समाराधना - चारशे वीस वर्ष - अखंडीत सेवा


 समाराधना - चारशे वीस वर्ष -  अखंडीत सेवा 


आदरणीय संत श्री जनी जनार्दन स्वामी यांना साष्टांग दंडवत घालुन माझी ही शब्द सेवा सुरू करतो.


माझ्या मागील काही बीड येथील वास्तव्यातील आठवणी आणि संदर्भ येतांना पाटांगण चा उल्लेख आलेला आहेच. खरं तर या विषयावर श्री डॉ विद्यासागर पाटांगणकर यांनी शोध निबंध लिहून Ph. D. ही मिळवली आहे. तेवढ्यावरच न थांबता त्यांनी त्यांचं संदर्भ आणि साहीत्य शोधन अखंड सुरूच ठेवले आहे. त्याच सोबत आदरणीय महाराज जी श्री धुंडिराज शास्त्री पाटांगणकर यांनी ही यात अखंड जीवन समर्पित केलेलं आहे. तेंव्हा या विषयावर मी काही लिहावं ही माझी पात्रता, योग्यता नक्कीच नाही. परवा विनू ने म्हणजेच विनायक पाटांगणकर याने एक दोन चित्र आणि व्हिडिओ पाठवले आणि या दिव्य अनुभुती विषयी काही तरी लिहावं असं आतून वाटु लागलं आणि न राहवुन लिहायला घेतले.  काही कमी जास्त असेल तर वरील सर्व प्रभृतींची माफी ज्यांनी अखंड सेवा आणि कुलाचार करून संत जनी जनार्दन यांचं कार्य अबाधित ठेऊन पिढ्या न पिढ्या पुढे घेऊन जात आहेत.समाराधणा करण्याचे अधिकार हा थोरले पाटंगन चे जेष्ठ वंशज श्री धुंडिराज महाराज यांच्या कडे आहे. यांच्या तीन पिढ्या ही पुजा करतात, आणि माळेवाडीकर या घराण्यालाही या पूजेचा मान आहे.


खरं तर बालपणी या सबंध कार्याचा आम्ही अविभाज्य भाग होतो, आणि या पूर्वी दिलेल्या संदर्भात आमचे पुर्वज म्हणजेच आमचे आजोबा आणि इतर ज्येष्ठ  पुराणिक पाटांगण येथे नित्य भागवत सेवा देत असत.  ही पारंपारिक वीण घट्ट होती आणि येथील कार्यक्रम म्हणजे स्वगृहीचाच कुलाचार आहे ही भावना तेंव्हाही होती आणि आज ही आहे. पण बालपणी फ़क्त प्रसादाला जाणे आणि घरी येणे एवढाच काय तो दुवा. हे सर्व इतकं भव्य दिव्य आहे ते विद्याभूषित डॉ विद्यासागर पाटांगणकर यांनी केलेल्या विवेचनातून पुन्हा नव्याने समोर आले. त्या सोबतच आदरणीय  श्री धुंडिराज शास्त्रीजी यांच्या अखंड सेवेच्या माध्यमातून कालानुरूप ते समजू लागले. धाकले आणि थोरले पाटांगण अशा दोन मठांतून ही सेवा नित्य सुरू आहेच. दोनीही संस्थानात उच्च विद्या विभूषित वंशज आहेत. 


श्री संत जनी जनार्दन हे नाथ परंपरेतील एक ज्येष्ठ कवी आणि संत. हे पुर्वी आदिलशाहीत कर्नाटकात बिदर संस्थानात अन्नमंत्री होते. एकदा मराठवाड्यात भिषण दुष्काळ आला आनि त्या काळी  त्यांनी राजाच्या आदेशाशीवाय अन्न भांडार खुले करून समस्त दुष्काळ ग्रस्त लोकांना ते वाटून दिले.  राजानी त्यांना शिक्षा म्हणुन  हत्तीच्या पायदळी देण्यासाठी आदेश दिला. पण हत्तीने त्यांना स्वतः हुन उचलून स्वतः वर स्वार करून घेतले आणि सर्वच जण चकित झाले. त्या क्षणी त्यांना स्वतः ला ओळखता आले नाही, राजाने शिक्षा माफ केली. पण हे त्यात न रमता स्वतः ला शोधत पायी प्रवास करत निघाले. माजलगाव जवळील गंगामसला येथे पोचले, तिथले पवित्र स्थान पाहून त्यांनी तेथेच राहून तपश्चर्या केली आणि एक दिवस साक्षात श्री गणेश यांनी त्यांना दर्शन दिले आणि बीड येथे जाऊन धर्मकार्य करण्याची आज्ञा केली. जिथे चार ही दिशांना श्री गणेशाची स्थान आहेत नवगण राजूरी, श्री क्षेत्र नामलगाव, लिंबागणेश आणि पिंपळनेर. त्या नुसार ते बीड येथे आले आणि जिथे त्यांना राहण्याची व्यवस्था झाली तो भाग म्हणजे आजचे पाटांगण. 



पाटांगण हे माझ्या घरापासुन अगदी 3 ते 4 मिनिटाच्या अंतरावर अशा या पावन भूमीत आपण जगलो वाढलो आहोत हा साक्षात्कार फार उशिराने झाला.  वर नमूद केल्या प्रमाणे दोनीही पाटांगणावर म्हणजेच जिथे श्री गणेश म्हणजेच संत जनी जनार्दन यांचा वास झाला आहे अशा दोनीही मठामध्ये धर्म सेवा, अन्नदान, विद्यादान अखंड सुरु आहे. वर्षानुवर्षे होणारी भागवत कथा, वार्षिक सोहळे आणि नित्यकर्म या मुळे या दोनीही वास्तु अगदी पावन आहेत. इथे गेल्या गेल्या त्याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही.


आत्ताच पार पडलेल्या श्री संत जनि जनार्दन यांच्या जन्मतिथी आणि पुण्यतिथी एकत्रित सोहळ्यात विविध कार्यक्रम पार पडले ज्यात समाराधना हा एक सोहळा असतो. ज्यात त्यांच्या पादुका, टोपी आणि गोधडी यांची षोडशोपचारे विधिवत पूजा, समस्त ब्राम्हवृंद यांच्या मंत्र घोषात संपन्न होते. लळीत या अजुन अद्भुत कार्यक्रमाने या सोहळ्याची सांगता होते. हा कार्यक्रम ही आवर्जून पहावा असाच असतो. विशिष्ट पेहराव घालून किर्तन आणि अगदी बेधुंद होऊन ती अनुभुती देणारे त्यांचे वंशज साक्षात स्वामी दर्शन घडवून आणतात. सोबत जोडकेल्या व्हिडिओ मध्ये श्री शास्त्रीजी पाहताना ही ती अनुभूती येतेच. खरं तर त्यांच्या स्मृतिदिन निमित्त हा विधी असतो पण आपल्या पूर्वजांना डोक्यावर घेऊन नाच करून त्यांच्या विषयी अभिमान, कृतज्ञता व्यक्त होते असा हा विधी. हा विधी आपल्या कडे फक्त श्री क्षेत्र लोणी आणि श्री क्षेत्र गुंज आणि पाटांगण इथेच होतो.  सोबत समस्त संस्थानाची वंशावळ ही जोडत आहेच.


खरंतर दोनीही घरांत इतके उच्च विद्याभूषित असताना ही आज च्या काळात ही सेवा तितक्याच उत्साहाने घडते आहे याचे कौतुक करावे तेवढे थोडेच. आणि आपणही त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भाग असल्याचा अभिमान ही. 


ही परंपरा अशीच उत्तरोत्तर सुरू राहो ...जय गणेश !!


शरद पुराणिक

050921

Comments

Popular posts from this blog

बायकोची जीवश्च कंठश्च मैत्रीण मानसी चा जन्मदिन....