झंपर - चोळी अन टेलर ची दिवाळी
झंपर - चोळी अन टेलर ची दिवाळी
काल घरगुती कामासाठी सौ सोबत गेलो अन गेले कित्येक दिवस डोक्यात घोळत होता तो विषय आज उतू आला ...लेडीज टेलर...
पूर्वी हा उद्योग (ब्लॉउज शिवणे) घरातच होत असल्याने याचा फार उहापोह नव्हता. पण मग हळूहळू गल्लीत एक ताई किंवा काकु स्वतःसोबत इतरांचेही शिवणकाम करू लागली आणि याची व्याप्ती वाढली. अन नंतर काही पुरुष मंडळी ही यात उतरले आणि आज "लेडीज टेलर" हा एक स्वतंत्र व्यवसाय झालाय. त्याचा व्यास आणि परिघ हा शहराच्या क्षेत्रफळाच्या काईक वर्ग जास्त आहे. एकतर तरुण, पुरुष मंडळी ही तयार कपड्यांच्या ब्रँड मध्ये अशी काही गुंग झाली तसतसे जेन्ट्स टेलर ला फार काही चांगले दिवस सध्या तरी नाहीत. अगदी मोजके लोक कपडा घेऊन शिवायला टाकणारी आहेत पण लेडीज टेलर च्या व्यासापेक्षा अगदीच नगण्य अशी ही संख्या आहे. आता रेडीमेड झंम्पर ही मिळतं पण एकंदरीत "matching" च्या विश्वात त्याला तसूभरही स्थान नसल्याने ते अगदीच "sos" तातडीच्या वेळी, वेळ मारुन नेण्यासाठीचा शेवटचा पर्याय आहे. त्यामुळे जगात विकत घेतल्या गेलेल्या साडीला लेडीज टेलर ची मु दिखाई ही क्रमप्राप्त आहेच.
साडीचा पॅटर्न, पदराचा पटर्न, डिझाइन आणि त्याप्रमाणे त्याचे विविध प्रकार ....आता ते इथे नमूद न करता पुढे सरकतो. अन हातोहात तिला फॉल पिको ....आता हा भाग ही श्रद्धा अंधश्रद्धा यात एवढा गुंतलेला आहे ...प्रत्येकाचे ते सोयीचे ठिकाण आहे आणि हे तिथे नाही झालं तर ती साडी, साडी न राहता विरुन जाते. तसंच टेलर चं ही इथे पिढ्यानपिढ्या तेच ते आहेत, असं नाही हां. ज्याचे त्याचे कौशल्य वेगळे, एक पॅटर्न भारी करतो, दुसरा फिटिंग भारी ठेवतो, तर तिसरा वेळेत देतो, एक बिघडवतो तर दुसरा ते सुधारून देतो. असे एक ना अनेक प्रकार आहेत. आता खरी गंमत आणि आश्चर्य मला हा विषय का लिहावा वाटला ते म्हणजे "शिलाई" ज्या माझ्या मित्रांना या विषयी कल्पना नाही त्यांना ही अभ्यासपूर्ण माहिती मी आज देतो. म्हणजे अनेकदा फक्त शीलाई च्या रकमेत अनेक साड्या तुम्ही बायकोला घेऊ शकता. मला ही हा साक्षात्कार अगदी अशातच झाला जेंव्हा मी ते घेण्यासाठी गेलो आणि पैसे मलाच द्यावे लागले. एरवी बायकोच ते सर्व पाहते त्यामुळे मला याची अजिबातच कल्पना नव्हती. तिने सांगितले ही असेल कदाचित. परवा दोन तीन तयार होते अन ते आणण्यासाठी गेलो अन तीन चार हजार रुपयाची ती रक्कम देताना मला भक्कम झटका बसला. आता आपण ही भरपूर खर्च करतो पण अगदीच बोटाच्या अंतरात मोजता मोजता संपणाऱ्या त्या ब्लॉउज साठी ही एवढी शिलाई अगदीच मनाला न पटणारी हे नक्की ...मी कदाचित चुक ही असेल ही भूमिका मांडताना ...कारण ज्या प्रकारे हा व्यवसाय झपाट्याने विकसित झालाय त्या अर्थी ते वाजवी असेल ही. बरं नुसती शिलाई इथेच हा विषय संपत नाही तर त्याच्या असंख्य accessories आणि मापात पाप झाल्याने नंतर च्या एक दोन चकरा - हे सर्व त्यात अजून भर घालतं. असं असलं तरी इथे प्रत्येकीचा एक आपला दर ठरलेला, तो तिकडून सर्व गणित समजावून सांगत असतो, पण या निघताना मी इतकेच देणार असं म्हणून निघतात, तेंव्हा त्याचा तो चेहेरा पाहण्यासारखा असतो.
