षडरात्र महासोमयाग - 16 जानेवारी ते 26 जानेवारी 2024

 षडरात्र महासोमयाग - 16 जानेवारी ते 26 जानेवारी  2024

श्री क्षेत्र नाझरे, ता. सांगोला 


गुरू माझा यज्ञ मार्तंण्ड, बहु सोमयाजी, कर्मयोगी, ज्ञानयोगी, निघाला घेऊन यज्ञध्वज करण्या यज्ञीय कार्यास राजयोगी


इवलेसे रोप लावियेले द्वारी |

त्याचा वेलू गेला गगनावरी ||

प्रवर्ग्य फुलला सोमयाग बहरला |

वाहता आहुती प्रेमभावें, अग्नी गगनी भिडला ||

वसुंधरे चे प्रेमे यज्ञीय सेवे देह अर्पियेला |!

सृष्टीयेचे रक्षणी याग योजियेला ||

प्रवर्ग्य फुलला ...सोमयाग बहरला !! 


माझ्या या पूर्वीच्या अनेक लेख मालिकेतून मी या कार्याविषयी भरपुर लिहिलं आहे. अगदीच ताजे संदर्भ द्यायचे झाल्यास खडकी (बीड) येथे पार पडलेला द्विरात्र अंगिरस सोमयाग,  SVYASA विद्यापीठ बेंगलुरु इथे पार पडलेला पशुकाम महासोमयाग यज्ञ सोहळा आणि  नंतर लगेच पुणे येथे सतत महिनाभर पार पडलेला दिव्य शिवपूजन सोहळा. त्या नंतर वृंदावन येथे पार पडलेला दशरात्र महासोमयाग... दोन वर्षांपूर्वी आलेला त्रिशताब्दी  अमृतयोग. मोठ्या महाराजांच जन्मशताब्दी वर्ष, सेलूकर घराण्याच्या अग्निहोत्र दीक्षेला ही 100 वर्ष आणि पार्थिव शिवपूजन सोहळ्याची ही 100 वर्ष.  या प्रत्येक यज्ञीय आणि इतर अनुष्ठानाचे मी माझ्या बाल, अज्ञानी (हो मी स्वतःला अज्ञानी च समजतो - ते कार्यच एवढे दिव्य आहे) बुद्धीने जसं जमेल तसं त्याच वर्णन करून आपल्या पर्यंत पोचवन्याचा हा एक सूक्ष्म यत्न.  


आदरणीय श्री यज्ञेश्वर महाराजांनी 2003 साली अग्निहोत्र दीक्षा घेतली आणि  गेल्या वीस वर्षांत 28 ते 30 सोमयाग त्यांनी केले. त्यात ही महामारीच्या काळात बंधनं असल्या कारणाने दोन वर्षे काहीही यज्ञीय कार्य न घडल्याची एक खंत होती, पण फेब्रुवारी 22 ला निघालेला हा रथ आता दिव्य गतीने मार्गस्थ होत आहे. गेल्या दोनवर्षात हा चौथा महासोमयाग त्यांनी आयोजिला. संकल्प ही त्यांचाच, तयारीही त्यांनीच केली आणि काल त्याचा बिगुल वाजला.


 समाज प्रबोधनासाठी आपले जीवन समर्पित केलेले व आपल्या तपश्चर्येतून सामाजिक परिवर्तन घडवणारे , तसेच ज्यांना तुझ्या घोड्याचा खूर ज्या ठिकाणी पाषाणात उमटेल ती कर्मभूमी समजून तेथे वास्तव्य करावे , असा श्री दत गुरूंनी स्वतः आदेश दिलेले निगडी , ता . कोरेगाव , जि .सातारा येथील समर्थ पंचायतनापैकी एक श्री रंगनाथ स्वामी यांचा जन्म नाझरे, जिल्हा सोलापूर येथील प्रसिद्ध देशपांडे घराण्यात झाला . अत्यंत प्रासादिक साहित्य रचना हे श्रीरंगनाथ स्वामी यांची वैशिष्ठ्य! योगवसिष्ठसार ,परमार्थ बोध, गुरुगीता व इतर अनेक ग्रंथांची तसेच काव्य व अभंगाची रचना स्वामींनी केली आहे . आपल्या गुरूच्या आज्ञेनुसार त्यानी निगडी येथे वास्तव्य केले . अशा नाझरे येथिल पावन भूमीत हा याग संपन्न होत आहे.  महाराज प्रत्येक कार्याची वास्तु निवडताना काहीतरी विशेष अशीच निवडतात, त्यांच्या दृष्टीतून काय दिसतं हे त्यांनाच माहीत. गेली 8 ते 10 दिवस तिथे स्वतः हजर राहुन हव्या त्या सर्व सोयी सुविधा निर्मित  त्या वास्तूत आज अग्निनारायनाच्या प्रखर तेजाने तिथे दिव्यत्व  स्थापित झालं. ज्यांनी याची देही याची डोळा अनुभवलं त्यांनी मला विशेष टिप्पणी करून जरूर कळवावे ही विनंती.


