अस्मत मित्र "नितीन" तस्मै स्वधा नमः / येईल का तो परत ?

 अस्मत मित्र "नितीन"  तस्मै स्वधा नमः / येईल का तो परत ?


आता या घटनेला खरं तर अनेक महिने उलटुन गेलेत तरीही मी ही अत्यंत वेदनादायी जखम पून्हा उघडी करून पाहतोय. पण काही जखमा अशा असतात त्या कधीही सुकणार नाहीत अन त्या क्षणोक्षणी तुमच्या आत खोलवर  प्रचंड गोंगाट, घालमेल, बेचैन आणि अस्वस्थ करत राहतात.  अनेकांसाठी ती एक घटना, बातमी ही असते जी इतर अनंत घडामोडींसारखी विरघळते काळाच्या ओघात ...त्यांच्यासाठी हे कदाचित विनाकारण खाजवने  किंवा गोंजारने असं होईल. पण ज्यांची आयुष्य उध्वस्त झालीयेत, उसवलीयेत इतकी की कुठलंही ठिगळ त्याला जोडू शकत नाही. ते उजाड आयुष्य जगतांना होणाऱ्या असह्य वेदनांनि विरलेला हा एक धागा आहे.  ज्यांना याचा त्रास होईल त्यांची माफी मागुन पुढे सरकतो.


आमचा जीवश्च कंठश्च मित्र या कोरोना महामारीच्या महाकाय अजगराने गिळंकृत केला आणि अनेकांची आयुष्य उसवली फाटली अगदी वरती उल्लेख केलाय त्या प्रमाने.  त्याचं स्वतःचं कुटुंब तर काय अवस्थेत आहे हे मी येथे नमुद करूच शकत नाही...😢😢


या पुर्वी ही मी आमच्या या समूहाविषयी लिहिलं होतं ...माझ्या अंबाजोगाई वास्तव्यात ज्याच्याशी मी जोडलो गेलो. जसं जसं काळ पुढे सरकत गेला, दोनाचे चार  झाले अन बोलता बोलता आम्ही अर्धशतकी खेळाडु ही झालो.  पण ती एकसंघ ठेवण्यासाठीचा जो महत्वाचा दुवा होता तो नितीन.  त्याच्या एक एक पैलू विषयी कितीही लिहिलं तरी कमीच. सतत हसमुख, शांत, संयमी, शिस्तप्रिय , उत्कृष्ट नियोजन, व्यावहारिक दृष्टिकोन, कुटुंबवत्सल,  तितकाच गोड मित्र एक अजात शत्रु. या शिवाय अनेक उत्तमोत्तम गुण असलेला हा माणूस याने हे आमचे हे मैत्रिबंध असे घट्ट विणले स्वतः भोवती अन तो मुख्य धागा निसटल्यावर ती वीण जशी होते तशीच अवस्था आमच्या सर्वांची आहे.  वर सांगितलेल्या प्रत्येक गुणाविषयी लिहायचं झालं तर एक अक्ख पुस्तक होऊ शकतं.  


त्याच्या आणि केवळ त्याच्याच आग्रही नियोजनामुळे आमच्या दोन तीन  कौटुंबिक आणि असंख्य मित्रांच्या सहली झाल्या. त्या सर्व कार्यक्रमाचे अत: पासून इति पर्यंत सुनियोजन त्याचेच.  स्वतः उच्च पदस्थ सरकारी अधिकारी असून ही तसूभरही त्याचा अविर्भाव नाही, उन्माद तर यत्किंचितही नाही. तिथेही एक यशस्वी अधिकारी म्हणूनच आपली न पुसणारी ओळख ठेऊन गेलाय. आता सरकारी नोकरी असल्याने बदली ही आलीच आणि ज्या ज्या ठिकाणी त्याची बदली झाली त्या प्रत्येक गावात, त्याच्या आसपासच्या ठिकाणी त्याने ही संमेलन घडवुन आणली म्हणजे आणलीच.  तुम्ही फ़क्त तुमच्या बॅग चं नियोजन करा, बाकी सर्व तो चोख व्यवस्था करायचा. एक हैदराबाद फॅमिली ट्रिप, एक सातारा, महाबळेश्वर, पुणे सहल - ही एक अविस्मरणीय होती आणि त्या विषयी मी या पुर्वी लिहिलेच आहे.  प्रतिवार्षिक फक्त मित्र मित्र मिळून तिरुपती भेट - इथे तो अगोदर फक्त तारखा सांगुन ठेवायचा. दोनीही बाजूचे तिकीट, दर्शन असं सर्व आरक्षित करुन ठेवायचा.  मी 4 ते 5 वेळा याचा भाग होतो.  या व्यतिरिक्त अनेक छोट्या मोठया अचानक ठरलेल्या एक दोन दिवसीय भेटी.


