नागदिवे ..कुलधर्म, कुलाचार अन बरंच काही















 नागदिवे ..कुलधर्म, कुलाचार अन बरंच काही


अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलम् ।

शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा ।।


महाराष्ट्र, कर्नाटक आणि आणखी बरेच ठिकाणी ज्यांचं कुलदैवत खंडोबा, मल्हारी म्हाळसकांत, मल्हारी मार्तंड आहे  त्यांच्या घरी मार्गशीर्ष महिन्याच्या अगदी एक दिवस अगोदर, म्हणजे कार्तिक अमावस्येला खंडोबाचे षड रात्र घट बसवले जातात पाच दिवसासाठी. चंपाषष्ठी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते. मणी-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकट मुक्त केले. या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव करतात. आता हे आमच्या घरी नाही तरीही थोडीफार माहिती आहे आणि माझ्या बहिणीकडे हे मोठया उत्साहाने केले जाते. 


पण या दरम्यान होणारे नागदिवे हा उत्सव आमच्या कडे आहे.

अमावस्येनंतर पाचवा  दिवस असतो त्या दिवशी नागदिवे करण्याची प्रथा आहे. घर व्यक्ती पर  प्रत्येकी पाच किंवा यथाशक्ती ते दिवे करतात. बाळ जन्माला आलं की त्याचं जसं नामकरण होतं तसंच यथावकाश त्याचा दिवा ही ठरतो, तो म्हणजे एक पक्वान्न, काही ठिकाणी याच्या अनेकविध पद्धती आहेत. बाजरीच्या पिठाचे,पुरणाचे ,व गोडशिऱ्याचे, तूप साखरेचे दिवे करून ते एक ठिकाणी सजवले  जातात (हे पुर्वी नव्हतं, पण हल्लीच्या काळात सणांना वैभवशाली करण्याची पद्धत आहे). त्याच दिव्यामध्ये तुपाच्या वाती लाऊन दिवे प्रज्वलित करतात. 


माझ्या वाचनात आलेली एक माहिती अशी ही आहे की आपल्याकडे नाग हे कुलरक्षक म्हणुन गणले जातात. 

नागपंचमी ला जशी पूजा होते अगदी तशीच नाही पण मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही पूजा करतात पण या दिवशी नागदिवे म्हणजे वर उल्लेख केला आहे तसे घरातील प्रत्येक व्यक्तीच्या नावाचे विशिष्ट मधूर पक्वान्नांचे पदार्थ ठरवुन, त्यावर दिवे लाऊन ते नैवेद्यासाठी ठेवतात.... सोबत जोडलेले काही चित्र पहा,  याला नागदिवाळी असे ही म्हणतात.


दिवा, दीप हे उत्तम आरोग्य, समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक तर नाग हे मूळ पुरुषाचे प्रतीक मानून त्यांच्या कृपेने समस्त कुटुंबाला  दीर्घायुष्य प्राप्त व्हावे या उद्देशाने खालील श्लोक म्हणतात. 


सर्वे नागाः प्रीयन्तां मे ये केचित्पृथिवीतले ।

ये च हेलिमरीचिस्था येऽन्तरे दिवि संस्थिताः ।।

ये नदिषु महाभोगा ये सरस्वतिगामिनः ।

ये च वापीतडागस्थाः तेभ्यः स्यान्मे नमो नमः ।।


हा श्लोक म्हणून नागांना प्रणाम करतात.


माहीत नाही ही प्रथा कुठे कुठे आहे आणि कुठे नाही.. जेंव्हा दिवाळीचं फराळ संपलेला असतो ...थंडी जाणवू लागते ...मार्तंड भैरव चे नवरात्र सुरू असतात अन हा उत्सव होतो...काही ठिकाणी याला सट अस ही म्हणतात... ज्यांच कुलदैवत खंडोबा म्हणजेच मल्हारी म्हाळसकांत आहे त्यांच्याकडे या षड रात्र  उत्सवाच्या अनंत प्रथा पद्धती आहेत त्या विषयी सविस्तर पुन्हा ....असो मला जे विषेश कुतूहल आवड आणी आठवण या सणाची येते ती या कारणाने की  सगळ्या गोड पदार्थांची मेजवानी ही आमच्या बालपणाच्या काळातील एकमेव भव्य असावी...म्हणजे माझ्या लहानपणी... तेंव्हा जेवणात गोड म्हणजे शिरा ..सुधारस किंवा केळीच शिकरण बाकी काही नसायचं आणि ते ही अगदी पाहुणे आले तरच ..इतर सण वार म्हणजे हमखास पुरण पोळी ...तर आशा या सणाची खूप प्रतीक्षा असायची ...कुणाचा दिवा श्रीखंड करंजी तुपसाखर जिलेबी विवीध प्रकारचे लाडू इत्यादी इत्यादी . आणी हे सर्व घरात केलें जायचे ..बाहेरून विकत वगैरे दुरापास्त होतं।..ते पाहूनच एक श्रीमंतीची भावना जागी व्हायची...या सगळ्यात माझा दिवा अतिशय कठीण आहे तो म्हणजे वाटल्या डाळीचा बेसन लाडू ...मला जस कळतंय तस तो फक्त माझी आई करायची आणि आता गेली अनेक वर्षे  बायको ही सुंदर  करते, या वर्षीच्या त्या लाडवांचे फोटो सोबत आहेत....हे सर्व  पदार्थ तयार होऊन नैवेद्य आरती आणि जेवण यातलं अंतर खूप दूर वाटायचं... कधी एकदा ते आपण खाऊ आणि संपवू अस व्हायचं... बर आपला दिवा म्हणजे पेटंट ऑल राईट्स रिसर्वड ...खूप मज्जा असायची ....


असे हे सर्व पदार्थ आज देवपूजेनंतर एका थाळीत सजले, अन त्याचा यथेच्च स्वाद घेऊन मी अनेक मित्रांना एक challange केलं, आणि सर्वांना त्यांचे चित्र पाठवण्यास सांगितले....अनेकांनी ती प्रेमाची पाठवण ही केली... ते खाली जोडत आहे...

शरद पुराणिक

171223

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती