अनोखे नववर्ष स्वागत ....इंडोवेस्टर्न - जोशी दा धाबा, भारतीय - कुलकर्ण्यांची सदनिका आणि "सासुरवाडी"
अनोखे नववर्ष स्वागत ....इंडोवेस्टर्न - जोशी दा धाबा, भारतीय - कुलकर्ण्यांची सदनिका आणि "सासुरवाडी"
माझ्या लिखाणावरून सर्वाना अस वाटत असेल कि मी प्रचंड फिरतो, अगदी देश पादाक्रांत करून झालाय... तर ती तुमची अंधश्रद्धा आहे. मी खरं तर कुठेही जाण्यासाठी तयार असतो पण खाजगी नोकरी, सुट्यांची बोंब, आणि नेमकी जेंव्हा सुट्टी असते तेंव्हा हमखास काही तरी महत्वाचे कार्यालयीन कामकाज निघते आणि त्यावर पाणी, नाराजी आणि नैराश्येचे आवर्तन होऊन त्याच्या प्रवाहात त्या सुट्यांचा आनंद विसर्जित होतो... मागे राहतात त्याच कडू आठवणी. अर्ध आयुष्य लोटलं पण आम्ही प्रवासाची पावकी हि पार केली नाही हे सूर्यप्रकाशा इतक स्पष्ट.... असो या वरून तुम्ही समजून घ्या "भावना को समझो"
तश्याच सलग काही सुट्या गेल्या वर्षात शेवटच्या महिन्यात मागोमाग आल्या.. मनातल्या मनात अनेक मनोरे रचले आणि ते तसेच पत्त्याच्या डावासारखे कोसळत गेले अन आम्ही पुन्हा ते रचत गेलो... अशातच मित्रांचा सहज संदेश आला जो तसा नेहेमीच येतो. डिसेंबर च्या अखेरीस चर्चाना ऊत येतो, योजना तयार होतात आणि त्या आपल्यापर्यंत पोचता पोचता लोप पावतात. पण या वेळी अस अचानक ठरल कि ३१ च्या ऐवजी ३० च्या रात्री सर्व मित्र सहकुटुंब एकत्र येऊ अन आठवणींची उजळणी करत पुन्हा ज्याला त्याला त्याने ३१ च्या रचलेल्या मनोऱ्यावर जाऊ देऊ. एरवी whatsapp वर संदेशांचें जणू शोध निबंध तयार व्हावेत एव्हढ्या चर्चा होतात आणि होत काहीच नाही... तस या वेळी मात्र झाल नाही... "झट मंगनी पट ब्याह" झाला... लगबनीने सर्व एकत्र आले आणि मग तो पत्त्यांचा मनोरा वास्तवात फुलला.
गाड्या सुसाट निघाल्या हो अगदी त्याच ऊर्जेत जी मित्राचा फोन आल्यावर असते आणि लगबगीने बाहेर पडायचे असते... एक दोन करत सर्व जण एकत्र आले अन मग त्या मनोऱ्याच्या पाया मजबूत होत गेला... वर उल्लेखिलेल्या "जोशी दा ढाबा" च्या सर्वेसर्वा स्मिता याणी कार्यालयीन जबाबदारी झटकून चक्क सुट्टी घेऊन तिच्या "kitchen" ला अक्षरशः ढाब्यासारख जगवलं... अगदी सूप, स्टार्टर,, मेन कोर्स, dessert इत्यादी. त्या माउलीने संबंध दिवस ते पदार्थ बनवण्यात तिची पूर्ण यंत्रणा कामाला लावली होती... मी आपल सवयीप्रमाणे "लांड लटक" विचारला काही मदत
करू का ? या एका वाक्याने आमचे मित्र शत्रूसारखे पाहू लागले.. पण मी त्यांचाच प्रतिनिधी म्हणून हि मेहनत करण्याचा प्रयत्न करत होतो... :) :)
बोलता बोलता ती मेहफिल सजली अन तिने असा काही सूर पकडला कि मन आनंदाच्या ढगात हेलकावे घेऊन पुन्हा खाली वर अगदी विमानात व्हाव तसं जोरदार तरंगत होतं.. या वेळी मित्राचा नवविवाहित मुलगा, सून, सोयरे असे नवीन रंग सजले...ज्या लेकराला अगदी diper ते बोहला असा प्रवास करताना पाहिलं त्याच्या अन त्याच वयातील आमच्या सर्व बाळांच्या आठवणीत असे काही रमलो विचारू नका.. आता तर सर्वच या प्रवासात पुढे मागे याच दिशेने निघाले आहेत आणि त्या अनुषंगाने, त्यांच्या जन्मापूर्वीच्या, नंतरच्या विविध प्रसंगावर असे काही हसलो कि औरंगाबाद ला असून हि खिडक्या दरवाजे बंद करावे लागले एवढ्या आवाजाच्या रेंज मध्ये ते होतें... स्मिता च कौतुक कराव तेवढ कमी १५-२० जणांचा तो स्वयंपाक, त्याला साजेशी ती सारी भांडी आनंदी चेहेऱ्यावर हसू आणि उत्साह या मुळे त्याची चव न्यारीच .. खरं तर तिची तब्येत ठीक नव्हती तरीही एवढा घाट घातला.. विश्वास म्हणजे एक "स्वच्छंदी " आनंदी माणूस, त्याला पाहून टेन्शन अगदी सुसाट पळ काढतं... एक आंतरिक ऊर्जा जो ती सतत वाटत राहतो आणि वातावरण एकदम खुलवून टाकतो.. त्या माउलीने एवढे पदार्थ करून हि हा काही बाही ऑर्डर करत होताच ..."अरे चलताना रे, उस मे क्या " ... अन गोड हसतो... पैसे वसूल तिथेच. असा हा निरागस मित्र प्रत्येकाच्या वाट्याला यावा. आम्ही स्वतःच्या लग्नासाठी मुली सोबत पाहणारे आता आमच्या पुढल्या पिढीसाठी वधुवर शोधतोय आणि मग साहजिकच त्या प्रवासाच्या त्या सुखद आठवणी कुरवाळत ती मेहफिल अजून अजून बहरत होती.. एक तर आम्ही सर्वजण अगदीच मध्यम वर्गातून आयुष्याच्या या वळणावर एकमेकात सुख दुःखाच्या प्रसंगात असे गोवले गेलेलो आहेत ती वीण दिवसेंदिवस अशी घट्ट होताना चा आनंद, अर्धशतकी या भागीदारीत प्रत्येक इंनिंग्स च्या विविध आठवणी आहेतच.. आता सर्वांचीच नावे घेत नाही... शुभम नी आणलेला गेम, त्याच्या मेहुनीच सुंदर गायन अन भसाड्या आवाजात माझं अन संजूचं ही बेसूर गाणं (?) Icing on cake.
'शाही तुकडा"खाऊन (घरी तयार केलेला) ती शाही मेहफिल कधीच संपू नये अशी रंगत भैरवि कडे निघाली आणि काही पावल अलगद निघू लागली... आम्ही मग स्मिताने सुंदर सजवलेली बाग पाहत पुन्हा गप्पांचा फड बसवला आणि हो नाही करत मध्य रात्री एक ला ते आवारत घेत निघालो.... भेट म्हणून एक छानस झाडाचं रोप त्या चौफेर फुल, फळ, शोभेची अगदी एका जुन्या टब मध्ये तिने "कमळफुलं" हि लावली आहेत अश्या बागेतून एक रोपटं त्या दिवसाची आठवण म्हणून घेऊन आलोय... जेंव्हा केंव्हा ती आठवण येईल मी त्या कुंडीला नक्कीच पाणी घालीन... "एक लोटा जल ऊस मेहफिल कि याद को डालिये " हर दुःख मीट जायेगा... पंडित शपु ..
शरद पुराणिक
३०१२२३ - जोशी दा ढाबा
कुलकर्ण्यांची सदनिका.... हुरडा पार्टी, सासुरवाडी
ते रोप व्यवस्थित ठेऊन काही तास निद्रिस्त होऊन पुन्हा एका नवी चाहूल लागली. ३० तारखेचा कार्यक्रम होण्या अगोदर काही मित्रांच्या गाठी भेटी घेणे गरजेचे होतं. सारल्या वर्षात अनेक दुःखद प्रसंग घडले तीथे जाऊन आलो आणि त्यातच "क्षीरसागर हुरडा" हा कार्यक्रम ठरला, टणाटण उड्या मारत गाडीत बसलो, माहित नाही पण गेली ३ वर्ष हा हुरडा आमच्या पानात अचानक येतो त्या साठी प्रशांत कुलकर्णी जबाबदार ? तो आणि शुभांगी आम्हाला तो आनंद देण्यासाठी अगदी ठरवून ते घडवून आणावेत असं होत. या वेळी अभय हि अगदी चतुर्थीचा उपवास असून हि सोबत घरून उपवासाची थालपीठ, दही, दाण्याचे लाडू, चिक्की, फळे असं घेऊन फक्त सहभोजनाचा आनंद घेण्यासाठी आला.. अगोदर बोरं, पेरू, भुईमूग शेंगा, दही, हुरडा, दाण्याची, तिळाची चटणी आणि गुळ अन सोबत गरमागरम कांदा भजी .... ऊस डाएट कि ऐसी कि तैसी करत थरावर थर लावत गेलो , जरा शेतात फेर फटका मारून पुन्हा पोटात जागा नसतानाही थालीपीठ, बाजरी भाकरी, भरली वांगी, दही चटणी असं घुसवलं ... इथेही तेच पण मग इथे गोड मुली, त्यांचे अनुभव, प्रश्न उत्तर आणि गप्पा असं गंमतशीर होत.. जोडीने झोका, त्याचे फोटो आणि दरम्यान ची टोमणेबाजी हि अजब मेजवानी घेत झोके उंचावत आनंद गोळा करून दुःख त्या हवेत सोडत झुलत होतो.
अभय आणि कल्याणी वाहिनी उपवास असल्याने ते खाऊ न शकल्याचं शल्य अजिबात नव्हत, उलटपक्षी त्यांनी पुन्हा ३१ ला रात्री भेटू, कारण आमच तसं काही ठरल नव्हतं पण त्यांच्या घरी भेटू असं ठरलं. पण मग सासुरवाडी ला एक हि भोजन झालं नव्हत आता हा मेळ बसवणं जरा अवघड होतं, अन हि दरवेळी उद्भवनारी समस्या. आमचे मेहुणे अनंत जोशी (राजू) आणि सौ अंजु हे कितीही आणि काहीही झाले तरी त्यांच्या आग्रहातून सुटका होऊ देत नाहीत...दुपारी तव्यावरची गरमागरम पुरणपोळी भज्जी त्या सोबत हिवाळी पौष्टिक लाडू अबब पोटाची दया येत होती पण नाईलाज. या बहीण भावांची बॉण्डिंग पाहून मलाही विरोध करवत नाही... त्यात हि तो आग्रह करतो तो, जो आजच्या काळात कोणी करत असेल माहित नाही. तशीच त्याची मुलं हि त्याच प्रेमाने "मी शाळेतून / कॉलेजवरून" येउ पर्यंत जाऊ नका, कुठेही जाऊ नका असा आग्रह करत राहतात आणि आम्ही गोंधळतो... त्यातून सुटका करून ते सर्व पदार्थ पोटात घेऊन डुलत डुलत प्रशांत कडे गेलो, त्याला घेऊन अभय च घर गाठलं , वाटेत वकीलमित्र मिलिंद पाटील आणि वाहिनी भेटल्या आणि पुन्हा एक आग्रह झाला पण समजदार बिचारे त्यांनी ऐकलं.. असे अजून एक दोन आमंत्रण होते श्री अविनाश जी ठिगळे आणि अभय जी अग्निहोत्री.. त्यांची माफी मागतो... अजूनही काही निरोप होते पण रात्र कमी सोंग फार.
अभय कडे एक चविष्ट भारतीय मेजवानी आमची वाट पाहत होती,, सर्व प्रथम कॉफी, गरम कांदा भजी (रोज भजी खातोय आम्ही - पोटा माफ कर), अन थोडी जागा व्हावी म्हणून चर्चा इथे तीन आमची गोड बाळं मुली, मग विषय अगदी लव जिहाद, महिला सबलीकरण, श्रद्धा, पेहराव असा फिरत फिरत अनेक वळणावरून होत गेला, अन त्या मुली हि या चर्चेत हिरीरीने सहभागी होत्या. थोडी शी जागा ? खरं तर झालीच नाही पण साजूक तुपातला "बाफळ्या " आंबट वरण (डाळ बाटी), काकडी, टोमॅटो, ठेचा, तूप, मसाला भात अन माझ्या धारूरच्या खव्याचे गुलाबजाम .(इतक होत कि अक्खी इमारत जेवली असत्य त्यात) .. ताटात पदार्थांची गर्दी, अन पोटात ट्राफिक जॅम पण इकडून तिकडून वाट काढत आपण कशी दुचाकी काढतो तसं मार्गस्थ होत ते रिचवलं, मसाला पानं चघळत होतोच तोवर निद्रानाश, स्वप्न असा विषय सुरुझाला आणि सौ नि आम्हाला "रात्री सूक्त" म्हणायला लावले, मग एक एक विषय वेंकटेश स्तोत्र,त्याची किमया, इतर व्रत वैकल्ये, मुलांचे संस्कार, अश्या अध्यात्मिक टेकडीवर जाऊन पुन्हा समेवर आला ... आता विचार करा ३१ डिसेंबर ची ती संध्याकाळ अश्या थाटात साजरी झाली तर कोणाला काय त्रास असावा सांगा. विशेष बात त्या अगदी तरुण मुली ज्या आनंदाने या चर्चेत सहभागी होत्या त्याच विशेष कौतुक. तशीच विश्वास ची आर्या हि अशी एकरूप होते... या गोष्टी मला फार भावतात. या गुणी बाळांनी या नात्यावर रुंजी घातली.
असं एक आगळंवेगळं नववर्ष स्वागत करून मी आता कामावर निघालोय...पाठीवर हि सुखद आठवांची पोटली, चेहेऱ्यावर तो निर्भेळ आनंद घेऊन...
नववर्ष शुभेच्छा !!
शरद पुराणिक
नववर्ष प्रथम आवर्तन 2024
Comments