काम धंदा ...पोट पाणी .. बरंच काही ..पुणे (भाग 3)
काम धंदा ...पोट पाणी .. बरंच काही ..पुणे (भाग 3)
मागच्या लेखात मी BMC ने दिलेल्या परदेशवारीची एक काडी टाकुन थांबलो होतो. कोणी म्हणेल हम्म मोठ्ठा आला परदेश वारी अन काय काय ...इथे घरटी एक ते दोन माणसं परदेशात आहेत ..आणि लाखो असे चुटकीसरशी जगभर फिरत असतात ...अन तु काय सांगतोस.
पण माझ्यासाठी ते फार वेगळं होतं... प्रामाणिकपणे सांगतो 2009 पर्यंत मी साधा विमानात ही बसलो नव्हतो आणि अशा या माणसाला थेट परदेशी विमानात बसायचे योग आले. या वरून तुम्ही अंदाज बांधला असेलच की काय तो आनंद झाला असेल. खरंतर या पुर्ण मालिकेत मी नामोल्लेख आवर्जुन टाळले कारण इतकी नावं आहेत की उगाच कोणी विसरायला नको आणि दुखायला ही नको. पण एक नामोल्लेख आवर्जुन करणार तो आमचे साहेब, boss, मॅनेजर, मित्र, बॅडमिंटन पार्टनर (हो आम्ही रोज 4 ते 5 बॅडमिंटन खेळायचो... तो एक घट्ट समूह आज ही तसाच आहे) आणि अजून बरेच काही असे श्री रवींद्र राजवाडे यांनी तो योग जुळवुन आणला. Windy Arnold नावाची एक बाई जी माझी US Manager होती तिची ही कल्पना होती. आता अस्मादिक Australia ला जाणार ही कल्पनाच भारावुन टाकत होती. माझा पहिलाच विमान प्रवास तो ही आंतरदेशीय त्यात माझी झालेली तारांबळ आणि गंमत हा एक पूर्ण वेगळा विषय होणार आहे तो नंतर लिहिणार आहेच, तेंव्हा जास्त हवेत न तरंगता थेट सिडनी ला जाऊ.
डिसेंम्बर चा महिना ख्रिसमस तोंडावर अशा प्रफुल्लित वातावरणात मी आमच्या ऑफिसला पोचलो. या ऑफिसमध्ये मी एकमेव भारतीय होतो, बाकी पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, चीन, जपान, इंग्लंड, आयर्लंड, फिलिपाईन्स अशा विविध देशातील मंडळी कार्यरत होती. ही ऑस्ट्रेलियाची खासियत आहे. तो बाहेरुन आलेल्या लोकांचाच देश आहे. अशा त्या विविधतेने नटलेल्या ठिकाणी काम शिकायचं होतं. दोन आठवड्यात सर्व अवगत करून मी भारतात येऊन ते काम सुरू करणार होतो. One man army. खरं तर ते अवघड होतं कारण त्या लोकांचे उच्चार आणि बोलण्याची गती त्या सोबत रुळायला वेळ लागतो. पण जमवलं ते.
ऑफिसमध्ये चिनी मुली होत्या त्यांचे टेबल चहाच्या डझनभर प्रकारांनी भरलेले.. काही जणांचे टेबल अनेक ड्राय फ्रुट्स, toys असं बरंच काही. आत शिरल्यावर Tanya Hunt नावाची 6 फूट उंच धिप्पाड बाई reception वर होती. मागे मोठा कॅफेटेरिया, दोन भले मोठे फ्रीझ, आणि त्यामध्ये शेकडो wine, whisky च्या बाटल्या. चौकशी केल्यावर कळालं, जो कोणी ऑफिसच्या कामासाठी परदेशी, बाहेर जाईन त्याला प्रवासात मिळालेल्या किंवा त्याने आणलेल्या बाटल्या तिथे साठवुन ठेवल्या जायच्या. आणि शुक्रवारी दुपारी 2.30 ते 3 च्या दरम्यान त्याचा ते आनंद घेत असत.