फक्त सहलीच नाही तर इथे प्रत्येकजण प्रत्येकाच्या  अडचणीत असे धाऊन जातात हे मी ही अनुभवले आहे, स्वतःची परिस्थिती असो वा नसो पण कुणाचाही अडचणीत काहीही मदत करायला सदैव तत्पर असतात, त्यात हा अग्रस्थानी होता पण इतर सर्व ही अगदी तसेच आहेत. 


अशा या मित्रासाठी आम्हाला काहीच करता आलं नाही याचं शल्य स्वस्थ बसु देत नव्हतं. तो गेल्यावर आम्ही सर्व फक्त फोनवरच एकमेकांशी बोलत होतो. मी ही नुकताच त्यातून बाहेर पडलो होतो. त्या नंतर सर्व जण जसं जमेल तसं त्याच्या घरी भेटून आले. पण सर्वांना एकत्र भेटायची तिव्र इच्छा होती आणि त्याच्या साठी अनेक दिवस आम्ही चर्चा करत होतो. आणि परवा आम्ही सर्व एकत्र भेटलो.  आम्ही भेटलो तो क्षण ते निघेपर्यंत फ़क्त त्याचाच विषय. एरवी सर्व नियोजन करुन कळवणारा तोच नव्हता आणि अगदी निघाल्यापासून एक उणीव सतत भासत होती. आम्ही 7 जण होतो पण कोणी तरी राहिलं आहे, येणार आहे अस सतत जाणवत होतं.  ती उणीव क्षणोक्षणी अधिक वाढत गेली. असं वाटायचं तो येईल , हळुच काही तरी वाक्य बोलेल,  एखाद्या वाक्यावर टाळी देईल. त्याच्या त्या सुबक बॅग मधुन त्या व्यवस्थित घडी अगदी इस्त्री केलेले वाटावेत असे सर्व, अगदी बनियन ला ही इस्त्री आहे अशी चौकोनी घडी, तसंच नेटकं दाढी चं साहीत्य, रोज ब्रश करतो तसे दाढी हा त्याचा नित्यक्रम. दाढी करता करता पुन्हा काहितरी किस्से. सर्वांच्या अगोदर शुचिर्भूत होऊन अगदी ऑफिसला निघेतोय असा,  सर्वांना उठण्यासाठी आणि आवरण्याची घाई करणारा तो  आता नव्हता. म्हणजे सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत प्रत्येक क्षणी त्याची आठवण अजून अजून व्याकुळ करत होती.  त्या ठिकाणी तो कुठूनही येईल, त्याचा आवाज ऐकायला येईल असं सर्वानाच वाटत होतं.


प्रत्येक क्षणात त्याला साक्षी ठेऊन आम्ही जगत होतो. पत्याचे डाव रंगले नेहेमीच्या यादीत एक नाव आणि त्या सोबत त्याचे छोटे छोटे विनोद नव्हते. घड्याळाचे भान नव्हते. 


या पितृ पक्षाच्या काळात हे एक आगळंवेगळं तर्पण आम्ही त्याच्या नावानं केलं आणि आठवणींचं ते भरणी श्राद्ध ही केलं.  कोंडलेली, दाबलेली आसवं तिलांजली म्हणुन तिथे सोडली.  हे होणं गरजेच होतं कारण असं साठवून त्याचा उद्रेक कसा होईल हे कल्पनेपलीकडे होतं. एरवी तसूभरही थेंब न गाळणारे ढसाढसा रडले, हंबरडा फोडला आणि दुःखाला वाट करून दिली. याच वेळी एक संकल्प ही सोडला की दरवर्षी तो गेला त्या दिवशी आम्ही सर्वजण एकत्र येणार ...एवढंच काय ते आम्ही करू शकतो.


 तस्मै स्वधा नमः


एरवी प्रचंड फोटो काढून ते ग्रुपवर, फेसबुकवर टाकणारे आम्ही अगदी शांत होतो, जड पावलांनी तो मुक्काम हलवला ...आणि त्या श्राद्धाच पिंड विसर्जित केलं.


शरद पुराणिक

260921

Comments

Popular posts from this blog

बायकोची जीवश्च कंठश्च मैत्रीण मानसी चा जन्मदिन....