कोरोना विसर्जनाय त्वम पुनरागमनायच .अहो मानाचे बुडाले का ?

कोरोना विसर्जनाय त्वम पुनरागमनायच .अहो मानाचे बुडाले का ? 


अनंत चतुर्दशी ...शुचिर्भूत होऊन ठेवणीतले पांढरे कुर्ते घालायचे, पार्किंग शोधत शोधत एकदाची गाडी लावायची अन गल्लीबोळात रस्ता काढत एकदाचा लक्ष्मी रस्ता गाठायचा. एक अड्डा शोधुन तिथे ठाण मांडायचे अन त्या दिवस पुरता तो सात बारा आपल्या नावे. कडेकोट बंदोबस्त पण तितकंच मंगलमय वातावरण... भव्यदिव्य, आकर्षक रांगोळ्यांनी सजलेले रस्ते...अगदी तसेच जसे श्री प्रभु रामचंद्र अयोध्येत परत आले तश्याच मंगलमय  भावना...पण तिथे आगमन इथे विसर्जन.  जागतिक पातळीवर कायमच चर्चिल्या गेलेल्या आणि तितकंच महत्व प्राप्त झालेला गणेशोत्सव हे पुण्याचं वैभव. अगदी बालपणापासून आकर्षण होतं याचं, तेंव्हा कधी वाटलं नाही की तो आपण इतक्या जवळ राहुन आणि त्याचाच भाग म्हणुन अनुभवू, पन घडलं.


पुण्यात आलो त्या वर्षी अलका चौकात एक कोपरा धरून हा सोहळा काही तास अनुभवला. नंतरच्या वर्षी दोनीही मुलं शिवगर्जना पथकासह या मिरवणुकीचा प्रत्यक्ष भाग झाले अन नव्याने मी पुन्हा हा महोत्सव अनुभवत होतो. 

दोघांना घेऊन सकाळीच ज्ञानेश्वर मंगल कार्यालय गाठायचं. असे प्रत्येक पथकाचे विविध स्थान होते. पांढऱ्या शुभ्र कुर्ता 

पायजम्यावर लाल फेटे, कोट. मुली अन स्त्रियाही तश्याच सजलेल्या उभं टोकदार कुंकु, नथ अन विविध आभूषणे. जणु काही शिव शंभो काळातील मावळेच अगदी.   


खरं तर सकाळी इथपर्यंत पोचनच दिव्य असायचं, रस्तोरस्ती बांधलेले वेळू, कधी इकडून कधी तिकडून असं पोचायचं. बाजीराव रस्त्यावर मिरवणूक रथांची रांगच रांग जी एक दिवस अगोदरपासून आकार घेते. 


पुण्याची मिरवणुक पहावी ती मानाच्या पाच गणपतीची. ढोल पथकांचे शिस्तबद्ध वादन, भजनी मंडळ, कुठे घोडेस्वार अन त्यावर छोटे शिवराय, क्रीडा पथक, झांज पथक, त्यामागे मंडळांच्या कार्यकर्त्यांची सेना, फेटे अन त्या मागे पहिला मानाचा गणपती येतो तो ही पालखीतून अन त्याचं ते गोजिरं रूप डोळ्यात भरण्यासाठी चौकाचौकात गणेश भक्त.  एक एक चौक गणपती पुढे सरकत राहतो.  अंग शहारून अन शरीराला आपसूक थिरकवणारा तो ब्रम्हनाद एक विलक्षण अनूभव आहे आणि तो लक्ष्मी रस्त्यावरच्या चौकाशिवाय जगात कुठेही न मिळणारा. एव्हाना गर्दी वाढत जातेय, थोडी निवांत जागा आता चेंगराचेंगरी पर्यंत पोचते. सभोवतालच्या सर्व ओट्यावर, गच्चीवर, गॅलरीत आणि शक्य तिथे माणसांची डोकीच डोकी आणि अंतर्मनात नाचत, ढोलाच्या ठेक्यावर वळणाऱ्या माना.  आबालवृद्ध सर्वच, काही लाडाचे बाप्पा बापाच्या खांद्यावर बसून हात भिरकावत, बाजूला त्याची आई आज्जी आजोबा असे सर्वच त्या विलक्षण अनुभूतित रममाण. 


मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी तितक्याच शिस्तीत आणि तसाच गोजिरवण्या रुपात येतो आणि पुन्हा तीच अवस्था. शहराच्या मध्यवर्ती भागात, ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी चा हा गणपती. अतिशय साधं, छोट्या मंडपात विराजमान बाप्पा त्याचं मोहक रूप आकर्षून घेतो.. तशीच त्यांची मिरवणूक ही.  


