आजी म्या किरवंत जाहलो...आधारवड हरवले ...हे राम हे राम तू ही माता तू ही पिता है !!
आजी म्या किरवंत जाहलो...आधारवड हरवले ...हे राम हे राम तू ही माता तू ही पिता है !!
एक एक दिवस असले काही अनुभव सोबत घेऊन येतात ज्याला शब्दांत बसवणं आणि नेमक्या त्याच भावना पोचवणे ही कठीण ....पण व्यक्त झाल्याशिवाय राहवत नाही ही अशी त्रेधातिरपीट होते.
रोजच गंमत करत जगलं पाहिजे असं नाही, या गमतीलाही एक दुःखाची झालर बसते कधी, ती असतेच पण जाणवत नाही जोवर ती चमकदार रजई अंगावरून निसटत उघडे पाडते...चमक दूर होते अन लक्तरे जीर्ण वाटावी अशीच काहीतरी भावना असते हो सुखदुःखाच्या लपंडावात असा जोरदार धप्पा पडतो अन राज्य तुमच्यावर येतं.
आज दिवस साला या वाढत्या वयात जबाबदारीच्या सुरपारंब्या आवळण्यात गेला जेंव्हा आधार वड च नाही राहिले हो.
काल एक बातमी धडकली आमचे एक काका अचानक हे जग सोडुन गेले.... खरंतर एक धष्टपुष्ट व्यक्ती, आयुष्यभर कष्ट केलेल शरीर त्यांना काही आजार होऊ शकतो हे कल्पनेपलीकडॆ.... पण अचानक मेंदु वर अपुऱ्या रक्तपुरवठ्याने घात केला अन सर्व संपलं. वरचेवर ज्येष्ठ सदस्यांची ही कमी कमी होत जाणारी संख्या आणि त्यासोबतच कुटुंबातील निर्माण होणारी दरी ...ती निर्माण होत नसते पण खेळ मनाचा हा सारा, आपण व्याकूळ होतो हे नक्की. आता तुमच्या माझ्या सारख्या भेटायला जाणाऱ्यांची एक उगाचच भावना असते... कोण फार काय रडतच नाही, यांना काही दुःख नाही ...अरे पण उर बडवून घनघोर आवाज केले म्हणजेच दुःख झालं असं नाही...अनेकांना ते उशीरा पचते तर काहींना त्यावर नियंत्रण मिळते, तर काहींची ती व्यक्त करण्याची पध्दत वेगळी असते एवढंच. विषय गंभीर असल्यामुळे रडण्याचा गमतीजमती बाजूला ठेऊन पुढे सरकतो.
असो या दुःखाच्या प्रसंगी भावांना भेटुन येऊ म्हणून निघालो, सोबत त्याचाच मेहुणा आणि मंडळी... मग या निमित्ताने गाडीत जुन्या आठवणीच्या त्या कंदिलावरची जळमटे, धूळ जरा बाजुला करत अनेक घटनांवर तो मंद प्रकाश टाकत आम्ही पोचलो. या आठवणीच्या महासागरात 5 तासाचा प्रवास अगदी अलगद तरंगत पैलतीरी गेल्यासारखा.
आता या आनंदाच्या लहरी समोरच्या दुःखावर विसर्जित करुन समोरच्या त्या घटनेने हादरलेल कुटुंब... माणूस नसतो तेंव्हा त्याची उणीव, किंमत आणि त्याच्या नसण्याची जाणीव होऊन गदगदणारे मन ..असे विलक्षण भाव त्या घरच्या लोकांच्या चेहेऱ्यावर असतात. ते व्यक्त होऊ की नाही या संभ्रमात पुसटशे उमटतात, अन मी ही ते बरोबर वेचतो ....
देवीदास काका - एक निरुपद्रवी, सृजनशील, शांत व्यक्ती. गालात हसणे आणि एखाद दुसरा शब्द एवढंच काय ते व्यक्त होणार. पण कर्त्यव्यात कसुर नाही, सर्वांसाठी करत राहुन त्याची वाच्यता ही न करता जगले. राग चिडचिड ही तारुण्याचा उंबरठा ओलांडली तशी ती कात टाकुन फ़क्त श्रवण, मान डोलावणे आणि मम म्हणुन प्रत्येक संकल्पात सहभागी होणारं एक लाघवी व्यक्तीमत्व. यांच्या असण्यापेक्षा, यांची नसण्याची जाणीव जास्त व्याकुळ करणारी. प्रत्येक आनंदाच्या क्षणी हसत तुमचं कौतूक करणारा तो आधार, चेहरा आता नाही. आपलं म्हणणं ऐकुन त्याला साथ देणारे हाथ नाहीत.... असे हे काका गेल्याने कुटूंब खरंच पोरकं झालं.
या घटनेनंतर कौटुंबिक भेट घेऊन निघालो.... आता एका मित्राची आई आम्हाला सोडुन गेली होती, त्या मित्राला भेटून निघू अस ठरवलं ...अखेर आज सुहास च्या आईने अखेरचा श्वास घेतला ...जीव गुंतने, अडकणे हे काय ? तर गेली काही दिवस जी माऊली निःशब्द, स्तब्ध होती ती बहुतेक सुहास च्या भेटीसाठी थांबली होती. काल सुहास आला अन आज तिने तो रोखलेला श्वास सोडला. एका नंतर एक हे असे आधार सुटत जात आहेत आणि पोरकेपणाची जाणीव त्या सुटलेल्या हाताने अजून जास्त तीव्र ...विश्वास चे बाबा जे अगदी काही महिन्यांपूर्वी गेले ते अन सुहास ची आई म्हणजे एक निर्व्याज, निरपेक्ष प्रेम वाटणारी, दोघेही सतत हसतमुख... आणि आपलं सर्वस्व इतरांसाठी वाटत गेले... या लोकांनी फक्त आणि फ़क्त प्रेम आणि माया लावली ...
सुहास ची आई तर आयुष्यभर कष्ट, प्रतिकुल परिस्थितीत, परगावी नोकरी करून संसाराचा गाडा यशस्वी पणे चालवला...कधी तक्रार नाही, मी पणा नाही आणि मुलांच्या स्वरात स्वर मिसळुन एक सुखी, समाधानी आयुष्य जगली ..स्वतः च्या संसारा सोबत बहिणींची, जावेची, जन्मदात्री ची ही शेवटच्या श्वासापर्यंत काळजी घेतली....
अनंत आठवणी आहेत ...त्यांनी केलेले अनेक पदार्थ, विषेश करून "बाफळ्या, बट्ट्या" .. आम्ही अंगती पंगती करायचो तेंव्हा भरपूर तयारी करून द्यायच्या ....कुठलाच हट्ट नाही, मागणी नाही ....अगदी अनेक चित्रपट, गोष्टीरूपातील प्रेमळ आईचं रूप आज हरवलं आणि आम्ही पोरके झालो.
मी तर माझी आसवं त्याच दिवशी रोकून अंतर्मनातून त्यांना नमस्कार केला, जेंव्हा मी आवाज देऊन शपू, शरद पुराणिक आलोय म्हणलो, डोळे हलवून थोडी उघडझाप केली...एरवी हसत स्वागत करणारी ती माऊली शरीर आकुंचित करून शांत झोपली होती, सुहास च्या प्रतीक्षेत. तसं संतोष आणि सुहास च्या बहिणी, भाऊजी, वैशू सर्व होतेच ...पण सर्वजण सोबत असतानाच निर्गमण करण्याची त्यांची सुप्त इच्छा असेल ....आज तीस वर्षाची ती चित्रफीत अशी पाणावलेल्या डोळ्यांनी पाहताना हात ही थरथर करत आहेत, अक्षर ही सुस्पष्ट दिसत आहे...काकू हा शब्द नमस्कार तुमच्या अखेरच्या क्षणी.