माझं हॉटेल अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर होतं त्यामुळे रोज चालत येत होतो. Marriott ला होतो रोज तिथला यथेच्च नाष्टा घेऊन निघायचं. इथला नाष्टा म्हणजे तो सर्व पहायलाच अर्धा तास जायचा. सर्व फळं, त्यांचे जुस, ड्राय fruits, ब्रेड चे अनेक प्रकार, बाकी तिकडच्या लोकांसाठी विविध मांसाहारी पदार्थ, एक दोन भारतीय पदार्थ, Kellogs Muesli चे विविध प्रकार, आता जास्त आठवत नाही. पण जेवणाची मात्र तारांबळ, कारण मी एकमेव शाकाहारी,चार एक दिवसानी महेश अरगडे पुण्याहून दुसऱ्या कामासाठी आला अन बरं वाटलं. तो सतत सर्व देश फिरत असल्याने त्याला अनेक बारकावे माहीत होते. हॉटेल मध्ये रात्री गरम दुघ अगदी अर्धा लिटर च्या बाउल मध्ये मिळतं, किंवा मग त्या सोबत muesli वगैरे अशा खास टिप्स त्याने दिल्या. दुपारच्या जेवणासाठी होटेल ला विनंती करून एक दोन वेळा काहीतरी बनवुन घेतलं. सोबत सौ ने इतके पदार्थ दिले होते की ते अगदीं परत येई पर्यंत पुरले. त्यातलं काही सोबत घेऊन जायचो. शाकाहारी माणसाचे खाण्याचे वांदे होतातच.
आता ख्रिसमस रंग भरत होता, ऑफिस डेकोरेशन, टीम लंच असे विवीध उपक्रम सुरू झाले. इथे एक विशेष होतं हे सर्व उपक्रम कामाच्या वेळेनंतर होतात. मलाही उद्योग नव्हता त्यामुळे मी ही मदत करत होतो अन अगदी 2ते 4 दिवसात मी तिथलाच झालो. रोज सकाळी कॉफी पिण्यासाठी माझ्यासाठी थांबायचे ...मी आलो की सोबत कॉफी, नंतर आसपासच्या हॉटेल्स मधे जेवण असं रतीब सुरू झालं. आसपासचे मॉल ही फिरुन झाले आणि यात सतत सोबत टीम च्या मुलं मुली यायचे. खरं तर त्या काळात भारतीय विद्यार्थी आणि स्थानिक असे अनेक वाद परंतु मला याचा यत्किंचितही त्रास झाला नाही.
नंतर सुरू झालं ते ख्रिसमस साठी भेट वस्तू आणि त्यांची सजवणूक, विविध पार्ट्या, वेगवेगळ्या थीम अन शेवटचा आठवडा धमाल गेला. पण मला त्या खाण्याची अजिबात मज्जा येत नव्हती, मग सँडविच, desert वर मी समाधान मानून त्या क्षणांचा आनंद घेत होतो.
या लोकांचं एक वैशिष्ट्य आहे, कामाच्या वेळेत काम. अगदी सकाळी 8 ला हजर, अजिबात टंगळमंगळ न करता 8 तास नेटाने काम. शुक्रवारी मात्र दुपारी 2 ते नंतर पुर्ण weekend चा माहोल. त्यात द्रव्य , खानपान, संगीत अगदी सर्व.
याच दरम्यान माझ्या न्यूझीलंड, कोरिया, जपान, चीन , सिंगापूर इथल्या टीम सोबत ही बैठका झाल्या, ओळख परेड आणि मी ही त्या हक्का नूडल गँगचा एक अविभाज्य घटक झालो. मला सर्व शिकवणारी ही मुलगीच होती Zobea Dean आणि Joe Karam नावाचा एक व्यवस्थापक होता - जो आज ही संपर्कात आहे. दोन्ही कानात मिळून 7 ते 8 बाळ्या, कोथिंबीर दाढी अन अलग पेहराव असा हा माणूस कायम लक्षात राहील. पण तितकाच चाणाक्ष, हुशार आणि काम एक काम हा मंत्र सतत सर्वांना देणार.
असो ही सर्व शिदोरी घेउन मी भारतात परत आलो, आणि ते नवीन काम सुरू केलं ...एकाच कंपनीत मी Data Analyst, Information Analyst ते Sales Operations Specialist झालो अन एक हटके व्यावसायिक आयुष्य जगलो. संपूर्ण भारताची sales टीम हे माझे सहकारी होते, आणि एक जबरदस्त sales team चा मी भाग होतो. काम आशियाखंड पण माझी मॅनेजर अमेरिकेत असल्याने सकाळी लवकर सुरू होणारा दिवस रात्री उशिरा संपायचा.. पण सर्व सोयी होत्या, येण्यासाठी गाडी होती (विशेष महिनाअखेर, किंवा वर्ष अखेर), रात्र रात्र काम असायचं पण मी ते enjoy केलं. या दरम्यान काही अवार्ड ही मिळाले...आणि हा प्रवास आता उत्तरार्धात अगदी शेवटच्या टप्प्यात पोचला ...का ते पुढील भागात ...
शरद पुराणिक
260621
Comments