फिर वही दिल लाया हूं....एक अविस्मरणीय विवाह सोहळा

 फिर वही दिल लाया हूं....एक अविस्मरणीय विवाह सोहळा


काल पुन्हा एकदा एक दिव्य, अद्भूत विवाह सोहळा अनुभवला.  तसं तर हल्ली सर्वच सोहळे दिमाखात साजरे होतात, पण कालच्या या सोहळ्याचं विशेष कौतुक. कारण तो हृदयाच्या कुपीत घर असलेल्या एका मित्राच्या मुलाचा.  मी आणि सुनील देशपांडे यांनी 1989 साली सोबतच नोकरी सुरु केली. तो चारठाणा (परभणी) तर मी बीड हुन औरंगाबाद ला पोटापाण्यासाठी आलो होतो. तो तसा शिक्षणासाठी इथे होताच, तिघे भाऊ एकत्र राहून शिक्षण घेत होते. अशातच आमची लुपिन मध्ये ओळख झाली अन या मैत्रीची बीजं तेंव्हाच रोवली गेली. आमचा तो प्रवास मी काम धंदा, पोटपाणी आणि बरंच काही या लेखातून विस्तृतपणे मांडला होता... पण त्याचा धागा धरून ती माळ तशीच ओवतो. 


साधारण मध्यमवर्गीय कुटुंबातील आम्ही अगदी सामान्य जीवन जगत होतो, पण मैत्रीचा धागा तलम रेशमी श्रीमंत होता. या धाग्यात एकत्र विणलेले सुहास जोशी, विश्वास जोशी, संजय पिंपळकर, मदन देशमुख असे बहुरंगी धागे त्यामुळे ती वीण अगदी घट्ट, डेरेदार, मजबुत आणि सुंदर होती आहे.  आमचं सर्वांचे नातं तर विचारूच नका. म्हणजे  मुलगी पाहणे, बोलणी, साखरपुडा, लग्न, पहिली अन दुसरी बाळं जन्माला येत असताना ...आणि या प्रवासात प्रत्येक सुखदुःखात आम्ही कायम सोबतच राहिलो.  पण आज या रत्नजडित रेशीम धाग्यावर त्या काटेरी आठवणींना फार न गोंजारता पुढे जाऊ. प्रतिकुल नाही पण आहे त्या परिस्थितीत मुलांना योग्य शिक्षण, मार्गदर्शन देऊन ती कालची पाळण्यातली बाळं आज बोहल्यावर सजताना आंतरिक आनंदाला पारावार नाही.


शुभम चं लग्न ठरल्यापासून ते अगदी परवा पर्यंत सुनील चे सतत निरोप, फोन आणि आग्रह असं सुरूच होतं. खरंतर एवढया आग्रहाची गरजच नव्हती, पण तो जिव्हाळा आणि आपलं सुख आपल्यातच वाटण्याची मनोमन इच्छा त्याला स्वस्थ बसवू देत नव्हती. आणि इथेही साखरपुड्यापासून ते Reception असे सारे आग्रहाचे निमंत्रण होतेच. त्याचा तो आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही कार्यस्थळी पोचलो. दिसताक्षणी चमकलेल्या डोळ्यांनी एक घट्ट आलिंगन देऊन ती अर्धवट आसवांची ओघळ थोपवुन एक मस्त चहा घेतला.  बरं सुनील एकटा नाही तर त्याची सर्व भावंड रवी, गिरीश आणि चुलत मालत सर्वच जवळचे ....कारण हे नाते मैत्री पलिकडचे...अशी सर्वांची भेट घेत घेत स्थिरावलो...


