भाग 2 - आजी म्या किरवंत जाहलो...आधारवड हरवले ...हे राम हे राम तू ही माता तू ही पिता है !!
भाग 2 - आजी म्या किरवंत जाहलो...आधारवड हरवले ...हे राम हे राम तू ही माता तू ही पिता है !!
खरं तर हे असे भाग लिहायची वेळ येउच नये, पण दुःखाचे हे दगड धोंडे असे येऊन आदळतात अन त्या जखमा खोल खोल होतात, आपण भेटुन सावरतो ही पन ते व्रण अनेकांची आयुष्य विद्रूप करतात.
परवा एक घनिष्ठ मित्र असाच डाव अर्ध्यावर सोडुन निघून गेला. आयुष्याच्या सारीपाटावर एक सुंदर खेळ सजत असतानाच, त्या सोंगट्या तश्याच टाकून गेला.... संघर्षाची एक खेळी संपत येऊन सुख असं उंबरठ्यावर असतानाच हा निघून गेला. समोर दोन गोंडस मुलं, प्रेमळ बायको डावावर तसेच त्या सोंगट्या पसरलेल्या सारीपाटावर सुन्न .. काय सांत्वन करायचं, कोणी कोणाचं हे अनुत्तरित प्रश्न आ वासून त्या भयानक वातावरणात घोंघावत होते.
एक एक दिवस असले काही अनुभव सोबत घेऊन येतात ज्याला शब्दांत बसवणं आणि नेमक्या त्याच भावना पोचवणे ही कठीण ....पण व्यक्त झाल्याशिवाय राहवत नाही ही अशी त्रेधातिरपीट होते.
रोजच गंमत करत जगलं पाहिजे असं नाही, या गमतीलाही एक दुःखाची झालर बसते कधी, ती असतेच पण जाणवत नाही जोवर ती चमकदार रजई अंगावरून निसटत उघडे पाडते...चमक दूर होते अन लक्तरे जीर्ण वाटावी अशीच काहीतरी भावना असते हो सुखदुःखाच्या लपंडावात असा जोरदार धप्पा पडतो अन राज्य तुमच्यावर येतं.
आज दिवस साला या वाढत्या वयात जबाबदारीच्या सुरपारंब्या आवळण्यात गेला जेंव्हा मित्र अन आधार वड सोडून गेले.
श्रीपाद उर्फ मिट्टया - मी माझ्या पूर्वीच्या एका लेखात ही लिहिले होते की तो एक Encyclopedia आहे, त्याच्या विषयी लिहिणे एक स्वतंत्र, मोठा विषय आहे. तो गेल्याची बातमी आली अन त्याच्या कुटुंबातील सदस्यांना भेटू म्हणुन मित्र मंडळी औरंगाबाद हून आली. मिट्टया अनेकांच्या आयुष्यात अनेक धाग्यांनी गुंफलेला....50 शी नंतर एक सहज सुंदर आयुष्य जगण्याची संधी खुणावत असताना हे त्याचं जाणं जिव्हारी लागलं. त्याच्या आयुष्यात त्याची स्वतः ची लोकं ज्यांनी त्याच्यावर अक्षरशः जीव ओवाळून टाकला निदान त्यांच्यासाठी ही तो असायलाच हवा होता.. पण साला हा "काळ" असा घाला घालतो ना 😢😢...दोन चार तास भेटुन त्याच्या सहवासातल्या आठवणी गोंजारत आम्ही चार यार जरा एकत्र राहु म्हणुन सोबत राहिलो.. त्या दुःखाची बोळवण तर शक्य नाही , पण विभागून त्याची तीव्रता कमी होईल म्हणुन.
तो वर आज सकाळी एक बातमी धडकली बायकोचे मावस काका अचानक हे जग सोडुन गेले.... खरंतर एक धष्टपुष्ट व्यक्ती, आयुष्यभर कष्ट केलेल शरीर त्यांना काही आजार होऊ शकतो हे कल्पनेपलीकडॆ..पण गेले काही दिवस जरा आजारी होते. आम्ही सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी त्यांना भेटुन, बोलून आलो. वरचेवर ज्येष्ठ सदस्यांची ही कमी कमी होत जाणारी संख्या आणि त्यासोबतच कुटुंबातील निर्माण होणारी दरी ..अन आपण व्याकूळ होतो हे नक्की.
आता मित्र ही औरंगाबाद ला जाणार होते, मी घरी न जाता तसाच त्यांच्या सोबतच निघालो.या दुःखाच्या प्रसंगी भेटुन येऊ म्हणून निघालो, ... मग या निमित्ताने गाडीत जुन्या आठवणीच्या त्या कंदिलावरची जळमटे, धूळ जरा बाजुला करत अनेक घटनांवर तो मंद प्रकाश टाकत मी पोचलो. या आठवणीच्या महासागरात 6 तासाचा प्रवास अगदी अलगद तरंगत पैलतीरी गेल्यासारखा.
आता या आनंदाच्या लहरी समोरच्या दुःखावर विसर्जित करुन समोरच्या त्या घटनेने हादरलेल कुटुंब... माणूस नसतो तेंव्हा त्याची उणीव, किंमत आणि त्याच्या नसण्याची जाणीव होऊन गदगदणारे मन ..असे विलक्षण भाव त्या घरच्या लोकांच्या चेहेऱ्यावर असतात. आयुष्यात डोक्यावरचं छप्पर गेलं म्हणुन हवालदिल कोवळा पोर, मुलीला एकदाचं बोहल्यावर सजवून जीवन सत्कारनी लावण्यासाठी , तिच्या सप्तपदी ची फुलं सजवण्यासाठी स्वप्नांचे मनोरे रचणारा तो बाप अचानक सोडुन गेल्यावर पार कोसळलेली ती पोर... ती दिसली अन माझाही बांध फुटला. त्यांच्या आजारपणात सर्वांचीच खुप धावपळ झाली, पण श्रद्धा नी ही प्रचंड सेवा केली..हे आमच्या सासरी एक विशेष उल्लेख करावा असं ते म्हणजे प्रत्येक सुखदुःखात जीवाला जीव देऊन सोबत करतात.. त्या सर्वांचे कौतुक करण्याचा हा योग्य क्षण नाही...असो .मुलगी अन वडील यांचं एक अनोखं नातं मी फार जवळून पाहिलं आहे ते आमच्या बायकोचं अन सासऱ्यांचं नातं. अनेक गोष्टी फ़क्त नजरेतून एकमेकांना समजवणारे..एकांतात तास न तास गप्पा मारुन घरच्यांना त्याचा थांगपत्ता ही नसतो. तसंच काहीसं हे ही नातं.
किशोर काका - एक निरुपद्रवी, सृजनशील, शांत व्यक्ती. गालात हसणे आणि एखाद दुसरा शब्द एवढंच काय ते व्यक्त होणार. पण कर्त्यव्यात कसुर नाही, सर्वांसाठी करत राहुन त्याची वाच्यता ही न करता जगले. एक लाघवी व्यक्तीमत्व. आमच्या बायकोवर विषेश प्रेम. ती आली हे नुसतं कळलं तरी धावत भेटायला येणार. डोळे भरून पाहणार, काहीतरी खाऊ नक्कीच सोबत असणार. मृदू शांत भाषेत विचारपूस करणार. मी असलो तर त्याच किंवा जास्त आदराने, प्रेमाने चौकशी करुन हसत गप्पा मारणार. मला हरभऱ्याची भाजी आवडते ती गेली अनेक वर्षे त्यांच्याकडूनच मिळाली. एकत्र कुटुंब त्यातही अरे नाही की कारे नाही, सर्वांना सोबत घेऊन वाटचाल केली... चार पिढ्या एकत्र नांदल्या ...आई, स्वतः भाउ, मुलगा आणि त्याची पोर. एवढा व्याप अर्थातच त्यांच्या भावाची ही उत्तम साथ या प्रवासात आहेच...मावशी म्हणजे गरीब गाय, त्यांच्याकडे तर आज पाहुच शकलो नाही.... मायेची मुर्ती ती आज पार कोलमडून गेलेली...एवढा मोठा परिवार आजच्या काळात ही यशस्वीपणे एकत्र नांदताना किती कसरत झाली असेल, पण यांच्या चेहऱ्यावर कधीही त्याचा लवलेश नव्हता.
एक धडपडीत आयुष्य जगलेला शेतकरी, सतत दुसऱ्याला काही तरी देत राहायची वृत्ती, बदल्यात काही अपेक्षा नाही. निरपेक्ष भाव, जोडव्यवसाय म्हणून भिक्षुकी ही जोरात चालत होती. मी आज देवासमोर ज्यात अगरबत्ती लावतो ते एका तांब्याच्या ताम्हणात, ते त्यानी दिलेलं. एका अधिकमासाच्या वानात त्यांनी ते मला दिलेलं. माझ्या पेक्षा अनिताच्या आठवणी खूपच आहेत.
आज, यांची नसण्याची जाणीव जास्त व्याकुळ करणारी. प्रत्येक आनंदाच्या क्षणी हसत तुमचं कौतूक करणारा तो आधार, चेहरा आता नाही. आपलं म्हणणं ऐकुन त्याला साथ देणारे हाथ नाहीत.... असे हे काका गेल्याने कुटूंब खरंच पोरकं झालं.
अनिताला तर हे दुःख अनावर झालंय, कारण अण्णांच्या जान्यांनंतर ती तो आनंद किशोर काकात अनुभवत होती. ती आज पुन्हा तो पोरकेपणाच्या भावनेने आसवं गाळत बसलीये.
देव ही असा निष्ठुर का, ज्या स्मशान मारुती मंदिरात त्यांनी नित्य आचरण, पूजा अशी सेवा दिली त्याच वास्तुत त्यांचा देह सरणावर होता...मी भेटून निघालो तेंव्हा धूर अजूनही होताच अन मग .
जगजितसिंग यांचे ते स्वर कानी पडले ....
हे राम, हे राम, हे राम, हे राम
जग में साचे तेरो नाम हे राम…
तू ही माता, तू ही पिता है ।
तू ही तू हे राधा का श्याम ।।
तू अर्न्तायामी, सबका स्वमी ।
तेरो चरणों में चारो धाम ।।
तू ही बिगाड़े, तू ही सवारे ।
इस जग के करे काम ।
तू ही जग दाता, विश्व विधाता ।
तू ही सुबह, तू ही शाम ।।
हे राम, हे राम, हे राम, हे राम…
माहीत नाही या भजनाची काय कमाल आहे पण हे भजन सुरू होताच आजच्या घटना, आठवणी डोळ्याच्या आसवांनी ओघळून मी पुरता गहिवरलो .....अन असं वाटलं मी आज काय किरवंत तर झालो नाही ना ? एकाच दिवसात हे आटोपून पुण्याला निघालोय.
शरद पुराणिक
270124
Comments