गौरीनंदन...येणार ....आले आले ...निघाले 🤔🤔🙃
गत वर्षीची खंत / आठवण
या वर्षीच्या फोटोनी सजली बहरली
तिचे पुनः प्रसारन आज
110921
=====
गौरीनंदन...येणार ....आले आले ...निघाले 🤔🤔🙃
तस पहायला गेलं तर आम्ही देशस्थ शुक्ल यजुर्वेदी ब्राम्हण, पण आमच्या कडे ही गणपती फक्त दीड दिवस आहेत. साधारण इकडे कोकणस्थ आणि इतर ठिकाणीच ते दीड दिवस आहेत. पण आमच्याकडे ही हे आहे, याचं कायम आश्चर्य वाटत राहिले. त्यात ही आम्ही मराठवाड्याचे, आणि बीड सारख्या ठिकाणी मूळ आहे. आता तो इतरांसाठी जरी मागासलेला जिल्हा असला तरी तो आम्हा सर्वांसाठी "गड" आहे अगदी जसा छत्रपतींचा रायगड तसाच आमच बीड ( प्रत्येकाला आपल्या गावाचं कौतुक असतं, एवढाच उद्देश, वेगळ्या अर्थाने घेऊ नये).
तर असा हा दीड दिन गणेश येतोय, येतोच आहे, आला आला म्हणेस्तोवर निघतो ही, अन मग उरते ती फक्त हुरहूर. बरं मला दोनीही मुलंच, आणि आमच्याकडे दोन मुर्ती बसवतात अशी प्रथा आहे. मग त्यांना प्रत्येकी एक अशी त्यांची मूर्ती असते (पुजा आणि सजावट या पुरतच) त्या मुळे मूर्ती आणणे ते विसर्जन करणे अस सर्व वेगवेगळ करायला मिळत (सोबत जुने फोटो पाठवतो...कारण lockdown मुळे या वर्षी मूर्ती मी घेऊन आलो.
माझ्या लहानपणी मला हे फार आवडायचं, कारण दुसऱ्या दिवशी विसर्जन करून त्वरित गल्लीतील मंडळात आपलं बस्तान हलवायचं ते अगदी विसर्जन करून ते stage रिकाम करून सगळी आवराआवर करूनच घरी पोचायचं. गणपती उत्सवात केलेल्या मेळे आणि इतर गोष्टीविषयी अगोदरच लिहिलेले आहे.
मधल्या काळात बरंच पाणी वाहून गेलं, मी दहावीला शिकण्याच्या निमित्ताने बीड सोडलं, नंतर पुन्हा दोन वर्षे बीड ला होतो पण मग त्या नंतर 1986 ला सोडलं त्या नंतर मी फक्त सणवार असं येत जात राहिलो. हा प्रवास बीड, धारूर, अंबाजोगाई, औरंगाबाद, पुणे, हैदराबाद असा होऊन आता पुण्यात स्थिरावला आहे सध्या.
दरम्यान विवाह झाला, मुलं मोठी होत असताना ते सतत एकच प्रश्न विचारायचे बाबा आपण फक्त दीड दिवसच का हा उत्सव करतो, कारण त्यांच्या इतर मित्रांकडे, माझ्या ही काही मित्रांकडे तो 10 दिवस आहे. मी समाधानकारक उत्तर न दिल्यावर त्यांनी त्यांचा मोर्चा आज्जी आजोबां कडे वळवला आणि त्यांना विनंती, आर्जव करून ते निदान 5 दिवस तरी करावा असा हट्ट धरला. आता तसं आम्ही कर्मठ अगदी कुठल्याही रीती भाती सहजासहजी न बदलणारे आम्ही पुराणिक, तेंव्हा हे शक्य नाही हे मला माहित होतंच. ते हिरमुसले आणि त्या नंतर त्यात ते रमत पण मग अगदीच दीड दिवस असल्याने फार सजावट, रोषणाई किंवा विशिष्ट देखावा करता येत नाही याचं त्यांना कायम शल्य आहे. पण दोन दिवस असल्याने पूजे साठी एक एक दिवस मिळतो.
या मुळे ते मग ढोल ताशा वादनाकडे वळले. (सोबत फोटॊ जोडत आहे) त्यांची गणेशभक्ती ते त्या पुण्याच्या मानाच्या गणपती मिरवणूकीत ढोल वाजवून देऊ लागले, या वर्षी तर ते ही नाही. "शिवगर्जना" या नामांकित पथकात ते सामील झाले.
