काम धंदा ..पोट पाणी .आणि बरंच काही ...पुणे (क्रमशः)
काम धंदा ..पोट पाणी .आणि बरंच काही ...पुणे (क्रमशः)
खरं तर काही गरज नव्हती औरंगाबाद सोडुन पुण्याला येण्याची. सर्व व्यवस्थित सुरळीत सुरू होतं. एकच खंत होती ती म्हणजे नोकरीच्या नवनवीन संधी नव्हत्या. अन नोकरदार माणसाचं काय असतं, जिथे चांगली पगार, पद मिळेल ते हस्तगत करून पुढे पुढे चालत राहायचं. मुलं ही नुकतीच शाळेत जाण्यासारखी होती, तेंव्हा त्यांना पुणे ईथे शिक्षण देऊ हा ही विचार होताच. त्यात टाटा मोटर्स ची संधी चालून आली ...पगार फार जास्त नव्हती पण मी "टाटा" नावाला आकर्षित झालो ..अन निघालो.
तर वल्लभनगर स्थानकावरून माझ्या या प्रवासाला सुरुवात झाली. नवीन शहर, नवीन लोक, नवीन कंपनी. काही मित्र आधीच स्थिरावले होते...मी तात्पुरता एका हॉटेलमध्ये राहिलो, 3 / 4 ,दिवस मित्राकडे ही राहिलो, आणि ऑफिसच्या जवळच एक घर घेतलं. पुढच्याच महिन्यात अनिता सर्व घरसामान, आई वडील अन लवाजमा घेऊन आली. नवीन नोकरीत सुटी नसल्याने मी जाऊ शकलो नाही. सर्व व्यवस्था तिने एकटीनेच सांभाळली अन आम्ही स्थिरावलो.
टाटा म्हणजे मोठा समुह, तिथे आपलं बस्तान बसवणं जरा अवघड वाटत होतं पण जमलं. भित्तीपत्रके, कथाकथन, ललीतलेखन स्पर्धा अस एक व्यासपीठ सहज उपलब्ध झालं. सोबतच कामगार संघटना, त्यांचे नेते यांच्या सोबत ओळखी असं हळूहळु होत होत मी कामात गढुन गेलो. नाश्त्याला टेंपो भरून वडा पाव, इडली, सामोसे, पोहे, उपमा, मिसळ असे विविध पदार्थ यायचे. तेच जेवणाबाबत ही होतंच. घर ते ऑफिस अगदीच चालत जाऊ शकत होतो इतकं जवळ, त्या मुळे जास्त वेळ कार्यालयीन कामकाजात जायचा. मी सी इ ओ च्या ऑफिसला जोडला गेलो होतो त्या मुळे दिवसभर मिटींग, कधी युनियन कधी उत्पादन प्रमुख तर अजून काही. सर्व स्तरावर काम असल्याने दांडगा संपर्क, दिमतीला दोन वाहने, एक चालक पण मी फार रमलो नाही. पुर्ण नोकरीत प्रथमच एक वाईट साहेब भेटला अन त्या मुळे मला कामात मज्जा येत नव्हती सोबत राजकारण (हा खाजगी क्षेत्राला ही एक शाप आहेच) पण मी प्रत्यक्ष त्याचा कधीच भाग नव्हतो , आज ही नाहीये म्हणून फार त्रास झाला नाही.
अन अचानक एक दिवस एका मित्राचा फोन आला, तो तेंव्हा IT क्षेत्रा मध्ये चांगल्या हुद्द्यावर होता - BMC Software. त्याच्या टीम मध्ये एक जागा होती. मुलाखत झाली आणि आयुष्यात पहिल्यांदाच गोऱ्या साहेबाने मुलाखत घेतली, आणि मी निवडला गेलो. खरं तर नोकरी मिळाली या पेक्षा त्या सर्व कठीण परीक्षेत मी पास झालो याचा आनंद जास्त होता. ही गोष्ट 2005 ची आहे. या काळात सर्वांनाच हे क्षेत्र खुणावत होतं. तसा माझा प्रत्यक्ष या क्षेत्रात अनुभव नसला तरी मी पूर्वी केलेल्या कामाचा फायदा झाला. पुन्हा नवीन क्षेत्र, पूर्णतः वेगळं विश्व, नवीन कामाचं स्वरूप. आजूबाजूला सर्व उच्चभ्रु लोक, पेहराव, राहणीमान अन संपूर्ण पाश्चात्य संस्कृती. पण सहज जुळवुन घेतलं. एक आवर्जून सांगतो माझ्या आजपर्यंतच्या कार्यकाळातील सर्वोत्तम "कार्य संस्कृती" या ठिकाणी अनुभवली. अतिशय चांगले लोक, सहकारी, साहेब जे आज ही घट्ट मित्र आहेत असे लाभले. मी या क्षेत्रात उशिरा आलो याची कधीच जाणीव होऊ दिली नाही. इंग्रजाळलेल्या या वातावरणात एक अस्सल पुणेरी मराठी झालर ही होती अन मी रमलो. 9 ते 10 मजली इमारत, प्रत्येक मजल्यावर cafeteria त्यात फळं, snacks, जुस असे विविध प्रकार. दिवसातून हवी तितक्या वेळेला cafe coffee day ची कॉफी. खरं तर या कंपन्यांनी कार्य संस्कृतीचा एक वेगळाच चेहेरा समोर आणला, तो सुखावणारा होता आहे. नैतिक मूल्य, व्यक्तीगत स्वातंत्र्य आणि तुम्ही केवळ कामगार नसून कंपनीची एक अमूल्य संपत्ती आहात ही भावना निर्माण केली अन ते सार्थ ठरवत त्या साठी विविध योजना आखून त्या यशस्वीपणे राबवल्या.
वेळोवेळी तुमच्या कामाची दखल म्हणुन होणारे समारोह, उंची हॉटेलमध्ये होणाऱ्या त्या पार्ट्या आयुष्याला एक वेगळीच चमक देत होते. पण मी स्वतःला कायम समजावत गेलो की हे क्षणिक आणि मर्यादित आहे. या प्रवाहात आपण वाहवून न जाता त्याचा क्षणिक आनंद घ्यायचा. अनेक लोक इथेच गल्लत करतात, त्यात गुंतत जातात अन मग त्यांची वाट हरवते. अनेक मुलं मुली सतत पाश्चात्य कपड्यामध्ये वावरणे, त्याच आवेशात वावरने आणि स्वत्व विसरून त्यात वाहत जाणे - हे थोडं चुकीचे वाटते.
Bring your parents to work, bring your kids to work या आणि अशा विविध उपक्रमांनी मी भारावून जायचो. याच्या आयोजनात ही मी भाग घेत होतो. भव्यदिव्य ते आयोजन. अगदी तुम्ही म्हणाल त्या सोय सुविधा, मनोरंजन, खानपान , ऑफिस ची पुर्ण सफर. मुलांना आपला बाप किंवा आई कुठे काम करतात, काय करतात हे कळावं. आयोजक मंडळींना विशिष्ट पोषाख, ते सर्व झाल्यानंतर प्रमाणपत्र आणि श्रमपरिहार.
उशिरा पर्यंत काम करत असाल तर सर्व चोख व्यवस्था असते, वाहन, जेवण, अशा सर्व व्यवस्था. नंतर काही वेळा रात्री उशिरा पर्यंत थांबण्याची गरज असायची, आशा वेळी तुम्ही तुमची बायको, मुलं यांना ऑफिसमध्ये बोलावू शकता. त्यांच्यासाठी एक बोर्ड रूम किंवा cafetria आरक्षित करून त्यांना भोजन, चहापाणी आणि अल्पोपहार अशा विविध गोष्टी उपलब्ध करून दिल्या जायच्या. कालापव्यया साठी चित्रपट, carrom इत्यादी सोय. या आणि अशा असंख्य गोष्टी आहेत, ते सर्वच इथे लिहिणं शक्य नाही.
संघ बळकटिकरन (team building) साठी experential learning सारखे उपक्रम, ते ही बाहेर, निसर्गाच्या सानिध्यात, जिथे साहसी उपक्रम, खेळ आणि त्यातुन अनुभवलेल्या गोष्टी तुम्ही कामांत कशा वापरू शकता असे अनेकविध कार्यक्रम म्हणजे पर्वणीच.
प्रतिवार्षिक होणार संमेलन. जिथे तुम्ही तुमचं कुटुंब, आई वडील, सासू, सासरे , भाऊ, बहीण यांना ही घेऊन येऊ शकता. हा म्हणजे 2 ते 3 हजार लोक एकत्र असा सोहळा. प्रत्येक वयोगटासाठी मनोरंजन, खान पान. आवर्जून जावे असा हा सोहळा. खऱ्या अर्थाने डोळ्यांचे पारणे फेडणारा उत्सव.
याच ठीकाणी मला परदेश गमनाचा योग आला ...तो अनुभव आणि इतर गोष्टी...पुढील भागात ..क्रमशः
शरद पुराणिक
200621
Comments