स्वातंत्र्याची अमृतमहोत्सवी कहाणी..साठा उत्तराची ...पाचा उत्तरा सुफळ
स्वातंत्र्याची अमृतमहोत्सवी कहाणी
साठा उत्तराची ...पाचा उत्तरा सुफळ
आज अनेकजनांचा हिरमोड झालाय, काय राव तो 15 ऑगस्ट रविवारी का आलाय ...हे :( सुटी गेली ना, निदान उद्या तरी यायचं म्हणजे कसा long weekend झाला असता. असा नाराजीचा सूर प्रचंद आदळ आपट करून आळवला गेलाय अनेक ठिकाणी. म्हणजे हा दिवस फक्त सुट्टी म्हणुन यावा वाटतो हीच भावना अनेकांची असते. घर आयुष्य आणि समस्त परिवार देशासाठी अर्पण करणारी ती पिढी ते आजचा हा विचार ....खरंच आपण खूपच जास्त प्रगती केलीये. आता तुम्ही म्हणणार तुम्हाला काय सुटी नकोय का ? तसं असेल तर राहू द्या...पण मग स्वातंत्र्यासाठी आहुत्यांवर आहुत्या देत ते याग त्याग भोग आठवतात जे आमच्याच पूर्वजांनी भोगले. आज ही देश सेवेच एखादं गीत आजुबाजुला वाजत असेल तर शहारून यायला होतं ...,आणि ते व्हायलाच पाहिजे ..नाही तर ते बलिदान खरंच व्यर्थ ठरतील. मी काही त्या तिसरीच्या पुस्तकात सांगितलेल्या इतिहासाची उजळणी इथे अजिबात करणार नाही. सर्वांनी तो आपापल्या परीने, तर कुठे आपापल्या सोयीने तो पद्धतशीर समजुन घेत वाचलाय, प्रत्येकाचे अर्थ वेगवेगळे तसे संदर्भ ही. म्हणजे स्वातंत्र्याची मूळ संकल्पना काय होती हीच आम्ही विसरलो आहोत की काय ? अहो एवढा भव्यदिव्य तो तिरंगा जो आमचं प्रतीक आहे त्याच्या रंगात ही आपले सोयीस्कर रंग शोधले आम्ही अन त्याची मुळ संकल्पना ही तशीच बदलली की काय असा विचार येतो. प्रत्येकाने आपापल्या सोयीचे रंग घेऊन तिरंग्याच्याही शाखा काढल्या अन रंगी बेरंगी त्या विविध रंगात आमचा तिरंगा झाकोळून गेलाय.
असो लिहायला गेलं तर अनेक गोष्टी आहेत, त्यांचा जास्त उहापोह न करता पुढे जाऊ. स्वातंत्र्य पूर्व घटना (अगदी चले जावं, रँड ची हत्या, सावरकरांचं त्याग बलिदान, गांधीजी, टिळक, वासुदेव बळवंत फडके , भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस ..ते तिसरीच्या इतिहासाच्या पानांवर असलेक्या अन नसलेल्या सर्व दिगगजांची बलिदाने) चा उल्लेख न करता आणि वरील सर्वांची माफी मागतो आणि पुढे सरकतो. माफी या साठी की मी त्यांच्या विषयी काही लिहावं ही माझी पात्रता नाही.. आणि माझा जन्म स्वातंत्र्यानंतर 25 वर्षांनी झाला असल्या मुळे तो काळ फ़क्त जसा वाचला, शिकवला आणि सांगितला गेला तसाच डोळ्यासमोर येतो.
मी लिहिणार आहे ते माझ्या बालवयापासून आज पर्यंत चा पाहिलेला 15 ऑगस्ट. प्राथमिक शाळेत सकाळच्या प्रार्थनेच्या वेळात सूचना द्यायच्या आणि मग तयारी सुरू होत असायची. कवायती, घुंगुरुकाठी, डंबेल्स, लेझीम, झांज इत्यादी. मी बीडच्या जुनाबझार शाळेत होतो तिथे फार मोठे मैदान नव्हते, पण दोन वर्ग, कोंडाबाईंची केबिन (या आमच्या मुख्याध्यापिका) या मध्ये एक अंगण होतं तिथे हे सर्व होत असायचं. कुठे तरी आपला नंबर लागावा ही ईच्छा, पण आम्ही साधारण सर्वच ठिकाणी असायचो कारण रोजची प्रार्थना, राष्ट्रगीत हे म्हणण्याचा मान 1 ली ते 7 वी आम्ही घेतलाच आहे.. आणि प्रत्येक जयंती, पुण्यतिथीला ते सर्व देव अंगी संचारले ही आहेत.. म्हणजे त्या त्या दिवशी भाषण द्यायचं असं की आपणच टिळक, गांधी, अहोत या आवेशात. 14 ऑगस्टच्या रात्री पितळी तांब्यात पेटते कोळशे टाकुन गणवेश इस्त्री करुन घ्यायचा ..ते शक्य नसेल तर त्याची घडी मारून तो उशाला घेऊन झोपायचं. पहाटे आलार्मच्या आधीच जाग यायची. मधेच एकदा उठून पाहायचं, डंबेल्स, घुंगुरकाठी जागेवर आहे की नाही. अगदी दिवाळीच्या पहाटे सारखीच हुरहूर.
चकाचक होऊन तेल लावून चोपुन चापून पाडलेला भांग, आणि 120 च्या गतीने शाळेत पोचायचं. एका रेषेत उभी सर्व मुलं मुली अन ज्या क्षणी तिरंगा फडकुन राष्ट्रगीत सुरू व्हायचं तो क्षण अंगावर अक्षरशः शहारे आणणारा. नंतर कवायती, बक्षीस वितरण आणि तो वेग कमी होत होत तो "देशाचार" (कुलाचार) संपन्न व्हायचा.
माध्यमिक शाळा, नंतर महाविद्यालयात पण बदलेल्या संदर्भाने हा दिवस आलाच. महाविद्यालयात या कार्यक्रमात जाणाऱ्या मुलांकडे वेगळ्या दृष्टीने पहायल जायचं, कारण त्या वयोगटात ते तुच्छ असं कार्य ...इथे शौर्याची व्याख्या वेगळी होती ..संदर्भ ही "मेरे देश की धरती" वरून "लैला मजनू", एक दुजे के लिये, असे बदलत गेले पण आम्ही जायचो कारण ते आतुन वाटायचं. एव्हाना घरी इस्त्री आलेली होती, पांढरे कुर्ते (असतील तर) नसतील तर ते विकत आणण्याचा काळ तेंव्हा अजिबातच नव्हता, कडक कपडे घालून जायचं आणि त्याच गर्दीत एखादा चेहेरा शोधण्यासाठी डोळे भिरभिरत असायचे. पण इथेही जयंती, पुण्यतिथी, भाषण, वादविवाद स्पर्धा हे सर्व करत अनेक ढाली आणि पदक महाविद्यालयाच्या शिरपेचात खोवले
दोनाचे चार झाले, पुढे मुलांच्या स्वतंत्र दिनाच्या तयारी.. नवनवीन ड्रेस बाजारातून आणायचे,थीम असलेले ते कार्यक्रम, भूमिका बदलली असली तरी भाव तोच होता ..पण इथे फक्त बघ्याची भूमिका, त्या मुख्य प्रवाहात तुम्ही नसता. काही नोकऱ्यात ही हा समारंभ असायचा, पण नाश्त्याला काय आहे या वरुन ठरायचे जायचं की नाही. तर काही ठिकाणी तो 14 ला किंवा 16 ला व्हायचा कारण सुटीच्या दिवशी कोण येणार ? इथेही पारंपारिक बेशभूषा, ऑफिस ची सजावट असे भरगच्च कार्यक्रम, पण ते सर्व कर्मचारी एकत्र यावे या साठी पण त्या दिवशी नाही. काही सोसायटीच्या आवारात, संघटनेच्या कार्यालयात अशा विविध ठिकाणी तो होत आहे, होत होताच... गेल्या दोन कोरोना बाधित स्वातंत्र्य दिवसात त्यालाही ग्रहण लागलं... पण आभासी जगात या दिवसाच्या तयारीसाठी अनेक हात बोटं सरसावली आहेत, लाखो करोडो चित्र संदेश, आणि मध्यरात्री सर्वांनी status ला ध्वजारोहन करुन ते रोवलेत उशीच्या बाजूला...सूर्य तळपत आहे पन इथे या मोबाईल मधून त्या असा हा दिवस साजरा होत आहे ...च्यायला आता या सर्व संदेशाना उत्तर द्यावे लागेल ..त्यात सुटी ही नाही या दुःखात दिवस मावळणार आहेच...
जय हिंद
भारत (कधी कधी) माझा देश आहे
या देशावर माझं (,कधी कधी) प्रेम आहे
बाकी बंधू, भगिनी या अंधश्रद्धा आहेत :( :(
सिनेमागृहात वाजणारे राष्ट्रगीत ही सध्या बंद आहे..
मी मात्र सरकारी अँप वर राष्ट्रगीत गाऊन त्याचं एक प्रशस्तीपत्र मिळवुन साजरा करतोय दिवस...
शरद पुराणिक
15082021
Comments