मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये।यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः!!






 मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये।यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः!!


आयुष्यात काही प्रचंड भारावलेले, मंतरलेले आणि दिव्य अनुभूती देणारे दिवस असतात. ते असे अचानक तुमच्या झोळीत येऊ पाहतात. ते तुमच्या भिक्षावळीत येणे न येणे हे तुमचे प्रारब्ध. आणि अगदी समोर असूनही तो न स्वीकारता येणे म्हणजे कपाळ करंटे...मी ही या पैकी एक.


दिवस रविचारचा होता, काही खासगी उद्योग आटोपून घरी आलो. आत्यंतिक वेगाने सौ स्वयंपाक करून तयार झाल्या आणि मी आपलं चालक म्हणुन तिला सोडण्यासाठी निघालो. तिला SP College च्या गेट वर सोडून परत यायचं होतं.  पण जसजसा मी त्या जवळ जात राहिलो तसतसे माझी उत्सुकता वाढत गेली. शुभ्र वस्त्र आणि काही केशरी (नारंगी,  Orange) परिधान करुन हजारो बंधु भगिनी तिकडे येत होत्या. हळूहळू तिथे हजारोच्या संख्येत लोक जमा होत होते. निमित्त होतं, गीताधर्म मंडळाच्या शताब्दी निमित्ताने एकत्र गीता पठण. त्यांचे प्रमुख श्री दातार यांचा तो संकल्प होता. किमान 10000 लोक एकत्र येऊन पठन करण्याचा.  ऑगस्टमध्ये जेंव्हा पंतप्रधान श्री मोदी पुण्यात होते, तेंव्हाच त्यांनी याची संकल्पना, परवानगी अशी चर्चा झाली. तेंव्हा आदरणीय पंतप्रधान श्री मोदी म्हणाले ही की "क्या पुणे मे 10000 लोग इस मे शामिल होंगे?"  असं म्हणून त्यांनी परवानगी दिली.  अगदी चार महिन्यात या दिव्य कार्यक्रमाचे नियोजन झाले.... आले योगेश्वराच्या मना. 


कुठलीही जाहिरात नाही, अवास्तव स्तोम नाही. सर्व जिल्ह्यामध्ये जे गीता वर्ग चालतात त्यांच्या साखळीतून सर्वांना निमंत्रण गेले. आणि पाहता पाहता ते 10000 चा टप्पा ही पार करून गेले. हल्ली 1000 ते 2000 ची गर्दी करण्यासाठी केवढे परिश्रम, जाहिरात आणि नियोजन करून ही चार पाचशे ही येत नाहीत अन त्या साठी चौक, रस्ते बंद ठेऊन सामान्य जनतेला वेठीस धरतात.  इथे 12000 लोक काल होते, ते ही टिळक रस्त्यावर अगदी ऐन दुपारी सुट्टीच्या दिवशी, पण सर्व सुरळीत होतं.  ट्रॅफिक जॅम नाही, गदारोळ नाही, गडबड नाही. शांत, संयमाने सर्व गीता भक्त येत होते, कोणी रिक्षा, चालत, बस, दुचाकी, चार चाकी तर इतर शहरातून बसेस ही आल्या होत्या.. पण नियोजन इतकं चोख ...दुचाकी, चार चाकी साठी वेगवेगळ्या प्रवेश व्यवस्था, बसेस साठीही वेगळी व्यवस्था. एका महाविद्यालयाच्या प्रांगणात हे सर्व होत असताना ही अगदी शांत, गोंधळ विरहित हे सर्व घडत होतं. मी बायकोला प्रवेशद्वार क्रमांक एक वर सोडलं आणि तिथेच थांबलो. कुतूहल, आश्चर्य या भावनांचा तो क्षण मी तिथेच अनुभवत थांबलो. अगदी वय वर्ष 5 ते 90+ अशा सर्व वयोगटातील महिला, पुरुष,मुलं, मुली त्या शुभ्र वेशात आणि चेहेऱ्यावर प्रसन्न भाव घेत एक, एक, समूहाने प्रवेशित होत होते. महिला वर्गाची संख्या लक्षणीय होती. समोरची वाहतुक सुरळीत सुरूच होती.


पाहता पाहता तो परिसर काही केशरी तर शुभ्र असा फुलला. आयोजकांनी 10500 ची आसन व्यवस्था केली होती, ती पूर्णत: व्यापली, तरी अजूनही 1500 ते 2000 लोक प्रवेशद्वारी आत जाण्यासाठी थांबले. आयोजकांनी सूचना केली अन अनेकांनी खुर्च्या सोडून खाली आसनस्थ होऊन त्यांना जागा करून दिली.  समोर भव्य व्यासपीठ, त्यावर श्री योगेश्वराची भव्य मूर्ती, केशरी साडीत चाळीस भगिनी दोन रांगेत आसनस्थ. आकर्षक पण शांत अन डोळ्याला आल्हाददायक अशी फुलांची आरास. व्यासपीठा समोर फुलांची योगेश्वराची मूर्ती रांगोळीच्या रुपात. भव्यदिव्य आणि शांत फक्त पांढरा रंग ल्यालेला मांडव, त्या समोर कुठल्याही फोनच्या स्क्रीनवर न मावणारी भव्य रांगोळी.  12000 एकत्र असून ही कोलाहल नाही... सूचना, पुजन होऊन शंखनाद झाला आणि एका संथ लयीत तो न भूतो न भविष्यती, कल्पनेपलीकडॆ ज्याला शब्दांत ही गुंफता येत नाही असा सुरू झाला.  तुम्ही कल्पना करा तेवढे सर्वजण एका सुरात, लयीत ओम श्री परमात्मने नमः...श्री भगवानु वाच ...असा उच्चार झाला ..अन जमिनीवरून दोन फुट हवेत अगदी ध्यानातीत अवस्थेत साक्षात योगेश्वराच्या चरणी लीन झालेले भाव ...इथे मंत्रपुष्पांजली कधी संपते अन कधी एकदाचा प्रसाद घेतो अशी परिस्थिती असते, तिथे सतत अठरा अध्याय ते ही एकाच सुरात, मुखोद्गत, कंठस्थ म्हणायचे हे ज्यांनी गीता एखादा अध्याय ही शिकले आहेत तेच सांगू शकतात. 


आमच्या साठी अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या गुरू भगिनी सौ वंदना कुणकीकर या व्यासपीठावर त्या निवडक साधकांच्या सोबत साक्षात श्री योगेश्वर चरणी ती सेवा देत होते तर आमच्या सौ. सहित अनेक गुरू बंधु, भगिनी ही या दिव्य साक्षात्कारी अनुभव याची देही याची डोळा अनुभवण्यास पात्र ठरले हे त्यांचे भाग्य. एक एक करत अध्याय होत गेले, 9 व्या अध्याया नंतर अगदी 5 मिनिटांची विश्रांती झाली, पण यात ही आवाज, गडबड गोंधळ काहीही नाही आणि सर्व पुन्हा आसनस्थ झाले, शंखनाद झाला आणि 10 ते 18 अध्याय झाले, गीतामहात्म्य, गीता आरती आणि  क्षमापणा झाली.  व्यासपीठावर आसनस्थ केशरी साड्यातल्या त्या गीता साधक आणि त्या समोर शुभ्र लहरींचा महासागर, त्यात एक एक करत प्रकट होणारे श्लोक... मी सहज आकाशात पाहिलं असं वाटलं, कमरेवर हात ठेऊन, हसतमुख श्री कृष्ण ते पाहत आणि ऎकत आहेत... अर्जुनाला रथ थांबवुन त्यालाही सांगत असावेत मी जे तुला सांगितले तेच ही सारी मंडळी किती छान वाचत आहेत... हात समोर करून काय बरं आशीर्वाद दिला असेल त्यांनी या साऱ्यांना....


यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।

अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।

धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे 


विशेष बाब म्हणजे याची नोंद Asia Book of Records मध्ये झाली आणि गीता धर्म मंडळाला तो पुरस्कार ही काल दिला गेला .  

Maximum number of devotees reciting Bhagvadgeeta together at a single venue. 


मी प्रामाणिक कबुली देतो या सोहळ्याचे वर्णन स्तुति किंवा ते लिहिण्याची माझी योग्यता अजिबात नाहीये ...माझी ती पात्रता ही नाहीये ...पण कुठंतरी न राहवुन तो आनंद सर्वांना वाटण्यासाठी हे  धाडस.... सोबत कार्यक्रमाची लिंक जोडत आहे ...आवर्जून पहा, ऐका. 


शरद पुराणिक

031223

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती