हुश्श !! संपले रे बाबा उपवास ...पोटाची चंगळ.. देवीचा जागरण गोंधळ
कुठलीही टीका अपेक्षित नाहीये...धर्माचा दंभाचार म्हणून किंवा अवहेलना म्हणुन हे लिखाण नाहीये. केवळ संमिश्र भावनातून, काही धार्मिक संबंध, घटना आणि खाण्याची गंमत असा एकत्रित अनुभव देण्याचा, आनंद वाटण्याचा हा प्रयत्न आहे.
कालच शारदीय नवरात्र संपन्न झाले. तसे आपल्या कडे दरच मोसमात विविध सन साजरे होतंच राहतात. पण हा उत्सव माझ्या अगदी जवळचा आणि आवडणारा उत्सव.
मी आमच्या या परंपरे विषयी 13 ऑक्टोबर 2019 रोजी एक लेख लिहिला होता, त्यातील काही संदर्भ इथे पुन्हा येतील कदाचित... तेवढं गोड मानून घ्या.
पहिल्या दिवशी मी जेंव्हा ऑफिस मधून घरी येत होतो तेंव्हा आसपासच्या घरातुन दरवळणारा गुगळ सुगंध, घंटानाद, मंत्र जागर आणि घंटा नाद ऐकताना मी पार आमच्या मूळ गावी बीड ला गेलो आणि त्या काळच्या नवरात्रीची ती धुम एका चित्रफिती प्रमाणे नजरे समोर फिरु लागली.
आम्ही ज्या वाड्यात राहतो तो वाडा म्हणजे 26 खण माळवद (लाकडी स्लॅब म्हणा). ज्यात साधारण 10 ते 12 खण आमची ओसरी होती, त्यातच एका कोपऱ्यात आमचे देवघर होते. भिंतीतच काढलेले ते देवघर होते ज्याला एक कमान, आत 4 ते 5 पायऱ्या आणि त्यावर क्रमाने राहणारे आमचे देव. देवीचा एक मोठा तांदळा म्हणजे आमची प्रमुख देवता. त्या सोबत वेगवेगळ्या आकाराचे रंगनाथ, शाळीग्राम, गरुड, दीप लक्ष्मी, श्रीयंत्र, अन्नपूर्णा, विष्णूपद, कुबेरयंत्र, गुरू च्या गुरुमंत्र घेतलेल्या डब्या. देव घरा बाहेर उजव्या हाताला एक मारुती मुंजा, शेंदूर लावून लावून फक्त एक चौकोनी आकार दिसतो आता. सोवळ्या साठी एक सीमारेषा म्हणून 2 फुटाचा एक कठडा. समोर बसून पूजा करण्या इतपत जागा. पूजेला बसण्यासाठी व्याघ्रासन, वरती खुंटीला एका विशिष्ट पद्धतीत वेटोळी करून ठेवलेले सोवळे. पूजेसाठी एक भलेमोठे ताम्हण, गंध उगाळण्यासाठी एक सहान आणि चंदनाचे खोड. इतर साहित्य.
नवरात्रीच्या आधी एक दिवस ते सर्व देव आणि उपकरणी घासणे हा एक मोठा कार्यक्रम असे. तो आज ही आहे मी आणि बायको मिळुन तो करतो. देव मी उजवतो आणि उपकरणी ती उजवते. ते असे चमकावून ठेवायचे. घटस्थापना होणार त्या दिवशी शाळेला सुटी असो व नसो, घरी थांबणे क्रमप्राप्त होते. तसंच आताही आहे रोजचं आन्हिक पूर्ण करुनच ऑफिसला निघायचे. यथासांग पूजा घरचे घरी मी करतो अगदी संकल्प दे नैवेद्य आरती. त्या नंतर मी स्वतः सप्तशतीचा पाठ करतो कधी एक, कधी दोन असं ऑफिसच्या वेळा सांभाळून करतो. तो वर सौ ज्यांना 9 दिवस उपवास असतो त्या नैवेद्यासाठी विशेष पदार्थ तयार करून आपण धुपम समर्पयामि, दिपम दर्शयामी, दिपानंतर नैवेद्यम म्हणे पर्यंत आणून ठेवते. आम्ही खरंतर अग्निहोत्री होतो, घरात रोज पंचकुंडी अग्नीहोत्र होते. अग्नीमंथन करुन नंतर विधिवत अग्निपूजन करून त्याच अग्निवर अन्न शिजलं जायचं. पण आता ते गॅसवर तयार होऊन येतं.
गेली तीन वर्षे मी ही उपवास करत आहे. सतत नऊ दिवस एकदम सात्विक भोजन. कुठलाही तामसी आहार नाही. त्यात हलकं फुलकं खाऊन, सतत देवीची उपासना करत एक वेगळी अनुभूती मिळते. आणि अगदी वेगळा खाद्य उपक्रम अनुभवायला मिळतो त्याचा मी खूप आनंद घेतो. या वर्षीच्या या खाद्य यात्रेचे काही छायाचित्रे इथे पाठवत आहेच. आता तुम्ही म्हणाल मोठ्ठा !!@😊 आम्ही काय उपाशी राहतो की आमच्या कडे काही होत नाही ...हम्म. तसं नाही पण त्या फराळाच्या पदार्थांना ही जरा बरं वाटावं म्हणुन.
लहानपणी आमची एकत्र कुटूंब होती, त्यामुळे आरतीला क्रमाने वेळ मिळायचा. जो आरती करणार आहे त्याने अंघोळ करून सोवळ्यात होणे, तो पर्यंत आमची ओसरी हळु हळू माणसांनी फुलून जायची. गल्लीतील आणि बाहेरून येणारे आप्तेष्ट पांढऱ्या शुभ्र धोतरावर हातात घंटा घेऊन एक एक करून यायचे. इकडे काही जण समोर अग्निकुंडात शुभा टाकून गुगळं आणि त्याच सोबत, आरतीला लागणारे साहित्य याची जमवाजमव करायचे. ओसरी अशी फुलून जायची. आरती करणारा शूचिर्भूत होऊन येताच, "स्वस्ति न इंद्रो वृध्द श्र्व: ' या मंत्राने तो आसमंत भारावून जायचा. षोडशोपचार पूजा म्हणजे, देवी आणि घटाला हळद, कुंकू, फूल, अक्षता आणि नैवेद्य दाखवुन आरतीची सुरुवात व्हायची. मी आता लिहिताना ही शहारतोय एवढं दैवी स्फुरण यायचं त्या नऊ दिवसात. एका मोठ्या ताम्हणात निरांजन घेऊन उभे राहिल की स्वत्व विसरायला व्हायचं.
ओं अग्निदेवता वातो देवता सूर्योदेवता चन्द्रमा देवता वसवो देवता रुद्रो देवता आदित्यो देवता मरुतो देवता विश्वेदेवा देवता बृहस्पति देवता इन्द्रो देवता वरुणो देवता
वरील मंत्र होऊन देवावर अक्षता टाकून आरतीला सुरुवात. खड्या आवाजात साधारण 25 ते 30 लोक एका सुरात आरती म्हणायचे आणि शरीर आत्मा पूर्णत्वे जगदंबे चरणी तल्लीन व्हायचे. आज तेवढी गर्दी नसली तरी घरची सर्व मंडळी एकत्र येऊन ती अनुभूती घेतोच.
कापूर आरती नंतर मंत्र पुष्पांजली होऊन सर्व जण खाली बसायचे. आरतीचा हा पूर्ण सोहळा उभं राहून असायचा. न्यासकरून रोज देवीची एक स्तुती प्रार्थना रूपात म्हणली जायची, कधी कवच, अर्गला, किलक, रात्रीसुक्त, शक्रा दय, अकरावा अध्याय, लक्षकोटी चंडकीरण.अस रोज एक म्हणून सर्वांनी आणलेला प्रसाद एकत्र करून तो पुर्ण वाटायचा. हे सर्व इथेच न थांबता, लगेच आमच्या काकांच्या आरतीला सर्व जण तसेच जायचे, तिथेही तोच क्रम, नंतर आमचे इतर नातेवाईक यांच्या कडे ही जायचे. असा हा साधारण 7 वाजता सुरू होवून रात्री 10 पर्यंत चालणारा सोहळा आता शॉर्ट कट झाला, कुटुंब विभागली, स्थलांतरित झाली उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने, शहरामध्ये अंतर ही जास्त आहेत. पण हो आजही आमच्या प्रत्येक घरात हे असंच चालू आहे फक्त सर्व एकत्र नाहीत एवढंच. या लेखाच्या निमित्ताने मी आज पून्हा तो काळ जगलो.
या सोबतच यथासांग कुमारिका पुजन, श्री सूक्त हवन, सोवाष्णींची ओटी भरणे, जसे शक्य असेल तसे देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणे असा एक भक्ती शक्तीचा सोहळा. या वर्षी कोरोना नंतर मुक्त झालेली देवालय गर्दीने फुलली होती. पण कार्यालयीन काम, नित्य पूजा, पाठ या मुळे कुठल्याही मंदिरात जाणे झाले नाही. पण घरी आलेल्या प्रत्येक दुर्गा रूपाचे, दर्शन आणि आशीर्वाद घेतले. रोज विविध दुर्गारूपी व्यक्तिमत्वाचा प्रवास उलगडून त्यांना सन्मानित केले.
नवमीचे दिवशी नऊ दिवसांचे पारणे हो
सप्तशतीचा जप, होम-हवन करून हो
पक्वान्नांचा नैवेद्य केले कुमारी पुजन हो
आचार्य ब्राम्हण तृप्त केले जगदंबेने हो
या आरतीच्या ओळी सार्थ करत तीची मनोभावे सेवा केली.
काल दसऱ्याला सरस्वती पूजन (पूर्वी वह्या पुस्तकं पाटी असायची) हल्ली लॅपटॉप ठेवावे लागतात हा एक बदल.
खरं तर लोक म्हणतात देवाची सेवा जाहीर करायची नसते आणि तिचं प्रदर्शन ही करायचं नसतं...पण ही दिव्य परंपरा पूढे घेऊन जाण्याच्या या प्रवासात या गोष्टी कराव्याच लागतात ...बाकी श्री ची इच्छा ..
देवीने हीच माझी सेवा मानून घ्यावी...
सेवा मानून घे आई !!
शरद पुराणिक
16102021
Comments