महाराष्ट्रातून अनेक शिष्य परिवार तिथे गेले आहेत. त्यातील आमच्या अनेक भगिनी नऊवारी पातळ नेसून, डोक्यावर घागर, वृंदावन घेऊन, तर महाराज मायबाई नेहेमीप्रमाणे ही तेजोमूर्ती रूप त्या सोहळ्यास उपस्थित होतेच.  खरं तर त्या दोघांच्या आग्रही आमंत्रणा मुळे ...म्हणजे आई बाप पोरा बाळांना चार दिवस माहेरी बोलावतात, अगदी त्याच मायेने आणि प्रेमापोटी मायबाई ही सर्वांची आई होऊन बोलवतात ...मग लेकरच ती, त्याच ओढीने निघतात. आणि दोघेही स्वतःची सोडून इतरांची काळजी इतकी घेतात की ..काय सांगु. 

असा तो सर्व परिवार, वेदपाठ शाळेचे विद्यार्थी, गुरू जण, असा तो समस्त परिवार एकत्र घेऊन या दिव्य कार्याची अनुभूती घेत आहेत. 


पुर्व तयारी, यज्ञ कुंड, यज्ञ शाळा, मंडप निर्मिती, ,असं करत करत काल संध्याकाळी त्याच दिव्य क्षेत्रात अग्निस्थापना, शोभायात्रा, ध्वजारोहन आणि संध्याकाळी दिक्षा विधी झाला....सकाळी भरजरी नऊवारी साडी घालून मायबाई तर रंगीत काठाचं धोतर घातलेलं ते रूप दिक्षा विधी नंतर ते सर्व त्यागून शुभ्रवस्त्रात अशी ही दोनीही मोहक रूप पाहिली.


जर आपणास शक्य असेल तर 26 जानेवारी  पर्यंत आवर्जून  जाऊन या... फिरणे, पाहणे असं सर्वांगी होईल ..नवचंडी,. शतचंडी, गणेश याग अशी ही अनुष्ठाने आहेतच, या शिवाय रोज श्रीसूक्त हवन आणि यज्ञातील प्रमुख अनुष्ठाने असा भरगच्च कार्यक्रम आहे .....आणि हो थंडी जरा  आहे.. गरम कपडे सोबत असू द्या...बाकी महाराज धोतर आणि पंचावर दिवस रात्र वावरत आहेत...कसं ते त्यांनाच माहीत...


जसं जमेल तसं पुढचे update देत राहीनच ...माझ्या कर्मभूमी वरून...

तो वर यज्ञ नारायण भगवान की जय !! देशभर,  जगभर श्री राम  अयोध्येत नुतन भव्यदिव्य वास्तूत विराजीत होत असतानाच्या या पर्व काळात हे अनुष्ठान ही घडत आहे. आम्हा शिष्य परिवार गर्व, अभिमान आणि आनंदाने प्रफुल्लित आहोत कारण महाराजांनी घडवलेले संस्कार, दिलेली संथा तिथे प्रभु श्रीराम प्राण प्रतिष्ठा अनुष्ठानात ही सहभागी आहेत ते श्री अरूण भिसेगावकर गुरुजी. माझी जन्मभूमी बीड येथूनही अनेक ब्रम्हवृंद या अनुष्ठानात आहेत.  देशभर श्री राम विविध रुपात सजले आहेत. गावोगावी, गल्लोगल्ली लक्षावधी व्रत, वैकल्ये, सोहळे घडत आहेत. मांगल्य आणि पवित्र या पर्वकाळात एक अद्भुत अनुभुती येत आहे... सारा आसमंत, फुले, झाडे, नदी, सागर, पर्वत चौफेर राम नाम लहरत आहे..या दिव्य पर्वात आदरणीय गुरुमाऊलींचा हा याग जणू "अश्वमेध याग" वाटावा हे भाव माझ्या स्थायी ..त्या माझ्या गुरुस वंदन करुन आजची ही भक्ती ची आहुती थांबवतो !! 


यज्ञ नारायण भगवान की जय !!


शरद पुराणिक

170124

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती