||श्री यज्ञेशो विजयते|| श्रावणमास पार्थिव शिवलिंग अर्चन सोहळा
||श्री यज्ञेशो विजयते||
श्रावणमास पार्थिव शिवलिंग अर्चन सोहळा
आजचा विषय अध्यात्मिक आहेच पण त्याहूनही जास्त तो काळानुरूप मागे पडत गेलेल्या अनेक रुढी, परंपरा यांची आठवण आणि जतन करण्यासाठी चा हा एक अल्पसा प्रयत्न आहे. त्यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन ही मांडणारा आहे.
माझे गुरू गवामयन सत्र सोमयाजी दीक्षित श्री रंगनाथ कृष्ण सेलूकर महाराज ज्यांचा मी गुरुमंत्र घेतला आहे. अग्निहोत्र चा वारसा लाभलेलं हे गुरुघर. आदरणीय महाराजांच्या नंतर बहू सोमयाजी वाजपेयी श्री यज्ञेश्वर रंगनाथ सेलूकर महाराज हा वारसा पुढे चालवत आहेत. नित्य अग्निहोत्र उपासना हा केंद्रबिंदु आहेच, पण त्या सोबत यज्ञ संस्था अधिकाधिक पुढे नेण्यासाठी ते अहोरात्र झटत आहेत. मोठे महाराज म्हणजेच श्री रंगनाथ कृष्ण सेलूकर महाराज (इथुन पुढे त्यांचा आपण दादा असा उल्लेख करू) यांनी सुरुवात केलेली ही चळवळ श्री यज्ञेश्वर महाराज (इथून पुढे त्यांचा उल्लेख आपण महाराज असा करू) यांनी अतिशय नेटाने सुरुच ठेवली आणि अल्पावधीतच त्यांनीही 25 यज्ञ आयोजित केले. आपल्या व्यावसायिक शिक्षणात जशा विविध पदव्या आहेत, तशाच इथेही आहेतच, आणि जसजसे तुमचे यज्ञ होत राहतील तसेच पदवीही मिळत जाते. मी लेखासोबत त्यांच्या यज्ञाची यादीही संदर्भ म्हणुन जोडणार आहे. आपण सर्व धर्मप्रेमी बांधवास विनंती करतो की ज्यांना ज्यांना या कार्याविषयी, यज्ञसंस्थेविषयी अधिक माहिती किंवा अगोदरच माहिती असल्यास हे कार्य पुढे नेन्यासाठी ची ज्यांची इच्छा आहे, त्यांनी आवश्य गंगाखेड येथे भेट देऊन किंवा खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क करुन उपकृत करावे. यज्ञीय संकल्पातून निर्माण होणारे ध्वनी, लहरी, आहुत्यातून निर्माण होणारे आरोग्यदायी वायु आणि सध्याच्या एकंदरीतच ढासळत चाललेल्या हवामानावर आणि जीव सृष्टीवर याचा होणारा सकारात्मक आणि आरोग्यदायी प्रभाव यावर अनेक वैज्ञानिकांनी संशोधन केलेच आहे, आणि सध्याही असे अनंत प्रयोग सुरूच आहेत.
नित्य वार्षिक सेवेचा भाग म्हणुन प्रतिवार्षिक श्रावण महिन्यात पार्थिव शिवपुजन संपूर्ण महिनाभर केले जाते. हे मी माझ्या बालपणापासून पहात आणि अनुभवत आहेच. पुर्वी अनेकदा हा सोहळा बीड येथे मी पाहिलेला आहे. काळासोबत त्याचं बदलणार स्वरूप ही अनुभवलं आहे. दरवर्षी हा वेगवेगळ्या ठिकाणी होतो. अर्थात गेली दोन वर्षे कोरोना च्या संकटामुकळे तो गंगाखेड येथेच होत आहे. या वर्षीही तो अत्यंत भक्तिभावाने, शिव कृपेने आणि सर्व गुरूबंधु, भगिनी, यज्ञ नारायनाची कृपा आणि गुरूच्या प्रबळ इच्छाशक्ती ने सुरु आहे. मागिल काही वर्षांत तो खुपच भव्यदिव्य होत गेला आहे.
रोजचा नित्यक्रम असा असतो :
प्रात: होम
अग्निहोत्री वृतस्थ लोकांची नित्य अग्नी सेवा, ही दोनीही वेळेस होते, त्या विषयी सविस्तर पुन्हा लिहिणार आहेच.
सप्तशती पठण, संथा, सराव
रोज श्री सप्तशती पाठ, वेद शाळेतील मुलांची नित्य संथा, या वर्षी अनेक इच्छुक गुरूबंधु ही सहभागी आहेत.
श्री सत्यांबा पुजन
रोजच्या अर्चन पूजेचे यजमान सपत्नीक या पुजेत सहभागी होतात. अतिशय आकर्षक पुजा विद्यार्थी मांडतात (फोटो जोडत आहेच). कधी चार पाच, कधी एक दोन तर कधी 8 ते 10 यजमान पद भुषवितात. हे स्वेच्छेने आहे आणि कुठल्याही प्रकारचा अट्टहास, आग्रह नसतो. रोज खूप लोक महाप्रसादाचा लाभ घेतात (सद्यस्थितीत बंधनं असल्याने संख्या आवर्जुन कमी ठेवली जाते). पण दोन वर्षांपूर्वी ही संख्या कमीत कमी एक हजार ते पुढे कितीहि असायची.
पार्थिव शिव लिंग निर्माण, भजन, कीर्तन, भागवत सेवा
हा या उपक्रमाचा गाभा आहे. माती आधीच आणून ठेवलेली असते, त्याचे गोळे करून एका सभा मंडपात कोपऱ्यात तयार असतात. भाविक भक्त ज्यांना ज्यांना लिंग तयार करायचे आहेत ते शुचिर्भूत होऊन सोवळ्यात एका पाटावर छोटे छोटे लिंग बनवून तो पाट सजवतात. ते तुमच्या इच्छाशक्ती प्रमाणे करू शकता, एक पाट, दोन किंवा कुटुंब असेल तर सर्वजण मिळून 4 ते 5 पाट ही होतात. ज्यांना संध्याकाळी पूजेसाठी बसायचे ते उपवास करून ती सेवा करतात. इतरांसाठी भोजनाची व्यवस्था, आणि उपवासाची ही व्यवस्था असते.
बाजूला रोज विविध अध्यात्मिक, धार्मिक विवेचन , प्रवचन, भजन असा स्वयंस्फूर्त सोहळा असतो. अनेक विद्वान मंडळी ही सेवा देतात.
लिंग षोडशोपचार पुजा
सर्व तयार पाट सभागृहात चौकोनी आकारात तीन बाजूने मांडले जातात. त्या समोर आकर्षक रांगोळी काढली जाते. समोर महाराज आणि मायबाई पुजेला बसतात, त्यांच्यासाठी एक शिवपिंड आणि सभोवताली छोट्या लिंगाचे पाट मांडले जातात. पुजेला बसणाऱ्या प्रत्येक भक्ताला एक पुजेची परडी दिली जाते ज्यात फुल, हार, बेल, वस्त्रमाळ, हळद कुंकु, तुपाची वात, निरंजन, अगरबत्ती, दूध साखर, पंचामृत पुजे साठी दिले जातात. पळी, भांडे, ताम्हण, आसन ही पुरवले जाते (हे शक्यतो भक्त सोबत ही आणतात).
आता हळूहळू हे वातावरण इतकं शिवमय होत जातं की विचारूच नका. महाराज, मायबाई येऊन समोर बसतात, समोर मांडलेली ती आकर्षक पुजा. बाजुला संहिता शिकलेला विद्यार्थी वर्ग आणि "स्वस्ति न इंद्रो वृध्द श्रव:" असा मंगलमय मंत्र कानावर पडतो. समोर सोवळ्यात बसलेले भक्त, सपत्नीक, कोणी आईसोबत, कोणी एकटेच असे. "नेत्रोदक स्पर्श':", आचमन होऊन यथासांग पुजा समोर पाटावर मांडलेल्या लिंगांची होते. तो मंत्रजागर इतका शांत, संयमित की प्रत्येक अक्षर स्वच्छ, स्पष्ट ऐकू येते आणि अजिबात घाई, गती नाही.
रुद्राभिषेक
षोडशोपचार पुजे नंतर सुरू होतो रुद्राष्टाध्यायी अभिषेक. हरी: ओम 20 ते 25 गुरुजींच्या एकसुरात सुरु होणारा तो अभिषेक एक दिव्य अनुभव आहे, तो शब्दांत सांगणे ही माझी पात्रता नाहीये. संथ, अगदी हळूवार लईत सोबत स्वतः महाराज ही म्हणतात..त्यांना घाई अजिबात चालत नाही. प्रत्येक मंत्र, स्वर शुद्ध स्वच्छ ऐकु येतो. चार वाजता सुरू होणारा हा विधी साडे सात ते आठ वाजता संपन्न होतो. काय अनुभुती आहे, कित्येक वेळा असं वाटून जातं की आपण हिमालयात कुठल्यातरी पर्वतावर आहोत, समोर शिव पार्वती विराजमान आहेत ..इतका दिव्य अनुभव.
नैवेद्य, आरती, शिवस्तुती
नैवेद्यासाठी भाविक भक्त विविध गोष्टी घेऊन येतात, हे ही स्वेच्छेने , त्याचा नैवेद्य दाखवुन सर्वांच्या आरत्या एकत्र लाऊन "सुखकर्ता ने सुरू होऊन चार पाच आरत्या होऊन थांबते. हे चित्र कुठल्याही कॅमेरात येऊ शकत नाही तो अनुभव तिथेच येतो आणि ते चित्र मनात घर करुन राहतं.
तितक्याच शांतपणे "कैलास राणा शिवचंद्र मौळी, फनींद्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधो भवदुःख हारी, तुजवीण शंभो मज कोण तारी" हे पुर्ण 31 श्लोक होऊन ती शिव आराधना संपन्न होते.
महाप्रसाद
अग्निहोत्राच्या अग्नीपासून प्रज्वलित केलेल्या चुलीवर / गॅसवर / भट्टीवर तयार होणाऱ्या त्या प्रसादाची चव न्यारी, प्रसन्न करणारी आणि दिवसभराच्या उपवासाची सांगता त्या तृप्तीने होते. सर्व कार्यक्रमावर आणि आयोजनावर महाराजांचे लक्ष असते.
असा हा सोहळा श्रावण शुद्ध प्रतिपदेला सुरू होउन भाद्रपद शुध्द प्रतिपदेला समाप्त होतो. हे सर्व घडण्यासाठी खूप मनुष्यबळ, नियोजन, आर्थिक आधार आवश्यक आहेच. त्या शिवाय हे होणे नाही.
या सर्व सेवा विनामूल्य आहेत. फ़क्त यजमान पद घेणाऱ्यांसाठी काही देणगी रूपांत द्यावे लागते, त्या साठी कुठलाही आर्जव, हट्ट, मागणी नाही. आपण एरवी म्हणतो कार्य सिध्दीस नेण्यास श्री समर्थ आहेतच, त्या उक्तीचा इथे क्षणोक्षणी अनुभव येतो.
असा हा भरगच्च कार्यक्रम महिनाभर सुरुच असतो. गेली दोन वर्षे हा कार्यक्रम गंगाखेड येथे असल्यामुळे रोज दादांच्या समाधीला सामुहिक अभिषेक ही एक सेवा करण्याचा योग येतो. तेच दादा, ज्यांनी हा परिवार एवढा वृद्धिंगत केलाय. आणी तीच अग्निहोत्राची मशाल घेऊन महाराज ही दुप्पट वेगाने निघाले आहेत. त्यांच्या या दिव्य कार्यात आम्हीही शक्य असेल ती, जमेल तशी सेवा देतो.
दर्श पोर्णिमास इष्टी
हा यज्ञ ही अग्निहोत्री वृतस्थ लोक दर पौर्णिमेला करतात. अतिशय देखणा कार्यक्रम असतो आणि तुम्हाला तो अनुभवायचा असेल तर पौर्णिमे दरम्यान तिथे जाऊन पाहु शकता. यज्ञाच्या प्रकाराविषयी सविस्तरपणे नंतर लिहिणारच आहे.
पण हे सर्व जनसहभागा शिवाय शक्य नाही. संस्थेची एक वेद अध्ययन शाळा ही आहे जिथे अनेक विद्यार्थी वेद ग्रहण करत आहेत. अनेक पालक त्यांची मुलं इथे शिकवण्यासाठी पाठवतात. सध्या साधारण 60 विद्यार्थी आहेत. प्रचंड मोठा व्याप आहे तो आपण स्वतः तिथे जाऊन, अनुभवावा, आपणास शक्य ती सेवा द्यावी आणि या विधायक कार्यात सहभागी व्हावे. तपशीलवार माहितीसाठी खालिल क्रमांकावर संपर्क करावा.
गेली अनेक दिवस हा विषय डोक्यात होता पण बहुधा गुरूंची आज्ञा आजच मिळाली असावी ...
!!यज्ञ नारायण भगवान की जय !!
गंगाखेड संपर्क : यज्ञभुमी संदेश 98229 41253
(या वर संपर्क करून सर्व माहिती घ्यावी)
शरद पुराणिक
310821
Comments