आता इथे जरा स्थिरावलो तोच फोन वर संदेश धडकला.... प्रशांत चे वडील दादांना दुपारी 1 वाजता देवाज्ञा झाली... आणि मी ही थबकलो. अरे हे काय सुरू आहे. मान्य आहे गेले काही दिवस ते जरा अस्वस्थ होते. पण प्रशांत त्यांचा डॉक्टर, मित्र, पुत्र, काळजीवाहक अशी विविध अंगी सेवा त्यांना देत त्यांचं आयुष्य वाढवत होता. त्याची सहचारिणी शुभांगी ही या सेवेत कुठेही कमी पडली नाही ...खरंतर दादा हा लेखाचा वेगळा विषय असू शकतात.... टाकावूतुन टिकाऊ वस्तू तयार करणे यात त्यांचा कोणीही हात धरू शकणार नाही, काल ही गेलो तर ज्या खोलीत त्यांचं वास्तव होतं ती जणु एक Museum भासावं असा त्यांचा संसार त्यांनी तिथे सजवला होता. कधीच कुठलीही गोष्ट फेकुन द्यायची नाही हा त्यांचा मंत्र त्या खोलीत प्रत्येक भिंतीवर, माळ्यावर असा सूचक, सुबक आणि त्यांना हवा तसा रुजवला, पण अगदी नेटनेटका कुठेही ती अडगळ न वाटता एक छोटेखानी प्रदर्शन म्हणाव असं. एका भिंतीवर हातोडी, करवत, चाकू, पाठ खाजवण्यासाठी चा प्लास्टिक चा हात, मोबाईल अन चार्जर, पण चार्जर साठी साबणाच्या खोक्याला दोर बांधून, तो वरच्या बाजूला झाकनरुपी उघडण्याची सोय करून त्यात व्यवस्थित ठेवलेले.... तसे दोन चार बॉक्स तिथे होते. त्यांच्या हस्तकौशल्यातून साकारलेली अनेक आश्चर्य तिथे होती....वयाच्या 90 व्या वर्षापर्यंत हा छंद जोपासलेल्या या तरुण व्यक्तीने अतिशय चोखंदळ आयुष्य जगलं. पण ते जपण्यासाठी कुटुंबातील सर्वांनी ही विरोध न करता ते होऊ दिलं.
जेवणात भाजलेले दाणे, खलबत्त्यात कुटलेली चटणी, मेथीचे पानं... असं अगदी कमी पण चवीनं खाणार, इथं थोडे आग्रही होते... पण मग ते त्यांच्या शारीरिक समृद्धी चं रहस्य. सतत चालणे, लोकांशी संपर्कात राहणे आणि नात्यांचा तो बंध घट्ट ठेवणारे दादा...प्रत्येक गोष्टीत टापटीप, नेटकेपणा, अवास्तव खर्च, दिखावा नाही या सर्व गुणांमुळे स्वतः आणि कुटुंबा पुरती आर्थिक सुबत्ता जपत स्वच्छंदी पण शिस्तीत जगलेले...पत्नीच्या वियोगात थोडेसे बदलत गेले ....अन काल गेले....
या सर्व गदारोळात मी ही आवरुन होतो माझं ते वाईट वाटणं... पण सर्व तयारी झाली, त्यांना नेण्यासाठी स्वर्गरथ आला, त्यांनी शेवटचा निरोप घेतला.... जसं तो देह स्वर्गरथात ठेवला तसं जगजितसिंग यांचे ते स्वर कानी पडले ....
हे राम, हे राम, हे राम, हे राम
जग में साचे तेरो नाम हे राम…
तू ही माता, तू ही पिता है ।
तू ही तू हे राधा का श्याम ।।
तू अर्न्तायामी, सबका स्वमी ।
तेरो चरणों में चारो धाम ।।
तू ही बिगाड़े, तू ही सवारे ।
इस जग के करे काम ।
तू ही जग दाता, विश्व विधाता ।
तू ही सुबह, तू ही शाम ।।
हे राम, हे राम, हे राम, हे राम…
माहीत नाही या भजनाची काय कमाल आहे पण हे भजन सुरू होताच आजच्या तीनही घटना, आठवणी डोळ्याच्या आसवांनी ओघळून मी पुरता गहिवरलो .....अन असं वाटलं मी आज काय किरवंत तर झालो नाही ना ? एकाच दिवसात हे आटोपून पहाटे पुण्यात पोचलो.
शरद पुराणिक
071223
Comments