समोर दस्तुरखुद्द वधुपिता श्री पेडगावकर जातीने सर्व व्यवस्था चोख पाहत होते, ती त्यांची लगबग, उत्सुकता, आनंद, उत्साह मी सोफ्यावर बसून न्याहाळत होतो. हळदीच्या कार्यक्रमासाठी सर्व जण तयार होत असताना मी ते सारे टिपत होतो.  हळूहळू पिवळ्या रंगांच्या विविध छटा तिथे उमटत होत्या ...हे देशपांडे वऱ्हाडी मंडळी हैदराबाद ते औरंगाबाद असा प्रवास करून आल्यानंतर पेडगावकर परिवाराने केलेले त्यांचं भव्यदिव्य स्वागत त्यातुन अजून ही सावरलीच नव्हती.  माणिकमोत्या सारख्या माळा, तालवाद्य, पुष्पवर्षाव आणि Ladkewale असे बिल्ले छातीला लावत "बारात का स्वागत" झालं. पण हळदीसाठी तयार होताना ती प्रेम, आपुलकी ची अंगावरील ओढलेली झालर सुटता सुटत नव्हती... पण एकदाची झाली आणि पिवळ्या रंगांची उधळण तिथे सुरू झाली.  आता तुम्ही म्हणाल हे फारच सिनेमॅटिक आहे, पण सिनेमात जे पाहतो ते असं डोळ्यासमोर ते ही आपल्याच माणसांच्या कार्यात पाहताना उर भरुन येतो. अन ते जुन्या अडगळीच्या खोलीत गेलेल्या आठवणीच्या गाठोड्यातून एक एक आठवण भरजरी पैठणी लेऊन येते.  वर वधू तालवाद्य, संगीत आणि स्प्रे गन नी हळदीच्या ढगात नाचत नाचत अवतरली.  समोर रंगीबेरंगी छत्र्यांनी सजवलेले आणि त्यासमोर हळदीसाठी छान कमलाकृती आसन, फुलांची अन हळदीची उधळण होत हळद उपस्थितांच्या मनात रंग भरत होती. दरम्यान त्या रेशमी रिळातले  एक एक धागे तिथे अवतरत होते आणि आम्ही सर्व त्यात गुंडाळत जात होतो.   


वधूपित्याने लगेच भोजन तयार आहे अशी घोषणा केली अन हळदीला साथ देणारा वाढप्यांचा पेहराव, पिवळे जॅकेट, त्यावर राजस्थानी बहुरंगी पगडी अन सोबतीला चविष्ट पदार्थांची रेलचेल .. अगदी ताटात न मावणारी संख्या...वधुपिता आणि त्यांचे मित्र जातीने सर्व व्यवस्था पाहत होते.  फोटो हा एक अविभाज्य भाग .. नवरा नवरीचे होवो न होवो पण आपण ते काढलेच पाहिजेत. ते आटोपून विश्रांती साठी मंडळी विखुरली. 


सुनील चा फोन आला अन लगबगीने आम्ही पुन्हा कार्यस्थळी पोचलो ...काही तासातच तो परिसर पुन्हा नव्याने नटला. एक भव्य, सुंदर, सुबक, आकर्षक मंडप, व्यासपीठ , त्यावर रोषणाई अजुन भर घालत होती... तिकडे बाजूच्या मांडवात सीमांत पुजन, वागनिश्चय असे विधी सुरु होते..तिथेही फळं, उपहार याची भरपूर रेलचेल....बाजूच्या मांडवात भव्य संगीत रजनी साठी  व्यासपीठ ...पुन्हा आम्ही अक्खा समुह, बायका, पोरं अन फोटो, मध्येच काही गमतीदार किस्से असं सुरू असतानाच वाद्यांचा गजर झाला अन बुलेटवर शुभम-अबोली त्या स्थळी पोचले. पेडगावकर यांनी इथेही बाजी मारली अन एका NGO ला डोनेशन देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला.   एक शास्त्रज्ञ चारठाणकर यांचाही सत्कार झाला. मित्र, मैत्रिणी, भाऊ बहिणी हे थिरकले, अबोली देशपांडे हिने तानपुरा लाऊन काही हिंदी गीतं सादर केली..  शुभम-अबोली या जोडीने बहारदार नृत्य सादर केले.. अन सरते शेवटी एक अलगद अलिंगन देताक्षणी मागे फटाक्यांची आतषबाजी अन त्या सोबत वरुन राजाचं आगमन असं चारी दिशांनी आनंदाचा पाऊस ....मुला मुलींचा तो सोहळा कौतुकाने आई बाप अनुभवत होते...आनंदाच्या अन मुलगी आता त्याची होणार या  दुःखाच्या अश्रूंनी आणि पावसाने सर्वच ओलं ओलं झालं ....या सर्व धांदलित ही वधू पिता आणि त्यांचे मित्र सर्व व्यवस्था चोख ठेवून होते.... बाजूला एका चौपाटीवर ही न मावणारे व्यंजने अगदी दाक्षिणात्य, पंजाबी, बंगाली, महाराष्ट्रीयन, continental अशी फक्त खवय्येगिरी ची मांदिआळी ..प्रवास अर्ध्यावरच पुर्ण होत होता...इतके पदार्थ...त्याचे सर्व थर एकावर एक पोटात रचुन आम्ही पुन्हा निवासस्थानी पोचलो.... अर्थात पुन्हा फोटो, विडिओ हे न विसरता...Bodhankar Events ला सलाम, औरंगाबाद सारख्या ठिकाणी ज्या नाविन्यपूर्ण शैलीने त्यांनी हा सोहळा आयोजित केला या साठी त्यांचे विशेष कौतुक.


हल्ली मी पाहतोय, या अनुभवतोय की आमच्यासारखी 50 तली मंडळी या सोहळ्यांचा निर्भेळ आनंद लुटतात, अगदी तरुणाईला लाजवेल इतका उत्साह, चैतन्य ....याला कारण म्हणजे सोबत असणारा परीस स्पर्श, अन भोगलेले दुःख, कटू प्रसंग यात विसर्जित करून जीवनाला खळखळाट निर्माण करत नव्या उमेदिने जगण्याची एक संधी ....अगदी तसंच आम्ही सारे याचा आनंद लुटत होतो.  आणि इव्हेंट्स मंडळी मूळात या साऱ्यांचा आनंद लुटावा या साठीच तर ते selfie points आणि झगमगाट केलेला असतो ....नवरा नवरी सोबत आपणही नटण्याचा तर हा सोहळा असतो ....हाय काय अन नाय काय. 


दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळीच आवरून सावरून हजर, सूलग्न, विधी, बारात, अन अनेक ओळखीचे चेहेरे, हस्तांदोलन, गळाभेट अशा एका पुनरुज्जीवित स्वतःला घेऊन मिरवत, दंगा मस्ती अगदी शाळा कॉलेजात करतो तशीच असं होतं होत मंगलाष्टके झाली.... पुन्हा वाद्य, फटाके आणि आनंदाच्या लहरी घेऊन खाद्यभ्रमंती सुरू झाली... गेली दोन दिवस आम्ही इथे विविध व्यंजने चाखत होतो, पण विशेष नमूद करावे वाटते ती पदार्थांची निवड, चव, गुणवता आणि प्रत्येक जेवनागनिस वाढप्यांचा त्या योग्य पोशाख ....कुठेही कमतरता, ढील, दिरंगाई नाही...अतिशय चोख नियोजन....Hats off @Bodhankar events


एरवी विधी आणि मुलगी सासरी जाणार या दुःखात असणारे वधुपिता आणि माता दुःख डोळ्यांच्या आत लपवुन ( कुठेतरी कोपऱ्यात जाऊन रुमालाने डोळे पुसलेही असतील, कदाचित) सर्वांचे स्वागत, आदरातिथ्य आणि सोबतच आनंद ही लुटत होते ...मान गये ...अन या छोट्याशा कालावधीत व्याह्यांच झालेलं एक गोड नातं ही वेळोवेळी दिसत होतं...हे असे कालानुरूप होणारे चांगले बदल मला आवडतात.... असा हा आनंद सोहळा आता भैरवी कडे जात होता ....सुनील - संगीता वहिनींना पुन्हा भेटून ...फिर मिलेंगे रे ...आवाजात घोगरा स्वर, हस्तांदोलनादासाठी जड हात पुढे, गच्च गळाभेट अन पुन्हा ती आसवे थिजवून निघालो आपापल्या घरी.....पण मदन चं एक निरोपाचं वाक्य मनात घर करुन गेलं ....अरे आता पोरांना पंख फुटलेत आपण भेटायला हवंय अधून मधुन...आणि हो त्यांना आपणच बळ दिलंय उडण्यासाठी, तेंव्हा ते त्या विहारात मग्न असतील....तोवर आपण भेटायला पाहिजे.. काय या नात्याची जादु आहे !! 


या वेळी मुद्दाम फोटो टाकत नाहीये...या शब्दांतून ते तुम्ही अनुभवावेत ही अपेक्षा ....


श्री पेडगावकर व सौ पेडगावकर, मित्र परिवार, सुनील आणि संगीता वहिणींचे वीशेष आभार या साठी की हा सोहळा दैदिप्यमान करुन आम्हा मित्रांना एकत्र येण्याची भेट तुम्ही आम्हाला दिलीत ... आणि या धाग्यात त्यांचे रंग विसरून आमच्यात मिसळुन ज्यांनी या रेशीमगाठी अजून सुंदर सजवल्या त्या आमच्या वहिणीसाहेब सौ स्मिता जोशी, सौ अर्चना पिंपळकर, सौ दिपा देशमुख, सौ वैशाली जोशी ...त्या कधी वहिनी, मैत्रिणी, मित्र अशा विविध भूमिका बजावतात ... आमची सौ अनिता आणि या सर्व जणी या पुण्याहवाचन, संकल्प सिद्धीत मम म्हणुन खंबीर साथ देत आहेत ते या नात्याचं खरं सौंदर्य !! 


शरद पुराणिक

271123

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती