नऊ महिने नऊ दिवस कस ग सोसतेस
आज एका मित्राची आई गेल्यानंतर ची पोस्ट वाचली अन नंतर लगेच दुसऱ्या मित्राची आई गेल्याचं कळालं ..अंत्यसंस्कार आटोपले अन या शब्दांनी मनात घर केलं ...गुदमरून जाण्यापेक्षा त्यांना वाट करुन देतो !!
नऊ महिने नऊ दिवस कस ग सोसतेस
दोन जीवाची होऊन हसत खेळत जगतेस
एरवी तशी साधी फार मोहक न वाटणारी तू
या दिवसात अशी खुलुन खुलून बहरतेस
ते तुझं मोहक रूप फार काळ नाही ग टिकत
असह्य वेदना झेलत कळा सोसत जन्म देतेस
तू अन तो बाप आणि सर्वच आंनदी असतात
ज्याला जन्म दिला त्याला याचं काही नसतं
तुझंही होतं कोड कौतुक काही दिवस तरी
डिंकाचे लाडू, आळीव, बदाम असं काही तरी
हीच काय ती तुझी काळजी घेतात घरी दारी
नंतर तू उपाशी, तापाशी कोण नाही विचारणारी
तेज हरवतं अन काळजी ने तू काळवंडंतेस
ते वाढत जातात अन तू बारीक होत जातेस
दिवस रात्र राब राब राबून पडताक्षणी झोपतेस
हात मायेने त्यांच्यावर गोंजारत आसवं टिपतेस
ते सर्व निराकार जन्माला आल्यावर जसे
ओली अंथरून, लंगोट हो डायपर सोडुन
छोट्या छोट्या कपड्यामध्ये त्यांना सजवतेस
बोट घट्ट धरून शाळेत नेऊन सोडतेस
घर भर राडा अन धुमाकूळ घालणारे तेच
दार उघडुन बाहेर ही उडु लागतात लगेच
नुसती काळवंडंन नाही तर तू बारीक होतेस
बसलेल्या गालानी त्यांचे गाल गुच्चे घेतेस
त्यांना बाहेरच जग समजावून सांगत राहतेस
अशी सतत सतत का ग चुकीचं वागतेस
नको दाखवू त्यांना ते जग तुला पोरकं करणारं
घट्ट पकडलेले हात अचानक ढीलं करणार
पुर्वीची आई बरी होती ग फ़क्त चूल अन मुल
पण तू आता शाळेत, कॉलेजात सोबत असतेस
कधी मित्र मैत्रिणीशी, सरांशी ही बोलत राहतेस
पायी, गाडीवर, बसमध्ये दूर दूर सोबत करतेस
का गं त्यांना असे पाय फुटू देतेस अन सोडतेस
तेच हात तुझ्यासाठी दुर्मिळ अन अदृश्य होतात
मधल्या काळात पायाखालून पाणी बरेच जाते
त्याच कोकराला कवटाळण्यासाठी बेचैन होतेस
तुझ्या हात पायांच्या पायघड्या घालून वाढवतेस
मोठं करून अजून अजून गोंजारत राहतेस
सगळ्यांनाच याची चाड आहे असं नाही बरं का
गोंजारणारे हात कोणी झटकते तर कोणी कुरवाळते
आहेत आज ही मोजकेच काही श्रावण बाळ
कुठे पुण्याई तर कुठे पापाची हा वेगळी माळ
कोणी तुझ्यासाठी आयुष्य वेचून सांभाळतो
तर कोणी तुलाच घराबाहेर ढकलतो तुझ्याच
तुझं प्रेम कसं ग आटत नाही संपत नाही कधीच
झिडकारले कितीही तरी त्रागा करत नाहीस
हसत हसत बोलत राहेतस दिवस त्यांचे आहेत
लपवत फाटलेले लुगडं बांधलेले जखमेवर त्यांच्या
कोरा चहा पिऊन तेच दुध त्यांना पाजतेस
त्यांच्या स्वस्थ उद्याची सतत तयारी करतेस
तेच तुला आज औषध आणून देत नाहीत
बघ नवरा बायको ते आइस्क्रीम खात बसलेत
आणलंच औषध चुकुन कधी तरी बळजबरी
हिशोब त्याचा निघत राहतो पदोपदी घरोघरी
कधी तरी मांड ग बाई तू ही हीशोब तुझा
मग पहा पेन, कागद अन वेळ पुरणार नाही
त्यांना जन्मताच मऊ मऊ कपड्यात ठेवतेस
काय आणू अन काय नको असं करतेस
जाताना तू दोन बांबू, चिपाटावर झोपतेस
सरणावर ही हसत हसत जळत राहतेस
अन या वेड्याला असं एकटं पोरकं करुन जातेस ...
शरद पुराणिक
111121
Comments