हळूच गुलालाने माखलेले चेहेरे नजरेस पडतात आणि समजावं गुरुजी तालिम मंडळ आलंय. मुशकारुढ गोंडस बाप्पा, त्यावर भव्यदिव्य आभूषणे, फुलांची आरास.सतत दोन ढोल पथकांची परंपरा  आणि हे मंडळ म्हणजे दांडगा उत्साह, गुलालाची उधळण जी बाकी कोणीच करत नाही अन साधारण 100 ढोलांची दोन पथकं अक्षरशः परिसर निनादून सोडतात. माझी मुलं ही या मिरवणुकीत इह वर्ष ध्वज, ढोल अशा दुहेरी भूमिकेत कायम असायची आणि मग आम्हीही हा जणु आपला घरचाच बाप्पा आहे या अविर्भावात सहभागी असायचो. इतर सर्व मुलं वाजवताना आनंद असतोच पण आपली मुलं वाजवताना तो पाहण्याचा आणि ऐकण्याचा आनंद असा शब्दांत मांडणं केवळ अशक्य. "आनंद पोटात माझ्या माईना ग, माईना"


आता पुढचे गणपती विसर्जित झालेले असतात आणि पथकातील मुलं पाठीवर ढोल घेऊन त्यांच्या दुसऱ्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी परत येत असतात.  त्या गर्दीतून मार्गक्रमण केवळ अशक्य पण हे मावळे ते करतात. अनेक धिप्पाड मावळे गळयात शिवमुद्रा, रुद्राक्ष, चंद्रकोर, कोरीव दाढी ...साक्षात शिवबाचे मावळेच भासतात.


गुलालाची उधळण कमी होत मागे येते ती भव्यदिव्य, चांदीच्या आभूषणांनी मढवलेली तुळशीबाग गणेश मुर्ती. कितीही वेळ पाहिलं तरी नजर हटत नाही अशी ही मूर्ती. सर्वात जास्त कार्यकर्ते, विविध खेळ आणि  जोरदार पथक, साहसी खेळ प्रात्यक्षिक असा हा भव्य गणराज अजून प्रफुल्लीत करतो. तीच मजा, तोच आनंद पुन्हा पुन्हा काय लिहु.  


आणि मानाच्या गणपती ची विसर्जन मिरवुनिकीची सांगता होते ती केसरीवड्याच्या गणपतीने. लोकमान्यांचे वंशज आणि इतर कार्यकर्ते दुसऱ्या मार्गाने या मिरवणुकीत सहभागी होतात अन ज्यांनी हा उत्सव सार्वजनिक केला त्या आदरणीय, वंदनीय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची आठवण होते. मिरवणुकीत ही साक्षात टिळक एका वाहनावर अवतरतात. 


या पाठोपाठ भाऊ रंगारी आणि विविध मंडळ येतच राहतात  आणि सोहळ्याची रंगत वाढत जाते.


पण लग्नमंडपात अक्षत पडून गेल्यावर जी अवस्था असते तशीच, आकर्षक  रांगोळ्या धुऊन पुसुन गेलेल्या, सजलेले मावळे घामाने भिजलेले, चंद्रकोर ओघळत मोडून गेलेली आणि लेकीला वाटी लावून मंगलकार्यालयात जी अवस्था असते तीच भावना इथेही .....


खरं तर पुण्याचं आराध्य दैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, त्या पाठोपाठ बाबु गेनू, अखिल मंडई अशी ही मिरवणूक, जी सुरूच रात्री होते ...हे भावविश्व वेगळं असतं, भव्यदिव्य रथ, विद्युत रोषणाई, तशीच पथकांची रेलचेल आणि दिवसभर वाजवून पुन्हा नव्या जोमाने हे मावळे तयार, वेगवेगळ्या रंगांचे फेटे अन सर्वार्थाने सांगता होणार त्या मुळें प्रचंड जोश ....पण मग यालाही वेळेची बंधनं लादली गेली अन याचं स्वरुप ही बदललं. मानपान पुढे मागे, सरकासरकी अशा विविध नाट्यछटा असतात यांच्या मिरवणुकीला. 


पण मला वयक्तिक भावली ती पाच मानाच्या गणपतींची मिरवणूक ...रात्रीचे ते बेधुंद DJ त्यावर बीभत्स नाचणारी मंडळी कोणी शुद्ध, कोणी धुंद तर कोणी काय.... ज्या उद्देशाने हा उत्सव सुरू झाला त्याला फाट्यावर मारुन  जी देवाच्या नावावर त्याचीच उपेक्षा होत आहे ती कधीच नाही भावली ...निदान कळु लागल्यावर वर तर नाही.


कदाचित याचा अति उद्रेक झाला की काय ? गेली दोन वर्षे हे सर्व संपलय अन आज तर या दिवशी संचारबंदी च सावट आलंय ...अति तेथे माती तर नाही ना ? या आणि अशा अनेक प्रश्नोत्तराच्या मालिकेत मी शोधतोय हरवलेला गणेशोत्सव ...सापडेल नक्की सापडेल ...


बाप्पा तुमच्या सोबत हा कोरोना पुरता विसर्जन करा

आणि तुम्ही एकटेच पुढच्या वर्षी लवकर या !!  पिढ्यानपिढ्या आम्ही तुम्हाला सद्बुद्धी दे, अशी विनवणी करतो ती तुम्ही कधी ऐकणार आहात ?? 


गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला !! 


आज सुनसान है वो गलीया

जहाँ हम कदम भी न रख पाये

बेशुमार आवाज की लहरे जहाँ

खामोशी और सन्नाटा है वहा


शरद पुराणिक

200921

आनंतचतुर्दशी





Comments

Popular posts from this blog

बायकोची जीवश्च कंठश्च मैत्रीण मानसी चा जन्मदिन....