इथे अजून एक आवर्जून उल्लेख तो म्हणजे आमच्या "पुराणिक" घराण्यात वर्षात फक्त हे दोन दिवसच गणेश सेवा आहे. मग इतरवेळी अगदी त्याचं चित्र, मूर्ती, फोटो असं काहीही अगदी घरात ठेवत नाहीत. इतकच नाही तर कित्येकदा भेट म्हणून आलेले फोटोफ्रेम, सुंदर मूर्ती इत्यादी ही लोकांना देऊन टाकतो आम्ही. अगदी विवाह निमंत्रण पत्रिकेवर ही "श्री गणेशाय नम:" असं ही लिहीत नाहीत. म्हणून गणेशोत्सव ही एकमेव संधी आहे त्याच्या सेवेची. त्यात काय करू, काय नाही असं होतं.
पण ही गोष्ट अशी आहे की आपला आवडता पाहुणा किंवा मित्र घरी आला की तो जावा असं कधीच वाटत नाही. त्यात त्यांच्या येण्यासाठी जी तयारी किंवा वाट पाहतो, अगदी त्याच भावना इथेही असतात. सुंदर सुबक मूर्तीतील ते मोहक रूप, षोडशोपचार पुजा आणि प्रतिष्ठापना झाल्या नंतर ते उत्सव रूप अगदी मोहित करून जातं. म्हणजे अगदी मैत्री जशी खुलत खुलत जाते तसंच काहीसं. आधी फक्त डोळे दिसतात, पण ते आता काहीतरी सांगतात असं वाटतात. "सुप्रतिष्ठित मस्तू" असं म्हणून टाकलेल्या अक्षता, चंदन, हळद कुंकु, शेंदूर, अबीर गुलाल यांनी मस्तक ते सोंड असं इंद्रधनू छटा वाटाव्यात अगदी असं ते रूप, सोबत वस्त्रमाळ (कार्पाश वस्त्र), अलंकार, माल्यादिनी सुगंधीनि..पुष्प, पुष्पमाला, तांबडा जास्वंद ..तसा तसा तो बाप्पा खुलत खुलत इतका मोहित करतो की ते शब्तातीत करणे केवळ अशक्य आहे. त्या सोबत मंद सुवासिक धूप, दीप अन रंगावली यांनी एक वेगळं भावविश्व वलय निर्माण होतं. अशा या अवस्थेत तुम्ही अगदी ध्यान अवस्थेत पोचता अन आजूबाजूला ती अध्यात्मिक, मंगलमय स्थिती आणि फक्त तो आणि आपण एकरूप होतो. हे अगदी सर्व वयोगटात होतं.
असा हा अगदीच मुख दर्शनासाठी येणारा आमचा बाप्पा आज "यांतू देव गणा सर्वे पूजा मादाय पार्थिव, इष्ट कामाय प्रसिद्धर्थम, पुनरागमनायच" असं म्हणुन ते आज निघाले त्यांच्या प्रवासाला.
या वर्षी एक बरं झालं, कोरोना मुळे बाप्पाना सोडायला बाहेर जावे लागले नाही, अन घरीच त्यांचे जहाज आल्यामुळे (म्हणजे लाडक्या मुलाला, मित्राला, किंवा आईवडिलांना departure gate वर न सोडता थेट विमानात बसवण्याचा योग यावा असंच). मग आमच्या सौ. अनिता यांनी जय्यत तयारी केली स्वछ पाणी (हा योगायोग म्हणजे दुग्ध शर्करा योग.. कुठे ते नदी, ओढे, नाले किंवा सागर म्हणा अथवा विसर्जन हौद अन त्यावर लोकांची गर्दी, अगदी उपचार म्हणून तो बुडवायचा). घरी पाण्यात सुगंधी अत्तर आणि फुलांच्या पाकळ्या अशी दोन जहाजे छान सजवली (अनायासे दोन नवीन कोऱ्या बादल्या होत्या घरात...सोबत फोटॊ जोडत आहे)...अन गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या...असं पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणत म्हणत त्यांना त्या जहाजात बसवलं.
गेले गेले गौरीनंदन ...अन मी बाल्कनी पासून घरात आलो तर गौरी आगमनासाठी आणि पूजेसाठी तयार फराळाचे पदार्थ सौ. डब्यात भरत होत्या ....आता प्रतीक्षा गौरी आगमानाची.
शरद पुराणिक
230820 गणेशोत्सव 2रा दिवस
Comments