फिरत्या चाकावरती देशी कपड्यालाआकार
सदाशिवा तू धन्य कलाकार
लेस, डोरा, लटकन आणि बरंच काही
तूच मिसळशी सर्व पसारा
झंम्पर मग ये आकारा
तुझ्या शिवण कलेला नसे अंत ना पार
कपड्यांचे ते रूप आगळे
प्रत्येकाचे design वेगळे
तुझ्याविना ते कोणा न कळे
नजरेस कुणाच्या दिसते छान, कुणाला नावडते
तूच घडविशी तूच उसविशी
तूच फाडलेले तूच शिवशी
न कळे कशास काय जोडीशी
देसी आकार परी तिज ना आवडी फार
सदाशिवा तू धन्य कलाकार ...
बरं जेंव्हा आपण गेलो, अन मुख्य मास्टर जर नसेल तर तसंच ताठकळत थांबायचे, या दरम्यान त्याचा ज्युनिअर खुप प्रयत्न करतो पण छे...एवढ्यात मास्टर येतो जो त्यानेच वाढवलेल्या व्यवसायाच्या इतर शाखांवरून असेच व्यवहार आटोपून येतो. हो अनेकांच्या अगदी मुख्य लक्ष्मी रस्त्यावर दोन चार शाखा आहेत.
अजुन एक आवर्जून सांगावी अशी गोष्ट म्हणजे "पुणे तिथे काय उणे" असं असताना ही जवळपास 80% ते 90 % "सदाशिव" हे माझा मित्र मदन ने दिलेले नाव, अर्थात टेलर हे मराठवाड्यातले आहेत, त्यात ही बीड जे माझं गाव आहे त्या जिल्ह्याची मंडळी जास्त संख्येने आहेत, त्याच बरोबर उस्मानाबाद, लातूर येथील आहेतच, विदर्भ आणि आता पर राज्यातील ही काही लोक आहेत. पण ही माहिती ज्यांनी मला दिली ते आमचे "पल्लवी लेडीज टेलर" यांनी आनंदाने दिली. बिझिलँड या टोलेजंग बहुमजली इमारतीत 150 च्या आसपास लेडीज टेलर ची दुकाने आहेत. म्हणजे इतरही व्यवसाय आहेत पण प्रामुख्याने आणि सर्वाधिक हे सदाशिव आहेत. असे अनेक छोटेमोठे ठिकाण आहेत तिथे हे वसलेले आहेत. एकट्या लक्ष्मीरोड वरच सर्व मिळुन 500 च्या वर दुकाने आहेत. तरूण आणि नवं व्यवसायीकांनी याची नोंद घ्यावी ...मी स्वतः ही हे शिकावं म्हणतोय राव.
मी अधूनमधून हिच्यासोबत जातो, अर्थात पार्किंग मिळाली तर. नाहीतर तुम्ही या रस्त्यावर दुतर्फा गाडी एका बाजूला लावून मोबाईल मध्ये गुंग असलेली जेवढी पुरुष मंडळी पाहता त्यांची बायको, बहीण, आई ही या इमारतीत गेलेली असते. हे सांगण्याची आवश्यकता एवढ्या साठी की अगदी उभं राहायला जरी जागा मिळाली तरी तुमचं नशीब. तसं नशीब बलवत्तर असेल अन कसबस पोचलो तर मग यांच्याशी गप्पा होतात. कधी कधी इथे वाद, परिसंवाद सुरूच असतात, त्यात ही नवीन प्रकार आणि customised रचना करून घेण्यासाठी होणाऱ्या चर्चा, किंवा त्यांची न आपली किती ओळख आहे हे इतरांना कळावं या साठी खटाटोप अशा बऱ्याच गमतीजमती होतात. अन मला मग यांची दया ही येते, हेवा ही वाटतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल अगदी पाच बाय पाच च्या या दुकानात शिवलेले ब्लोउज पर राज्यात, परदेशात ही जातात. आज आमच्या समोर courier चं ते काम सुरु होतं जिथे गोवा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, लंडन अशा विविध ठिकाणी ते जात होते. एकंदरीतच या चोळी मुळे होणारी दिवाळी हा आश्चर्यजनक प्रवास एकदा सर्वांसमोर मांडावा ही इच्छा आज पूर्ण झाली एकदाची.
मग सिनेमात, गोष्टीत आणि आमच्या लहानपणी किंवा आज ही अनेक भगिनी ज्या फ़क्त संसाराला हातभार, किंवा काही पोटाची खळगी भरण्यासाठी शीलाई मशीनवर दोरा ओवून तो भाता पायाने चालवत आयुष्य घडवतात त्यांच काय या काळजीत थांबतो.
शरद पुराणिक
111223
Comments