे ..तिचे ते व्हिडिओ पाहुन मी अवाक झालो..अगदी इडली सांबर, खमंग ढोकळा , उकडीचे मोदक अन काय काय..त्या खेळभांड्यातून साकारणारी ती पाक कला पाहून मी भारावून गेलोय. तिचं नाव आहे श्राव्या अंबेकर
https://youtube.com/channel/UCyBQbIqZbasr4S-u93FWhjw
वर दिलेली लिंक तिच्या चॅनेलची आहे... हे कुठलंही प्रमोशन अजिबात नाही, पण मला जे लिहायचं ते शब्दांत व्यक्त होणार नाही... उलट तुम्हाला ते हे पाहुन जास्त लक्षात येईल.
मी काही मुलगी आणि बाई म्हणजे चूल आणि मूल या विचारांचा नाही पण मग पाश्चात्य पेहराव करून स्वयंपाक हे अति निकृष्ट दर्जाचं काम आहे (खरं तर पाश्चात्य देशात सर्वच गोष्टी स्वत: करतात.. अगदी धुनी, भांडी इत्यादी) ही विचारधारा किंवा याचं स्वतःवर सोयीस्कर आवरण घेतलेल्यासाठी ..किंवा PubG, free fire च्या लेवल पार करत खाण्या पिण्याचं ध्यान हरवलेल्या पिढी साठी ...हे एक चांगलं उदाहरण आहे ...कोरोना ने शिकवलेली स्वावलंबन नीती, घरचं जेवण किती महत्वाच या साठी सुद्धा हे एक आदर्श उदाहरण आहेच.
अजून एक भाच्याचा मुलगा Samy (समीरन विवेक जोशी) याचं ही एक chanel ..पण तो भातुकली तुन नाही तर थेट छोट्या Chef चा अनुभव देतो ....
https://youtube.com/channel/UCtO13odkkNRup7ApueWr_HQ
अशा या नवीन रुपात आलेल्या आपल्याच बालपणाच्या रुपाच्या मी प्रेमात पडलोय ...
या काळात या आणि अशा विवीध छंद जोपासलेल्या सर्व बाळ गोपाळाना समर्पित....
Love you kids...गोविंदा आला रे आला !!
शरद पुराणिक
280821
Comments